- मनस्विनी प्रभुणे-नायक
अतिशय प्रभावी मानल्या जाणाºया चित्रपट क्षेत्राने वेगवेगळ्या टप्प्यावर आपली कात टाकली. मूकपटापासून सुरू झालेला चित्रपटाचा प्रवास आज डिजिटल क्र ांतीमुळे अधिकच वेगवान झालाय. १८९५ला ल्युमिअर बंधूंनी फ्रान्समध्ये पहिल्या चलचित्राचं प्रदर्शन केलं आणि साºया जगाला या चलचित्राची भुरळ पाडली. जो तो या प्रयोगाने प्रभावित झाला. मनोरंजन क्षेत्रात नजीकच्या काळात क्र ांती घडणार आणि त्याच्याच या पाऊलखुणा म्हणून या प्रयोगाकडं बघितलं जाऊ लागलं. त्यानंतर बरोबर अठरा वर्षांनी भारतात दादासाहेब फाळके यांनी राजा हरिश्चंद्र नावाने चाळीस मिनिटांचा मूकपट प्रदर्शित करून भारतीय चित्रपटसृष्टीचा पाया रचला. शंभरहून अधिक वर्षांच्या इतिहासाकडे बघत असताना, इथली स्थित्यंतरं अनुभवत असताना अचंबित व्हायला होतं. एक मोठा समृद्ध पट डोळ्यासमोर उभा राहतो तो या साºया इतिहासाचे जतन करणाºया राष्ट्रीय फिल्म संग्रहालय (एनएफएआय) या संस्थेमुळे. चित्रपटांचे जतन करणारी भारतातील ही एकमेव संस्था आहे. चित्रपट क्षेत्रातील अनेक दिग्गज मान्यवर वास्तूत आपलं पाऊल टाकण्यापूर्वी या वास्तूला नमन करतात.मुंबई आणि सिनेमा यांचं एक अतूट नातं आहे; पण पुण्याचंदेखील तितकंच महत्त्वाचं आणि मोलाचं योगदान आहे. १९३०ला मूकपटाचा काळ संपत असताना व्ही. शांताराम-दामले-फत्तेलाल-धायबर या मित्रांनी मिळून कोल्हापूरमध्ये सुरू केलेला प्रभात स्टुडिओ पुण्याला हलवला आणि पुण्यात मराठीबरोबर हिंदी चित्रपटांची निर्मिती सुरू झाली. कुंकू, धर्मात्मा, शेजारी, संत तुकाराम, माणूस अशा एकापेक्षा एक सरस चित्रपटांची निर्मिती इथे होऊ लागली. प्रभात स्टुडिओ पुण्यात येणे ही पुण्याच्या सांस्कृतिक जीवनाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची अशी घटना होती.पुढे सत्तावीस वर्षात ४६ चित्रपटांची निर्मिती करून हा स्टुडिओ बंद पडला आणि याच जागी फिल्म अॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट सुरू झाले आणि त्यानंतरच्याच वर्षात १९६४ साली राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयदेखील जवळच्याच परिसरात उभं राहिलं. भारतीय चित्रपटसृष्टी बहरत होती. भारतीय भाषांमध्येही अनेक उत्तोमत्तम चित्रपटांची निर्मिती होऊ लागली. पण या सगळ्या चित्रपटांचा संग्रह करणाºया, जतन करणाºया यंत्रणेची गरज होती. १९६४साली भारत सरकारच्या सूचना प्रसारण मंत्रालयाच्या माध्यमातून पुण्यात राष्ट्रीय फिल्म संग्रहालयाची स्थापना करण्यात आली.जागतिक पातळीवर चित्रपट जतनाचे होत असलेले निरनिराळे प्रयोग बघून १९५१ साली पाटील कमिशनने राष्ट्रीय फिल्म संग्रहालय करावं अशी शिफारस केंद्र सरकारला केली होती. प्रत्यक्ष ती पूर्णत्वास यायला १९६४चं वर्ष उजाडावं लागलं.इथे नुसतंच चित्रपटांचं जतन आणि संग्रहाचं काम होत नाही तर चित्रपटांशी संबंधित आणि चित्रपटांशी थेट संबंध नसलेल्या; पण एखादं दृकश्राव्य चित्रण जे काळाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचं ठरतं अशी चित्रणंदेखील इथे संग्रहित करून ठेवण्यात आली आहेत. अगदी मूकपट काळातील चित्रपटांचे रिळ जतन करण्याचे काम एनएफएआयने केले. आज चित्रपटविषयक अभ्यास करणाºया अनेकांना या सगळ्या मौल्यवान ऐवजाचा मोठा उपयोग होतो. विशेषत: चित्रपटविषयक विविध प्रकारचे शिक्षण घेणाºया विद्यार्थ्यांना याचा खूप उपयोग होतो.चित्रपटाचं तंत्रज्ञान झपाट्याने बदलत असताना एनएफएआयलादेखील अनेक बदल घडवून आणावे लागले. सेल्युलाइड (रिळं) ते डिजिटल असा प्रवास सहज सोपा नव्हता. जुनी रिळं जतन करून ठेवण्याच्या कामात अनेक टप्पे आहेत. हवेतील आर्द्रतेचा या रिळांवर लगेच परिणाम होतो म्हणून एक विशेष पद्धतीचं तंत्रज्ञान इथे विकसित करावं लागलं. फिल्म जतन करायला चार महिन्यांचा अवधी लागतो. यात फक्त फिल्म म्हणजेच चलचित्र जतन करण्याचं काम नसतं, तर त्याचा आवाजही बघावा लागतो. कृष्णधवल रिळं १५ डिग्री सेल्सिअस तापमान आणि ५० टक्के सापेक्ष आर्द्रतेमध्ये जतन करून ठेवण्याची सगळी व्यवस्था एनएफएआयमध्ये आहे. फिल्म कोणत्या प्रकारची आहे त्यावर ती जतन करून ठेवण्याची पद्धत ठरते. भारतीय भाषांमधील एकोणीस राज्यांतील वेगवेगळ्या प्रकारच्या फिल्म्स इथे जतन करण्यात आल्या आहेत. दोन लाखांहून अधिक फिल्म जतन करता येईल इतकी क्षमता एनएफएआयमध्ये आहे.एनएफएआयमध्ये पाय टाकताच अलिबाबाच्या गुहेमध्ये शिरल्यासारखं वाटतं. चित्रपटसंबंधी अनेक गोष्टी इथे आहेत ज्यांचा नुसता संख्यात्मक उच्चारदेखील आपल्याला थक्क करून सोडतो. चित्रपटांशी संबंधित वेगवेगळ्या प्रकारची छायाचित्रच नुसती १,२७,६८७ इतकी आहेत. अनेक दुर्मीळ छायाचित्र आहेत जी आज फक्त इथेच बघायला मिळू शकतात. मोठमोठ्या चित्रकारांनी पूर्वी चित्रपटांची पोस्टर्स आपल्या कुंचल्यातून रंगवली होती. आज डिजिटल पोस्टर्स बनतात. पण काही वर्षांपूर्वीपर्यंत ही पोस्टर्स कोणा चित्रकाराकडून बनवून घेतली जायची. १९४२ सालापासूनची २३,७४८ इतकी वेगवेगळ्या आकारातील पोस्टर्स जतन करून एनएफएआयने काळाच्या पडद्याआड गेलेल्या कलेला सिनेरसिकांसाठी सांभाळून ठेवलं आहे. चित्रपट गीतांच्या पुस्तिका हा असाच आगळावेगळा प्रकार प्रचलित होता. काळ बदलत गेला तसा तोही अस्तित्वहीन झाला. पूर्वी चित्रपट प्रदर्शित झाले की त्या चित्रपटातील सर्व गाण्यांच्या पुस्तिका प्रकाशित केल्या जायच्या. रसिक मुद्दाम या पुस्तिका विकत घ्यायचे. १४२१० गाण्यांच्या पुस्तिका या संग्रहात आहेत. यासर्व ऐवजाला एक ऐतिहासिक महत्त्व आहे.सर्वात मोठे ग्रंथालयजगभरातील चित्रपटविषयक पुस्तकं एनएफएआयच्या ग्रंथालयात वाचायला मिळतात. २९,०००हून अधिक चित्रपटांशी संबंधित पुस्तकांचा मोठा अमूल्य असा खजिना इथे आहे. यात अनेक दुर्मीळ अशी पुस्तकं वाचायला मिळतात. यातील अनेक पुस्तकांना डिजिटल रूप देण्यात आलं आहे. ज्यांना केंद्रीय बोर्डाचं प्रमाणपत्र लाभलंय अशा एकतीस हजारांपेक्षा जास्त पटकथा इथे ग्रंथालयात आहेत. सत्यजित रे यांनी हाताने लिहिलेली पाथेर पांचालीची स्क्रिप्ट बघण्यासारखी आहे.नॅशनल हेरिटेज मिशनया मिशन अंतर्गत आजपर्यंत जतन करण्यात आलेल्या एक लाख बत्तीस हजार चित्रपट रिळांचे डिजिटलाझेशन करणं, त्याचं संवर्धन करणं अशा कामांचे उद्दिष्ट एनएफएआयला देण्यात आलं आहे. यामुळे खूप मोठा दुर्मीळ संग्रह अधिक चांगल्या पद्धतीने जतन केला जाईल.आजच्या घडीला येथे अनेक महत्त्वाचे प्रकल्प, चित्रपटविषयक वेगवेगळे उपक्र म सुरू आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये इथे अनेक महत्त्वाचे चित्रपटमहोत्सव होऊ लागलेत. पुण्याला महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हटलं जातं; पण याच पुण्याला जागतिक सिनेमाची ओळख करून देण्याचं काम एनएफएआयने केलं. पुण्याच्या सांस्कृतिक जडणघडणीमध्ये एनएफएआयचा वाटा खूप मोठा आहे.(लेखिका चित्रपट अभ्यासक आणि पत्रकार आहेत.)manthan@lokmat.com
दुर्मीळ गोष्टींचा खजिना !फक्त फिल्म्सच नाहीतर चित्रपटविषयक साºया दुर्मीळ गोष्टी मिळवण्याचा आमचा प्रयत्न असतो. गोविंद अडिवरेकर या चित्रपट रसिकाकडे चित्रपटांच्या हॅण्डबिलांचा संग्रह होता. यात १९३७च्या व्ही. शांताराम यांच्या कुंकू, मा. विनायक यांच्या छाया (१९३६) आणि विलासी ईश्वर (१९३५) यांसारख्या जुन्या दुर्मीळ चित्रपटांची हॅण्डबिल्स होती. हा त्यांचा सगळा संग्रह नुकताच त्यांनी एनएफएआयला दिला असून, रसिकांना बघायला तो उपलब्ध आहे. प्रथमेश बारूआ दिग्दर्शित १९३६ सालच्या देवदास चित्रपटाची मूळ रिळं बांग्लादेशात होती. बांग्ला देशातील माहिती प्रसारण खात्याच्या मदतीनं ही फिल्म एनएफएआयकडे परत आली. १९१९ सालचा बिल्वमंगल हा मूकपट फ्रान्सकडून मिळाला. याशिवाय ॠत्विक घटक यांच्या पूर्ण न होऊ शकलेल्या कातो अजानारे (१९५९), बागलार बांगदर्शन (१९६३) आणि रांगेर गुलाम (१९६८) या चित्रपटांची काही रिळं मिळाली आहेत.- प्रकाश मगदूम, एनएफएआयचे संचालक