- किशोर कुलकर्णी
आमचा लढा कोरोनाशी आहे, त्याला पराभूत केल्याशिवाय राहाणार नाही, इथपासून कोरोनाचे वास्तव स्वीकारून पुढे जायला हवे इथपर्यंतच्या संघर्षाचा आणि त्यानंतर सहअस्तित्वाची निकड व्यक्त करणारा असा हा सहा महिन्यांचा प्रवास सर्वांनीच पहिला आहे. या काळातच ‘नवसामान्य’ हा एक नवा शब्द अस्तित्वात आला आहे. त्याला ‘न्यू नॉर्मल’ असंही म्हणतात. आता कोरोनापूर्व आणि कोरोनानंतर अशा युगाचीही चर्चा होत आहे. कोरोनानंतरच्या काळाला ‘न्यू नॉर्मल’ असे म्हटले जात आहे. तुमच्या सारखाच मीही हे सारं पाहत आहे, अनुभवत आहे. अनुभव, अनुभूती, चिकित्सा यासाठी कधी नव्हता एवढा वेळ सध्या उपलब्ध आहे. समाजमाध्यमे कधी नव्हे एवढी घरात घुसलीत, त्यांनी मनात घर केलंय अन् मेंदूही व्यापून टाकलाय.त्यातूनही अलिप्तपणे विचार केला तर मग प्रश्न उभा ठाकतो तो म्हणजे न्यू नॉर्मल नंतर पुढे काय? कोरोनापूर्व अन् पश्चात अशी काही विभागणी खरोखर झाली आहे का? खरंच ती अशी असेल तर न्यू नॉर्मल म्हणजे नेमकं काय आहे? आणि आपण पुन्हा कोरोनापूर्व काळात जाणारच नाही की काय?या प्रश्नांची उत्तरे समजावून घेण्यासाठी मुळात न्यू नॉर्मल ही परिस्थिती म्हणजे काय? ती आता प्रथमच निर्माण झाली आहे का? हे पहायला हवे. खरं तर कोणतीही परिस्थिती सातत्याने कायम नसते, ती बदलतच असते. आर्थिक, औद्योगिक, सामाजिक, शैक्षणिक यांच्या परिवर्तनाच्या रेट्यात ते होतच असतात. माणसाचे संस्कार बदलले, राहणी बदलली, विवाहासारख्या सामाजिक बंधनात सहनिवास मान्यता पावला किंवा समलिंगी सहनिवास टाकाऊ ठरला नाही. याचाच अर्थ कधीकाळी सामान्य नसलेले व्यवहार स्वीकारले गेले, ते नवसामान्य किंवा न्यू नॉर्मल झाले. अर्थात झालेल्या या बदलांची व त्यांच्या स्वीकाराची गती हा महत्त्वाचा विषय आहे. कोरोनाने अचानक धक्का द्यावा असे बदल घडविले आहेत. ते स्वीकारण्याशिवाय पर्यायच उपलब्ध नव्हता. ते स्वीकारण्यामागे अगतिकताच होती. व्यापार, उदीम, समन्वय, मार्केटिंग, दैनंदिन गरजा, व्यवहार यात आभासी तंत्राने स्वत:चा असा प्रभाव निर्माण केला आहे. चांगले आहे. डिजिटल युगात भारतीयांना नेण्यासाठी कोरोनाची पार्श्वभूमी महत्त्वाची आहे; पण याच कोरोनाने माणसामाणसांत, नातेसंबंधात, कर्तव्य, प्रेम, आस्था या भावनांत आभासी भिंती उभ्या केल्या आहेत का? माणुसकी हा शब्द न्यू नार्मलमध्ये निर्थक ठरेल का? न्यू नॉर्मल हे खरेच नॉर्मल, सामान्य असेल का? का ते हाडामासाच्या यंत्रमानवाचे जगणे असेल? कदाचित असं काहीच होणार नाही. एखादी लस येईल किंवा कोरोना आपोआपच संपून जाईल, सध्याचा हा कालखंड पूर्ण विस्मरणात जाईल. आपलं जगणं अधिक समृद्ध होईलही. माणूस अधिक माणसासारखाही होईल? हो तसे होईलही; पण त्यासाठी न्यू नार्मलची परिमाणे निश्चित व्हायला हवेत.कोरोना हे संकट तर आहेच; पण ती संधीही आहे, असे विविध मान्यवर सांगत आले आहेत, त्याची अनेक उदाहरणेही दिली जातात; पण आजचा न्यू नार्मल सर्वांसाठी नॉर्मल नाही हे विसरता कामा नये. आहे रे आणि नाही रे मध्ये कोरोनाने आभासी, पण भक्कम भिंत उभी केली आहे. स्वाभाविकच नाही रे वर्गासाठी उपाशी राहाणे, मदतीवर अवलंबून राहावे, दुय्यम जीवनपद्धती स्वीकारणे हे त्यांचे न्यू नार्मल बनते आहे. अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी लाखो कोटींच्या योजना घोषित होत आहेत, त्यांचे स्वागतच आहे; पण मुंबईतील धारावी असो वा पुण्यातील जनता वसाहत, यांचे न्यू नार्मल अधिक खडतर असेल तर ते त्यांनी का स्वीकारायचे? कोरोनाने जर काही संधी उपलब्ध करून दिली असेल तर ती उपयोगात का नाही आणायची? मुंबईत किती टक्के जनता झोपडपट्टीत राहाते, याची आकडेवारी राजकीय नेतृत्वापासून बांधकाम व्यावसायिक यांना चांगलीच माहिती आहे. या प्रश्नांची उत्तरे काय हेही ते जाणतात, तर मग या विषयांची अर्थपूर्ण आणि सक्रिय चर्चा कधी सुरू होणार? अशा प्रकल्पातूनही अर्थव्यवस्थेला गती मिळणार नाही असे थोडेच आहे? विधायक विचारांचे नेतृत्व मात्र हवे. मुंबई आज ठप्प आहे, लोकलसारख्या तिच्या जीवनवाहिन्या आक्रसून गेल्या आहेत. उद्या परवानगी दिली तर जिवावर उदार होऊन सामाजिक अंतराचे बंधन न पाळता चाकरमानी मुंबईकर लोकलवर लोंबकळत प्रवास करतील. दक्षिण मुंबईतील आपल्या ऑफिसमध्ये पोहोचल्यावर आपल्या या लोकल संघर्षात समाधान मानणार्या कामकर्यांना पुन्हा तेच जीवन न्यू नॉर्मल म्हणून आपण देणार आहोत का? छोटी का होईना गाडी वा बाइक घेण्याची क्षमता नसलेल्या घटकाला गर्दीतल्या अनामिक भीतीसह आपले सामान्य जीवन जगावे लागणार आहे का? उद्या गाडी, बाइक घेतली तरी ती चालवायला जागा असेल का? मुंबईचे विकेंद्रीकरण किंवा डिजिटल युगाची सुरुवात हे काही नवे विषय नव्हेत. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव ही मुंबईच्या न्यू नॉर्मलसाठी संधी का ठरू नये? मुंबईपाठोपाठ पुणे, औरंगाबाद, नागपूर, नाशिक या शहरांची अवस्था कालच दखल घ्यायला हवी, अशीच आहे.कोरोना थांबविण्यासाठी टाळेबंदीचा पर्याय पुढे आला, त्यामागे जागतिक अनुकरण होते, विचार नव्हता. अर्थात टाळेबंदीने वैद्यकीय आघाडीवर तयारी करायला उसंत मिळाली. आज उभ्या असलेल्या यंत्रणा हा त्याचाच परिणाम आहे. आरोग्याच्या आघाडीवर आपण किती बेसावध होतो हेही त्यातून पुढे आले आहे. आता नवं सामान्य घडविण्यासाठी योजना हव्यात, दृष्टी हवी, इच्छाशक्तीही हवी. कोरोनाने अनेक बळी घेतलेत, आता अर्थव्यवस्थेचे परिणाम म्हणून अधिक बळी पडता कामा नयेत. टाळेबंदीची उलट गणना सुरू आहे; पण त्यात आत्मविश्वास नाही, धरसोडच अधिक आहे. जबाबदारी स्वीकारायला नव्हे तर ती खालच्या पातळीवर ढकलायला सारेच उत्सुक दिसतात. यातून नजीकचा काळ अधिक जिकिरीचा असेल. त्याला सामोरे जातानाच नवे घडविण्याची जिद्दही हवी. त्यासाठी आतातरी टाळेबंदीच्या कुबड्या फेकायला खबरदारी, काळजी, शिस्त जोपासायला हवी. आज भीतीने अनेक व्यवहार होत नाहीत, त्यांना भीतीऐवजी स्वसंरक्षणाच्या रीती समजावून सांगायला हव्यात. अपरिहार्यता, असहायता, हतबलता यातून आलेली स्थिती म्हणजे काही न्यू नार्मल नव्हे. ते आपल्यालाच घडवावे लागणार आहे.कोरोनाची समाप्ती किंवा त्यावर रामबाण लस उपलब्ध झाली तरी या संकटातील संधी गमावता कामा नये.
digkishor@gmail.com(लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत.)