- श्रीमंत मानेजगाच्या कानाकोपऱ्यात जणू धर्माच्या नावावर हिंसाचाराने थैमान घातले आहे. कट्टरता वाढते आहे. धर्माभिमान टोकदार बनलाय. इतरांच्या श्रद्धांचा आदर या मूळ तत्त्वाचा विसर पडलाय. प्रत्येकाला आपल्या धर्माचा प्रभाव इतरांवर हवा आहे. त्यासाठी निष्पापांचे बळी घेतले जात आहे. लहान मुलांचे खेळण्याचे बगिचे, त्यांच्या शाळा, इतकेच कशाला मंदिरे, मशिदी, चर्च अशा प्रार्थनास्थळांमध्येही रक्ताचा सडा पडल्याच्या घटना घडताहेत. हिंसेमुळे विस्थापित झालेल्या बायाबापड्यांचे जत्थे ते जिथे जन्मले, वाढले, स्वप्ने पाहिली तो भूभाग, घरेदारे सोडून जिवाच्या आंकाताने सैरावैरा धावताहेत. आता तर निर्वासितांच्या छावण्यांवरही बॉम्ब टाकण्यापर्यंत मजल गेलीय. हे सारे विषण्ण करणारे आहे खरे. पण, संजीवन नाशातून उमलते, प्रकाश अंधारातून प्रसवतो, हा विचार केला तर खरा धर्म सामान्यांना समजून सांगण्यासाठी हीच योग्य वेळ आहे. हीच वेळ आहे, प्रेम, अहिंसा, बंधूभाव, शांततेचा संदेश देण्याची आणि जगाला ठणकावून सांगण्याची की धर्म माणसांनीच तयार केले आहेत, उपदेश, सिद्धांत, आचरण हेच सांगते की धर्म म्हणजे सकल जनांच्या कल्याणाचा मार्ग व शांततेचा आधार. त्या दिशेने अल्पसा प्रयत्न म्हणून उद्या रविवारी, २४ ऑक्टोबर २०२१ ला नागपूरमध्ये लोकमतच्या वतीने राष्ट्रीय आंतरधर्मीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. धार्मिक सौहार्दापुढील वैश्विक आव्हाने व भारताची भूमिका हा या परिषदेचा विषय आहे.'दी आर्ट ऑफ लिव्हींग'चे प्रणेते गुरूदेव श्री श्री रवि शंकर, पंतजली योगपीठाचे संस्थापक स्वामी रामदेव, नवी दिल्ली येथील अहिंसा विश्व भारतीचे संस्थापक आचार्य डॉ. लोकेश मुनी, अजमेर शरीफ दर्ग्याचे गद्दी नशिन हाजी सईद सलमान चिश्ती, मुंबईच्या जीवनविद्या मिशनचे संस्थापक प्रल्हाद वामनराव पै, मुंबईचे आर्चबिशप कार्डिनल ओस्वाल्ड ग्रेसियस, लेह-लद्दाख येथील महाबोधी आंतरराष्ट्रीय तपसाधना केंद्राचे संस्थापक भिख्खू संघसेना, 'बीएपीएस' स्वामीनारायण संस्थेचे ब्रह्मविहारी स्वामी असे मान्यवर आध्यात्मिक गुरू या परिषदेत जगभरातील धार्मिक संघर्ष तसेच त्यावरील उपायांविषयी मंथन करणार आहेत.वृत्तपत्रसमूह म्हणून गेली पन्नास वर्षे सर्व धर्म, पंथांचा आदर करणारा ‘लोकमत’ आणि विविध धर्म, जाती, पंथ, भाषा अशा वैविध्याने नटलेल्या भारताच्या हृदयस्थानी असलेल्या नागपूरमध्ये मंथन हा संगम अनोखा आहे. भगवान गौतम बुद्ध, भगवान महावीर, गुरू गोविंदसिंंग, महात्मा गांधींचा भारत, ‘सर्वेपि सुखिन: सन्तु’, तसेच वसुधैव कुटुंबकम् चा संदेश जगाला देणारा भारत, जो जे वांछील तो ते लाहो म्हणत जगभरातील प्राणिमात्रांसाठी परमेश्वराकडे पसायदान मागणारा ज्ञानेश्वरांचा भारत, विखाराऐवजी विचारावर विश्वास ठेवणारा आपला देशच सौहार्द, बंधूभावासाठी जगाचे नेतृत्त्व करू शकतो. अल्पसंख्यकांच्या श्रद्धांचे रक्षणाचा पाया बहुसंख्यकांच्या सहिष्णूतेमध्ये, धार्मिक औदार्यात आहे, ही बाबदेखील येथे विशेषत्त्वाने नोंद करायला हवी.
कृतिशील धर्मगुरूंची मांदियाळी* केवळ ध्यानधारणा, प्रवचने नव्हे तर प्रत्यक्षात मैदानात, रस्त्यावर उतरून पीडितांना धीर देणारे आध्यात्मिक गुरूंचा सहभाग हा लोकमत राष्ट्रीय आंतरधर्मीय परिषदेचा विशेष आहे. दी आर्ट ऑफ लिव्हींगचे प्रणेते, गुरूदेव श्री श्री रवी शंकर यांचे या दिशेने काम मोठे आहे. त्यांच्या प्रेरणेने, सहभागाने ईशान्य भारतातील फुटीरवादी संघटना, जम्मू-काश्मीरमधील अतिरेकी, भारत तसेच जगाच्या विविध भागातील सशस्त्र घुसखोर, त्याचप्रमाणे लेबनॉन-जॉर्डन सारख्या युद्धांमधील कैदी, युद्धग्रस्त भागातील सामान्य जनता तसेच विविध धार्मिक संघर्षांमुळे घरदार सोडून परागंदा होण्याची वेळ आलेल्या निर्वासितांच्या छावण्यांमध्ये जीव मुठीत घेऊन जगणाऱ्या बायाबापड्यांना दी आर्ट ऑफ लिव्हींग व इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ ह्युमन व्हॅल्यूज यांनी मोठा आधार दिला.* रक्तपात थांबवायचा असेल, उगवत्या पिढीच्या हाती सुरक्षित भविष्य सोपवायचे असेल तर संवाद महत्त्वाचा आहे. त्यातून आधी माणसांच्या मनात शांतता प्रस्थापित होते. त्यातून विचार सकारात्मक बनतात व अंतिमत: भवताल शांततामय, भयमुक्त होतो, या त्यांच्या विचारांवर भरवसा ठेवून ईशान्य भारताील फुटीरांनी शस्त्रे खाली ठेवली. जम्मू-काश्मीरमधील अनेक तरूण शांततेच्या मार्गावर चालले.* गांधीनगरच्या अक्षरधाम मंदिरावरील २००२ मधील अतिरेकी हल्ल्याची घटना व त्यातील निरपराधांच्या बळीच्या वेदना पाठीवर टाकून बीएपीस स्वामिनारायण संस्थेच्या सेवाकार्याचा व्याप जगभर पोचला. अत्यंत देखणी अशी मंदिरे व साेबत सेवाकार्य हे या संस्थेचे वैशिष्ट्य ठरले. अमेरिकेतल्या अशा मंदिरांची वाहवा होत असतानाच आता मध्य-पूर्वेत अबुधाबी येथे एक विशाल मंदिर उभे राहात आहे. राजपुत्र शेख अब्दुल्ला बिन झायेद अल नहयान यांनी त्या निर्माणाधीन मंदिराला भेट दिल्यानंतर धरलेला मूळ रचनेचा आग्रह, त्यासाठी ब्रह्मविहारी स्वामी व त्यांच्या सहकाऱ्यांना दिलेली परवानगी हे जगातील धार्मिक सौहार्दाचे ठळक उदाहरण ठरावे.* राष्ट्रीय चारित्र्य, मानवी मूल्यांचा विकास, अहिंसा, शांती, परस्पर सद्भाव, नैतिक मूल्यांसोबत स्त्रीभ्रूणहत्या व पर्यावरणरक्षणासाठी आयुष्य वेचणारे दिल्लीच्या अहिंसा विश्वभारतीचे प्रमुख आचार्य डॉ. लोकेशमुनी यांनी या परिषदेच्या आयोजनासाठी पुढाकार घेतला आहे. जैन, बौद्ध व वैदिक धर्माचे अभ्यासक, राष्ट्रीय सदभावना पुरस्काराचे मानकरी, संयुक्त राष्ट्रसंघाचे शांतता राजदूत असलेले डॉ. लोकेश मुनींची ओळख कृतिशील विचारवंत अशी आहे.* योग व आयुर्वेदाच्या प्रसारासाठी झटणारे हरिद्वारच्या पतंजली योगपीठाचे प्रमुख, घराघरात माहीत असलेले योगगुरू बाबा रामदेव, फेडरेशन ऑफ एशियन आर्चबिशप्स कॉन्फरन्सचे अध्यक्षपद भूषविलेले व पोप फ्रान्सीस यांचे अष्टप्रधान मंडळ म्हणता येईल अशा कौन्सील ऑफ कार्डिनल ॲडव्हायजर्सचे सदस्य, मुंबईचे आर्चबिशप कार्डिनल ओसवाल्ड ग्रेसियस, अजमेर दर्ग्याचा आठ शतकांहून अधिक काळ वारसा चालवितानाच रस्त्यावर उतरून तरूणाईला दिशा देण्याचे काम करणारे आणि कोवळ्या मुलांच्या आत्महत्यांनी व्याकूळ होणारे गद्दीनशीन हाजी सैय्यद सलमान चिस्ती, सदगुरू वामनराव पै यांचे जीवनविद्या मिशनला जगभर नवा आयाम देणारे उच्च विद्याविभूषित प्रल्हाद पै, देशाच्या उत्तर टोकावर लेह-लद्दाखमध्ये राहून महाबोधी आंतरराष्ट्रीय तपसाधना केंद्राच्या माध्यमातून तथागत भगवान गौतम बुद्धांची अहिेंसेची शिकवण त्या संघर्षग्रस्त भागात रूजविणारे भिख्खू संघसेना अशी आध्यात्मिक गुरूंची मांदियाळी या परिषदेच्या निमित्ताने जगाला प्रेमाचा संदेश देण्यासाठी एकत्र येत आहे, हे अधिक महत्त्वाचे.
(कार्यकारी संपादक, लोकमत, नागपूर)