- डॉ. यश वेलणकरआपल्या शरीरात कोणत्याही वेदना होतात त्यांचा मुख्य उद्देश आपले लक्ष वेधून घेणे हाच असतो. लेप्रसी म्हणजे कुष्ठरोग या आजारात वेदना समजत नाहीत, त्यामुळे एखादी जखम झाली तरी ते त्या रुग्णाला कळत नाही. त्यामुळे त्या जखमेची काळजी घेतली जात नाही. मधुमेह झाला असेल तर हार्ट अटॅकच्या वेदना कळत नाहीत. छातीत दुखत नाही; पण हृदयाला होणारा रक्तपुरवठा थांबतो आणि मृत्यू येऊ शकतो. वेदना समजणे आरोग्यासाठी खूप आवश्यक आहे.एखाद्या ठिकाणी वेदना होऊ लागतात, मान दुखायला लागते, त्यावेळी माणूस त्याच्या मानेकडे लक्ष देऊ लागतो, मानेचे व्यायाम करू लागतो. वेदना कमी करण्यासाठी उपचार केले जातात, औषधे घेतली जातात. पण माणसाला होणारे दु:ख केवळ वेदनेचे नसते. या वेदना मलाच का आहेत, त्या नक्की कशामुळे आहेत, असे अनेक विचार माणसाचे दु:ख वाढवत असतात. अन्य प्राण्यांना वेदना होतात; पण असे दु:ख होत नसावे. माणसाचे दु:ख मात्र त्याच्या वेदनेच्या बरोबरच अस्वीकाराचेही असते. वेदना आणि दु:ख या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. वेदनेच्या अस्वीकारामुळे दु:ख निर्माण होते. माइंडफुलनेस थेरपीने हे अस्वीकाराचे दु:ख कमी होते. सांधेदुखी, मायग्रेन यासारख्या अनेक आजारात माइंडफुलनेस थेरपीचा उपयोग केला, तर औषधांचे प्रमाण कमी करता येते असे जगभरातील संशोधनात दिसत आहे. मुंबईतील मानसरोगतज्ज्ञ डॉ. मनोज भाटवडेकर यांना सांधेदुखीचा आजार आहे. पण माइंडफुलनेसमुळे तो कसा सुसह्य झाला आहे, त्यांचे औषधांचे प्रमाण कसे कमी झाले आहे हे त्यांनी त्यांच्या ‘एका पुनर्जन्माची कथा’ या पुस्तकात सांगितले आहे.शारीरिक वेदनांची तीव्रता कमी करण्यासाठी माइंडफुलनेस थेरपीमध्ये ओपन अटेन्शनचा उपयोग करून घेतला जातो. ज्या ठिकाणी वेदना होत आहेत, तेथे आपले लक्ष निसर्गत: केंद्रित होत असते. पायाचा गुडघा दुखत असेल तर आपले लक्ष तेथेच जाते. आपले लक्ष वेधून घेण्यासाठीच असे होते. त्यावेळी तो का दुखतो आहे, हे समजून घेण्यासाठी तपासण्या करायला हव्यात, फिजिओथेरपी, काही औषधे घ्यायला हवीत. अशावेळी वेदनाशामक गोळ्यांनी वेदना कमी होतात; पण त्या रोज अनेक दिवस घेतल्या तर त्याचे अनेक दुष्परिणाम होऊ शकतात. वेदना अशा होत असतात की शरीरात फक्त गुडघा हा एकच अवयव आहे असेच वाटत असते, चैन पडत नसते.अशावेळी माइंडफुलनेस थेरपीनुसार आपले अटेन्शन केवळ गुडघ्यावर न ठेवता संपूर्ण पायावर ओपन अटेन्शन ठेवण्याचा प्रयत्न करायचा. कंबरेपासून पायाच्या बोटांपर्यंत संपूर्ण पायावर एकाच वेळी लक्ष द्यायचे. कोणत्या भागात खाज उठते आहे, कोठे स्पर्श समजतो आहे, हे समजून घ्यायचे. वेदना होत आहेत त्या कोणत्या भागात आहेत, त्या कोठे सुरू होतात अणि कुठपर्यंत पसरतात हे साक्षीभावाने जाणत राहायचे. कोणत्या भागात वेदना आहे आणि कोणत्या भागात नाही हे जाणत राहायचे. आपले अटेन्शन एक्सपॉण्ड करायचे, विस्तारित करायचे, ते छोट्या अंगावर न ठेवता विस्तीर्ण भागावर ठेवायचे. असे विस्तारित अटेन्शन म्हणजेच ओपन अटेन्शन होय. सरावाने असे अटेन्शन एकाचवेळी संपूर्ण शरीरावरदेखील ठेवता येते. एकाच वेळी संपूर्ण शरीरात कोठे कोठे काय काय होत आहे हे प्रतिक्रि या न करता जाणत राहणे शक्य आहे. असे काहीकाळ करीत राहिल्याने छोट्या भागातील, गुडघ्यातील वेदनांची तीव्रता कमी होते.असाच उपाय मायग्रेनसाठीही करता येतो. संपूर्ण मस्तक आणि चेहरा यावर लक्ष ठेवून वेदना कोठे होत आहेत, कोठे नाहीत हे जाणत राहायचे. डोकेदुखी सुरू होत असताना असे ओपन अटेन्शन सुरू केले तर वेदनांची तीव्रता कमी राहू शकते. शरीरात कोठेही अशा वेदना होत असतील तर असे ओपन अटेन्शन, विस्तारित लक्ष उपयोगी ठरू शकते. कर्करोग आणि केमोथेरपीमुळे होणाऱ्या वेदना सुसह्य होण्यासाठी अमेरिकेत आणि युरोपमध्ये अनेक हॉस्पिटल्समध्ये असे ट्रेनिंग दिले जाते.असे ट्रेनिंग गर्भिणी, प्रेग्नंट स्त्रियांनाही उपयोगी ठरते. गर्भधारणा झाल्यानंतर स्त्रियांना माइंडफुलनेस थेरपी शिकवली, ओपन अटेन्शनचा सराव त्यांनी रोज केला तर त्यांच्या शरीरात होणाºया बदलांना, त्यामुळे होणाºया वेदनांना त्या हसत हसत तोंड देऊ शकतात. त्यांची प्रसूतिवेदनांची भीती कमी होतेच, शिवाय हार्मोन्समध्ये होणाºया बदलांमुळे या काळात येणारे औदासीन्यही टाळता येते.ओपन अटेन्शनमुळे, ध्यानाचे क्षेत्र विस्तारित केल्याने वेदनांची तीव्रता का कमी होत असावी, याचे संशोधन मेंदुविज्ञान करीत आहे. वेदनांना प्रतिक्रि या न देण्याच्या सजगता ध्यानामुळे मेंदूतील भावनिक मेंदूचा भाग असलेल्या अमायगडालाची सक्रियता कमी होते असे या संशोधनात दिसून येत आहे. रोज वीस मिनिटे असे दोन महिने माइंडफुल बॉडी स्कॅन केले, तर अमायगडालाचा वाढलेला आकारदेखील कमी होतो.मनाची स्थिती मेंदूवर रचनात्मक परिणाम घडवते हे दाखवणारे हे संशोधन मेंदू संशोधकांना आश्चर्यकारक वाटत आहे. अनेक संशोधक सध्या या विषयावर अभ्यास करीत आहेत. त्यामध्ये डॉ. डॅनियल सिगल यांचे कामही मोठे आहे. आपण ओपन अटेन्शन ठेवतो त्यावेळी मेंदूतील विविध भागांना एकाचवेळी कामाला लावतो. त्यामुळे मेंदूत नवीन जोडण्या तयार होतात, इंटिग्रेशन होते. त्यामुळे ठरावीक भागातील वेदनांची तीव्रता कमी होते, असे त्यांचे मत आहे. त्यांची माइंडसाइट आणि माइंडफुल ब्रेन ही पुस्तके प्रसिद्ध आहेत.ओपन रिसेप्टिव्ह मेडिटेशनमुळे वेदनांची तीव्रता कमी होते, हा अनुभव तथागत गौतम बुद्धाच्या शिष्यांनादेखील आला होता. त्यांनी असे का होते, असा प्रश्न तथागतांना विचारला असता बुद्धाने त्यांना एक मूठभर मीठ पेलाभर पाण्यात टाकायला सांगितले. त्या मिठामुळे पेल्यातील पाणी खूप खारट झाले. आता बुद्धाने तेवढेच मूठभर मीठ मोठ्या तळ्यातील पाण्यात टाकायला सांगितले आणि पाण्याची चव पाहायला सांगितले. मिठाचे प्रमाण तेवढेच असूनही तळ्याच्या पाण्याच्या चवीत काहीच फरक पडला नाही. आपल्या अटेन्शनचेदेखील असेच होते. ते फोकस्ड असेल, छोट्या भागावर केंद्रित असेल त्यावेळी तेथील संवेदना तीव्रतेने जाणवतात. श्वासाचा स्पर्श समजण्यासाठी नाकाच्या खाली, वरच्या ओठाच्या वर छोट्या भागात लक्ष केंद्रित करावे लागते; पण हेच लक्ष शरीराच्या मोठ्या भागावर विस्तारित केले, ओपन अटेन्शन ठेवले तर संवेदनांची तीव्रता कमी होते. असे करताना आपण वेदना नाकारत नाही, त्यांच्यापासून पळून जात नाही, स्वत:ला बधिर करीत नाही; पण दु:खदायक वेदना कमी करू शकतो.सजगता ध्यानाचा, माइंडफुलनेसचा उद्देश स्वत:ला बधिर करणे हा नसून अधिक सजग, जागृत करणे हा आहे. त्यासाठो मनाला क्षणस्थ ठेवून त्या क्षणी शरीरातील संवेदना, मनातील विचार आणि भावना जाणत राहण्याचा सराव करत राहणे आवश्यक आहे. मनाला अशा स्थितीत ठेवणे हे आपल्या मेंदूला दिलेले ट्रेनिंग आहे. या ट्रेनिंगमुळे सर्जनशीलता वाढते, तणाव कमी होतो तशीच शारीरिक वेदनांची तीव्रता कमी होते.
ओपन अटेन्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 01, 2018 10:45 AM