(माहिती : डॉ. श्रीश क्षीरसागर)
ही छायाचित्रं पाहिल्यावर काय वाटतं? छोटा पक्षी मोठ्या पक्ष्याला भरवतोय की मोठा पक्षी छोट्या पक्ष्याला भरवतोय? की हे पक्षी नुसतीच गंमतजंमत करताहेत? या छायाचित्रांतील छोटा पक्षी आहे सनबर्ड. यालाच शिंजिर किंवा सूर्यपक्षी असंही म्हणतात. मोठा पक्षी आहे तो ‘ग्रे बेलिड कुकु’. म्हणजे कोकीळ कुळातला एक पक्षी.
यातला मोठा पक्षी खरंतर आहे एक पिल्लू आणि छोटा पक्षी आहे ‘दत्तक पालक’. निसर्गातलं हे एक आगळंवेगळं वैशिष्ट्य आहे. पक्ष्यांच्या काही प्रजातींमध्ये आपल्या पिलांची वाढ, पालनपोषण त्यांचे जन्मदाते करीत नाहीत, तर ‘दत्तक पालक’ या पिलांची पूर्ण जबाबदारी घेतात. म्हणजे अगदी अंडी उबवण्यापासून ते त्यातून पिलू बाहेर येऊन ते मोठं, ‘स्वतंत्र’ होत नाही, तोपर्यंत..! हे पक्षीही आपल्या पिलांप्रमाणेच दुसऱ्यांच्या पिलांवरही आपलं समजून प्रेम करतात, त्यांना वाढवतात. इथेही तेच दिसतं.
कावळा आणि कोकिळेचं उदाहरण यासंदर्भात अगदी प्रसिद्ध आहे. कोकिळा कावळ्याच्या घरट्यात आपली अंडी घालते आणि नंतर कावळेच त्यांच्या पिलांचं पालनपोषण करतात.
पावशा, काेकीळ, चातक, तसेच कुकु म्हणजे कोकीळ कुळातील काही पक्षी स्वत: घरटं बांधत नाहीत, त्यामुळे पिलांना जन्म देताना त्यांची मोठी अडचण होते. हे पक्षी मग एक युक्ती करतात. आपली अंडी ते दुसऱ्या पक्ष्यांच्या घरट्यात घालतात आणि निर्धास्त होतात. त्यांच्या पिलांची सर्व काळजी मग हे ‘दत्तक पालक’ घेतात.
नुसतंच दुसऱ्या पक्ष्याच्या घरट्यात आपली अंडी घालून उपयोग नाही. त्या पक्ष्याच्या मादीनेही नेमकी त्याच काळात अंडी घातलेली असावी लागतात. असं घरटं हे पक्षी आधी शोधतात. समजा कोकीळ पक्ष्यांच्या जोडीला कावळ्याचं असं घरटं सापडलं.. पण कावळ्याची जोडी घरट्यात असताना तिथे अंडी घालायची कशी? त्यामुळे कावळ्याच्या घरट्याजवळ जाऊन कोकीळ पक्षी खूप वेळ ओरडतो. काही वेळानं कावळ्यांनाही हा आवाज असह्य व्हायला लागतो. आपल्या पिलांना या पक्ष्यापासून धोका आहे, असं त्यांना वाटायला लागतं. त्यामुळे कोकीळला तिथून हुसकावण्यासाठी ते घरट्यातून बाहेर पडतात, कोकीळही त्यांना भुलवत दूर नेतो. तेवढ्यात कोकिळा संधी साधते आणि कावळ्याच्या घरट्यात आपली अंडी घालते! त्यांचं काम आता झालेलं असतं! कारण यापुढे पिलांची सारी जबाबदारी कावळ्यांची !
या पक्ष्यांच्या चतुराईच्या आणखीही काही गोष्टी पाहायला मिळाल्या आहेत. दुसऱ्या पक्ष्याच्या घरट्यात अंडी घालणारे हे पक्षी अगोदर घरट्यात असलेली काही अंडी खाली पाडून फोडून टाकतात. म्हणजे समजा अगोदर चार अंडी असतील, तर नंतरही चारच अंडी तिथे असतील. त्यामुळे घरटं असलेल्या पक्ष्याला अंड्यांतला झालेला बदल कळत नाही. कारण ही अंडीही साधारण सारख्याच आकाराची असतात.
अंड्यांतून पिलं बाहेर आल्यावर सुरुवातीला सारीच पिलं छोटी असतात, पण दोन-तीन आठवड्यांतच ही ‘दत्तक पिलं’ झपाट्यानं मोठी होतात. आपल्या पालकांपेक्षाही आकारानं ती धिप्पाड होतात. काही पिलं तर पालकांपेक्षा आकारानं चार-पाच पट मोठी होतात. त्यामुळे त्यांना खायलाही तसंच भरभक्कम लागतं. ही पिलं वाढवताना, त्यांच्यासाठी खाद्य गोळा करताना दत्तक पालकांचीही अक्षरश: दमछाक होते; पण तरीही ही पिलं ते वाढवतात. पिलं मोठी झाल्यानंतर काही पक्ष्यांना कळतंही ही पिलं आपली नाहीत; पण तोपर्यंत पिलाबरोबर त्यांचे बंधही जुळलेले असतात. त्यामुळे हे दत्तक पालक या पिलांना टाकून देत नाहीत.. मायेनं त्यांना वाढवतात.
वटवट्या, राखी, शिंपी, रेपाळ वटवट्या, सातभाई.. यांसारखे पक्षी इतर पक्ष्यांच्या पिलांचे पालक होतात. कारण, आपली अंडी त्यांनी या पक्ष्यांच्या घरट्यात घातलेली असतात.
पालक पक्ष्यांना ही पिलं मोठी करण्यात तसा काही फायदा नसतो, उलट त्यासाठी त्यांना मोठे कष्टच पडतात; पण एकमेकांच्या आधारानं जगताना अशी अनेक उदाहरणं निसर्गात दिसतात. उदाहरणार्थ माकड आणि हरीण. माकडं झाडावरची फळं काढून हरणांकडे फेकतात. हरीणही वाघ वगैरे आला की आवाज करून माकडांना सावध करतात.. निसर्गात अशा अनेक आश्चर्यकारक गोष्टी दडलेल्या आहेत. त्याकडे उघड्या डोळ्यांनी पाहायला फक्त हवं..!
(छायाचित्रे : मुकेश कुकडे, नागपूर)