शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

आत्मविश्वास हरवलेला व्यावसायिक नितीन

By admin | Published: October 18, 2014 2:15 PM

व्यवसाय म्हटला की चढउतार हे आलेच; पण त्या लाटेवर स्वार होताना जे स्वत्व हरवू देत नाहीत, अशी माणसं खर्‍या अर्थाने यशस्वी होतात. नितीनची कथाही अशीच. आत्मविश्‍वास परत आला, नियोजनाची कास धरली, योगसाधनेचं बळ मिळालं आणि आयुष्याची गाडी पुन्हा मार्गावर आली.

- डॉ. संप्रसाद विनोद
 
नितीन हा जोशी घराण्यातला पहिला व्यावसायिक. वडील शिक्षक, आई गृहिणी. त्याचा आणि त्याच्या वाडवडिलांचा धंदा-व्यवसायाशी दुरूनही कधी संबंध आला नव्हता. पदवी मिळाली, की सरकारी किंवा खासगी ‘नोकरी’ करणं ही जोशी घराण्याची परंपरा. पण, घरबांधणी अभियांत्रिकीचं शिक्षण घेणार्‍या नितीनचा व्यावसायिक पार्श्‍वभूमी असणार्‍या अनेक विद्यार्थ्यांशी आणि त्यांच्या कुटुंबीयांशी जवळून संबंध आला. त्यांचं ऐश्‍वर्य त्याला पाहायला मिळालं. असं ऐश्‍वर्य आपल्याकडे असावं, अशी आकांक्षा निर्माण झाली. मग, जाणीवपूर्वक तो या मित्रांच्या आणि त्यांच्या पालकांच्या मानसिकतेचा अभ्यास करू लागला. त्यातून त्याला अनेक गोष्टी नव्याने समजू लागल्या. व्यावसायिक पद्धतीने विचार कसा करतात, याची थोडी तोंडओळख झाली. व्यवसाय ही काही ‘अपने बस की बात नही’ या भ्रमाचा पगडा दूर होऊ लागला. फारसा धोका न पत्करता सामान्य जीवन जगण्याची मध्यमवर्गीय प्रवृत्तीदेखील थोडी कमी झाली.
अभियांत्रिकीच्या अभ्यासाबरोबर त्याचा हा ‘व्यवसाय मनाचा’ जोड-अभ्यास सुरू राहिला. त्यानंतरही ‘व्यावसायिक मानसिकता’ नितीनला काही पूर्णपणे समजली नाही. पण, ती जाणून घेण्याची  तीव्र जिज्ञासा मात्र निर्माण झाली. त्यामुळे, पदविका परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर चांगल्या पगाराची नोकरी चालून आली तरी त्याने ती नाकारून ओळखीतल्या एका बांधकाम व्यावसायिकाकडे वर्षभर ‘व्यवसाय प्रशिक्षण’ घ्यायचं ठरवलं. पगार थोडा कमी मिळणार होता; पण लाख मोलाचं ‘व्यावहारिक’ ज्ञान मिळणार होतं. अर्थातच, त्याच्या या निर्णयाने घरातले सगळे नाराज झाले. त्रासले. रागावले. नितीनने नोकरी करावी, लग्न करावं आणि स्थिरस्थावर व्हावं अशी त्यांची ‘धोपटमार्गी’ अपेक्षा होती. आग्रह होता. पण, नितीनला आपण जे करतोय त्याबद्दल पूर्ण विश्‍वास होता. त्यामुळे, तो आपल्या निर्णयावर ठाम राहिला. घरच्यांचा विरोध मग ‘नाईलाजाने’ मावळला. नंतर, व्यवसायात यशस्वी झाल्यावर तर या विरोधाचं रूपांतर ‘कौतुका’तच झालं.
व्यवसाय प्रशिक्षण सुरू झालं. नितीनने वर्षभर अपार कष्ट केले. पडतील ती, सांगतील ती सर्व कामं केली. कुठल्याही कामाची कधी लाज बाळगली नाही. मित्राच्या वडिलांचा विश्‍वास संपादन केला. वर्षाच्या अखेरीस तो त्यांचा एक जवळचा सहकारी झाला. या काळात त्यांच्या व्यक्तित्वाचा, विचारसरणीचा, वागण्या-बोलण्याचा त्याने नीट अभ्यास केला. व्यावसायिक विचारप्रक्रियेचे, योजनांचे बारकावे काळजीपूर्वक समजून घेतले. ‘विचारपूर्वक’ धोका पत्करणं म्हणजे काय हे जवळून पाहिलं. छान शिकून घेतलं. त्यामुळे, त्याचा स्वत:चा असा एक व्यावहारिक दृष्टिकोन विकसित झाला. माणसांची पारख करण्याचं कौशल्य निर्माण झालं.
प्रशिक्षणाचा कालावधी संपला. नितीन आता शेटजींच्या व्यवसायाचा एक महत्त्वपूर्ण घटक बनला होता. अनेक महत्त्वाच्या जबाबदार्‍या तो एकहाती सांभाळत होता. शेटजी त्याच्यावर खूष होते. अनेक कामांसाठी त्यांची त्याच्यावर मदार असायची. कधी कधी तर ते त्याचादेखील सल्ला घ्यायचे. त्याच्याशी  विचारविनिमय करायचे. अमेरिकेत एम. एस. करायला गेलेला त्यांचा मुलगाझ्र नितीनचा मित्र शिक्षण संपवून परत येईपर्यंत ते नितीनवर आणखी बर्‍याच जबाबदार्‍या टाकण्याच्या विचारात होते. 
पण, नितीनचं स्वप्न वेगळं होतं. प्रशिक्षण संपल्यावर तो शेटजींना भेटला. शेटजींचे त्याने मनापासून आभार मानले. स्वत:चा व्यवसाय करण्याची आपली इच्छा शेटजींना सांगितली. शेटजींना थोडा धक्का बसला; कारण त्याच्यावर त्यांची भिस्त होती. त्यांचे चिरंजीव परदेशात असल्याने नितीन हा त्यांची आता ‘व्यावसायिक गरज’ बनला होता. पण, नितीन खाल्ल्या मिठाला जागला. त्याने शेटजींची अडचण समजून घेतली. त्याने स्वत:चा व्यवसाय तर सुरू केलाच; पण त्याचबरोबर शेटजींकडे कामाला असलेल्या एका इंजिनियरला सगळ्या कामाविषयी व्यवस्थित माहिती दिली. त्या इंजिनियरला चांगलं तयार केलं. शेटजींचं काम आपल्या अनुपस्थितीत अडून राहणार नाही, याची शक्य ती सर्व काळजी घेतली. त्यामुळे, शेटजींच्या मनात नितीनविषयी एक आत्मीयतेची भावना-‘गुडविल’ निर्माण झालं.
नंतर, ‘व्यावसायिक अनुभवाची’ पुरेशी शिदोरी घेऊन नितीनने मोठय़ा आत्मविश्‍वासाने आपला बांधकाम व्यवसाय सुरू केला. त्याची सुरुवातीची प्रगती खूपच चांगली झाली. धावपळ मात्र बरीच करावी लागली. दुचाकीवरून तासन्तास उन्हातान्हात प्रवास करावा लागला. खूप कष्ट उपसावे लागले. दगदग झाली. नितीनने या सगळ्याची तयारी ठेवली होती; पण झालेल्या दगदगीचे परिणाम शरीरावर दिसू लागले. रक्तदाब, पाठदुखी सुरू झाली. वजन वाढलं. औषधपाणी केलं. ‘शेवटी’ मग योगाची आठवण झाली. योगसाधना सुरू झाली. त्याचे परिणाम हळूहळू दिसू लागले. आत्मविश्‍वास वाढला. त्यामुळे, आवाक्याबाहेरची ‘आर्थिक उडी’ घेण्याचा मोह झाला. दुर्दैवाने आर्थिक मंदी आली. व्यवसायावर परिणाम झाला. कर्जाचे हप्ते थकले. चिंता वाढली. घरातून कोणी मानसिक, भावनिक आधार देणारं नव्हतं. उलट, ‘तरी आम्ही म्हणत होतो की भलते ‘धंदे’ करू नकोस. धंदा करणं हे काही आपलं काम नाही..’ असं म्हणून घरच्यांनी त्याला नामोहरम, नाउमेदच केलं. नितीन फार निराश झाला. भयग्रस्त झाला. त्याचा आत्मविश्‍वास हरवला. रक्तदाब वाढला. झोप लागेनाशी झाली.
योगसाधना सुरू केल्यावर याविषयी त्याच्याशी एकदा विस्ताराने बोलणं झालं. त्याची सांपत्तिक स्थिती, घरच्या जबाबदार्‍या, कुटुंबाची आर्थिक सुरक्षितता या सगळ्याचा काळजीपूर्वक आढावा घेतला. बँकेचे किती हप्ते भरलेत आणि किती बाकी आहेत हे समजून घेतलं. त्यातून असं स्पष्ट झालं, की एवढी चिंता करण्याचं काहीच कारण नव्हतं. मुख्य म्हणजे, त्याच्या हातात आणखी काही कामं होती. तसंच, इतर काही कामं मिळण्याच्या मार्गावर होती. मग, आमचं असं ठरलं, की प्रथम त्याने त्याच्या हातातल्या कामांविषयी मोकळेपणाने बँकेशी बोलावं. 
बॅंकेने त्याचं म्हणणं ऐकून घेतलं आणि त्याला कर्ज दिलं, की मंजूर कर्जापैकी ८0 टक्के वापरून कामाला सुरुवात करावी.  हातात घेतलेलं काम यशस्वीपणे पूर्ण करावं. वेळेवर हप्ते भरून कर्ज फेडावं. असं केल्याने बँकेमध्ये पत निर्माण होईल. हे त्याला पटलं. 
याशिवाय, त्याला असंही सुचवलं, की प्रत्यक्ष कामाला सुरुवात केल्यानंतर त्या कामाविषयी जे काही ‘८0टक्के’ तुझ्या हातात आहे, ते अगदी मनापासून करावं आणि उरलेल्या २0टक्क्यांचा भार शांतपणे त्या अज्ञात शक्तीवर सोडून द्यावा. नीट विचार केल्यानंतर त्याला माझं म्हणणं पटलं आणि जणू काही त्याला यशाची गुरुकिल्लीच मिळून गेली. ‘८0-२0’चा मंत्र त्याच्या बाबतीत इतका छान लागू पडला, की त्याच्या सगळ्या समस्या हळूहळू सुटायला लागल्या. व्यवसायात पुन्हा एकदा स्थैर्य आलं. आधीचं कर्ज फिटलं. नवीन प्रकल्पासाठी कर्ज मिळालं. पुन्हा हाच मंत्र वापरून बँकेने देऊ केलेल्या कर्जापेक्षा २0 टक्के  कमी कर्ज घेऊन त्याने ‘शांतपणे’ नवीन प्रकल्पाची सुरुवात केली. हा प्रकल्पही दोन वर्षांत पूर्ण केला.
नितीन आता एक यशस्वी व्यावसायिक म्हणून नावारूपाला येऊ लागलाय. कामाचा उत्तम दर्जा आणि जागेचा ताबा दिल्यानंतरही योग्य ती सेवा पुरवून तो आता ग्राहकांचा विश्‍वास संपादन करू लागलाय. आता बँक त्याला आपणहून हवं तेवढं कर्ज द्यायला तयार आहे! 
तो मात्र जेवढं त्याच्या आवाक्यात आहे, तेवढंच कर्ज घेऊन ‘दमादमाने’ पण ‘निश्‍चितपणे’ प्रगती साधतो आहे. नियमितपणे सुरू असलेल्या ‘अभिजात योगसाधने’मुळे त्याचं आरोग्य छान राहतंय आणि मला खात्री आहे, की पुढेही ते तसंच छान राहणार आहे. 
त्यामुळे, आणखी काही वर्षांनी ज्या वेळी त्याच्याकडे भरपूर ऐश्‍वर्य असेल, त्या वेळी त्याच्यावर ‘चणे आहेत पण ते खायला दातच नाहीत’ असं म्हणण्याची वेळ नक्कीच येणार नाही!! 
(लेखक हे महर्षी न्यायरत्न विनोद यांचा विशुद्ध अध्यात्माचा आणि अभिजात योगसाधनेचा वारसा चालविणारे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे योगगुरू आणि योगोपचारतज्ज्ञ आहेत.)