- हेरंब कुलकर्णी
* शिक्षक म्हणून तुम्ही मुलांसाठी खूपच वेळ दिला, नेमके कसे काम केले? - मी ज्या गावात नोकरी केली तिथे पहाटे पाच वाजता विद्यार्थ्यांना बोलवायचो. योगासने, व्यायाम व अभ्यास घ्यायचो. दिवसभर शाळा व संध्याकाळी ७ ते १० या वेळेत मुलांना अभ्यासाला बोलावत असे. साने गुरुजी कथामाला उपक्रम प्रत्येक आठवड्यात घेतला. ‘श्यामची आई’ पुस्तक ८०० कुटुंबांत पोहोचविले. भूकंपग्रस्त भागात विनंती बदली मागून घेतली. शाळेतील विद्यार्थ्यांना पोहायला शिकवले.
* तुम्ही जवळपास १० गावांत नोकरी केली. त्या प्रत्येक गावात तुम्ही कोणकोणते सामाजिक उपक्रम केलेत? - त्या त्या गावातील पालकांच्या व शेतकऱ्यांच्या अभ्यास सहली काढल्या. प्रयोगशील शेती दाखवायला नेले. एकवर्षी महाराष्ट्रातील आदर्श गावे, एकवर्षी गांधी, विनोबांचे आश्रम, किल्ले अशा सहली काढल्या. रस्त्यावरील बसून चप्पल शिवणाऱ्या १८ मोची बांधवांना व्यवसायासाठी छत्रींचे वाटप केले. सेंद्रिय शेतीची शिबिरे घेतली. बचत गटाच्या मदतीने गरीब कुटुंबांना म्हैस घेऊन दिली. अपंग व्यक्तीला तीनचाकी सायकल घेऊन दिली. गावात वाचनालये काढली. डासमुक्त गल्ली होण्यासाठी प्रत्येक घरात पाण्याची टाकी दिली. रस्त्यावर झोपलेल्यांना थंडीच्या दिवसांत चादररींचे वाटप केले. अंधश्रद्धा निर्मूलन समितीत मी २५ वर्षे काम करतोय. निवृत्तीनंतर सध्या राज्य कार्यकारिणीत काम करतोय. मी कीर्तनही करतो.
* प्रत्येक नोकरीच्या गावात तुम्ही दारूबंदी केली..ते कसे जमले? - हडोळती या ८००० लोकसंख्येच्या गावात मतदान घेऊन आम्ही दारू दुकाने बंद केली. इतर नोकरीच्या गावी अवैध दारू पोलिसांमार्फ त बंद केली. वडील दारू पीत असतील तर दारू बंद करेपर्यंत मी जेवणार नाही, अशी विद्यार्थ्यांना गांधीगिरी शिकवली. त्यातून अनेक पालकांची दारू सुटली. विडी, तंबाखू आणून देणार नाही असे मुले सांगत.
* तुम्ही जत्रेतील पशूहत्याबंदी केली. हे अवघड काम शिक्षक असूनही कसे केले? - भूकंपग्रस्त तपसेचिंचोली गावामध्ये पहिल्या मंगळवारी तिथे यात्रा भरत असे. आजूबाजूच्या गावांतील हजारो लोक त्या दिवशी देवदर्शनाला येत. शेकडो कोंबड्या, मेंढ्या, बकऱ्यांचे बळी देत. पहिल्या वर्षी अपयश आले; पण दुसऱ्या वर्षी यात्रेच्या दिवशी ज्या ठिकाणी कोंबडे, मेंढी आणि बकऱ्यांचा बळी दिला जायचा तिथे ज्ञानेश्वरी घेऊन उपोषणाला बसलो. सोबत कथामालेचे विद्यार्थी आणि गावातील काही तरुण होते. गुरुजी उपोषणाला बसल्याची वार्ता पसरली. चार-पाचशे लोक माझ्या पाठीशी जमले. विरोधक अल्प मतांमध्ये आल्यामुळे त्यांनी माघार घेतली. सर्व लोक देवीला शाकाहारी नैवेद्य दाखवून परतले. सहा वाजता उपोषणाची सांगता झाली.
* दारूबंदी किंवा पशूहत्याबंदी ही अत्यंत कठीण सामाजिक कामे आहेत, ती पुन्हा नोकरदार व्यक्तीने केली तर अनेकदा त्याच्यावर दडपण आणले जाते, बदली करण्याचे प्रयत्न केले जातात. या भीतीने शिक्षक गावात भाग घेत नाही; पण तुम्हाला त्रास झाला नाही का? - अजिबात त्रास झाला नाही. मी पहाटे पाच ते रात्री १० पर्यंत शाळेत पूर्णवेळ मुलांसाठी जे काम करीत होतो ते गावकरी बघत होते, त्यामुळे गावातील लोक, पुढारी यांना माझे कौतुक असायचे. तरुण मंडळ सोबत असायचे. शाळेत उत्कृष्ट काम केले की, सामाजिक उपक्रमात गावकरी साथ देतात, असा अनुभव आहे.
* इतके समर्पित काम करण्याची प्रेरणा काय आहे ?- मी रोज माझा पगार मोजायचो आणि पगाराइतके काम मी करतो का? या अपराधी भावनेने मला काम करायला लावले. साने गुरुजी माझी जीवनप्रेरणा आहे. साने गुरुजींच्या प्रेरणेतून ही सारी धडपड नोकरीत मी केली.
( herambkulkarni1971@gmail.com , tammewarharidas@gmail.com )