- वेंकटरामन रामकृष्णनगेल्या अनेक वर्षांपासून मी संशोधन क्षेत्रात काम करतो आहे. त्यासंदर्भात सर्वसामान्य वाचकांसाठीचं माझं पहिलं पुस्तकही (जीन मशीन) मी नुकतंच लिहिलंय. हे लिखाण कल्पितावर आधारित आहे, की वास्तवावर, याबद्दल वाद होऊ शकतो, मात्र साहित्य-कला आणि वैचारिक लेखनाचा समावेश असलेली मानव्यविद्याशाखा आणि शुद्ध विज्ञान या दोन विद्याशाखांमधली अतिप्रचंड खोल दरी यासंदर्भातली काही निरीक्षणं मी मांडणार आहे.याच प्रश्नावरून समाजातील अनेक घटकांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून मोठा संभ्रम आहे. ब्रिटिश शास्रज्ञ आणि कादंबरीकार सी. पी. स्नो यांनी बऱ्याच वर्षांपूर्वी या दरीच्या अल्याड-पल्याडच्या दोन जगांनी निर्मिलेल्या दोन विभिन्न संस्कृतींच्या संदर्भात लिहिलेला एक निबंध त्यावर प्रकाशझोत टाकतो.गेली कित्येक वर्षे मी संशोधन क्षेत्रात आहे; पण कुठेही गेलो की, आजही अनेकजण मला विचारतात, ‘तुम्ही काय करता?’मी सांगतो, ‘मी शास्रज्ञ आहे’.हे सांगितल्यावर समोरच्या चेहºयावर एक भीतीयुक्त प्रश्नचिन्ह आणि अलिप्तता उमटलेली दिसते.‘कुठल्या प्रकारचे शास्रज्ञ?’- विनम्रपणे पुढला प्रश्न येतो.‘मी मॉलिक्युलर बायोलॉजिस्ट आहे. आपल्या जिन्समधील माहितीपासून प्रोटिन्स कसे बनतात याचा अभ्यास मी करतो’, असं मी सोप्यात सोप्या भाषेत सांगतो.मग ती समोरची व्यक्ती आमचा संवाद अर्ध्यातच गुंडाळल्यासारखी घाईघाईत म्हणते,‘अरे व्वा, हा प्रकार तर फारच आकर्षक आहे आणि तुम्ही फारच बुद्धिवान दिसता. विज्ञान आणि गणितात आमचं डोकं कधीच फार चाललं नाही. आम्हाला आजही त्यातलं ओ की ठो कळत नाही !’- बस्स, या विषयावरचा हा इतकाच संवाद.संभाषणाची गाडी लगेच पटरी बदलते आणि घाईघाईने त्यांनी नुकत्याच वाचलेल्या एखाद्या कादंबरीवर नाहीतर ऐकलेल्या एखाद्या मैफलींच्या गप्पांवर घसरते.आता याच्या नेमकी उलट कल्पना करून बघा.समजा मी त्यांना म्हणालो, ‘साहित्य, संगीत, कला.. यातलं मला तर बुवा काहीच कळत नाही. तो काही माझा प्रांत नाही !’..तर तेच लोक, जे मला अतिशय प्रौढीनं सांगत असतात, की विज्ञान आणि गणितातलं आपल्याला काहीच समजत नाही, ते माझ्यासारख्याला मात्र लगेच अगदीच अनाडी आणि बोअर समजायला लागतील !..वास्तविक विज्ञान आणि गणिताचा आपल्यापैकी प्रत्येकानं समरसून आस्वाद घेतला पाहिजे. कारण विज्ञान आणि गणित हा मानवी कार्यसिद्धीचा एक विलक्षण आविष्कार आहे. साहित्य, संगीत, कला आणि इतिहास या गोष्टी जशा आपल्या संस्कृतीचा एक भाग आहेत, तसंच विज्ञान आणि गणितही आपल्या संस्कृतीपासून अलग करता येणार नाही.कल्पना करा.. समजा, आपण भूतकाळात जाऊ शकतोय. आजपासून आपण फक्त दोनशे वर्षं मागे जायचं, आणि त्यावेळच्या ‘स्मार्ट’ लोकांना सहज गप्पांमध्ये सांगायचं : की अनुवंशिक माहिती अणूंमध्ये संकेत रूपात कशी साठवली जाते, वेगवेगळ्या प्रजाती कशा उत्क्रांत झाल्या, वर्षानुवर्षांच्या जुनाट आणि चिवट रोगांवर प्रतिजैविके हा कसा रामबाण उपाय आहे, विश्वाची उत्पत्ती कशी झाली हे आम्हाला माहीत आहे, विघातक गोष्टींबरोबरच चांगल्या गोष्टींसाठीही अणूचा कसा उपयोग केला जाऊ शकतो, हे आम्ही शोधून काढलं आहे. अंत:चक्षुनं पाहावं तसं अगदी दुसºया खंडावरच्या व्यक्तीला आम्ही पाहू शकतो, एवढंच नव्हे, तर त्याचवेळी त्याच्याशी प्रत्यक्ष संवादही साधू शकतो.. आणि हे सारं काही आम्हाला माहीत आहे, या गोष्टी आम्ही प्रत्यक्षात करूही शकतो, तर काय होईल?आपल्या आधी फक्त दोनशे वर्षं या पृथ्वीवर वावरलेल्या आपल्याच पूर्वजांची बोटं आश्चर्यानं तोंडात जातील आणि आपण कोणी मायावी जादूगार आहोत की काय, असंही त्यांना वाटेल.या विश्वाच्या पोटातली सत्ये शोधून काढण्याचे तीन रस्ते आहेत : कला, साहित्य आणि विज्ञान ! त्यातला विज्ञानाचा रस्ता थोडा वेगळ्या स्वभावाचा आणि गुणधर्मांचा आहे, एवढंच ! त्या रस्त्यावर कुणा एकाच्या पाऊलखुणा उमटत नाहीत. त्या रस्त्यातल्या थांब्यांवर कुणा एकाचा स्वामित्व-हक्क नाही. तुम्ही कोण आहात किंवा कुठे काय लिहिलं गेलं आहे, याच्याशी विज्ञानाला कोणतंही कर्तव्य नाही, मात्र कोणतीही कल्पना विज्ञान नाकारत नाही. कारण प्रयोगातून ती तपासली जाऊ शकते. योग्य ते प्रशिक्षण आणि त्यातलं कौशल्य प्राप्त केल्यानंतर जगातला कोणीही, कोणत्याही ठिकाणी त्या कल्पनेतली तथ्यातथ्यता तपासू शकतो.विज्ञान हा आज आपल्या आयुष्यातला सर्वाधिक महत्त्वाचा घटक आहे. आपण आज ज्या युगात राहतो, तिथे विज्ञान आणि तंत्रज्ञान या दोन गोष्टी सर्वव्यापी आहेत. सरकारपासून ते कंपन्या, शिक्षणतज्ज्ञ आणि अनेकजण आपापल्या क्षेत्रात सातत्यानं काही ना काही निर्णय घेताहेत, या निर्णयांचा आपल्या आयुष्यावर गहिरा प्रभाव पडतो.मी जे काही सांगतोय, त्याचा काही उपयोग नाही, ते कमी उपयुक्ततावादी आहे, असं कदाचित तुम्हाला वाटेल; पण विज्ञान आणि ज्ञानाचा पाठपुरावा करणं हा सौंदर्याचाच एक अत्युत्कट असा आविष्कार आहे. कवी, कलावंत यांच्या कलाकृतीतून कायमच चांदण्या रात्रींचं सौंदर्य प्रतिबिंबित होतं; पण मग हबल दुर्बिणीतून घेतलेलं या अतरल चांदण्याचं प्रत्यक्ष दर्शन हे सौंदर्य नाही, तर दुसरं काय असतं?डीएनएची वर्तुळाकृती संरचना, आपल्या जिन्सची रचना सांगणारे अणू.. त्यांच्यातल्या साधे, सोपेपणातही अद्वितीय सौंदर्य आहे. अणू आणि परमाणूत दडलेलं गुपित आपल्याला केवळ आश्चर्यचकितच करत नाही, तर त्यातलं सौंदर्यही आपल्याला लुभवतं.मात्र त्याच वेळी, आम्हा शास्रज्ञांनीही प्रकृतीचे मानवी, भावनिक आणि सामाजिक पैलू कधीही विसरता कामा नयेत. जगाकडे पाहण्याचे विज्ञानाला अवगत असतात त्याहून अनेक दृष्टिकोन आहेत. इतिहासापासून आपण कायमच बोध घेतला पाहिजे. कला आणि संगीत ही क्षेत्रं अतिशय गूढ, गहिºया आणि अनपेक्षित प्रांतात तुमची मुशाफिरी घडवून आणू शकतात.... म्हणूनच मानवता आणि कलेच्या प्रांतातून शास्राला आणि माझ्यासारख्या शास्रज्ञांना खूप काही शिकण्यासारखं आहे.
(नोबेल पुरस्काराने सन्मानित मूळ भारतीय वंशाचे अमेरिकन-ब्रिटिश शास्रज्ञ )(जयपूर येथे नुकत्याच संपन्न झालेल्या ‘जयपूर लिटफेस्ट’च्या उद्घाटनप्रसंगी केलेले बीजभाषण)