- दिलीप फडके
कुठल्याशा जाहिरातीत महानायक कपडे धुण्याच्या पावडरीचे गुणवर्णन करताना दिसतो... तर दुसऱ्या एका जाहिरातीत मराठीतील सर्वांत जास्त काळ पडद्यावर दिसलेला महागुरू एका खाद्यतेलाची प्रशस्ती करून आपल्या फिटनेसचे रहस्य म्हणून बायकोच्या प्रेमासोबतच त्या तेलाचे स्थान असल्याचे सांगतो. जिच्या नवऱ्याच्या डोक्यावरचे केसांचे छप्पर उडायला लागले आहे अशी स्वरूपसुंदरी लांब, काळ्या केसांसाठी अमकेटमके तेल वापरायचा अनाहूत सल्ला देते... अशा कितीतरी जाहिराती रात्रंदिवस आपल्याभोवती पिंगा घालत असतात.
थोरामोठ्यांकडून वस्तूच्या वापराचे खरेखोटे लाभ जनतेच्या समोर मांडणे आणि त्यांना त्या वस्तूकडे आकर्षित करून घेणे हा जाहिरातीचा खूप जुना प्रकार आहे. ‘सेलिब्रिटी एन्डॉर्समेंट’ हा जाहिरातीचा एक अत्यंत प्रभावी प्रकार मानला जातो. कित्येक वर्षे हा प्रकार बाजारात अतिशय प्रभावी ठरलेला आहे. याचे सर्वोत्तम उदाहरण लक्स साबणाच्या जाहिरातीचे आहे. जवळपास शंभर वर्षे या साबणाच्या जाहिरातीत चित्रपट तारे आणि तारकांचा वापर होतो आहे. सुरुवातीच्या काळातील पाश्चिमात्य चित्रताऱ्यांनंतर १९४२ मध्ये लीला चिटणीस यांच्यापासून अगदी अलीकडच्या काळातील दीपिका आणि करिनासारख्या चित्रतारकांपर्यंत शेकडो सेलिब्रिटींचा वापर लक्सने केलेल्या आहे. साबण, सौंदर्यप्रसाधने, कपडे, दागिने, सिगरेट, छुपेपणाने केल्या जाणाऱ्या मद्याच्या जाहिराती यासारखी कितीतरी उदाहरणे आपल्याला आपल्या सभोवती बघायला मिळतात. ‘खूब जमेगा रंग, जब मिल बैठे है दो यार’ यासारखी चमकदार वाक्ये असणाऱ्या जाहिराती लोकांच्या अजूनदेखील लक्षात आहेत. या सगळ्या जाहिराती खूप प्रभावी होत्या आणि लोकांनादेखील त्या खूप आवडल्या होत्या.
सुरुवातीला लोकांना आवडणाऱ्या या जाहिरातींत हळूहळू लोकांची दिशाभूल केली जात आहे, हे लक्षात यायला लागले. कधी वस्तूमध्ये जे घटक वापरल्याचे सांगितले जाते ते प्रत्यक्षात वापरले जातच नाहीत किंवा त्यांचे प्रमाण नगण्य असते, कधी वस्तूचे जे गुणधर्म असल्याचा दावा केलेला असतो ते गुणधर्म वस्तूमध्ये पाहायलाच मिळत नाहीत... तर कधी वस्तू वापरल्याचे जे फायदे सांगितले जातात ते प्रत्यक्षात मिळत नाहीत... जाहिरातीवर विसंबून राहणाऱ्या ग्राहकांच्या पदरी निराशाच पडते, असे अनुभव अनेकदा येत असतात.
एखाद्या मोठ्या नामांकित सेलिब्रिटीच्या सांगण्यावर विसंबून खरेदी करावी तर ती वस्तू त्या सेलिब्रिटीने कधीच वापरलेली नसणे हे नेहमीचेच असते. फक्त मुहमांगा दाम मिळालाय म्हणून ग्राहकांच्या गळ्यात वस्तू मारणाऱ्या सेलिब्रिटींना नव्या ग्राहक संरक्षण कायद्याने एक मोठा दणका बसेल, अशी शक्यता निर्माण झालेली आहे. आतापर्यंत जाहिरात करणाऱ्या सेलिब्रिटीजना जबाबदार धरता येत नसे. साहजिकच मोठ्या मान्यवरांकडून आपल्या उत्पादनाची जाहिरात करवून घेऊन ग्राहकांची फसवणूक करणे सहज शक्य होई. याबद्दल जुन्या कायद्यात कोणतीही तरतूद नव्हती. आता मात्र भ्रामक किंवा खोटी जाहिरात करून ग्राहकांच्या फसवणुकीला कारणीभूत ठरणाऱ्या सेलिब्रिटीजना त्याबद्दलची जबाबदारी स्वीकारावी लागणार आहे. जाहिरात प्रसिद्ध करण्यापूर्वी जाहिरातीत केलेल्या दाव्याची चौकशी करण्याची जबाबदारी सेलिब्रिटीची आहे. दिशाभूल करणाऱ्या किंवा खोट्या जाहिरातीसाठी मान्यता देणाऱ्या सेलिब्रिटीला किंवा उत्पादकाला दोन वर्षांपर्यंत कारावास आणि दंड आकारण्याचा अधिकार असेल. वारंवार गुन्हा केल्याचे आढळले तर पन्नास लाख रुपये दंड आणि पाच वर्षांपर्यंतची शिक्षा होऊ शकते. त्यामुळे आता एखादा मोठा क्रिकेट स्टार किंवा चित्रपट सेलिब्रिटी एखाद्या उत्पादनाची जाहिरात करत असेल तर त्यांना पूर्वीपेक्षा जास्त काळजी घ्यावी लागेल. जाहिरात प्रसिद्ध करण्यापूर्वी जाहिरातीत केलेल्या दाव्याची चौकशी करण्याची जबाबदारी सेलिब्रिटीची आहे.
बऱ्याचदा कायदा अस्तित्वात आला तरी पुस्तकातच राहतो. केरळच्या थ्रिस्सूर जिल्हा ग्राहक न्यायमंचाने नुकताच एक निवाडा दिला आहे. एक हेअरक्रीम वापरूनदेखील त्याचा अपेक्षित परिणाम न मिळालेल्या एका ग्राहकाने न्यायमंचाकडे तक्रार दाखल केली. सुनावणी होऊन न्यायमंचाने त्या क्रीमचे उत्पादन करणारा उत्पादक, त्याची विक्री करणारा विक्रेता यांना दंड केलाच; पण ग्राहक कायद्यातील नव्या तरतुदींच्या आधारे त्या क्रीमची जाहिरात करणाऱ्या अनूप मेनन या मल्याळी अभिनेत्यालादेखील दंड ठोठावला. कदाचित नव्या कायद्यानुसार दंडाच्या शिक्षेस सामोरा जाणारा तो पहिला सेलिब्रिटी असावा. या निकालामुळे ग्राहक जाहिरातींकडे अधिक जागरूक दृष्टिकोनातून बघायला सुरुवात करतील. अर्थात यामुळे उत्पादक आणि जाहिरातदारदेखील अधिक जागरूक होतील आणि ग्राहकांची दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींचे प्रमाण कमी होईल. ‘दादा’ची ॲन्जिओप्लास्टी झाल्यावर तो जाहिरात करीत असलेल्या आणि त्याच्यामुळे बाजारात ‘फॉरचुनेट’ ठरलेल्या, हृदयासाठी खूप चांगल्या म्हणून जाहिरात होत असलेल्या खाद्यतेलाच्या जाहिरातीतून त्याला वगळल्याची चर्चा सुरू झाली आहे. नव्या कायद्याचाच हा दणका म्हटला पाहिजे.
pdilip_nsk@yahoo.com