रात्री बाराचे ठोके वाजले. तरटाच्या कोठय़ांमधून एकामागोमाग 90 कैदी बाहेर पडले. झुडपात लपले.
तराफ्यात बसून अंदमान बेटावर उतरताच दाट जंगलातून पळत सुटले. त्यातच दूधनाथही होता.
अचानक बाणांचा मारा सुरू झाला. काही जण कोसळले, गतप्राण झाले. दूधनाथला तीन बाण लागले होते. आणखी एक बाण ढुंगणात घुसला. दुस:या दिवशी तो भानावर आला. आजूबाजूला नजर फिरवली तर भोवती नग्न आदिवासींचा गराडा. तोही संपूर्ण नग्न! नकळत आपले हात त्याने लज्जरक्षणासाठी मांडय़ांत घुसवले आणि हुससून रडू लागला.
मधुकर आडेलकर
अखेर 23 एप्रिल 1858 चा दिवस उजाडला. पलायनात सामील झालेल्यांपैकी काही जणांनी आदल्या रात्री 4 वाजेर्पयत जागून खाडीकिनारी छोटय़ा झुडपांत ओंडके बांधून तराफे तयार ठेवले होते.
रात्री बाराचे ठोके जेल चौकीवर वाजवण्यात आले. तरटाच्या कोठय़ांमधून एकामागोमाग 90 कैदी बाहेर पडले आणि झुडपांमधून लपून राहिले. आवाज न करता सर्व तराफे खाडीत ढकलण्यात आले आणि हेरीयट बेटाला वळसा घेऊन, वायपर आयलंडच्या पुढे जाऊन, अंदमान बेटावरच्या पूर्व किना:याच्या झाडीत सर्व जण उतरले.पहाटे साडेतीनच्या दरम्यान अंदमान बेटावर उतरलेले 90 कैदी उत्तर दिशेला तोंड करून दाट जंगलातून पळत सुटले.
जंगल अतिशय दाट, उंच वृक्षांनी वेढलेले. दाट जंगलामुळे दिवसाढवळ्या अंधार, यामुळे त्यांना धड चालणोही कठीण होत होते. पावलापावलाला घसरल्यामुळे थकवा येत होता. संबंध दिवस रखडत रखडत चालून त्यांना छोटे अंतरही कापता आले नाही. झाडपाल्याच्या ओल्या, कुजल्या लगद्यात चालताना त्यांचे पाय गुडघ्यार्पयत फसत होते.
दिवसांमागून दिवस गेले. चौदाव्या दिवशी सकाळी संपूर्ण थकलेले आणि भवितव्याची आशा सोडलेले दोनशेच्या आसपास बंदी रोजच्या सवयीने, अंदाजाने उत्तर दिशेला चालू लागले. एक-दीड तासानंतर त्यांच्यावर अचानक चारी बाजूंनी आजूबाजूच्या झाडांवरून बाणांचा जबरदस्त मारा सुरू झाला. त्या जबरदस्त दणक्याने काही खाली कोसळले, काही गतप्राण झाले. काही विव्हळत पडले, काही दाही दिशांना, वाट मिळेल तिकडे पळत सुटले..
बाण लागून जमिनीवर निपचित मृतवत पडलेल्या बंद्यांमध्ये दूधनाथ तिवारीही होता. (दूधनाथ हा 14 रेजिमेंट, बंगालचा शिपाई. बंडखोरीबद्दल त्याला आजन्मठेपेची सजा सुनावण्यात आली होती.) त्याला डावा खांदा, डावा कोपर, तसेच उजवा खांदा या जागी तीन बाण लागले होते. उजव्या खांद्यावर लागलेल्या बाणाचा दणका एवढा जबरदस्त होता की, तो क्षणात चक्कर येऊन खाली कोसळला. सर्वाची पळापळ व त्यांच्यामागून पटापट झाडावरून उतरलेले डोळे उघडणा:या दूधनाथला दिसले. आदिवासींची चाहूल घेत त्याने उठण्याचा प्रयत्न केला. आजूबाजूला बरेच बंदी मरून पडले होते.
दूधनाथचे सर्व अंग खरचटून निघाले. त्याने पाया पडून गयावया सुरू केली. दूधनाथला ठार करावे या उद्देशाने त्यांच्यापैकी एकाने त्याच्यावर जवळून बाण मारला. प्रचंड वेदना देत तो बाण त्याच्या ढुंगणात खोलवर रुतून बसला. बाण मारणा:या आदिवासीने खोल रुतलेला बाण जोराने खेचून काढला. वेदनांमुळे तो रडू लागला. बाजूला उभा असलेला त्यांच्या टोळीचा नायक पोटिहा याचे पाय गच्च पकडून तो गयावया करू लागला. त्याच्या डोळ्यांतील अश्रूंनी नायकाचे दोन्ही पाय भिजले. तेवढय़ात काय चमत्कार घडला कुणास ठाऊक, कदाचित नेत्रपल्लवीच्या भाषेत त्याला जीवदान द्यायचे असे नायकाने इतरांना सांगितले असावे. लगेच दोन आदिवासींनी त्याच्या दोन्ही काखांत हात घालून त्याला उभे केले आणि होडय़ांच्या दिशेने ते त्याला नेऊ लागले. त्याच्या पायात अजिबात शक्ती नव्हती. त्यामुळे त्याला किना:याच्या रेतीतून फरफटत नेत ते एका होडीजवळ पोहोचले. चारपाच आदिवासींनी त्याला हळूवारपणो उचलून डोंगी होडीच्या तळाशी झोपवले. त्यांच्या बरोबरच्या एका नग्न स्त्रीने दूधनाथच्या चेह:याला, मानेला सफेद माती पाण्यात भिजवून चोपडली आणि दुस:या स्त्रीने भिजवलेल्या लाल मातीचा लेप त्या जखमांना व अंगाला लावला. त्या लेपामुळे आणि रगडल्यामुळे त्याची शुद्ध केव्हा हरपली ते त्याला समजलेच नाही. त्याला घेऊन आदिवासींच्या सर्व होडय़ांचा ताफा टूरमंगलू बेटाच्या दिशेने वेगाने रवाना झाला.
दुस:या दिवशी सकाळी त्याला हळूहळू जाग येऊ लागली; तसा तो कण्हू लागला. त्याच्या भोवती जमलेल्या आदिवासींनी एकच कालवा केला.
त्याचे सर्व अंग ठणकत होते. उताण्या अवस्थेत बराच काळ तो निपचित पडून होता. त्याने डोळे उघडण्याचा प्रयत्न केला; पण पापण्या जड झाल्या होत्या. हळूहळू त्याला पूर्ण जाग आली. काही वेळाने हनुवटीवर दाब पडल्यासारखे त्याला वाटले. तोंड थोडे उघडले गेले आणि पाण्याची हळूवार धार त्याच्या घशार्पयत आली. पहिला घोट त्याने मोठय़ा कष्टाने घेतला. बरे वाटले. त्यानंतर येणारी पाण्याची धार तो घटाघट प्यायला. सर्व शरीरभर चैतन्य आले. त्याच्या तोंडावरून कुणी तरी पाणी फिरवले. तेच राकट हात डोळ्यांना पाण्याचा ओलावा लावत होते. हळूहळू तो भानावर आला.
त्याने डोळे उघडले. आजूबाजूला हळूच नजर फिरवली.. आणि तो एकदम दचकला! त्याच्या भोवती नग्न आदिवासींचा गराडा पडला होता. त्यात स्त्रीपुरुष व मुलेमुली, अंगावर कपडय़ाची चिंधीही न पांघरता नग्न शरीराने सभोवार घोळका करून उभी होती. त्याला नारळाच्या करवंटीने पाणी पाजणारा माणूस त्याच्याजवळ ओणवा होऊन आपल्या भाषेत काही विचारण्याचा प्रयत्न करत होता. त्याला काही अर्थबोध होईना.
दूधनाथने उठण्याचा प्रयत्न केला. सर्व अंग बधिर झाले होते. शरीरभर तेल लावलेले होते. त्याच्या उग्र दर्पाने त्याला मळमळून उलटी येईल असे वाटू लागले. झाडाच्या पानांच्या बिछायतीवर तो पहुडला होता. त्याची नजर खाली गेली आणि लक्षात आले की तोही संपूर्ण नग्न होता!
नकळत आपले हात लज्जरक्षणासाठी त्याने दोन्ही मांडय़ांत घुसवले. शरमेने मान खाली झाली. डोळ्यांत पाणी जमा झाले. तो हुससून रडू लागला. क्षणभर त्याला स्वत:ची कीव आली; संतापही आला! बेभान होऊन तो उठून उभा राहिला. तत्क्षणी जमाव थोडा मागे हटला.
त्याने पाहिले, तो समुद्रकाठी नग्न आदिवासींनी चारी बाजूंनी वेढलेल्या घोळक्याच्या मध्यभागी उभा होता. जवळच छोटी छोटी झुडपे होती. डोळ्याचे पाते लवण्याच्या आत त्याने झुडपात घुसून स्वत:चा नग्न देह लपवला. आपला संपूर्ण नग्न देह, आजूबाजूला नग्न आदिवासी.. तो अगतिक होऊन कपाळ बडवून ओक्साबोक्शी रडू लागला.
झुडपातून त्याला काही अंतरावर समुद्राच्या उसळणा:या लाटा दिसत होत्या. धावत जाऊन त्या लाटांत स्वत:ला झोकून द्यावे आणि जीवनाचा अंत करावा असे क्षणभर त्याला वाटले. पण झुडपाच्या आजूबाजूला आदिवासी त्याच्यावर पाळत ठेवून उभे होते. त्याला काय करावे हे समजेना. सर्व ताकद लावून तो पटकन खाली बसला आणि आपल्या जांघांत दोन्ही हात घुसवून लज्जरक्षणाचा व्यर्थ प्रयत्न करू लागला. त्याचा चेहरा केविलवाणा झाला. दोन्ही डोळ्यांत अश्रू दाटून आले. समोरचे काही दिसेना.
तेथील स्त्रिया, मुले व पुरुषांसमोर आपण नग्नावस्थेत आहोत ही त्याची व्यथा, पिढय़ान्पिढय़ा नग्नावस्थेतच जीवन घालवलेल्या आदिवासींना अनाकलनीय होती. त्या सर्वाना वाटले की, अंगावर असलेल्या बाणांच्या खोल जखमा व ताप यांमुळे त्याची ताकद क्षीण झालेली आहे.
खाली फतकल मारून बसलेल्या दूधनाथला त्यांनी उचलून झोपडीच्या कोप:यात नेले आणि झाडाच्या पानांचा जाड गालिचा करून त्यावर नेऊन झोपवले. भिंतीकडे तोंड करून, पाय पोटाशी दुमडून तो धुससून धुमसून रडू लागला.
प्रत्येक हुंदक्याबरोबर त्याचे गदगद हलणारे शरीर पाहून झोपडीत असलेल्या सर्व आदिवासी मुली हातांत कासवाच्या पाठीच्या कवचातून कासवाचे तेल व लाल माती घेऊन आल्या. भिंतीला तोंड करून झोपलेल्या दूधनाथला सर्वानी मिळून उताणा केला. दोन्ही बाजूंना बसून त्या मुलींनी कासवाच्या तेलात माती मिसळून त्याच्या अंगाला फासली आणि जोराने रगडायला सुरुवात केली.
हा उपचार किती वेळ चालू होता हे दूधनाथला समजलेच नाही. थोडय़ाच वेळात तो गाढ झोपी गेला..
‘अंदमान’ आणि ‘काळे पाणी’ या विषयाने झपाटलेले एक स्वयंसिद्ध संशोधक, अभ्यासक आणि मनस्वी इतिहासयात्री म्हणजे मधुकर आडेलकर. सध्या ते 82 वर्षाचे आहेत. 14 वर्षापूर्वी पर्यटक म्हणून त्यांनी अंदमान बेटांना भेट दिली आणि या विषयानं त्यांना झपाटलंच. तत्कालीन ब्रिटिश सरकारनं 1858 पासून अंदमान येथे ‘काळापाणी वसाहत’ उभारून राजबंद्यांवर अनन्वित अत्याचार केले. 10 मार्च 1858 रोजी अंदमानात एस. एस. सेमिरामीस या पहिल्या बोटीने नांगर टाकून 2क्क् राजबंद्यांना पोहोचवले. त्या दिवसापासून देश स्वतंत्र होईर्पयत अंदमानच्या बेटावर राजबंद्यांनी अनन्वित अत्याचार सोसले. ‘काळे पाणी म्हणजे काय? तिथे नेमके काय झाले?’ हा सारा इतिहास एका संशोधकाच्या वृत्तीने त्यांनी शोधून काढला. तोच हा सारा थरारक इतिहास त्यांच्या ‘क्रांतितीर्थ - मु. पो. काळापाणी, अंदमान 714101’ या पुस्तकाद्वारे प्रसिध्द होत आहे.
‘शहीद प्रकाशन’ तर्फे 1 मे रोजी हे पुस्तक प्रकाशित होत आहे. त्यानिमित्त या पुस्तकातील ‘नग्नठेप’ या प्रदीर्घ प्रकरणाचा संपादित सारांश.