पाणलोट क्षेत्राचे फसलेले मॉडेल नव्या रूपात मांडण्याचा प्रयत्नच झाला नाही. यामुळे वर्षानुवर्षे चुकीच्या पद्धतीचा अवलंब झाला. यातून शेतीचीच माती झाली आहे. या संपूर्ण प्रकारावर मात करण्यासाठी समाजकार्य महाविद्यालय, प्रगतीबंधू गट, स्वयंसेवी संस्था आणि अभियंत्यांनी एकत्र येत भन्नाट कल्पना शोधून काढली आहे. यामध्ये पाणी अडवा पाणी जिरवा, असा प्रयोग झाला नाही. तर माती अडवा पाणी जिरवा हा प्रयोग झाला. अनेक वर्षांच्या श्रमाला यश आले आहे. आज शेकडो हेक्टर वर हा प्रयोग लोकसहभागातून सुरू झाला आहे. शेतीची सुपीकता जपली आणि संरक्षित ओलितामधून उत्पन्न वाढले आहे.१९९४ पासून मृद आणि जलसंधारणाची कामे सुरू आहेत. यामध्ये कमी पाऊस पडणाऱ्या मराठवाड्याला केंद्रस्थानी धरले होते. त्या दृष्टीने पाणी अडवा पाणी जिरवा हा प्रयोग राबविला गेला. हा प्रयोग विदर्भातही राबविला आहे. मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेत विदर्भाची स्थिती वेगळी आहे. विदर्भात ८५० ते ११०० मिमी पाऊस वर्षभरात पडतो. धोधो पडणारा पाऊस वाहून जातो.या पाण्याला अडविण्यासाठी शेतशिवारात बांध घालण्यात आले. कोसळणाऱ्या पावसाने हे बांध फुटले. माती आणि पाणी वाहून गेले. फुटलेला बांध दुरूस्त झाला नाही. यामुळे पाणी जमिनीत मुरले आहे. आज मुबलक पाणी कोसळणारा प्रदेश म्हणून पश्चिम विदर्भाची ओळख आहे. तरीही या ठिकाणी दुष्काळाला सामोरे जावे लागते.या स्थितीत तंत्रज्ञानाची चूक मान्य करायला कोणीच तयार नाही. शेततळ्याच्या ऐवजी शेत खड्डे केले, तर त्याचा संरक्षित सिंचनासाठी वापर होतो. आणि जागाही कमी लागते. शेतशिवारही हिरवे राहते. या भन्नाट कल्पनेचा जन्म समाजकार्य महाविद्यालय, प्रगतीबंधू गट, अभियंते, शास्त्रज्ञ, प्रगतीशील शेतकरी आणि समाजसेवी संस्थेचे कार्यकर्ते यांनी एकत्र येत केला.यासाठी बांध घालताना उताराला आडवा बांध टाकत त्याच्या अलीकडे चर खोदून हौद पद्धतीने नाल्या तयार केल्या आहेत. याच्याच बाजूला २० बाय १० आकाराचा खड्डा खोदून त्यात पाणी सोडण्यात आले. त्याकरिता पाईपचा वापर करण्यात आला आहे. यामुळे वाहून येणारे पाणी प्रथम शांत होते. गाळ खाली बसतो. यानंतर पाणी वाहून खड्ड्यात भरते. यामुळे जमीन पाणी शोषून घेते. शिल्लक राहिलेल्या पाण्याच्या माध्यमातून खंडकाळात संरक्षित ओलितही करता येते.हा प्रयोग जिल्ह्यात ३०० हेक्टरवर लोकसहभागातून पार पडला. यासोबत वाशिम जिल्ह्यातही हा प्रयोग घेण्यात आला. त्याचा फायदा शेतकऱ्यांना झाला आहे. यामुळे हे मॉडेल राबवावे, अशी मागणी गावामधून होत आहे. मोठा खर्च करूनही शासकीय यंत्रणेला जे शक्य झाले नाही. ते साध्या मॉडेलने शक्य झाले आहे.शेतकरी सोडवितात स्वत:चा पेपरहा प्रयोग राबविण्यापूर्वी शेतकऱ्यांना २० गुणांचा पेपर दिला जातो. यामध्ये पावसाळ्यात पडणारे पाणी, शेतातून वाहून जाणारी माती. चिबडणारे शेत आणि घटणारे उत्पन्न यावर प्रश्न विचारले जातात. याच्या उत्तरात नियोजन कारणीभूत असल्याचे उघड होते. यावर मात करण्यासाठी लोकसहभागातून शेतकरी पुढे येतात.ही आहे झटणारी मंडळीहे मॉडेल विकसित करून जनसामान्यात प्रयोग करण्यामध्ये प्राचार्य अविनाश शिर्के, सुभाष शर्मा, मधुकर खडसे, पवन मिश्रा, शंकर अमिलकंठावार, रमेश साखरकर, विजय कडू, मधुकर धस, डॉ.किशोर मोघे, रंजीत बोबडे, अमोल साखरकर, मन्सूरभाई खुरासिया, एस. बी. घोयटे, सलीम उद्दीन काझी ही मंडळी आता काम करीत आहे.सहा इंच मातीचा थर शेतीचा प्राणकोसळणाऱ्या पावसात जमिनीवरील सुपीक मातीचा थर वाहून जातो. दरवर्षी वाहणाऱ्या पावसात सुपीक माती खरडून जाते. याकडे साऱ्यांचेच दुर्लक्ष झाले. यासाठी माती अडवा पाणी जिरवा ही मोहीम राबविण्यावर भर दिला आहे.
- रूपेश उत्तरवार