- अतुल कुलकर्णी
देवगिरी कॉलनीतल्या त्या घरातले सूर आता पुन्हा ऐकू येणार नाहीत... सतत तबला, ढोलकी, हार्मोनियमचे सूर ऐकू येणारे ते घर आज सुने सुने झाले आहे... पंडीत नाथराव नेरळकर या नावाची विलक्षण जादू मराठवाडा प्रदेशावर होती. संगीताचा कान असणारा असा कोणीही सापडणार नाही ज्याला हे नाव माहिती नसेल. अनुभवाने रसरसलेले, स्वत:च्या राजकीय भूमिका कधीही न लपवणारे, कसलाही आडपडदा न ठेवणारे नाथराव गेले ही कल्पनाच सहन होत नाही. आम्ही त्यांना काका म्हणायचो. औरंगाबादला असताना सतत त्यांची भेट व्हायची. बोलणे व्हायचे. मात्र मुंबईला आलो आणि आमची भेटीची मैफल थांबली.
ती पुन्हा सुरु झाली दिवाळी पहाटमुळे. औरंगाबादला परिवर्तन संस्था आणि आ. सतीश चव्हाण यांच्या पुढाकाराने आम्ही दिवाळी पहाट सुरु केली. एक वर्ष पं. श्रीनिवास खळे संगीत रजनीचे आयोजन दिवाळी पहाट साठी केले होते. कार्यक्रमाची रुपरेषा ठरवत असताना त्यांना फोन केला. म्हणालो, खळेकाकांना आपल्या सुरांची भावांजली अर्पण करण्याचे मनात आहे. आपण या कार्यक्रमात भैरवी गावी अशी माझी इच्छा आहे. एका क्षणाचाही विलंब न लावता ते म्हणाले, बिलकूल येतो. काका आले आणि ‘आता लई नाही लई नाही मागणं...’ ही भैरवी सादर केली. सगळे सभागृह उभे राहून टाळ्यांचा पाऊस पाडत होते. आजही तो प्रसंग काल घडल्यासारखा आठवतो.
दिवाळी पहाटच्या निमित्ताने मराठवाडासाठी ज्यांनी योगदान दिले अशांचा सत्कार करण्याची कल्पना मी आ. सतीश चव्हाण यांना सांगितली. त्यांनी देखील लगेच होकार दिला. एक वर्ष पं. नाथरावांचा सत्कार करण्याचे ठरले. पुन्हा आमचे फोन वर बोलणे झाले. मी येतो कार्यक्रमाला असे त्यांनी सांगितले. ठरल्या वेळेला बरोबर आले आणि मस्त मैफल रंगवली. याच कार्यक्रमासाठी मी औरंगाबादला गेलो, सत्कारच्या आदल्या दिवशी त्यांना भेटायला गेलो. हॉलमध्ये भारतीय बैठक सजलेली असायची. मी आल्याचा निरोप दिला तेव्हा त्यांनी बसायला सांगितले. काहीवेळाने ते आले. मी म्हणालो, तुम्ही कामात होतात का..? मी नंतर आलो असतो... त्यावर त्यांचे ते निखळ हास्य चेहऱ्यावर आणत म्हणाले, तुम्ही आलात तर चांगले कपडे घालून आलं पाहिजे ना.... म्हणून वेळ लागला... हा निखालस सच्चेपणा जसा त्यांच्या सुरांमध्ये होता तसाच तो वागण्यात होता. त्यांच्यात कायम एक लहान मूल दडलेलं होतं... सतत काहीतरी आपल्याला नवीन शिकता आलं पाहिजे हा त्यांचा आग्रह होता... अगदी हेमाने एखादी नवीन गझल गायली तर तिला ती रेकॉर्ड करुन पाठव, मला शिकायची आहे असेही ते म्हणायचे....
निटनिटके रहाणे हे त्यांचे व्यसन होते. सतत स्वच्छ, डाग न पडलेले कपडे घालणे, त्यांना कायम आवडायचे. त्यांच्याकडे असणारा पानाचा डबा देखील कायम व्यवस्थीत असायचा.सुपारीमध्ये बडीशेप आणि बडीशेपमध्ये लवंग मिसळलेली असा विस्कळीत डबा मी कधीही पाहिला नाही. येणाऱ्यांना खाऊ पिऊ घालणे, गप्पांची मैफल सजवणे हा त्यांचा सर्वोच्च आनंदाचा भाग असायचा. घरात त्यांच्या अल्सेशियन कुत्री होती. ती देखील पांढरी शुभ्र. कायम त्यांच्या कपाळी गंधाचा टिळा लावलेला असायचा. ती प्रेमाने त्यांच्या मागेपुढे फिरत असायची.
घरात सजलेली भारतीय बैठक, कायम मैफलीचे वातावरण आणि नवेपणाचा ध्यास ही त्यांची बलस्थानं होती. एखद्या मैफलीचे बोलावणे आले आणि त्यांनी ते नाकारले असे कधी झाले नाही. आपल्या मुलांनी देखील असेच वागावे याकडे त्यांचा कटाक्ष असायचा. एकदा हेमाला, त्यांच्या मुलीला अंबाजोगाईच्या कार्यक्रमाचे आमंत्रण आले. पण हेमाकडे गुड न्यूज होती. ती आई होणार होती. त्यामुळे तीला अंबाजोगाईला जाता येत नव्हते. तीने आपली अडचण काकांना सांगितली. दुसऱ्या क्षणाला त्यांनी अंबाजोगाईच्या आयोजकांना फोन लावला आणि म्हणाले, तीच्याकडे गुडन्यूज आहे, ती येऊ शकणार नाही, पण ती नाही म्हणून काय झालं, तीचा बाप येईल आणि गाणं गाईल.... ते अंबाजोगाईला गेले, मनसोक्त गायले... आपण एक मागितले होते, देवाने आपल्याला दोन दिले, या आनंदात अंबाजोगाईकर चिंब भिजून गेले.... असे हे जिंदादिल व्यक्तीमत्व.
त्यांच्या पत्नी गेल्या तेव्हा मी त्यांना फोन केला. काय बोलावे क्षणभर सुचेना. म्हणालो, खूप एकटं वाटत असेल ना काका... त्यावर क्षणात म्हणाले, छे छे... ती काय माझ्या समोरच आहे ती... मोठ्ठे डोळे करुन पहात असते ना माझ्याकडे.... हेमाच्या आईचा सुंदर फोटो त्यांनी लावून ठेवला होता. हेमा, जयंता कोणीही काही नवीन केल्याचे सांगितले की ते फोटोकडे पहात आपल्या पत्नीला सांगून टाकायचे.... हे असे जगावेगळे प्रेम होते त्यांचे....
संगीतातील रत्न पंडीत जसराज यांचे अमेरिकेत निधन झाले. त्यावेळी पंडीत नाथराव नेरळकर यांना मी फोन केला. लोकमत युट्यूब साठी त्यांची मुलाखत घेतली. अवघ्या सात महिन्यापूर्वीची ही गोष्ट. जवळपास २० मिनिटे आम्ही बोललो. त्यांनी अनेक आठवणी सांगितल्या. सैंया निकस गये री... मै ना लडी थी....हे गीत त्यांनी गाऊन दाखवले... गाताना त्यांचा आवाज भरुन आला होता.... डोळे डबडबलेले मी पहिल्यांदा पाहिले... आणि त्यांचा ऐकलेला तो शेवटचा स्वर.... त्यानंतर आमचे बोलणे झालेच नाही... आज त्या स्वरांशिवाय जवळ काही उरलेले नाही....
त्या मुलाखतीनंतर माझे आणि हेमाचे बोलणे झाले होते. काकांकडे सांगण्यासारख्या खूप गोष्टी आहेत. त्या रेकॉर्ड करुन ठेवल्या पाहिजेत, खूप मोठा ठेवा आहे त्यांच्याकडे असे आम्ही बोललो. रेकॉर्डिंग करायचेही ठरले. पण कोरोनाने या आठवणींचा कायमचा बळी घेतला...- अतुल कुलकर्णी, वरिष्ठ सहायक संपादक, लोकमत