आपल्या मुलांनी उत्तम शिकावं, चांगली नोकरी मिळवावी, कोणत्याही आई-बाबांची आपल्या मुलांकडून हीच तर अपेक्षा असते.
एकदा का मुलांचं शिक्षण पूर्ण झालं की आई-बाबांची हीच अपेक्षा मग हट्टामध्ये रुपांतरित होते आणि सतत नोकरीसाठी मुलांच्या मागे लागलं जातं. मुलं लवकर नोकरीला लागली नाही की मुलाचं संपूर्ण भविष्यच मग अंधारात दिसू लागतं.
पण इकडे मुलांच्या मनात काहीतरी नवं उमलत असतं, त्यांना स्वत:साठी नवी पायवाट दिसत असते याचा अंदाजही त्यांच्या पालकांना नसतो. मग नोकरीचा लकडा, मुलं जे म्हणतात ते उडवून लावणं, सतत मुलांच्या मनात भीती पेरणं नाहीतर इतका पैसा तुमच्या शिक्षणावर खर्च केला तो वसूल तरी होणार का? - यासारखी अपेक्षांची तलवार मुलांच्या डोक्यावर ठेवली जाते.
पालकांच्या अपेक्षा, मुलांच्या इच्छा यांच्यात संघर्ष इथेच सुरू होतो. असे संघर्ष घरोघरी होत असतात.
मुलांना नोकरी करायची नसते याचा अर्थ त्यांना काम करायचं नसतं, कमवायचं नसतं, आपल्या जबाबदा:या पूर्ण करायच्या नसतात असं नाही.
खरंतर त्यांना नवं काही तरी करून बघायचं असतं.
मनात उमललेल्या इच्छेला मूर्त स्वरूप देण्यासाठीची जमवाजमव करण्यात मुलं गुंतलेली असतात. पण रिझल्ट ओरिएण्टेड झालेल्या पालकांना मुलांच्या इच्छांचा प्रवासच उमगत नाही. अशा वेळेस मग पालक आणि मुलं यांच्या वाटय़ाला येतं काय? तर केवळ झगडा आणि क्लेशच.
हे सगळं टाळायचं असेल तर काय करावं? याचं उत्तर दिनांक
22 नोव्हेंबर रोजी ‘मंथन’मध्ये प्रसिद्ध झालेल्या रश्मी बन्सल यांच्या ‘आमच्या आई-बाबांचं काय?’ या लेखातून मिळतं. नवा व्यवसाय, स्वत:च्या आवडीचा उद्योग करायला जिगर लागते. ती जर मुलांमध्ये असेल तर आनंद मानायचा सोडून मुलांच्या मनात अपयशाची भीती कोंबणं हे केव्हाही चूकच.
त्यापेक्षा मुलांवर विश्वास ठेवणं, त्यांना जमेल तसं पाठबळ देणं, त्यांच्या संघर्षाच्या काळात त्यांच्याशी वैचारिक संघर्ष करण्यापेक्षा त्यांच्याशी पावलोपावली संवाद ठेवून त्यांचं मनोबल वाढवणं हे केव्हाही चांगलं.
कोणतंही पाठबळ नसताना स्वत:च्या बुद्धीच्या, कौशल्याच्या जोरावर नवं काही तरी सुरू करणा:या उमद्या मुलांना त्यांच्या पालकांकडून सुरुवातीच्या काळात फक्त मनोबल आणि विश्वास मिळाला तर आपल्या देशातही तरुण आणि यशस्वी उद्योजकांची फळी तयार होईल हे नक्की!
- गजेंद्र तराळे
यवतमाळ