- योगेश बिडवई
राष्ट्रपती भवनातील पद्म पुरस्कारांच्या श्रीमंती सोहळ्यात अंगात बंडी आणि धोतर घातलेल्या एका 66 वर्षाच्या व्यक्तीने राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते पद्मश्री पुरस्कार स्वीकारताना सर्वाचेच लक्ष वेधून घेतले. जेमतेम तिसरीर्पयत शाळा शिकलेली ही व्यक्ती म्हणजे ओडिशातील लोककवी आहे. पाच साहित्य अभ्यासकांनी त्यांच्या कवितांवर पीएच.डी. केली आहे. लोक त्यांना प्रेमाने ‘लोककवी रत्न’ म्हणतात. हलधर नाग हे त्यांचं नाव. शंभरावर अधिक काव्यसंग्रह लिहिलेल्या नाग यांनी 2क् महाकाव्ये लिहिली आहेत. विशेष म्हणजे, त्यांना हे सर्व मुखोद्गत आहे. गावोगावी त्यांचे कवितांचे कार्यक्रम होतात. संबलपुरी-कोशली भाषेतून लिहिणा:या या कवीच्या कविता म्हणजे ग्रामीण जीवनाचा अस्सल बाज आहे.
अठराविसे दारिद्रय़ असलेल्या घरात हलधर नाग यांचा ओडिशातील बारगढ जिल्ह्यात घेस गावी 31 मार्च 195क् रोजी जन्म झाला. तिसरीत असताना वयाच्या दहाव्या वर्षी त्यांचे वडील वारले आणि त्यांची शाळा सुटली ती कायमचीच. त्यानंतर त्यांनी सर्व धडे जीवनाच्याच शाळेत घेतले. गावातीलच एका मिठाईवाल्याच्या दुकानात ते डिश-भांडी धुण्याचं काम करू लागले. दोन वर्षानंतर सरपंचाने त्यांना जवळच्याच एका शाळेत स्वयंपाकी म्हणून काम मिळवून दिलं. तिथं त्यांनी तब्बल 16 वर्षे काम केलं. त्या भागात नंतर काही शाळा सुरू झाल्यानंतर बँकेतून एक हजार रुपये कर्ज घेऊन हलधर नाग यांनी शाळेच्या समोरच शालेय साहित्याचं छोटंसं दुकान सुरू केलं. विशेष म्हणजे, तो काळ शाळेत शाईपेन वापरण्याचा होता आणि नाग हे दहा पैशात पेनमध्ये शाई भरून देत असत.
नाग यांना याच दिवसांत त्यांच्या जीवनाचा खरा मार्ग सापडला. त्यांचा हात लिहिता झाला. ‘धोडो बरगच्च’ (पुरातन वटवृक्ष) ही पहिली कविता 199क् मध्ये लिहिली. स्थानिक नियतकालिकात ती प्रसिद्ध झाली. साहजिकच त्यांचं काहींनी कौतुक केलं आणि नाग यांना आणखी लिहिण्याची प्रेरणा मिळाली. त्यानंतर त्यांनी कविता लेखन आणि त्यांच्या गावाच्या परिसरात त्याचं सादरीकरण सुरू केलं. त्यांच्या कविता गावक:यांना आवडू लागल्या. निसर्ग, समाज, ग्रामीण जीवन, पौराणिक विषयांवर ते कविता लिहितात. त्यांच्या कविता म्हणजे ओडिशातील अस्सल ग्रामीण जीवनाचा आरसा आहे. गावातली पिचलेली, अन्यायग्रस्त, कष्टकरी माणसं त्यांच्या कवितांच्या केंद्रस्थानी आहेत. कविता म्हणजे वास्तव जीवनाचं एक अंग असतं. त्यातून आपण समाजाला काहीतरी देऊ शकतो. लोकांच्या दु:ख, वेदना यांना ते त्यातून वाट मोकळी करून देतात.
तिसरी शिकलेल्या हलधर नाग यांचं समग्र साहित्य ‘हलधर ग्रंथबली-2’ स्वरूपात संबलपूर विद्यापीठातर्फे प्रकाशित करण्यात येत आहे. विद्यापीठात त्यांच्या कविताही अभ्यासक्रमाचा भाग असणार आहेत. सुमारे 33क् शैक्षणिक व सामाजिक संस्थांनी आतार्पयत त्यांचा गौरव केला आहे. पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश, छत्तीसगडमधील विद्यापीठांतही त्यांच्या कविता वाचनाचे कार्यक्रम झाले आहेत. ओडिशा साहित्य अकादमीतर्फे भाषेच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावल्याबद्दल त्यांचा 2क्14 मध्ये गौरव करण्यात आला आहे. ‘कोशलीकौली’, ‘कोशलीरत्न’ आदि पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आलं आहे.
केवळ बंडी आणि धोतर घालणा:या हलधर यांना हीच वेशभूषा आवडते. त्यात त्यांना एक प्रकारचा मोकळेपणा जाणवतो. नाग यांना केवळ कवितेचा विषय सांगितला की ते कविता म्हणू लागतात. दिवसातून त्यांचे तीन-चार कवितांचे कार्यक्रम आता होतात. तरुणांना त्यांच्या कविता आवडतात, याचा त्यांना विशेष आनंद वाटतो. विशेष म्हणजे, पश्चिम ओडिशात तरुण कवी ‘हलधर धारा’ म्हणून ग्रामीण, गावकुसातील जीवनाच्या कविता सादर करतात.
कष्टकरी माणसाला आत्मप्रतिष्ठा महत्त्वाची वाटते, त्याचंच चित्रण हलधर नाग त्यांच्या कवितांतून करतात. संबलपुरी-कोशली भाषेचा राज्यघटनेच्या आठव्या अनुसूचित समावेश व्हावा म्हणून त्यांनी यशस्वीपणो लोकचळवळ राबविली. संबलपुरी-कोशली ही भाषा ओडिशातील दहा जिल्ह्यांत बोलली जाते. हे दहा जिल्हे ‘कोशल’ नावाने ओळखले जातात.
आयुष्यात कविता सापडली, तो परमोच्च क्षण असल्याचं हलधर नाग मानतात. ‘भाब’, ‘सुरुत’, ‘मोरा’ या काव्यसंग्रहांसह ‘अचिया’, ‘बचर’, ‘महासती ऊर्मिला’, ‘तारा मंडोदरी’ आदि महाकाव्यं त्यांच्या नावावर आहेत. नाग यांच्या नावाने लोककवी हलधर संस्कृत परिषद, लोककवी हलधर वन विद्यालय आदि संस्था स्थापन झाल्या आहेत.
बोलीभाषेपुरत्या मर्यादित राहिलेल्या संबलपुरी-कोशली भाषेला हलधर नाग यांनी त्यांच्या कवितांनी एक नवे परिमाण मिळवून दिले आहे. त्यामुळेच ओडिशातील ग्रामीण भागात त्यांचं नाव आज घरोघरी पोहचलं आहे.
(लेखक लोकमतच्या मुंबई आवृत्तीत
वरिष्ठ उपसंपादक आहेत.)
yogesh.bidwai@lokmat.com