- सुलक्षणा वऱ्हाडकर
आॅलिम्पिकच्या या महामेळ्यात पडेल ते काम करायला जगभरातून स्वयंसेवक रिओला येत आहेत. त्यात भारतीयांची संख्या मोठी आहे, हे विशेष!शंभराहून अधिक लोक भारतातून पदरमोड करून इथे रिओला दाखल झाले आहेत. दोन लाखाहून अधिकची रक्कम खर्च करून, शिवाय वरून महिनाभराची बिनपगारी सुटी घेऊन ही मंडळी इथे येत आहेत. यात कर्ज काढून येणारे काही तरुण विद्यार्थीही आहेत, हे विशेष!आता फक्त पाचच दिवस उरले.खास ब्राझीलच्या नखऱ्यात होणाऱ्या आॅलिम्पिकच्या ‘ओपनिंग सेरेमनी’कडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे आणि इथे रिओमध्ये एकच लगीनघाई उडून गेली आहे.लग्नकार्य म्हटल्यावर गोंधळ आलाच, तो या देशात अंमळ जास्त आहे, एवढेच! रिओमध्ये येणाऱ्या खेळाडूंच्या निवासापासून प्रेक्षकांना दिल्या गेलेल्या / अजून द्यायच्या तिकिटांपर्यंतच्या प्रत्येक गोष्टीत असलेल्या गोंधळाच्या कहाण्या तुम्ही वर्तमानपत्रात वाचल्या असतील. शिवाय प्रत्यक्ष सामने सुरू झाल्यावर दहशतवादी हल्ल्यांची तलवार डोक्यावर टांगती आहे, हे वेगळेच!- पण आॅलिम्पिकच्या यशाची जबाबदारी अंगावर असलेले अधिकारी काळजीत असले, तरी त्या तणावाचा मागमूस इथल्या रस्त्यांवर दिसत नाही.- लोकांचे जथ्थेच्या जथ्थे रिओमध्ये येऊ लागले आहेत. त्यात पर्यटकांची संख्या अर्थातच मोठी! शिवाय वेगवेगळ्या देशांच्या खेळाडूंची पथकेही दाखल होऊ लागली आहेत. आॅलिम्पिक व्हिलेजमधल्या साम्बाद्रोमाच्या अॅथलेटिक्स सेंटरमध्ये खेळाडूंचा सरावही सुरू झाला आहे. शिवाय स्थानिक व्हॉलेंटिअर्सची कामे, ट्रेनिंग सुरूच आहे. जगभरातून आलेल्या स्वयंसेवकांचा उत्साह उतू जातो आहे. सीएचा अभ्यास करणारा श्वाश्वत मुंबईहून नुकताच रिओला पोचला. त्याची ड्यूटी साम्बाद्रोममध्येच आहे. त्याला भारतीय नेमबाजांचा सराव पाहायला मिळतोय. दुबईहून आलेली मूळची गोव्याची असलेली वृषालीसुद्धा तिच्या ड्यूटीवर हजर झालीय. रात्री दहापासून पहाटेपर्यंत तिची ड्यूटी आहे. तीही अॅथलेटिक्स सेंटरवरच काम करतेय. मी टेनिस कोर्टवर असणार आहे. आमचेही दोन दिवसांचे ट्रेनिंग नुकतेच पूर्ण झाले. आॅलिम्पिकसाठी उभारण्यात आलेल्या स्टेडियम्सपैकी टेनिसचे स्टेडियम हे कायमस्वरूपी ठेवण्यात येणार आहे. या स्टेडियममध्ये जवळजवळ ४०० व्हॉलेंटिअर्स काम करतील, त्यात मी एक असेन.मागल्या आठवड्यात आम्ही गेलो तेव्हा या नव्या स्टेडियमचे काम पूर्ण झाले नव्हते. परंतु कामाचा जोम जबरदस्त होता. रात्रंदिवस मेहनत करून हे कार्य सिद्धीस न्यावे म्हणून रिओमध्ये एकच धामधूम उडाली आहे. संध्याकाळच्या वेळेस समुद्रकिनारी लष्कर तैनात झालेले दिसले, तेव्हापासूनच स्थानिकांना अंदाज आला, झाले आता आॅलिम्पिक सुरू!शहराच्या बाहा दी तिजुका या विभागात ६० टक्के सामने होणार आहेत. त्यानिमित्ताने नवीन बीआरटी स्टेशन या विभागाला मिळते आहे. हे नवेकोरे बसस्टेशन उद्यापासून सुरू होईल. कोपकबाना आणि बाहा या दोन ठिकाणांना जोडण्यासाठी तीन रस्ते होते. आॅलिम्पिकच्या निमित्ताने इथे मेट्रो सुरू झाली आहे. त्यामुळे पर्यटकांना, स्वयंसेवकांना प्रवास लवकर करता येईल . सध्या रिओमध्ये बोलबाला आहे तो हॉस्पिटॅलिटी हाउसेसचा! अर्थात आदरातिथ्य करण्यासाठी खुली केली गेलेली खासगी घरे!(महागड्या) हॉटेलांचा पर्याय न परवडणाऱ्या अनेक क्रीडारसिकांनी रिओमधल्या स्थानिकांच्या घरी निवासासाठी बुकिंग केले आहे.आॅलिम्पिक टेनिस सेंटरच्या अगदी समोरच्या इमारतीत एक भारतीय कुटुंब राहते. गेली अकरा वर्षे ते इथेच आहेत. आता त्यांची तिसरी पिढी ब्राझीलमध्ये वाढते आहे. या मारवाडी कुटुंबाने त्यांचे घर एक महिन्यासाठी भाड्याने दिले आहे.जिथे जिथे महत्त्वाचे सामने होणार त्या जवळपासच्या अशा घरांना अगदी कमी कालावधीत उत्तम कमाईची ही संधीच आहे.यातही एक विशेष गोष्ट आवर्जून सांगण्याजोगी!कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा न ठेवता या सोहळ्यात पडतील ते कष्ट उचलायला जगभरातून येणाऱ्या स्वयंसेवकांबद्दल रिओवासीयांना मोठी उत्सुकता आहे.काही जणांनी आपली घरे या स्वयंसेवकांना राहण्यासाठी मोफत खुली केली आहेत. घरातली एक बेडरूम स्वयंसेवकांसाठी! तेही विनामूल्य! त्यासाठी एक अधिकृत वेबसाइटही चालवली जाते आहे.जशी घरे उपलब्ध आहेत तसेच महागडी तिकिटे न परवडणाऱ्या क्रीडारसिकांसाठी रस्तोरस्ती स्क्र ीन्स लावण्यात येणार आहेत; शिवाय खाण्या-पिण्याची, नाचगाण्याची चंगळ असेल ती वेगळीच! ट्रॅफिकचे नियम सर्वसामान्यांना सोयीचे असणार आहेत. म्हणजे जास्तीत जास्त लोक सार्वजनिक वाहने वापरतील. ट्रॅफिक जाम होणार नाही. ऐतिहासिक इमारती, समुद्रकिनारे, स्पोर्ट्स क्लब इथे सामने पाहण्याची सोय असणार आहे. तिसाहून जास्त देश आपापली हॉस्पिटॅलिटी हाउसेस उभारणार आहेत. चीन आणि अमेरिकेच्या हॉस्पिटॅलिटी हाउसेसमध्ये फक्त खेळाडूंना आणि निमंत्रितांनाच प्रवेश असेल.काही देशांनी मात्र त्यांच्या हॉस्पिटॅलिटी हाउसची दारे उघडी ठेवली आहेत. तिथे नि:शुल्क प्रवेशासाठी आगाऊ नोंदणी करावी लागेल. आपापल्या देशाच्या खेळाडूंचे मनोधैर्य वाढावे म्हणून ही हाउसेस काम करतील. म्हणजे जर नेदरलँडने महिलांच्या हॉकीमध्ये सुवर्णपदक मिळवले तर त्याच्या दुसऱ्या दिवशी डच हाउसमध्ये मोठ्ठी पार्टी होणार! आणि ज्या पर्यटकांकडे डच पासपोर्ट असेल, त्यांना (आगाऊ नोंदणीने) या पार्टीला प्रवेश मिळणार!जमेक्का हाउसमध्ये अॅथलेटिक्सची धमाल असणार आहे. हॉलंडमध्ये हॉकी, ब्राझीलमध्ये फुटबॉल, हंगेरीमध्ये वॉटरपोलो आणि डेन्मार्कमध्ये हँडबॉल! या देशांच्या फेसबुक पेजेसवर या पार्ट्यांची माहिती झळकू लागली आहे.उद्घाटन समारंभाची तिकिटे अत्यंत महाग आहेत. म्हणून आपापल्या देशाच्या हॉस्पिटॅलिटी हाउसमध्ये प्रवेश मिळवून तिथल्या मोठ्या पडद्यावर हा कार्यक्रम पाहण्याचे नियोजन अनेकांनी जमवत आणले आहे. ...या उत्साही वीरांमध्ये भारतीयांची संख्याही बरीच म्हणावी इतकी दिसते. सध्या रिओमध्ये पंचवीसच्या आसपास भारतीय कुटुंबे राहतात. यात विद्यार्थीसुद्धा असतील.गेल्या सहा महिन्यांत इथून अकराहून जास्त कुटुंबे परत गेली. त्यातल्या काही जणांना तर केवळ एका महिन्याच्या नोटिसीने ब्राझील सोडून जाणे भाग पडले. त्याचे मुख्य कारण तेलाचे अर्थकारण गडगडल्याने बिघडलेली कंपन्यांची आर्थिक/ व्यावसायिक गणिते! आॅलिम्पिक तोंडावर असताना असे परत जावे लागणे अनेकांना खट्टू करून गेले. पर्यटक म्हणून अनेक भारतीय रिओमध्ये येत आहेत. त्यांच्यासाठी भारतीय वकिलातीने माहिती केंद्र उभारावे अशी एक मागणी आहे. पण त्या बाबतीत अजूनतरी फारशी हालचाल दिसत नाही. भारतीय स्वयंसेवकांनी स्वत:चा एक फेसबुक ग्रुप तयार केला आहे, सध्यातरी तेच ‘माहिती केंद्र’ झालेले दिसते.भारतातून पदरमोड करून इथे रिओला येणाऱ्या स्वयंसेवकांची संख्या १२० पेक्षा जास्त असावी.दोन लाखाहून अधिकची रक्कम खर्च करून, शिवाय वरून महिनाभराची बिनपगारी सुटी घेऊन ही मंडळी इथे येत आहेत. यात कर्ज काढून येणारे काही तरुण विद्यार्थीही आहेत, हे विशेष!....त्यातले काहीजण आॅलिम्पिक सुरू होण्यापूर्वी माझ्या घरी जेवायला, गप्पा मारायला येणार आहेत. त्या गप्पांचा वृत्तांत पुढच्या रविवारी!!प्रॉब्लेम आहे, बॉस!आॅलिम्पिकच्या पार्श्वभूमीवर सध्या एक विनोद रिओमध्ये व्हायरल झाला आहे. दहशतवादी संघटनेने बॉम्बस्फोट घडवण्याच्या ‘मिशन’वर रिओला पाठवलेली टोळी आणि त्यांचे मुख्य हॅण्डलर यांच्यातला हा (अर्थातच रचलेला) संवाद :हॅण्डलर : आपला प्लॅन अयशस्वी कसा झाला? म्होरक्या : आमच्या बॅगाच चोरीला गेल्या. ब्राझील एअरपोर्टवर इंटरनॅशनल फ्लाइटमध्ये अशा बॅगा चोरीला जातातच म्हणे. आम्ही काय करणार त्याला?हॅण्डलर : ओके. आम्ही तुम्हाला एक्स्प्लोझिव्हचे नवीन शिपमेंट पाठवतो.म्होरक्या : नको नको. इथले लोक संपावर गेलेत. हॅण्डलर : ओके, मग तुम्ही स्थानिक मटेरियल वापरून काही स्फोटके बनवू शकता का?म्होरक्या : आम्ही प्रयत्न केला, पण पोस्ट आॅफिस संपावर गेलेय. वस्तू मिळाल्याच नाहीत वेळेवर . हॅण्डलर : ३.१७ मिनिटाने स्टेडियम उडवायचा प्लॅन होता आपला. का नाही झाले तसे? म्होरक्या : आम्ही स्टेडियमची तिकिटे विकत घेतली होती. पण ऐनवेळी त्यांनी खेळाची जागा कुणालाही न सांगता बदलली. आणि रिओमधल्या ट्रॅफिकमधून आम्ही सोडा, खेळाडूसुद्धा स्टेडियममध्ये वेळेवर पोचणं शक्य नाहीये.हॅण्डलर : ओके. मग तुम्ही कार घेऊन गर्दीत का नाही घुसलात?म्होरक्या : आम्ही जिथे आमची गाडी ठेवली होती तिथे कुणीतरी चारही टायरमधली हवाच काढून टाकली. आम्ही तिथल्या माणसाला वरचे पैसे द्यायला विसरलो, बॉस!हॅण्डलर : तुम्ही टॅक्सी का नाही घेतलीत मग?म्होरक्या : घेतली ना! पण तो टॅक्सीवालाच आम्हाला लुबाडून पळाला!हॅण्डलर : ब्राझीलमध्ये काहीच धड नाहीये का, म्हणजे?म्होरक्या : आहे ना बॉस, इथला क्राइम तेवढा वेल आॅर्गनाइझ्ड आहे! अरे बाबा...!!‘कमिनो दास इंडियाज्’ ही ब्राझीलिअन टीव्ही सीरियल सध्या इथे अत्यंत लोकप्रिय आहे. एमी पुरस्कार मिळालेली ही मालिका भारतीय संस्कृतीचे रूप घेऊन येते. एका दलित व्यक्तिरेखेच्या आयुष्याचा प्रवास या मालिकेत पोर्तुगीजमध्ये घडताना आपल्याला दिसतो.कोणत्याही भरजरी हिंदी, एकता कपूर टाइप मालिकेसारखी ही मालिका आहे. प्रेम, विरह, अरेंज मॅरेज, किचन पॉलिटिक्स, जातीयवाद, गणपती पूजा, बॉलिवूड डान्स, मेकअपचे थर, अश्रुपात... सगळे अगदी थेट भारतीय मालिकांमधून उचललेले! ही मालिका पाहताना जाणवतच नाही की ती ब्राझीलच्या गाजलेल्या चॅनलवर आहे आणि प्रचंड लोकप्रिय आहे. सध्या या मालिकेचा दुसरा सिझन चालू झालाय.. आणि त्या वेळेस सगळेजण भान विसरून टीव्हीला चिकटलेले असतात. या मालिकेमुळे अनेक हिंदी शब्द इथे लोकांच्या तोंडी रुळू लागले आहेत. तुम्ही इंडियन आहात हे त्यांना समजले की लगेच ‘अरे बाबा’ असे लोक म्हणतात. कारण या मालिकेतली एक व्यक्तिरेखा सारखी जाता-येता ‘अरे बाबा’ म्हणत असते.. समुद्रकिनारी कापोइरा हा ब्राझीलियन मार्शल आर्टचा प्रकार. सोळाव्या ते अठराव्या शतकाच्या सुमारास (ब्राझीलमध्ये त्या काळातील इतिहासाचे संदर्भ नसल्यामुळे नेमका कोणता काळ हे संदिग्ध आहे) सुमारे ४० टक्क्यांहून जास्त आफ्रिकन मजूर उसाच्या मळ्यात राबत होते. मजूर गुलाम ही त्यांची ओळख. त्यांच्यासाठी कोणत्याही प्रकारच्या मनोरंजनाची सोय नव्हती. अखंड हलाखी. स्वत:वर झालेल्या अन्यायाची दाद मागणे शक्य नाही, शस्त्र बाळगण्याची तर शक्यताही शून्य!अशा अवस्थेत खितपत पडलेल्या या गुलामांनी मन रमवण्यासाठी एक स्वतंत्र नृत्यशैली विकसित केली. साधे संगीताच्या तालावर केलेले हे नृत्य म्हणजेच कापोइरा!पोर्तुगीजांना शंकासुद्धा न येऊ देता गुलाम मजुरांनी ही कला विकसित केली. सध्या आॅलिम्पिकच्या पार्श्वभूमीवर रिओच्या समुद्रकिनारी अनेक ग्रुप्स संगीताच्या तालावर हे नृत्य करताना दिसतात...