संदीप बावचे -
सुपीक जमीन, बारमाही पाणी,
मुबलक उत्पादन..
तरीही शेतमालाला भाव नाहीच.
अनेक प्रयोग झाले,
शेवटी शेतकऱ्यांनीच आपला
सहकारी संघ स्थापन केला.
कोल्हापूर जिल्ह्याच्या शिरोळ तालुक्यातील नांदणीचा हा संघ.
अशा प्रकारचा राज्यातला
हा ‘पहिला’ महत्त्वाचा प्रयोग.
यापासून पे्ररणा घेऊन
नंतर राज्यातही असे
अनेक संघ निर्माण झाले.
शेतमाल आणि शेतकऱ्यांच्या भाजीपाल्याला योग्य भाव न मिळणं हे सगळीकडेच. शेतकऱ्यांनी कितीही आवाज उठवला, कोणीही कितीही कणव दाखवली तरी त्यात काहीच फरक पडत नाही ही वस्तुस्थिती. आजही त्यात काहीच फरक पडलेला नाही. राज्यात काही ठिकाणी काही शेतकऱ्यांनी मात्र हिमतीनं दुसरा रस्ता पकडला आणि आपल्यावरील अन्यायावर आपणच रस्ता शोधला.
कोल्हापूर जिल्ह्याच्या शिरोळ तालुक्यातील नांदणी हे त्यातलं एक उत्तम उदाहरण.
आपल्या शेतमालाला योग्य दर मिळावा यासाठी शेतकऱ्यांनी स्वत:च पुढे येऊन नांदणी भाजीपाला व फळफळावळ उत्पादक सहकारी संघ स्थापन केला आणि त्या माध्यमातून आजवर चाललेली शेतकऱ्यांची कोंडीही फोडली. राज्यातील शेतकऱ्यांसाठी हा प्रयोग म्हणजे रोल मॉडेलच ठरला. त्यापासून पे्ररणा घेऊन शिरोळ तालुक्यातच नव्हे तर राज्यातही अनेक असे संघ निर्माण झाले आहेत.
महाराष्ट्रातील पहिला नोंदणीकृत भाजीपाला संघ म्हणून नांदणी भाजीपाला व फळफळावळ उत्पादक सहकारी संघाचा उल्लेख होतो़
अशी झाली संघाची स्थापना
शिरोळ तालुक्यातील सुपीक जमिनी व बारमाही मुबलक पाणी. सुरुवातीला खरं तर ही इष्टापत्तीच शेतकऱ्यांच्या मुळावर उठली. कारण शेतीसाठी उत्तम वातावरण असल्यामुळे शेतकरी फळे, भाजीपाला अशा नगदी पिकांकडे वळाला़ अर्थातच या क्षेत्रात भाजीपाला पिकांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होऊ लागले. त्यामुळे व्हायचं तेच झालं. मागणी कमी आणि पुरवठा जास्त! अतिरिक्त मालामुळे स्थानिक बाजारपेठांमध्ये भाजीपाल्याचे दर धडाधड कोसळू लागले. त्याची विक्रीही होईनाशी झाली.
आता काय करावं? काहींनी त्यातूनही पर्याय काढला. पाच-सहा शेतकऱ्यांच्या समूहाव्दारे उत्पादित भाजीपाला पुणे येथील बाजारपेठेत विक्री केला जाऊ लागला़ परंतु या पद्धतीमध्ये आवश्यक पॅकिंग मटेरियलचा पुरवठा, वाहतूक याचे नियोजन करणे अडचणीचे होत होते. तसेच याठिकाणीही मालाची मोठी आवक होत असल्याने मालाची विक्री होईनाशी झाली़ शेतकऱ्यांनी मग मुंबईचा मार्ग धरला. त्याच धर्तीवर पाच-सहा शेतकऱ्यांच्या समूहाद्वारे उत्पादित भाजीपाला मुंबईच्या बाजारपेठेत जाऊ लागला़ उत्पादित माल काढण्याचे नियोजन, पॅकिंग मटेरियल, वाहतूक त्याचबरोबर वाहनासोबत जाऊन दलालामार्फत मालाची विक्री करून रक्कम रोखीने घ्यावी लागत होती़
या साऱ्याच बाबी जोखमीच्या होत्या. सारे पर्याय थकल्यावर शेतकऱ्यांच्या लक्षात आले, आपली स्वत:चीच भाजीपाला संस्था असली तरच त्यातून काही मार्ग निघू शकेल. त्याच गरजेतून ३ नोव्हेंबर १९८६ रोजी नांदणी भाजीपाला उत्पादक संघाची स्थापना झाली़ आप्पासाहेब भगाटे, अण्णासाहेब नरदे, म्हमूलाल शेख, आप्पासाहेब पाटील-सावंत्रे, अण्णासाहेब गुरव, रामचंद्र म्हेत्रे, चंद्रकांत नलवडे, महावीर पाटील, मधुकर गरड, विश्वनाथ निशाणदार इत्यादि शेतकऱ्यांनी हा संघ स्थापनेसाठी पुढाकार घेतला आणि शेतकऱ्यांची स्थिती पालटण्यास सुरुवात झाली.
हा मार्गही सोपा नव्हताच. पण शेतकरी ठाम होते. कष्ट घेण्याची, शिकण्याची तयारी होती. त्यांनी दलालांना मागे सारलं. जे जे आवश्यक ते ते सारं स्वत:च जमा केलं. अभ्यास केला. त्यात काही काळ गेला, पण संघ आता स्वबळावर वाटचाल करतो आहे.
शेतमालाची देशभरात विक्री
संघाकडे स्वत:चा संगणक, फॅक्स, इंटरनेट सेवा आहे़ या सेवेमार्फत देशांतर्गत बाजारपेठा, तिथल्या भाजीपाल्याचा बाजारभाव, आवक याबाबत दैनंदिन माहिती घेतली जाते़ त्यानुसार देशातील कोलकता, दिल्ली, मुंबई, बडोदा, अहमदाबाद, राजमंड्री, नागपूर, रायपूर, पुणे अशा बाजारपेठांमध्ये भाजीपाला पाठवला जातो़
संबंधित शेतकरी माल काढणीच्या आदल्या दिवशी अथवा काढणीच्या दिवशी सकाळी ८ वाजेपर्यंत मालाची नोंद करतात़ त्यानुसार वाहतुकीकरीता गाड्यांचे व बाजारपेठांचे निश्चितीकरण केले जाते़ प्रत्येक गाडीत माल भरण्याकरीता हमाल देऊन गाड्या संकलन मार्गावर पाठविल्या जातात़ संस्थेकडे करारबद्ध असणाऱ्या कोणत्याही दलालाकडे माल पाठविण्याचे, निवडीचे स्वातंत्र्य उत्पादक शेतकऱ्यांना आहे़
पट्टी पेमेंट
शेतकऱ्यांचा भाजीपाला संघामार्फत थेट मोठ्या बाजारपेठेत पाठविला जातो़ तत्पूर्वी संघामार्फत त्या त्या बाजारपेठांमधील दलालांचे सर्वेक्षण केले जाते़ प्रमुख दलालांशी करार केले जातात़ संबंधित दलालांकडून वेळच्या वेळी पेमेंट डीडी़द्वारे जमा होते़ हे पेमेंट जमा झाल्यानंतर संबंधित शेतकऱ्यांनी संघाकडून क्रेडिटवर माल घेतला असल्यास त्याची कपात करून स्थानिक बँकेच्या धनादेशाने पेमेंट केले जाते़ यालाच संघाने ‘पट्टी पेमेंट’ असे नाव दिले आहे़ यामुळेच भाजीपाला संघाची विश्वासार्हता आजही कायम आहे़
शेतकऱ्यांचे खासगी संघही कार्यरत
आज नांदणीत एका सहकारी संघाबरोबरच तीन खासगी संघ आहेत़ नांदणीबरोबरच कोथळी, दानोळी, कुरुंदवाड यांसह तालुक्यातील काही गावात खासगी संघ स्थापन झाले आहेत़ या संघांमार्फत भाजीपाला मोठ्या बाजारपेठेत पाठविला जातो़
नांदणी सहकारी भाजीपाला संघाच्या माध्यमातून १९९८ ते २००५ या काळात सांगोला परिसरातून डाळींब तर सांगली जिल्ह्यातून द्राक्षे खरेदी केली जात होती़ ही फळे लंडन, आखाती देश या ठिकाणी निर्यात केली जात होती़ कोल्ड स्टोरेज पद्धतीमुळे निर्यात करणे शक्य होऊ शकले़ मात्र राजकीय इच्छाशक्ती व शासकीय धोरणाअभावी २००५ नंतर निर्यात बंंद झाली़
येथील शेतमालाच्या विक्रीचा प्रवासही रंजक आहे.
कृष्णा, पंचगंगा, वारणा नद्यांना बारमाही पाणी उपलब्ध झाल्याने १९८० सालापासून तालुक्यामध्ये भाजीपाला उत्पादनास प्रारंभ झाला़ फ्लॉवरबरोबर टोमॅटो, ढबू मिरची, कोबी, पपई, केळी, भुईमुग शेंग, पांढरी काकडी या भाजीपाल्याचे उत्पादन घेतले जात होते़ कालांतराने फ्लॉवर, ढबू मिरची, पांढरी काकडी
या तीन फळभाज्या मुंबईबरोबरच नागपूर, रायपूर, अहमदाबाद या बाजारपेठेत पाठविल्या जाऊ लागल्या़ पूर्वी दिल्ली, विशाखापट्टणम, हैदराबाद, आंध्र प्रदेश, कोलकाता या ठिकाणी भाजीपाला जात होता़ सध्या मुंबईतील वाशी नाका ही बाजारपेठ प्रमुख ठरली आहे़ शिरोळ, हातकणंगले बरोबरच बेळगाव जिल्ह्यातील शेतकरीही नांदणीतील भाजीपाला संघाच्या माध्यमातून भाजीपाला पाठवितात़ या संघाची वार्षिक उलाढाल सुमारे वीस कोटी रुपयांची आहे.