- मनोज गडनीस
टॅक्सी ड्रायव्हरचा पगार किती?
शहर, काम, कंपनी आणि ‘प्रतिष्ठे’नुसार पाच हजार ते फार फार तर 25 हजारांर्पयत.
.पण महिना एक लाख?
माहिती तंत्रज्ञान क्रांतीनं हे प्रत्यक्षात आणताना इंटरनेटच्या माध्यमातून टॅक्सी सेवेचा एक नवा उद्योगही जन्माला घातला आहे.
परवडणा:या दरात वातानुकूलित ‘पंचतारांकित’ सेवेमुळे अनेकांनी आपली कार खरेदी गुंडाळून ठेवली आहे, तर साडेचार लाख कोटींची उलाढाल असलेल्या वाहन उद्योगाच्या
पोटातही गोळा आणला आहे.
ऑफिसमधून घरी जाताना एका मोठय़ा सिग्नलवर बाजूला बेस्टची एक बस उभी होती. सहज त्या बसवरच्या जाहिरातीकडे लक्ष गेले आणि अवाक्च झालो. चक्क एका रेडिओ टॅक्सी कंपनीची जाहिरात आणि त्यावर संदेश होता की, ‘आमचे ड्रायव्हर व्हा आणि महिन्याला एक लाख रुपये मिळवा!’
..क्षणभर विश्वासच बसेना.
ज्या देशात दरडोई सरासरी वार्षिक उत्पन्न हे तीन लाख रुपये आहे किंवा कितीही नामांकित कंपनी असली तरी जिथे ड्रायव्हरचा कमाल पगार हा महिन्याला 22 ते 25 हजार रुपये आहे, अशा देशात ड्रायव्हरला तब्बल एक लाख रुपये पगार? (यामध्ये ड्रायव्हर मित्रंचा उपमर्द करण्याचा कोणताही हेतू नाही.) पण आश्चर्य वाटले, कुतूहल वाटले आणि खरंच प्रगती होत आहे, असा विचार मनात आला. पण त्या पाच आकडी पगाराचे कुतूहल काही शमेना. म्हणून मग या विषयाचा शोध सुरू झाला आणि ‘टॅक्सी’ या वर्षाकाठी 23 हजार कोटी रुपयांची उलाढाल असलेल्या उद्योगाच्या अनेक रंजक बाबी समोर आल्या.
टॅक्सी या विषयातील माहिती विविध कंगोरे जसजसे उलगडण्यास सुरुवात झाली तसतसा एक विचार मनात बळावत गेला..
थँक्स टू द रिव्होल्यूशन इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी !
माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून किंवा विशेषत: सॉफ्टवेअर या प्रचलित शब्दाने कात टाकून ‘अॅप’ ही पुढची पातळी गाठली आणि ही अॅपसेवा थेट स्मार्टफोनमध्ये अवतरल्यावर केवळ टॅक्सी मिळवणोच सुलभ झाले असे नव्हे, तर तंत्रज्ञानामुळे देशातील संपूर्ण टॅक्सी उद्योगाचा कायाकल्प होताना दिसत आहे. स्पर्धेत टिकून राहण्यासाठी वृत्तीत सुधार न दाखविणा:या परंपरागत टॅक्सीचालकांना तर दणका बसण्यास सुरुवात झाली आहेच, पण या दणक्यांचे ‘आफ्टर शॉक्स’ आता वाहन उद्योगालाही जाणवायला लागले आहेत. ओला कॅब, टॅक्सी फॉर शुअर, उबर अशा इंटरनेटच्या माध्यमातून टॅक्सी सेवा देणा:या या कंपन्यांमुळे एक नवा उद्योग जन्माला आला असून, आता या उद्योगाने चांगलेच बाळसे धरले आहे.
या विषयाचे आणखी एक निमित्त म्हणजे, महिन्द्रा आणि महिन्द्रा या देशातील एका अग्रगण्य उद्योगसमूहाचे मालक (महिन्द्रा वाहन उद्योगातही आहे) आनंद महिन्द्रा यांच्यासारख्या द्रष्टय़ा उद्योगपतीने या रेडिओ टॅक्सीमुळे वाहन क्षेत्रला नेमका कसा धोका निर्माण होईल, हे ओळखतानाच यासंदर्भात नुकतेच नेमके भाष्य केले आहे. त्यांच्या मते रेडिओ टॅक्सी हा प्रकार चांगलाच जोर धरत असून, भविष्यात याचा फटका वाहन उद्योगाला बसू शकतो. महिन्द्रा यांच्यासारख्या उद्योगपतीने केलेले हे भाष्य अशासाठी महत्त्वाचे आहे की, आज केवळ 23 हजार कोटी रुपयांची वार्षिक उलाढाल असलेल्या एका टॅक्सी उद्योगाने वर्षाकाठी चार लाख 38 हजार कोटी रुपयांची उलाढाल असलेल्या वाहन उद्योगाच्या पोटात गोळा आणला आहे. याचीही कारणो या लेखाच्या निमित्ताने तपासण्याचा प्रयत्न केला आहे.
मुळात इ-टॅक्सी किंवा रेडिओ टॅक्सी हा प्रकार जगात नवीन नाही. अमेरिका, कॅनडा, आखाती देश, युरोप आदि ठिकाणी ही सेवा गेल्या दशकभरापासून सुरू आहे. भारतामध्ये चार वर्षापासून ही सेवा सुरू झाली आहे. या कंपन्यांनी कॉम्प्युटरवरून वापरल्या जाणा:या इंटरनेटच्या माध्यमातून ही सेवा सुरू केली. पण जसजशी स्मार्टफोनची संख्या वाढली तसतसे या कंपन्यांनी अॅपच्या माध्यमातून आपल्या सेवेचा विस्तार केला. परदेशात अशा टॅक्सी हा तिथल्या लाइफस्टाईलचा भाग आहे. किंबहुना, या टॅक्सीसेवेमुळे अनेकांनी आपली वाहन खरेदी योजनाही गुंडाळून ठेवली आहे.