- डॉ. सीमा घंगाळे- ‘पुणे नाट्यसत्ताक’मध्ये झालेल्या ‘वाफाळलेले दिवस’ या प्रतीक पुरी यांच्या कादंबरीच्या संपादित भागाचे अभिवाचन नुकतेच झाले. योग्य वेळी, योग्य मार्गाने लैंगिक शिक्षण न मिळाल्याने मुलांची झालेली अर्धवट आणि गोंधळलेली लैंगिक मानसिकता उभी करताना लेखक-दिग्दर्शकाने लैंगिकतेचे सगळेच बळीचे अन् कळीचे मुद्दे सुयोग्यरीत्या मांडले आहेत. त्याचे रसग्रहण... आठवीत असताना मिशा फुटू लागल्या आणि आपण जवान व्हायला लागलो... अशा अगदी थेट सूचक वाक्याने कादंबरीची अन् अभिवाचनाची सुरुवात होते. तेथेच लेखकाच्या कोणत्याही काल्पनिक कथेत न अडकता नेमक्या विषयाला हात घालण्याचा निर्णय लक्षात येतो अन् हे प्रकरण भलतंच बोल्ड वाटू लागतं. ...निमित्त होतं ‘पुणे नाट्यसत्ताक’मध्ये झालेल्या ‘वाफाळलेले दिवस’ या प्रयोगाचे. ‘वाफाळलेले दिवस’ या प्रतीक पुरी यांच्या कादंबरीचा लिखित ऐवज वाचनाच्या मंचीय सादरीकरणातून दिग्दर्शक राहुल लामखेडे यांनी प्रेक्षकांसमोर आणला आहे. कोणत्याही पारंपरिक किंवा प्रचलित रंगमंच न वापरता केवळ सूचक प्रकाशयोजना आणि हिंदी सिनेमातील काही निवडक गाणी नेमकेपणे वापरून अतिशय गंभीर विषय आणि तितकाच गंभीर प्रश्न प्रेक्षकांना विचारण्याचे काम या विनोदी सादरीकरणातून दिग्दर्शकानं केला आहे. मंचावरील सगळी पात्रं कादंबरीतील लेखनाचे वाचन करीत असली तरी हे प्रमाणबद्ध वाचनासारखं थेट नाही. आपल्या अभिनयातून आणि डोळ््यांच्या अतिशय संयत हालचालीतून वरवर दिसणाºया विनोदी प्रसंगातला गर्भित आणि गंभीर विषय प्रेक्षकांसमोर ठेवण्यात दिग्दर्शकाला यश आले आहे. वर वर पाहता हा प्रयोग म्हणजे वयात येणाºया मुलाचे शारीरिक आणि भावनिक बदलांचे स्थित्यंतर लक्षात घेऊन उडालेल्या गोंधळाचे चित्रण भासते. पण कादंबरीकारानं वयात येणाºया आठवीतील मुलाचा ‘फिलॉसॉफिकल वांदा’ समोर ठेवून लैंगिकता आणि लैंगिकतेचे सामाजिक संदर्भ आणि हे संदर्भ मुलगी आणि मुलगा यांच्याबाबतीत कसे वेगळे किंवा कधी कधी बरोबर विरुद्ध असतात, यावर निर्भीड भाष्य केलं आहे. यामुळेच ‘किशोरवयीन मुलांसाठी’ या वर्तुळातून बाहेर येऊन कादंबरीचा परीघ वाढत जातो तो थेट लैंगिकतेबद्दलच्या समाजाच्या असणाºया ढोंगी आणि दांभिक संदर्भापर्यंत. आजही लैंगिकतेबद्दल उघडपणे बोलणे, विचारणे, चर्चा करणे हे व्यभिचारसदृश किंवा किळसवाणे ठरवले जाते. या धोरणामुळेच किशोरवयीन मुला-मुलींना याबद्दल योग्य आणि पद्धतशीर मार्गदर्शन मिळत नाही अन् सेक्स ही कधी दमन, तर कधी विकृती बनून जाते. यामध्येही मुले आपल्या समवयस्कांमध्ये ही कोंडी फोडण्याचा प्रयत्न करतात. पण मुलींना मुलींसोबतच असे अनुभव वाटून घेताना लाज वाटते. स्वत:च्या शरीराबद्दल, शरीरातील बदलाबद्दल एक तर बोलू दिले जात नाही किंवा या चर्चा घाणेरड्या आहेत-असतात असे बिंबवले जाते. दिग्दर्शक राहुल लामखेडे यांनी लेखक प्रतीक पुरी यांच्या मदतीने कादंबरीचा संपादित भाग मंचावर आणला. त्याला प्रेक्षकांचा सुहास्य प्रतिसाद लाभला. वयात येणाºया मुलांचे प्रथमपुरुषी निवेदन स्वत: दिग्दर्शकाने सादर केले आहे. त्यातून प्रेक्षकाला त्यांनी भरपूर हसवले. त्याचबरोबर दांभिक समाजाच्या खोट्या लैंगिक संदर्भांना सणसणीत चपराक दिली आहे. सर्व प्राण्यांप्रमाणेच माणसांमध्येही सामान्य आणि तहान-भूक-निवारा याप्रमाणे लैंगिकताही अनिवार्य गरज असताना त्याचे झालेले अवघड ‘ग्लोरिफिकेशन’ दिग्दर्शकाने विनोदी शैलीतून समोर ठेवले आहे. वयात येणारा मुलगा (नायक) त्याला आवडणारी मुलगी शिल्पा निंबाळकर (नायिका) यांच्याभोवती हे अभिवाचन फिरून फिरून येत असले तरी लैंगिकतेला उगाचच गुंतागुंतीचे करणारे बरेचसे प्रसंग दिग्दर्शकाने मांडले आहेत. नैतिक-अनैतिकतेच्या परंपरावादी समाजमान्यता आपल्या मुलांच्या गळी उतरवताना आपण नात्यामधली ती आपलेपणाची भावनाच पुसून टाकतो अन् आधीच गोंधळलेल्या आपल्या किशोर-कुमार तरुणाईला अजूनच एकटं पाडतो. आपल्या सगळ््या पात्रांतून आणि प्रसंगांतून हे अभिवाचन असे नेहमी अनुत्तरित राहिलेले (...की ठेवलेले?) प्रश्न समोर आणते. हा प्रयोग कुठेही धडे-सल्ले देत नाही. बरोबर की चूक या गुंत्यात न पडता नैसर्गिक सत्य दांभिकतेमुळे कसे काळवंडले आहे, हे कादंबरीकाराने मांडले आहे. दिग्दर्शक त्याच्या प्रभावी वास्तववादी सादरीकरणातून आपल्याला अधिक अंतर्मुख करतो. ...आणि म्हणूनच ही अप्रतिम कलाकृती तरुण मुले अन् त्यांच्या पालकांनी जरूर पाहावी.
निमित्त - गोंधळलेल्या लैंगिक मानसिकतेचे दर्शन
By ऑनलाइन लोकमत | Published: February 03, 2019 6:00 AM