इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल नजीक आले, की हल्ली चर्चा होते ती कुठली बॉलिवूड तारका कोणता इव्हिनिंग गाऊन घालून रेड कार्पेटवर मिरवणार याचीच! - आंतरराष्ट्रीय महत्त्व लाभलेले हे महोत्सव हा केवळ ग्लॅमरचा झगमगाट नसतो, याचं भान आणि अनुभव असलेले काही चित्रपटवेडे मात्र खिशाला कात्री लावून देश-विदेशातल्या या महोत्सवांच्या वारीला पंढरीच्या वारक:याच्या श्रद्धेने जात असतात. गेली अनेक वर्ष कान महोत्सवाला हजेरी लावणा:या अशाच एका रसिकाच्या ‘तिकडल्या’ डायरीची ही पानं खास ‘लोकमत’ वाचकांसाठी!!!
‘पाथेर पांचाली’ ते कतरिना कैफ
अशोक राणे
तू जर ‘रोको अँड हिज ब्रदर्स’ आधी पाहिला आहेस, तर इथल्या धावपळीच्या तुङया कार्यक्रमात तो पुन्हा का पाहतो आहेस? दुसरं काही तरी तुला पाहता येईल.’’
- माङया त्या पहिल्या अमेरिकन वारीत माङयाकडे खरंच खूप कमी वेळ होता. ‘सनडान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवा’ला उपस्थित राहून मी सॅन फ्रॅन्सिस्को, सॅन होजे, लॉस एंजेलिस, ऑरलँडो, वॉशिंग्टन आणि न्यू जर्सी असा अमेरिकेचा धावतापळता फेरफटका मारीत न्यूयॉर्कमध्ये असाच दोन-तीन दिवसांकरता आलो होतो. जगप्रसिद्ध लिबर्टी स्टॅच्यू म्हणजेच अमेरिकन स्वातंत्र्यदेवतेचा पुतळा यापेक्षा मला ‘मोमा’ म्हणजेच ‘म्युङिायम ऑफ मॉडर्न आर्ट’चं आकर्षण होतं. मी तिथे पोचलो तेव्हा काही वेळातच लुचिनो व्हिस्कोंती या ख्यातनाम इटालियन प्रतिभावंताचा ‘रोको अँड हिज ब्रदर्स’ (196क्) दाखविला जाणार होता. मी तो दोनदा पाहिला होता. ‘मोमा’च्या प्रोग्राम डायरेक्टरशी बोलताना तसं माङया बोलण्यात आलं म्हणून ते मला पाहिलेला सिनेमा पुन्हा पाहण्यापेक्षा दुसरं काही तरी पहायला जा असं सुचवत होते. पण मी म्हटलं,
‘‘मी आज तिस:यांदा पाहीन. कितीही वेळा पाहू शकेन. परंतु आज तो पाहण्याचं कारण म्हणजे ‘मोमा’च्या याच थिएटरमध्ये 1955 मध्ये सत्यजित राय यांचा ‘पाथेर पांचाली’ दाखवला गेला होता. आणि म्हणून न्यूयॉर्कच्या पहिल्या भेटीत या थिएटरमध्ये असेल तो सिनेमा पहायचा असं माझं ठरलं होतं.’’
- मी तिथे रोका अँड हिज ब्रदर्स पाहिला परंतु आणखीही वेगळं काही तरी अनुभवलं. ‘पाथेर पांचाली’ आणि एकूणच ‘अपू चित्रत्रयी’शी असलेल्या अतूट नात्याशी जोडून घेणारं!
- ही गोष्ट 2क्क्3 ची!
आणि आता ‘पाथेर पांचाली’च्या संदर्भातला असाच एक क्षण अनुभवण्याची संधी मला पुन्हा मिळणार आहे. 68 व्या कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात तो पुन्हा दाखविला जाणार आहे. याआधी 1956 मध्ये तो इथे दाखविला गेला आणि इथेच त्याला ‘द बेस्ट ह्युमन डॉक्युमेंट’ या सायटेशनसकट उत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार देण्यात आला होता. पुढल्या आठवडय़ात ‘कान क्लासिक्स’ या खास विभागात ‘पाथेर पांचाली’चं विशेष प्रदर्शन होईल तेव्हा तो पाहताना असं बरंच काही आठवत राहील. आफ्रिकन सिनेमाचे जनक मानले गेलेले ओस्मान सेम्बेन, लॅटिन अमेरिकन फर्नाडो सोलान्स, जपानचे केन्जी मिझोगुची आणि अकिरा कुरोसावा, हंगेरीची मिकिलोस यांचो, जर्मनीचे अलेक्झांडर कोर्डा, अमेरिकेचे ऑर्सन वेल्स आणि स्टीव्हन स्पीलबर्ग आदि जागतिक चित्रपटातील दिग्गजांच्या अजरामर कलाकृती पाहण्याची संधी यावेळच्या कान महोत्सवात लाभणार आहे. त्यातही ‘पाथेर पांचाली’चं विशेष म्हणजे त्याला यंदा साठ वर्षे पूर्ण होत आहेत. सत्यजित राय यांच्या या अलौकिक कलाकृतीने भारतीय चित्रपटाला जगाची दारं उघडून दिली असं गौरवाने म्हटलं जातं. तिच्या आता या साठीच्या वळणावरच्या कौतुकाला उपस्थित राहण्याची संधी कानच्या भारतीय वारक:यांना यंदा मिळणार आहे.
गेली जवळपास चाळीस र्वष फिल्म सोसायटी चळवळीच्या माध्यमातून आणि देश-विदेशातील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातून जगभरचे गेल्या शंभरेक वर्षातले असंख्य सिनेमे पाहिले आणि तरीही एखादा चित्रपट महोत्सव जवळ आला की माझी गत एकाचवेळी उपाशी आणि अधाशी माणसासारखी होऊन जाते. समोर हारीने मांडून ठेवलेली छान छान पक्वान्नं पाहून मग उपाशी आणि अधाशी माणसाची होते तशीच अवस्था होते.
- यंदाच्या कानमध्ये वर उल्लेख केलेल्या दिग्गजांच्या कलाकृती, ज्यातल्या काहींची अक्षरश: पारायणं झालीत, त्या तर पहायला मिळणार आहेतच, परंतु तितकीच महत्त्वाची गोष्ट म्हणजे काही नव्याको:या डॉक्युमेंटरीजचा एक विशेष विभाग आहे. त्यात रहस्यपटांचा बादशहा ऑल्फ्रेड हिचकॉक आणि त्याचा खासा अभ्यासक, फ्रेंच न्यू वेव्हचा एक महत्त्वाचा प्रणोता समीक्षक - दिग्दर्शक फ्रान्स्वा त्रूफो यांच्यात झालेला मॅरेथॉन डायलॉग यावरची केण्ट जॉनची डॉक्युमेंटरी, जागतिक ख्यातीचे येरार देपाद्यरू आणि स्टीव्ह मॅक्विन यांच्यावरच्या दोन आणि ‘इन्ग्रिड बर्गमन इन हर ओन वर्ड्स’ ही थोर अभिनेत्री इन्ग्रिड बर्गमवरची डॉक्युमेंटरी यांचाही समावेश आहे. इन्ग्रिडचं हे जन्मशताब्दी वर्ष आहे. त्यानिमित्ताने सादर होणा:या या डॉक्युमेंटरीसाठीच्या खास खेळासाठी तिची आणि तिचे पती, इटालियन निओरिएलिझमचे प्रणोते रॉबटरे रोङोलिनी यांची अभिनेत्री मुलगी इझाबेला रोङोलिनी उपस्थित राहणार आहे. माङया मुलांपासून मला माझं आयुष्य अजिबात लपवायचं नाही, असं मनाशी ठरवत ‘माय स्टोरी’ सारखं एक श्रेष्ठ दर्जाचं आत्मचरित्र लिहिणा:या इन्ग्रिडबद्दल इझाबेल काय बोलते याची मला उत्सुकता आहे. याशिवाय ‘सिटीझन केन’चे लेखक-दिग्दर्शक ऑर्सन वेल्स यांच्यावरची डॉक्युमेंटरी आहे. डॉक्युमेंटरीजच्या या विभागात ‘सिक्स्टी इयर्स ऑफ गोल्डन पाम लीजंड‘ आहे ज्यात गेल्या साठ वर्षातील कानमध्ये सवरेत्कृष्ट चित्रपटाचा, दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळवणा:यांचा आढावा आहे. हा साठ वर्षाचा इतिहास म्हणजे जागतिक चित्रपटाच्या इतिहासातील एक महत्त्वाचं पर्व आहे. इतकंच नाही, तर सिनेमाचे जनक ल्युमिए बंधू यांनी चित्रपटनिर्मितीला आरंभ केला त्याला मार्च 2क्15 मध्ये 12क् वर्षं पूर्ण झाल्याच्या निमित्ताने तयार केलेल्या खास डॉक्युमेंटरीचाही समावेश आहे.
‘ङोड’, ‘मिसिंग’, ‘हना के’, आमेन’, ‘द कॅपिटल’ आदि अभिजात चित्रपटांचे कर्ते थोर दिग्दर्शक कोस्ता गावरास यंदा कान महोत्सवाचे सन्माननीय पाहुणो आहेत. उद्घाटन सोहळ्यात त्यांचे विचार ऐकायला मिळतीलच, परंतु त्यांचा मास्टर क्लासदेखील असणार आहे. जिथे ते त्यांचा एकूण कलाप्रवास आणि चित्रपटाशी असलेलं नातं याविषयी सविस्तर बोलतील. 1969 मध्ये त्यांच्या ‘ङोड’ला ज्युरींचा विशेष पुरस्कार, तर ‘मिसिंग’ ला 1982 मध्ये सवरेत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार लाभला होता. अतिशय वेगळ्या धाटणीच्या आणि वास्तवाला थेट भिडणा:या त्यांच्या एकापाठोपाठच्या राजकीयपटांनी जगभरच्या प्रेक्षकांना एकाचवेळी अभिजात चित्रकृती पाहिल्याचा आणि समकालीन राजकीय वास्तवाचा एक वेगळा अन्वयार्थ तपासून पाहण्याची अपूर्व संधी दिली.
क्वचितच घडणारी गोष्ट यंदाच्या कानच्या ज्युरीबाबत घडली आहे आणि ती म्हणजे ज्युरीचे दोन अध्यक्ष आहेत. कारण जॉएल आणि एथान कोयेन ह्या दिग्दर्शक द्वयींना अध्यक्ष म्हणून पाचारण करण्यात आलं आहे. स्पर्धा विभागात एकूण 17 चित्रपट आहेत. पैकी इटलीचे नानी मोरेती आणि अमेरिकेचे गूज वा सँ यांना अनुक्रमे ‘द सन्स रूम’ (2क्क्1) आणि ‘एलिफंट’ (2क्क्3) साठी कानचा सर्वोच्च पुरस्कार प्राप्त झाले आहेत. यंदा ते त्यांच्या अनुक्रमे ‘माय मदर’ आणि ‘द सी ऑफ ट्रीज’ या चित्रपटांसह पुन्हा या स्पर्धेत उतरले आहेत. बाकीचे अर्थातच पहिलटकर आहेत.
मुख्य स्पर्धा विभागाइतकाच महत्त्वाचा असलेल्या ‘अन् सर्टन रिगार्ड’ मध्ये नीरज घायवान आणि गुरविंदर सिंग या दोन तरुण भारतीय दिग्दर्शकांचे अनुक्रमे ‘मसान’ आणि ‘चौथा कुट’ हे दोन चित्रपट आहेत. ‘गँग्ज ऑफ वासेपूर’ या अनुराग कश्यप दिग्दर्शित चित्रपटाचा सहायक दिग्दर्शक असलेल्या नीरजचा दिग्दर्शक म्हणून हा पहिलाच चित्रपट, तर पुण्याच्या फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिटय़ूटचा स्नातक असलेल्या गुरविंदरचा हा दुसरा चित्रपट! याआधीच्या त्याच्या ‘अन्हे घोरे दा दान’ या चित्रपटाला दोन राष्ट्रीय आणि काही आंतरराष्ट्रीय पुरस्कार लाभले आहेत. त्याचे हे दोन्ही चित्रपट पंजाबी भाषेतील आहेत.
तर जागतिक चित्रपटातील ज्येष्ठ, श्रेष्ठ प्रतिभावंतांबरोबरच नव्या दमाच्या दिग्दर्शकांचे चित्रपट पाहण्याची उत्सुकता सोबत घेऊनच कानचे वारकरी प्रवासाला सज्ज झालेत. त्यात आपले सत्यजित राय आणि नव्या युगाचे नीरज घायवान आणि गुरविंदर सिंगदेखील आहेत. आणि हो, रेड कार्पेटवर कतरिना कैफ आहेच की..
‘पाथेर पांचाली’ची जादू ‘कान’मध्ये..
सत्यजित राय यांच्या ‘पाथेर पांचाली’ साठी विशेष गौरवाची - अलीकडची - बाब म्हणजे तो आणि त्याचे पुढले दोन भाग - ‘अपराजितो’ आणि ‘अपूर संसार’ म्हणजेच ‘अपू चित्रत्रयी’ परवाच म्हणजे 8 मेला अमेरिकेत प्रदर्शित झाले. निमित्त दोन - एक ‘पाथेर पांचाली’ला साठ वर्षं पूर्ण होणं आणि महद्प्रयत्नांनंतर या तीनही चित्रपटांच्या डिजिटल प्रिंट्स तयार होणं. काळाबरोबर चित्रपट माध्यम केवढं बदललं, तरी आजही या अभिजात कलाकृती गुंतवून ठेवतात.
बिभूतीभूषण बंदोपाध्याय यांच्या ‘पाथेर पांचाली’ आणि ‘अपराजितो’ या दोन कादंब:यांचा आणि त्यावर आधारित अशा सत्यजित राय यांच्या ‘अपू चित्रत्रयी’चा नायक अपू आणि त्याचा अवघा जीवनप्रवास हा एकूणच जगण्याचं मर्म उलगडवून दाखवीत संवेदनशील प्रेक्षकाला एक प्रगल्भ भान देतो. त्यातली सहजता, तरलता ही अभूतपूर्व आहे आणि म्हणूनच या तीन चित्रपटांना अभिजाततेचं लेणं लाभलं आहे.
- आजवर अक्षरश: असंख्य वेळा पाहिलेला ‘पाथेर पांचाली’ यावर्षीच्या कान चित्रपट महोत्सवाचं खास आकर्षण आहे. तो कानमध्ये पाहणं हा एक वेगळाच अनुभव असेल.
( लेखक ख्यातनाम चित्रपट समीक्षक आणि जगभरच्या चित्रपट-संस्कृतीचे अभ्यासक आहेत.)