असंख्य निसर्गप्रेमी हिमालयातील वा आल्प्समधील पर्वतांवर चढून जातात,
अॅमेझॉनचे अचाट-घनदाट जंगल भेदून जातात, अण्टाक्र्टिकावर जाऊन महिनोन्महिने राहतात.. हे सारे मग फुले, झाडे, नद्या, सूर्योदय-सूर्यास्त, पौर्णिमा, ढग, वारे,
ऋतू या (खरोखरच) सुंदर असलेल्या गोष्टींनी मंत्रमुग्ध होतात!
..इथेच सगळी गफलत आहे.
कुमार केतकर
पले काही सोपे सोपे समज-गैरसमज असतात. ते आपल्या संभाषणातून, आपल्या वागण्यातून आणि लेखक-कवी मंडळींच्या लेखनातून व्यक्त होत असतात. ती गृहीत सत्य आहेत असे मानून आपण बोलत-वागत-लिहीत असतो. त्यापैकी एक सोपा, पण अवैज्ञानिक गैरसमज निसर्गाबद्दलचा आहे. आपण एखादी गोष्ट ‘नैसर्गिक’ आहे म्हणतो तेव्हा ती स्वाभाविक आहे. बरोबरच असणार, अपरिहार्य आहे असे सुचवित असतो. ‘इट इज नॅचरल ही वॉज अॅन्ग्री’ किंवा ‘इट इज टोटली अननॅचरल टू हॅव रेन्स नाऊ’ या प्रकारच्या संवादातून किंवा ‘ते युद्ध/संघर्ष अपरिहार्यच होते. कारण इट वॉज अ नॅचरल कॉन्सिक्वेन्स ऑफ देअर पॉलिसीज्’ असे म्हणण्याची प्रथा आहे.
- आपल्या दैनंदिन वाद-विवाद-संवादातील काही वाक्ये इथे वानगीदाखल दिली. पण मुद्दा हा की ‘नॅचरल’ ऊर्फ ‘नैसर्गिक’ म्हणजे बरोबर’ वा ‘स्वाभाविक’ आणि ‘अपरिहार्य’ असे मानले असते तर माणसाची प्रगती (चंद्रावर जाणो वा अणुऊर्जा तयार करणो) होऊच शकली नसती. कारणी ती प्रगती नॅचरल - स्वाभाविकपणो झालेली नाही.
झाडावरून सफरचंद खाली पडणो ‘नैसर्गिक’ आहे. पण त्यामागचे नैसर्गिक नियम ओळखून आणि गुरुत्वाकर्षणाचा भेद करून विमान बनविणो वा चंद्रावर जाणो हे नैसर्गिक नाही. स्वाभाविक वा अपरिहार्य तर नाहीच. निसर्गाने पक्ष्यांना उडण्याची क्षमता दिली आहे, माणसांना नाही. असंख्य सामुद्री जीव दूर व खोल समुद्रातच जन्माला येतात व मरतात, ते नैसर्गिक आहे. पण माणसाने नाकाला ऑक्सिजन सिलिंडर लावून व इतर उपकरणो घेऊन दूरवरच्या खोल समुद्रात जाऊन तेथील प्राणिजीवनाचा शोध घेणो, हे ‘नैसर्गिक’ नाही. त्यामुळे एखाद्याने संतापणो, खून वा आत्महत्त्या करणो हे स्वाभाविक वा नैसर्गिक नाही. शेतक:यांची आत्महत्त्या ही निसर्गकोपामुळे होत नाही, तर आपल्या आर्थिक-सामाजिक-राजकीय बेपर्वाई व नियोजनशून्यतेमुळे होते.
याच चालीवरचा दुसरा गोड गैरसमज म्हणजे- जे जे नैसर्गिक ते ते सर्व सुंदर, रम्य, चैतन्यशील, आनंददायी आहे असे गृहीत धरणो! असंख्य निसर्गप्रेमी हिमालयातील वा आल्प्समधील पर्वतांवर चढून जातात, अॅमेझॉनचे अचाट-घनदाट जंगल भेदून जातात, अण्टाक्र्टिकावर जाऊन महिनोन्महिने राहतात. सर्व कवी फुले, झाडे, नद्या, सूर्योदय-सूर्यास्त, पौर्णिमा, ढग, वारे, ऋतू या (खरोखरच) सुंदर असलेल्या गोष्टींनी मंत्रमुग्ध होतात आणि इथेच सगळी गफलत आहे.
जे जे निसर्गदत्त वा नैसर्गिक आहे ते सुंदर, उपकारक आणि आनंददायी आहे असे मानले तर भूकंप, महापूर, वणवे, ज्वालामुखी हे सर्व कशाचे आविष्कार आहेत? ते सुंदर नाहीत, माणसाला वा कुणालाच उपकारक वा आनंददायी नाहीत. पण ते नैसर्गिक आहेत. काही दुष्काळ मानवनिर्मित आहेत, म्हणजे नियोजनशून्यतेमुळे पडतात हे खरे. नियोजनाची ही निसर्गासंबंधातील चर्चा गेल्या एक-दोन शतकातली, पण संत तुकारामांच्या काळातील दुष्काळ वा इतिहासातील महापूर हे खचितच मानवनिर्मित नव्हते. ते नैसर्गिक होते.. सुंदर वा आनंददायी वा प्रसन्न नव्हते.
म्हणूनच जे जे ‘नैसर्गिक’ ते ते सुंदर वा बरोबर असे मानणो हेच चुकीचे आहे. कित्येक पर्यावरणवादी ‘निसर्गाला हात लावून तो विस्कटू नका’ किंवा ‘निसर्गसौंदर्याला बाधा आणू नका’ असे सांगतात तेव्हा त्याचा एक अर्थ असाही असतो की, नद्यांना वाहायचे असेल तसे वाहू द्या, धरणो बांधू नका, वणवे पेटले तर पेटू द्या, पूर-महापूर-त्सुनामी आले तर येऊ द्या, भूकंप-ज्वालामुखी असले तरी तेही ‘सुंदरच’ आहेत असे माना!
- खरे म्हणजे कुणीच पर्यावरणवादी अशी विध्वंसक मांडणी करीत नाही; परंतु ‘निसर्गाचा समतोल’ बिघडवू नका, त्या निसर्गात हस्तक्षेप करू नका असे म्हणतात तेव्हा त्याचे हेही परिमाण होऊ शकते.
वस्तुत: निसर्ग जितका सुंदर तितकाच उग्र असतो. टीव्हीवर (नॅशनल जिऑग्राफिक चॅनल पाहताना) किंवा निसर्गविषयक नियतकालिकातील छायाचित्रे पाहताना ज्वालामुखी उग्र असूनही आकर्षक व सुंदर दिसतो. पण ज्वालामुखी धुमसत आग ओकत असताना त्या परिसरात राहणा:यांना मात्र ज्वालामुखीच्या त्या ‘नैसर्गिकतेत’ सौंदर्य दिसत नाही.
पृथ्वी जन्माला आल्यावर (म्हणजे सूर्यापासून फुटून वेगळी झाल्यावर) कित्येक वर्षे या ग्रहावर जीवसृष्टी जन्माला आली नव्हती. नद्या, समुद्र, पाऊस वगैरे नव्हते. जलहीन पृथ्वीवर जीवसृष्टी निर्माण होणो शक्य नव्हते. म्हणजेच ‘निसर्ग’ही जन्माला आला नव्हता. निसर्गाचे सौंदर्य, प्रसन्नता, चैतन्य दूरच राहो. किंबहुना त्या महाउग्र ज्वाला फेकत पृथ्वी स्वत:च्या वेगळेपणाचा आविष्कार निर्माण करू लागली तेव्हा जर कुणा कवीने ते सर्व पाहिले असते तर त्याने त्या विश्वाच्या ‘नैसर्गिक’ अभिव्यक्तीला सुंदर खचितच म्हटले नसते.
- म्हणजेच निसर्गातील ‘सौंदर्य’ पुढे लाखो वर्षानी प्रकट झाले. रंगसंगती, नक्षीकाम, फुलांची ठेवण, झाडांची रचना, नदीचा प्रवाह, अथांग समुद्र, घनदाट जंगल, विशाल वाळवंट, उत्तुंग पर्वतरांगा, धबधबा, द:या हे सर्व सुंदर भासते ते आपल्याला (निसर्गाने) दिलेल्या विशिष्ट दृष्टीमुळे! ही सौंदर्यदृष्टीसुद्धा खूप उशिरा आविष्कृत झाली.
अतिप्राचीन गुहांमध्ये आढळणारी चित्रे व आकार ऊकार हे सौंदर्यदृष्टीने प्रेरित झालेले नव्हते, तर ती तत्कालीन मानवाची गरज होती. दुस:या कोणत्याही प्राण्याने तशी ‘गुहा-कला’ वा तसे संदेशवहन केलेले नाही. याचा अर्थ असा नाही की इतरांना संदेशवहनाची गरज नव्हती. किंबहुना सध्याचे संशोधन सांगते की सरपटणा:या प्राण्यांनाच नव्हे तर बहुतेक सस्तन प्राण्यांना, पक्ष्यांना भूकंपाचे संकेत अगोदर मिळतात. वादळाची चाहूल अगोदर लागते. त्सुनामीचा अंदाज अगोदर येतो. त्याचप्रमाणो ऋतू बदलले की पक्ष्यांचे थवेच्या थवे, मासे आणि सापही स्थलांतर करतात. माणसांना असे ‘नैसर्गिक’ ज्ञान होत नाही. म्हणूनच आता भूकंपाचे संकेत अगोदर मिळावे म्हणून पक्षी, प्राणी, मासे यांच्या हालचालींवर, त्यांच्या स्वभावबदलांवर वैज्ञानिक विशेष लक्ष देऊ लागले आहेत. भूगर्भात होणा:या हालचालींचा अभ्यास करण्यासाठी जगभर भूकंप-स्पंदन-नोंदयंत्रे खूप खोलवर ठेवण्यात आली आहेत. परंतु अजून तरी भूकंपाचा आगाऊ अंदाज करता येत नाही. फार तर काही तास वा काही मिनिटे अगोदर भूकंपसूचना प्राप्त होते.
वादळ-चक्रीवादळांची पूर्वसूचना मिळण्यात विज्ञानाला काही प्रमाणात यश आले असले तरी अजूनही निसर्ग त्याच्या ‘लहरी’प्रमाणोच चालतो. त्यामुळे त्या लहरींचा अचूक भेद घेता येत नाही. त्यामुळेच कदाचित ग. दि. माडगूळकरांना ‘पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा’ अशी ओळ लिहावीशी वाटली असेल. ती पराधीनता दूर करण्याच्या प्रयत्नातूृनच विज्ञान, तंत्रज्ञान जन्माला आले आहे. ती मानवी क्षमता कितीही अभिमानास्पद वाटली तरी या अथांग (आणि अगाध) विश्वात होणा:या उत्पाती उलथापालथी आपल्याला कधीही पूर्णपणो कळणार नाहीत.
म्हणूनच निसर्ग हे एक आव्हान आहे. तो जितका चैतन्यमयी आहे तितकाच उग्र व हिंस्त्रही आहे. म्हणूनच र्नैसर्गिक म्हणजे योग्य, स्वाभाविक नव्हे.
निसर्गालाही ‘वळण’ लावणो आणि त्यासाठी निसर्गनियम व चक्र समजावून घेणो हे मात्र माणसाला अपरिहार्य आहे!
आपण आणि ‘ते’
प्राणी, पक्षी, मासे, साप यांना त्यांचा नैसर्गिक परिसर त्या अर्थाने ‘सुंदर’ भासत नाही. ‘डिस्कवरी’ वा ‘अॅनिमल प्लॅनेट’ंवर भले मोठे सर्प, नाग, अजगर पाहताना व त्यांच्या हालचालींचे निरीक्षण करताना त्यांच्या त्वचेवरील डिझाइन्स विलक्षण सुंदर दिसतात. कितीही मोठा व सजर्नशील चित्रकार इतकी सुंदर रंगसंगती व नक्षीकाम करू शकणार नाही हे आपल्याला समुद्रातील रंगीबेरंगी माशांकडे बघूनही जाणवते. पण त्या सापांना व माशांना आपण इतके कमालीचे सुंदर आहोत हे माहीत नसते वा असे भान त्यांना नसते.
अलीकडच्या संशोधनानुसार प्राणी-पक्षी-साप-मासे हे नर वा मादीला आकर्षित करण्यासाठी त्वचेवर, पंखांवर रंगांची उधळण करतात असे सिद्ध झाले असले तरी ते आपल्याला ज्या अर्थाने सौंदर्य भासते तसे त्यांना दिसत नाही हे उघडच आहे.
किंबहुना माणसाला जसे रंगज्ञान आहे तसे सर्व प्राण्यांना व पक्ष्यांना नाही. वाघ, साप किंवा मासे हे आपल्याइतके रंग ओळखू शकत नाहीत.
(लेखक ज्येष्ठ पत्रकार-संपादक आणि जागतिक घडामोडींचे भाष्यकार आहेत.)