- किरण अग्रवाल
शहरी कोलाहलात चिऊताईचा चिवचिवाट क्षीण होत चालला आहे. केवळ चिमणीच कशाला, सर्वच पक्ष्यांचा अधिवास धोक्यात आला आहे. ही जैवविविधता जपायची तर माणसातील माणुसकीचा प्रत्यय आणून द्यावा लागेल. सध्याच्या तापू लागलेल्या उन्हात त्यांच्या संवर्धनासाठी पुढे येण्याची गरज आहे.
खऱ्या उन्हाळ्याला अजून सामोरे जायचे आहे; पण आतापासूनच चटका जाणवू लागला आहे. आगामी महापालिका व जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरणही तापणार आहे. या एकूणच चटका देणाऱ्या वातावरणात मुक्या प्राण्यांसाठी मायेचा गारवा आकारण्यासाठी माणसांनी माणुसकीच्या ओलाव्याने पुढे येण्याची गरज आहे.
यंदा पाऊस जोराचा झाला तशी थंडीही कडाक्याची पडली आणि आता उन्हाळाही अंग भाजून काढणारा आहे. आताशी कुठे मार्च महिन्याच्या उत्तरार्धात आपण आहोत, तरी उन्हाने अंगाची काहिली होते आहे; त्यामुळे एप्रिल व मे कसा जाईल याच्या विचारानेच अंगात ताप येऊ पाहतो. अर्थात अकोलेकरांना उन्हाचा तडाखा नवीन नाही, पडणारे ऊन अंगावर झेलत दिनक्रम सुरू ठेवण्याची त्यांना सवय आहे. समस्या कितीही असो, सहनशील राहण्यासारखेच हे आहे म्हणायचे. त्यामुळे ऊन वाढू लागल्याचे बघून आता घराघरांतील कुलर्सची साफसफाई सुरू झाली आहे. उघड्या गच्चीवर शेडनेट लावले जात आहेत. हे सारे माणूस माणसासाठी, स्वतःसाठी करीत आहे; पण मुक्या जिवांचे काय?
महत्त्वाचे म्हणजे, मनुष्य संकटात मार्ग शोधून घेतोच; पण उन्हाच्या चटक्यांनी व्याकूळणाऱ्या व तहानेने तळमळणाऱ्या जिवांची काळजी वाहून भूतदयेचा विचार फारसा केला जाताना दिसत नाही. नाही म्हणायला काही अपवादही असतातच, त्यात गेल्या हंगामात थंडीने कुडकुडणाऱ्या मुक्या प्राण्यांच्या अंगावर अनेकांनी संरक्षणात्मक झूल पांघरल्याचे दिसून आले होते, त्याचप्रमाणे सध्याच्या उन्हाळ्यात त्यांच्यासाठी सावलीचा आसरा करून देणे गरजेचे आहे. शेती पिकविण्यासाठी बळिराजाच्या जिवाभावाचा जोडीदार असणाऱ्या बैलाच्या अंगाखांद्यावर केवळ पोळ्याच्या दिवशी झूल पांघरून एक दिवसाचा सण-उत्सव साजरा करण्यापेक्षा या उन्हाळ्यातही त्याच्या जिवाची काळजी घेण्यातच खरी माणुसकी असेल.
वसंत ऋतुमुळे अधिकतर झाडांची पानगळ झाली आहे, त्यामुळे पक्ष्यांच्या निवाऱ्याचा प्रश्न पुढे येतोच; शिवाय त्यांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही असतो. शेत शिवारात ही समस्या तितकीशी जाणवत नाही; परंतु शहरी सिमेंटच्या जंगलात पक्ष्यांना पाणी मिळणेही अवघडच बनते. तेव्हा घराच्या बाल्कनीत, व्हरांड्यात पक्ष्यांना पिण्यासाठी पाण्याची व्यवस्था करायला हवी. आजच जागतिक चिमणी दिन आहे. शहरी कोलाहलात अलीकडे चिऊताईचा चिवचिवाट कमी होत चालला असल्याचे अकोल्यातील निसर्ग कट्टाने केलेल्या सर्वेक्षणातून पुढे आले आहेच. तेव्हा चिऊताईला जगवायचे, तिचे संवर्धन करायचे तर आज तिच्यासह सर्व पक्षांसाठी पाण्याची व्यवस्था करण्याचा प्रण करूया. उन्हाच्या झळांपासून ते कसे बचावतील यासाठी काही करूया.
वसंताचे आगमन होतानाच गल्लीबोळांत गुलमोहर, तर रानावनात पळस फुलला आहे. या पळसाचे औषधी गुणधर्म असून, उष्णतेपासून वाचविण्याचेही काम या वनस्पतीद्वारे घडून येते. गुलमोहर व पळसाप्रमाणेच या रखरखत्या उन्हात कासावीस होणाऱ्या प्राणी पक्ष्यांसाठी हरेक व्यक्तीच्या मनामनातील माणुसकी फुलण्याची गरज आहे. त्यातून सुहृदयतेचे जो ओलावा पसरवेल तो मुक्या जिवांचे संरक्षण करायला उपयोगी येईल. विशेषतः लहान मुलांवर यासंबंधीची जबाबदारी सोपवायला हवी. त्यातून त्यांच्यावर भूतदयेचे संस्कारही घडून येतील. रणरणत्या उन्हात बाल्कनीतील गार पाणी पिऊन तृप्त होत उडणाऱ्या चिमणीच्या चिवचिवाटाने मनुष्यहृदयी समाधानाच्या ज्या स्वरलहरी अनुभवास येतील त्याची सर अन्य कशात येणारी नसेल.