- पवन देशपांडे
चंद्राचे आपल्या आयुष्यात कायम महत्त्वाचे स्थान राहिले आहे.
सर्वसामान्यांना जसं चंद्राचं आकर्षण, तसंच शास्रज्ञांनाही. पृथ्वीच्या या उपग्रहावर नेमकं काय आहे? अगदी प्राचीन काळापासून चंद्र सगळ्यांना आकर्षित करत आलाय. चंद्राच्या अस्तित्वाची, त्याच्यावर असणाऱ्या घटकांची, त्याच्या प्रकाशमान होण्याची, त्याचा आणि पृथ्वीचा संबंध असण्याबाबतचा शोध घेण्याची उत्सुकता जवळपास चार हजार वर्षांपूर्वीपासूनची आहे.
चंद्राचा अनेक अंगांनी अभ्यास करून संशोधकांनी अनेक वेगवेगळे पैलू तपासले, अनेक वैज्ञानिक गोष्टींचा शोधही लावला. तेथील वातावरण कसे आहे, तेथे जीवसृष्टीची शक्यता किती आहे, याचेही संशोधन करून झाले आहे. त्यातील कायमच महत्त्वाचा राहिलेला शोध म्हणजे चंद्रावरील पाण्याचा. चंद्रावर पाणी आहे? का? असेल तर कोणत्या स्वरूपात आहे? कधीपासून आहे? आणि ते आले कुठून अशा अनेक प्रश्नांचा शोध घेतला जात आहे.
याच प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी अनेक रडार, दुर्बिणींचा वापर केला जात आहे. अनेक देशांच्या संस्था यासाठी अहोरात्र कामही करत आहेत. अमेरिकेची अवकाश संशोधन संस्था नासा ही त्यात आघाडीवर आहे. नासाने असाच एक शोध काही दिवसांपूर्वी जाहीर केला. चंद्राच्या ज्या भागावर सूर्यप्रकाश पडतो तेथील विवरांमध्ये पाणी असल्याचे नासाने जाहीर केले. यापूर्वीही चंद्रावर पाणी असल्याचे जाहीर करण्यात आले होते. पण हे पाणी पृथ्वीवरून कधीही न दिसणाऱ्या आणि ज्या भागात कायम सावली असते अशा विवराच्या आसपास असल्याचे नासाने शोधून काढले आहे. विशेष म्हणजे नासाने याचा निश्चित असा पुरावाही दिला आहे. नासाच्या या शोधामुळे अनेक नव्या शोधांना बळ मिळेल. चंद्रावर पाणी टिकून राहणे शक्य नाही, असे या आधी शास्रज्ञांचे मत होते. कारण सूर्याच्या थेट प्रकाशात ते टिकाव धरू शकणार नाही, असे मानले गेले होते. पण, ज्या ठिकाणी सूर्यप्रकाश असतो, त्याच भागातील विवराच्या आसपास पाणी असल्याचे नासाने शोधून काढले आहे. हे विवर दक्षिण गोलार्धात आहे. पृथ्वीवरूनही ते दिसते.
यानुसार, चंद्राच्या दक्षिण गोलार्धातील क्लेव्हीयस दरीत पाणी असल्याचे आढळले आहे. मात्र, हा फक्त प्राथमिक पुरावा असून, याबाबत अधिक अभ्यास करणे उचित ठरेल, असेही ‘नासा’ने स्पष्ट केले आहे.
तसेच पाणी असल्याचे पुरावे मिळाल्याने चंद्रावर जीवसृष्टी असेल, असे मानण्याचे कारण नाही, असेही ‘नासा’ने स्पष्ट केले आहे. पण हे पाणी रेणूंच्या रूपात आणि गोठलेल्या अवस्थेत आहे. म्हणजेच हे पाणी प्रत्यक्ष पाहायला मिळणार नाहीच. हे पाणी प्रत्यक्ष द्रव रूपात मिळवता येईल का, याबाबतही शंका आहेत. ते वापरण्यायोग्य असेलच असेही नाही, याबाबतही नासाने शंका उपस्थित केली आहे. पाण्याचे रेणू तयार कसे झाले किंवा आले कुठून हा आता नव्या संशोधनाचा विषय झाला आहे. सौरवादळे किंवा चंद्रावर सातत्याने आदळणारे धुमकेतू यातून पाण्यांचे कण निर्माण झाले असावे, असा तर्क लावला जात आहे.
नासाच्या या नव्या शोधामुळे चंद्रावरील विविध प्रकारच्या मोहिमांना आता वेगळे वळण लागलेले आहे. येत्या २०२४ मध्ये चंद्रावर एखादी महिला किंवा एखादा पुरुष पाठवण्याची योजना नासा तयार करत आहे. तेव्हा या पाण्यासंदर्भात काय काय करता येईल, याचा विचार केला जाईल. पृथ्वीवगळता अवकाशात इतर ठिकाणी कुठेही पाणी असेल तर त्याचा संबंध थेट जीवसृष्टीशी जोडला जाऊ शकतो. जिथे पाणी तिथे कधीतरी जीवसृष्टी असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे चंद्रावरील पाणी आले कुठून, ते तेथेच होते तर किती वर्षांपासूनचे आहे... ते नष्ट कसे होत गेले अशा अनेक प्रश्नांची उत्तरे येत्या काळात शोधावी लागणार आहेत. यासाठी येणाऱ्या सर्व चांद्रमोहिमा पाणी आणि त्यासंबंधीची माहितीवर लक्ष केंद्रित करू शकतील.
अपोलो यानातून चंद्रावर पाय ठेवून आलेले अवकाशवीर परतले तेव्हापासून म्हणजेच १९६९ पासून असाच समज होता की चंद्र पूर्णपणे कोरडा आहे. पाण्याचा तिथे अंशही नाही. पण त्यानंतर नासानेच चंद्राच्या अप्रकाशित भागात बर्फ असल्याचा शोध लावला होता. आता सूर्यप्रकाश ज्या भागावर पडतो, तिथेही पाणी असल्याचे पुरावे मिळाले आहेत.
डॉ. कॅसे हॉनीबॉल या शास्रज्ञाच्या मते, ‘प्रखर सूर्यकिरणांपासून वाचवणारे वातावरण चंद्राभोवती असल्याशिवाय तेथे पाणी टिकणार नाही. कारण चंद्राच्या या भागावर प्रखर सूर्यकिरणे असतात. पण तरीही आपल्याला पाण्याचे रेणू दिसले ही मोठी गोष्ट आहे...’
हा शोध कोणी लावला?
हा शोध ‘स्ट्रॅटोस्फेरिक ऑब्झर्व्हेटरी फॉर इन्फ्रारेड ॲस्ट्रॉनॉमी’ (सोफिया) या वेधशाळेने लावला आहे. सोफिया ही जगातील सर्वांत मोठी अवकाशात उडणारी विमानातील वेधशाळा आहे. बोइंग ७४७ या विमानात बदल करून ती तयार केलेली आहे. सोफियाद्वारे केलेल्या निरीक्षणांवरून चंद्रावरील पाण्याबाबत निष्कर्ष काढण्यात आला आहे.
या पाण्याचा वापर करता येईल का?
चंद्रावरील पाण्याचा वापर संशोधनासाठी करता येईल का? चांद्रमोहिमांमध्ये इंधन म्हणून वापरता येईल का? हे पाणी पिण्यासाठी द्रवरूपात तयार करता येईल का? आणि ऑक्सिजनचा स्रोत म्हणू ते वापरता येईल का? असे अनेक प्रश्न एका शोधातून निर्माण झाले आहेत. या प्रश्नांची उत्तरं शोधण्यात यश आले तर ती मोठी उपलब्धी असेल.
(लेखक लोकमतच्या मुंबई आवृत्तीत सहाय्यक संपादक आहेत.)
dpavan123@gmail.com