मेघना ढोकेसिल्चर. इथल्या भाजून काढणाऱ्या उन्हात गर्दीनं गच्च भरलेल्या गल्ल्यांतून फिरायला लागलं की, दिसतो एक वेगळाच भारत. तो माहितीच नसतो आपल्याला. इथं लोक सिल्हेटी बंगाली भाषेत बोलतात. एखादा कुणी बोलता बोलता सांगूनही जातो, ‘वो कोलकातावाली नहीं, हमारा बंगाली अलग है, सिल्हेटी बोलता हम!’सिल्चरला उतरल्यापासून ते न पाहिलेलं सिल्हेट असं भेटायला लागतं.
कुठंय ते सिल्हेट? -तिकडे बांग्लादेशात!माणसं भेटत राहतात, बोलत राहतात. आणि माणसांच्या त्या गर्दीत भेटते फाळणी. आपली कहाणी सांगता सांगता कुणीतरी आपल्या आजोबांचं फाळणीच्या काळातलं जुनं, कळकट, रंग उडालेलं, रेफ्यूजी कार्ड हातात देतं.. ते पाहताना अंगावर काटा येतो. देशोधडीला लागलेल्या माणसांच्या रक्तघामाचा वास नाकात शिरायला लागतो. सिल्चर शहरातल्या भयंकर उन्हात फिरताना हा असा अनुभव वारंवार येत होता.खरं तर फाळणी म्हणताच आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो पाकिस्तान. पण फाळणी पूर्वेलाही झाली, हे कुठं आपल्या पटकन लक्षात येतं? तेव्हा पूर्वेच्या माणसांचं काय झालं?ते समजतं इथं सिल्चर खोऱ्यात आणि आसाममध्ये आल्यावर..त्याला निमित्त ठरते सध्या आसाममध्ये सुरू असलेली एनआरसी प्रक्रिया. एनआरसी म्हणजे राष्ट्रीय नागरिक नोंदणी. आसाममध्ये राहणाऱ्या माणसांत कोण घुसखोर, कोण भारतीय नागरिक याचा शोध ही प्रक्रिया घेतेय आणि ४० लाख लोकांची नावं एनआरसीच्या अंतिम मसुद्यात वगळण्यात आली आहेत.खरं तर हा शोध भारतीय नागरिकत्वाचा आहे, म्हणजे विषय राष्ट्रीय आहे; पण सारं आसाम एका भयंकर घुसळणीतून जात असताना उर्वरित भारताला त्याविषयी काहीही माहिती नाही, आस्था नाही, जणू काही ‘संबंध’च नाही. आपलं नागरिकत्वच पणाला लावत आसामी माणसं हे अग्निदिव्य करायला का तयार झाली, रांगा लावून उभी राहिली..?ते शोधतच आसाम आणि आसामच्या बराक व्हॅलीतलं सिल्चर शहर गाठलं. आसामचे भौगोलिकदृष्ट्या ढोबळमानानं दोन तुकडे झाले आहेत. एक बराक नदीचं बराक खोरं, दुसरं ब्रह्मपुत्र नदीचं ब्रह्मपुत्र खोरं. सिल्चर हे बराक खोºयातलं मोठं शहर. हे बराक खोरं भारत-बांग्लादेश सीमेला लागून आहे. मणिपूरच्या पर्वत रांगांत उगम पावलेली बराक नदी सिल्चरमार्गे बांग्लादेशात जाते. बराक खोऱ्यातले तीन जिल्हे आहेत. कचार, करीमगंज आणि हायलाकंदी. हे तिन्ही जिल्हे बंगाली भाषाबहुल. म्हणजे राज्य आसाम; पण इथली स्थानिक भाषा बंगाली, संस्कृती बंगाली. तीनही जिल्ह्यांत बंगालीबहुलच सारा कारभार.‘एनआरसी’चा झमेला समजून घ्यायला सगळ्यात आधी सिल्चर का गाठलं याचं उत्तरच या आसामी-बंगाली विभाजनात आहे. ‘एनआरसी’च्या पहिल्या मसुद्यातून वगळण्यात आलेल्यांपैकी बहुतेक लोक या बराक व्हॅलीतले आहेत. हिंदूही आणि मुस्लीमही. अर्थातच बंगाली भाषा बोलणारे. बंगालीभाषक स्थलांतरितांची बराक नदीच्या खोºयातली संख्या प्रचंड आहे.आसाममध्ये कुठून आले एवढे बंगाली लोक, याचं उत्तर शोधत थेट १९४७ पर्यंत मागे जावं लागतं. १९४७ साली देशाच्या वाटण्या झाल्या. सिल्चर आणि सिल्हेट या १९४७ पूर्वी समृद्ध असलेल्या बंगालीबहुल भागात धार्मिक मुद्द्यावर फाळणी झाली. सिल्हेट प्रांतातून हिंदू भारतात, बराक खोऱ्यात आले. पुढे पूर्व पाकिस्तानातल्या अस्थिरतेतून आले आणि बांग्लादेश मुक्तिसंग्रामाच्या काळातही मोठं स्थलांतर झालं. हिंदूंचे लोंढे आले आणि मुस्लीम लोंढेही आले. स्थलांतरितांची या खोऱ्यातली संख्या फुगत राहिली, एकूण आसाममध्येही फुगतच राहिली...आणि आता इतक्या वर्षानंतर हाच फाळणीचा अंगार इतिहासाच्या खोल भोवऱ्यात वर्तमानाचा पाय खेचतो आहे. त्या भोवऱ्याची ओढ इतकी तीव्र की आता तर तो आसामी माणसाच्या वर्तमानाचा बळी मागतो आहे. प्रवास करकरत बराक खोऱ्यातल्या दुर्गम भागात थेट बॉर्डरवर गेलं तर सुतारकंदी बॉर्डर भेटते. समोर बांग्लादेशात जाणारा काळाकुळकुळीत रस्ता. दुतर्फा हिरव्यासोनसळी रंगाची भातशेती. त्या बॉर्डरवर हात लांब करून वाट अडवून एक पिवळं बॅरिकेड उभं आहे. ते म्हणतं प्रूव्ह यूअर आयडिण्टिटी. सुतरकंदी गाव एकदम शांत, सन्नाटा. त्या गावातल्या एका बाईशी बोलण्याचा प्रयत्न केला तर तिनंच विचारलं, ‘आसमे? बांगालीर?’ मी म्हटलं, ‘ मी आसामी नाही, बंगालीही नाही !’पुढं काही बोलणार तेवढ्यात तीच हसून म्हणाली, ‘तोमी जानबे ना... ना जानबे !’हे असं ‘बाहेरच्यां’ना समजूच नये असं काय नेमकं खदखदतं आहे देशाच्या ईशान्येला? तेच शोधत तर बराक आणि ब्रह्मपुत्र नदीचं खोरं पिंजून काढलं..meghana.dhoke@lokmat.com‘दीपोत्सव २०१८ मध्ये वाचा, अस्वस्थ आसाममधल्या भळभळत्या जखमा..