भाग- १
शमा भाटे
जगाकडे बघण्याची प्रत्येकाची आपली-आपली अशी एक खिडकी असते. त्याच खिडकीतून आपण आपल्या भोवतीचे जग बघत असतो आणि त्या जगाशी स्वत:ला जोडून घेत असतो. कोणाची खिडकी आत उघडणारी तर कोणाची बाहेर, कोणाची आपल्यापुरती छोटीशी आणि त्याच मापात ठाकठीक राहू बघणारी, तर कोणाची ऐसपैस, दररोज मोकळे-ढाकळे वारे आणि रसरशीत सोनेरी सूर्यप्रकाश आत घेणारी.
रियाजावर बोलण्याच्या निमित्ताने मी जेव्हा माङया जगण्याकडे आणि ते दाखवून देणा:या खिडकीकडे मान वळवून बघू लागले तेव्हा जाणवले, अरे, आपल्या आयुष्यात त्या दोन गोष्टी वेगळ्या दिसतच नाहीत. दिसते ती मला भोवतालच्या जगाशी जोडून देणारी एकच भली मोठी, जगाकडे उघडणारी, उत्सुक खिडकी. घुंगरांचे भरगच्च तोरण बांधलेली. खिडकीतून आत येऊ बघणारी वा:याची झुळूक असो नाहीतर पावसाचे तुषार, त्या घुंगरांना स्पर्श करीतच प्रत्येकाला माङया आयुष्यात यावे लागते. आणि मग असा घुंगरांचा स्पर्श होऊन आलेली प्रत्येक गोष्ट माङयासाठी नृत्य होऊन जाते. माङया रियाजाचा भाग होऊन जाते. ज्यांनी मला नृत्याच्या खिडकीतून जग बघायला शिकवलं त्या माङया गुरू पंडिता रोहिणीताई नेहमी म्हणायच्या, ‘रियाज म्हणजे काय, तर एखादी गोष्ट आपल्यात इतकी उतरवायची की जेव्हा ती व्यक्त होईल तेव्हा ती आपलीच बनली असेल. आपल्या जगण्याचा, श्वासाचा एक भाग.
नृत्य ही अशी कला आहे ज्यामध्ये तुमच्या सगळ्या शरीराचा सहभाग असतो. केवळ पदन्यास बरोबर येऊन चालणार नाही, हाताची फेकही तशीच नेमकी यायला हवी. बोटांच्या मुद्रा, चेह:यावरील अभिनय, डोळ्यातील भाव आणि उभे राहण्यातील डौल हे सगळे एकत्र जमून येते तेव्हा ते नृत्य होते. फुलाला फूलपण येण्यासाठी त्याच्या सगळ्या पाकळ्या उमलाव्या लागतात ना, तसेच असते हे काहीसे. आणि असे सगळे जमून येत असताना एकीकडे घुंगरांचे बदलणारे नादही कानांना टिपत राहावे लागतात. त्यामुळे नृत्य माङया आयुष्यात आल्यावर पहिली काही वर्षे तर मी दिवसभर घुंगरू बांधूनच वावरत राहायची.
रोजचा रियाज किमान सहा तास असायचा मग दिवसातला उरला-सुरला वेळ कशाला काढायची ती घुंगरं? त्यांचे कधी ओङो नाही वाटले मला. काही कलाकार रियाजी असतात. रियाजात आनंद घेणारी. त्याचाच चस्का असणारी. मी तशी होते. मला एकच ध्यास असायचा, जे शिकते आहे ते इतके घटवायचे की पुढे रंगमंचावर करण्याची वेळ येईल तेव्हा तो तुकडा, परण मला सहजतेने करता यायला हवी.
माङया या रियाजाच्या काळातील सर्वात महत्त्वाची गोष्ट होती ती म्हणजे त्यावेळी माङया भोवताली असलेले त:हेत:हेच्या प्रयोगांनी गजबजलेले वातावरण. एकीकडे मी नृत्यातील परंपरेत घट्ट रु जून असलेल्या गोष्टी शिकत होते, जाणू बघत होते; तर दुसरीकडे, माङया भोवताली मात्र सगळ्या परंपरांना नवा घाट देणारे प्रयोग सुरू होते. ही गोष्ट सत्तरच्या दशकातील. रोहिणीताई या सर्व परंपरांचा सन्मान करणा:या होत्या, पण त्यात जखडलेल्या नव्हत्या. आपली कला समृद्ध करण्यासाठी कलाकाराला इतर कलांच्या प्रांतात डोकावून बघायला हवे असा आग्रह धरणा:या मोजक्या पुरोगामी कलाकारांपैकी त्या होत्या. आणि इतर प्रांतांमध्ये त्यावेळी बरेच काही घडत होते. नाटकाच्या प्रांतात पीडीए आणि विजयाबाईंसारखे कलाकार, सिनेमात श्याम बेनेगल-अमोल पालेकर, संगीतात कुमारजी आणि किशोरीताई ही सगळी मंडळी परंपरेबरोबरच नव्या प्रवाहांचा शोध घेऊन ते आपल्या कलेला जोडू बघत होती. ते सगळे वातावरण, संस्कार माङया खिडकीतून आत येत होते. माङया रियाजाबरोबर.
याच काळात मला बघायला मिळाले ते इंग्लंड-अमेरिकेतील समकालीन नृत्य. ऑपेरा-बॅलेसारखे त्या परंपरेतील अभिजात नृत्य तर बघायला मिळालेच, पण त्याच्या जोडीने बघायला मिळाले रु डॉल्फ न्यूरिएव आणि मिखाईल बॅरिश्नकाव्हसारखे बॅले नृत्यातील झगमगते तारे आणि त्यांची बंडखोरी. बॅले नृत्यातील स्त्री कलाकाराला साथ देण्याइतपत असलेली दुय्यम भूमिका नाकारून तिच्या बरोबरीने रंगमचावर उभे राहून स्वत:मधील प्रतिभा दाखवण्याचा त्यांचा तो प्रखर आग्रह जातिवंत कलाकाराचा होता.
माङया शारीरिक रियाजाला मानसिक रियाजाचे खतपाणी जसे मला भारतात मिळत होते त्यापेक्षा हे काहीतरी वेगळे होते. पण सूत्र मात्र एकच होते. परंपरेचे भान राखत तिला नव्या वाटेवर नेण्याचे. एक कलाकार म्हणून त्यात बंडखोरीचा अभिनिवेश नव्हता, गोष्टी नव्याने मांडून बघण्याची उत्सुकता मात्र होती. याच दिशेने मग मीही एक पाऊल उचलले. वेगळ्या माध्यमातील नवी गोष्ट नृत्याला जोडण्याचा प्रयोग करण्याची हिंमत करण्यासाठी.
ते होते तालयोगी पंडित सुरेशदादा तळवलकर यांच्याबरोबर तालीम करण्याचे, शिक्षण घेण्याचे.
तो एक वेगळ्याच प्रकारचा रियाज होता माङयासाठी.
माङया परंपरेने न सांगितलेल्या तबल्यातील बंदिशी आणि बोल मला नृत्यातून दाखवायच्या होत्या. किडतक धित्ता, तत घेत्ता, धित्ता कता घेघेदा अशी एखादी परण शिकत असताना त्यात असलेला विशिष्ट वेग, त्यातील पॉज किंवा थांबायची नेमकी जागा, त्यात येणारा कोणता स्वर शार्प कोणता सौम्य, कुठे तुकडा पाडायचा
आणि कुठे मिंड घेत, स्वरांवरून सरकत पुढे जायचे अशा कित्येक गोष्टी गुरु जी आमच्या रियाजात बोलून दाखवत आणि त्या नेमकेपणाने दाखवणारा पदन्यास त्यांचं समाधान होईपर्यंत करायला लावत. असा एखादा तुकडा, एखादी परण मी किमान 7-8 हजार वेळा तरी केली असेल. ‘मला जे अभिप्रेत आहे ते हे नाही’ असे म्हणत पुन्हा-पुन्हा ते साउंड डिझाइन ते बोलून दाखवत आणि पुन्हा-पुन्हा मी नव्याने ते मांडू बघायची.
नृत्याचे शिक्षण घेताना आणि त्याच वेळी समाजात चालू असलेले नवे प्रयोग बघताना जे काही माङया खिडकीतून आत आले होते
आणि माङयात रु जले होते त्याचा अगदी कस बघणारा असा हा टप्पा होता.
ही परीक्षा जशी माङया शारीरिक रियाजाची होती तशी मानसिक रियाजाचीही होती.
ज्यामधून मग अनेक प्रयोग जन्माला आले, ज्यावेळी मला आत कुठे काय
रु जले आहे याची ओळख पटत गेली..!
त्याविषयी पुढील लेखात..
मुलाखत आणि शब्दांकन
- वन्दना अत्रे