-अविनाश कोळीसहानुभूतीच्या वर्षावापेक्षा कलेला मिळणारी दाद, संगीतातून हृदयांना घातली जाणारी साद त्यांना अधिक आनंददायी वाटते. नेत्रपटलापेक्षा मनपटलावर उमटणाऱ्या आनंदलहरींचा अनुभव त्यांच्या जीवनात रोमांचकारी ठरत असतो. एक-दोन नव्हे, तर अनेक अंध व्यक्तींनी एकत्र येत जगण्याचा आपला मार्ग निश्चित केला. कलेचे शिक्षण घेऊन बाहेर पडणाऱ्या मिरज आणि जिल्ह्यातील डझनभर अंध तरुणांनी एकत्रित येऊन उभारलेला आॅर्केस्ट्रा डोळस घटकांनाही थक्क करणारा आहे. नेत्रांव्यतिरिक्त वाद्यांना साथ देणाºया शरीराच्या अवयवांना जणू डोळे फुटले असावेत असा भास, लिलया वाजणाºया वाद्यांकडे पाहून होत असतो. अंध लोकांचा आर्केस्ट्रा म्हणून कुणी झालेल्या चुका पोटात घ्याव्यात अशी अपेक्षा न ठेवता, अगदी व्यावसायिक कलाकारांच्या तोडीस तोड कला सादर करून लोकांच्या हृदयात वास करण्याचे ध्येय ठेवून हे तरुण पुढे जात आहेत.
सर्वधर्मसमभाव अंध, अपंग सेवाभावी संस्थेमार्फत हा आॅर्केस्ट्रा उभारला आहे. विशेष म्हणजे ही संस्थासुद्धा अंध मुलांमार्फतच चालविली जाते. दावल शेख हे या संस्थेचे अध्यक्षसुद्धा अंधच आहेत. २0१३-१४ मध्ये त्यांनी आॅर्केस्ट्रा उभारून कार्यक्रमांना सुरुवातही केली. हार्मोनिअम, तबला, ड्रम, गिटार, सिंथेसायझर, बासरी, सतार अशा अनेक वाद्यांमधून स्वराविष्कार करणारे हे लोक अंध आहेत, या गोष्टीवर अनेकांचा विश्वासच बसत नाही. तालबद्ध गायकीही यातील काही कलाकारांनी आत्मसात केली आहे. म्हणूनच त्यांची ही कला पाहिली की, संगीतमय दिव्यदृष्टी त्यांना प्राप्त झाल्याची जाणीव प्रत्येकाला झाल्याशिवाय राहत नाही. मुला-मुलींचे हे पथक गेल्या पाच वर्षांत नावारूपास आले. जिल्हा आणि जिल्ह्याबाहेरही त्यांच्या संगीत पथकास बोलावणे येते. कार्यक्रमात कलाकारांना उत्स्फूर्त दाद देणारे अनेक रसिक कार्यक्रम संपल्यानंतरही त्यांचे भरभरून कौतुक करीत असतात.
‘अपना जमाना आप बनाते हैं अहल-ए-दिल, हम वो नहीं की जिनको जमाना बना गया,’ असा संदेश देत हे पथक रसिकांच्या मनात घर करीत, संकटाने खचलेल्या मनांनाही प्रेरणा देत आहे. सुमारे १८ ते २0 वयोगटातील हे सर्व तरुण असून, त्यांनी या संगीत पथकातून संस्थेलाही हातभार लावण्याचे काम केले आहे. प्रत्येक कार्यक्रमामागे मिळणाºया २५ हजार रुपयांमधून वाहतूक व अन्य खर्च वगळता राहणारे पैसे संस्थेत जमा केले जातात. सुरुवातीला तोटा स्वीकारून दोन हजार रुपयांमध्येही कला सादर करणाºया या पथकाला आता अनेकजण पसंती देत आहेत. अनेक प्रकारचे शिक्षण घेऊन नोकरीसाठी भटकणाºया अंध तरुणांचे दु:ख त्यांनीही भोगले आहे. पूर्णत: अंध लोकांना कुठेही नोकरी दिली जात नाही. याच निराशेतून खचलेले अनेक लोक कुटुंबावर अवलंबून राहू लागतात.
अवलंबित्वातून कौटुंबिक समस्या, समस्येतून पुन्हा नैराश्य... असे दुष्टचक्र त्यांच्याबाबत सुरू होते. अंधत्व असले तरी स्वत:च्या पायावर आपल्याला उभे राहता येते, हा आत्मविश्वास या संस्थेच्या माध्यमातून निर्माण झाला. त्यापूर्वी ‘नॅब’नेही याच आत्मविश्वासाचे बीजारोपण त्यांच्यात केले होते. म्हणूनच आत्मविश्वासाचा पाया असलेल्या या पथकाला आता यश मिळत आहे. मिरजेतील काही मोजक्याच, पण चांगल्या लोकांनी संस्थेला मदतीचा हात देण्यास सुरुवात केली आहे. कार्यक्रमाच्या ठिकाणी स्टेजवर सर्व साहित्य मांडण्यापासून अनेक गोष्टी हे कलाकारच करीत असतात. कार्यक्रमाच्या प्रसंगानुरूप त्यांचे सादरीकरण असते. त्यामुळे प्रत्येक कार्यक्रमापूर्वी त्यांना कसून सराव करावा लागतो. जुनेद बेलिफ नावाचा एक अंध नसलेला तरुणही त्यांच्याबरोबर असतो. मदतीचे असे काही हात असले तरीही, उणिवांचा डोंगर त्यांच्यासमोर उभा आहे. ही वाटचाल काटेरी असलीतरी, आत्मविश्वासाच्या बळावर कलेलासुंदर बहर आला आहे. समाजातीललाखो मनांना सुगंधित करीत ते पुढे जात आहेत.(लेखक ‘लोकमत’च्या सांगली आवृत्तीमध्ये वरिष्ठ उपसंपादक आहेत)