-सुभाष अवचट
पंडित भीमसेन जोशी, मी आणि गणपती.. या तिघांमध्ये काही खास नातं असावं, अशी शंका तरी कुणाला येईल का?- पण ते आहे.
इतकं घट्ट की गणपती म्हटलं की मला भीमूअण्णा आठवतातच आठवतात आणि आठवणीतलं ते चित्रं नजरेसमोर उमटायला लागतं.
मी त्यांना भेटायला गेलो आहे.. ते म्हणतात, या, बसा बसा! मग कुठूनतरी एक कोरा कागद पैदा करतात. एक साधं बॉलपेन. एकाग्रपणे त्या कागदावर बिंदू-बिंदू काढण्याचं त्यांचं काम चालू आहे. एकीकडे गप्पा. मध्येच मान खाली घालून पुन्हा पुढला बिंदू.
तेवढय़ात वत्सलाबाई येतात. त्या येत-जात असतातच. भीमूअण्णा काय करताहेत याकडे त्यांची बारीक नजर आहेच. शेवटी त्या अस्वस्थ होऊन विचारतातच, अहो, हे काय करताय कागदावर?तोवर भीमूअण्णांनी ते बिंदू-बिंदू जोडून एक आकृती तयार केली आहे. ते हसत हसत वत्सलाबाईंना म्हणतात, अहो, चित्रकारांना द्यायला गणपती काढतोय!
- कागदावरचा आकार गणपतीचाच आहे!
हे इतकं मोकळंढाकळं रंग-रुप-आकार असलेला, नियम-अटी-आग्रह-सोवळं-दरारा-धाक यातलं काही म्हणता काही नसलेला, गप्पा मारतामारता सहज साकारता येणारा दुसरा कुठलातरी ‘देव’ आहे का?
ठिपके जुळवले तरी त्यात तो दिसतो.
फुलं-पानं मांडली तरी त्यात तो उमटतो.
माती चिवडून तिचा गोळा हातात घेतला तरी त्याचा भास होऊ शकतो.
तो गणपतीच!
आणि तो. त्याला अहो-जाहो करायचीही सक्ती नाही.
खांद्यावर हात टाकून मनातलं सांगावं, इतका जवळचा मित्रच जसा!प्रत्येक कलावंताचा तो आद्य-देव. गायक, वादक, नर्तक, चित्रकार सगळेच त्याच्याशी जोडलेले. त्याचं कारण गणपतीचं हे लोभस, आकर्षक रूप आणि मुख्य म्हणजे कशातूनही, कुठेही साकार होऊ शकणारा त्याचा आकार!हा आकार कसा आकाराला आला असेल, याचा विचार मी खूपदा करत बसलेलो आहे. कसलाही साचा, प्रमाण नसलेला नुसता रेघांचा भास.
रेघा नसल्या तर रंगही पुरतात. त्यातलं काहीही नसलं, तर मग वस्तू नुसत्या जुळवत नेल्या तरी तो आकार साधता येतो.
ही जादूच नव्हे काय?
गणपती उग्र रुपातही असतो म्हणे. पण तो तंत्रपूजा करणा-याचा गणपती.सामान्यांचा गणपती हा दरवर्षी घरी येणारा, चौकातल्या मांडवात बसणारा, मुलांसोबत नाचणारा, त्यांच्या कॉमिक्समध्ये चक्क उडणा-बिडणारा मित्रच जसा. तो ज्ञानी आहे. गुरु आहे; पण रागीट, धाक घालणारा नाही. उलट असेल त्यात जुळवून घेणारा, जाताना डोळ्यात पाणी आणणारा लोभस पाहुणा आपल्या घरचा!
काही वर्षांपूर्वी मी मला भेटलेला गणपती एका चित्रमालिकेत रंगवला होता. चहा पिणारा, पुस्तक वाचणारा, कामगारांसोबत कष्टणारा, नटासोबत रंगमंचावर वावरणारा, दारात उभा असणारा.. असा तुमच्या-माझ्यासारखा गणपती!
ती मालिका वादात सापडली, तो विषय वेगळा; पण माझ्या त्या चित्रप्रदर्शनाला आलेल्या एका बाईंनी माझ्याजवळ येऊन सांगीतलं होतं,
‘अवचट, सध्या माणसाचा ‘देव’ करण्याचा जमाना आहे. अशा या विचित्र दिवसात तुम्ही देवातला ‘माणूस’ दाखवला, हे उत्तम केलंत!’
तेच गणपतीचं खरं वर्णन आहे.
देवातला माणूस!
- मला माझ्या कॅनव्हासवर जाता-येता भेटतो तो.
(लेखक ख्यातनाम चित्रकार आहेत)