अतुल कुलकर्णी
वरवर चकाचक दिसणारी हॉस्पिटल्स,पण खरेच ती तशी असतात?वैद्यकीय उपकरणे, रूममधल्या फरश्या, फर्निचर, ऑपरेशन रूम निर्जंतुक असतात?रुग्णांना सर्वाधिक इन्फेक्शन होते तेही हॉस्पिटलमधूनच. रुग्ण हॉस्पिटलमध्ये दाखल तर होतात, पण बरे होण्याचे नावच घेत नाहीत. मग सुरू होतो अॅण्टिबायोटिकचा मारा.. कॅन्सर झालाय, द्या अॅण्टिबायोटिक..
ताप आलाय, सर्दी-पडसे झालेय, द्या अॅण्टिबायोटिक.. मूळ आजारापेक्षाही इन्फेक्शनच्या भीतीने अॅण्टिबायोटिकचा मारा सुरू होतो. ज्या अॅण्टिबायोटिकने एकेकाळी रुग्णांना नवजीवन दिले, तीच औषधे आज रुग्णांना मरणपंथाला नेताहेत.. त्यामागे व्यावसायिक आणि आर्थिक गणितेही आहेतच. काय आहे हा गडबडगुंडा?
मुंबईतील एक मोठे खासगी रुग्णालय. त्यात ब्लड कॅन्सरचा अत्यंत नाजूक स्थितीत असलेला एक रुग्ण..
डॉक्टर त्या रुग्णास मोठ्या प्रमाणावर अॅण्टिबायोटिकचा (प्रतिजैविके) डोस देतात. त्याचे नातेवाईक डॉक्टरी पेशातले. ते सांगतात, या रुग्णास एवढ्या मोठ्या डोसची गरज नाही. त्यावर डॉक्टर सांगतात, हॉस्पिटलच्या वातानुकूल यंत्रणेतून रुग्णास इन्फेक्शन होतात म्हणून हे जास्तीचे डोस आहेत..! परिणामी पेशंट काही दिवसांनी कॅन्सरऐवजी अॅण्टिबायोटिकचा जास्ती डोस गेल्यामुळे दगावला...
पुण्यातले एक हॉस्पिटल. तेथे वॉर्डात ‘झाडू पोछा’ करणारे मामा पोछा मारतात, तोच पोछा हाताने पिळून पुन्हा फरशी पुसत राहतात, नंतर साध्या पाण्याने हात धुऊन त्याच ओल्या हाताने दरवाजाचे हॅण्डल ढकलून वॉर्डाच्या बाहेर जातात, नंतर त्याच वॉर्डातील एक नर्स पेशंट तपासून त्याच हॅण्डलला ढकलून दरवाजा उघडून बाहेर जाते आणि दुसऱ्या वॉर्डातल्या पेशंटना त्याच हाताने तपासते... परिणामी इन्फेक्शन एकापासून अनेकांपर्यंत जाते. त्या हॉस्पिटलमध्ये असे रुग्ण बरे करण्यासाठी त्यांना गरज नसताना तीव्र क्षमतेची अॅण्टिबायोेटिक दिली जातात...
भारतातून परतलेल्या ७० वर्षांच्या एका अमेरिकन महिलेचा नुकताच मृत्यू झाला. सीआरई प्रजातीतील एका जीवाणूचा संसर्ग तिला झाला होता. तिला चार वेळा भारतातील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. १४ प्रकारची प्रतिजैविके तिला देण्यात आली होती, पण त्यातल्या एकाचाही उपयोग झाला नाही.
नाशिकच्या एका हॉस्पिटलमध्ये एका रुग्णाची किडनी काढली गेली. त्यातून त्याला ‘केप्सीएला’ नावाचे हॉस्पिटलमुळे होणारे इन्फेक्शन झाले.
त्यावर वेळीच औषधे दिली गेली नाहीत.
नंतर इन्फेक्शन वाढले. जखमेत पू झाला. नंतर तीव्र स्वरूपाची अॅण्टिबायोटिक दिली गेली. पण आॅपरेशन चांगले होऊनही रुग्ण वाचला नाही...
वाशिम जिल्हा रुग्णालयाने गेल्यावर्षी २४ रुग्णांचे डोळ्याचे आॅपरेशन केले. त्यानंतर पेशंटचे डोळे लाल होणे, पाणी येणे असा त्रास सुरू झाला. आॅपरेशनच्या वेळी दूषित उपकरणे वापरल्याने हा त्रास झाल्याचे प्राथमिक तपासणीतून सिद्ध झाले. त्यातल्या १४ रुग्णांना जे. जे. हॉस्पिटलमध्ये आणले गेले. डॉ. तात्याराव लहाने यांनी त्यांच्यावर उपचार केले व काहींचे डोळे परत मिळवून दिले.
अॅण्टिबायोटिकचा वापर, अतिवापर आणि दुसरीकडे जंतुविरहित वातावरण, उपकरणे न वापरण्याचे परिणाम आपल्या राज्यात अत्यंत भयंकर दिशेने चालू आहेत. पण त्याकडे लक्ष देण्यास कोणालाही वेळ नाही किंवा गरज वाटत नाही.
१९२८ साली लंडनमध्ये सर अॅलेक्झांडर फ्लेमिंग यांनी पेनिसीलीन नावाचे पहिले अॅण्टिबायोटिक शोधून काढले. त्याचवेळी ते म्हणाले होते की याचा वापर विचारपूर्वक केला नाही तर भविष्यात या अॅण्टिबायोटिकचा उपयोगच होणार नाही. आणि आम्ही त्यांचे विचार पूर्णपणे खरे करून दाखवले. आज पेनिसीलीनला आमचे जीवाणू दादच देईनासे झाले. त्यातून कितीतरी जास्ती क्षमतेची अॅण्टिबायोटिक्स शोधली गेली. पण त्यांनाही आता हे जीवाणू दाद देईनात. याची गंभीरता ओळखून जागतिक आरोग्य संघटनेने ‘नो अॅक्शन टूडे, नो क्यूअर टुमारो’ असे घोषवाक्य घेऊन २०११ साली जगभरात एक मोहीम राबवली. मात्र हा सल्लादेखील आम्ही गंभीरपणे घेतला नाही.
वर दिलेली काही बोलकी उदाहरणे ही मोठ्या खासगी हॉस्पिटलमधली आहेत. सरकारी हॉस्पिटलची अवस्था तर विचार करण्यापलीकडची आहे. कोणताही आजार झाल्यानंतर हॉस्पिटलमध्ये रुग्ण दाखल होतो, मात्र ४८ तासातच त्याला बरे वाटण्याऐवजी वेगवेगळे इन्फेक्शन्स घेरून टाकतात. सरकारी हॉस्पिटलमध्ये येणारे गोरगरीब रुग्ण अॅडमिट होतात, त्यांचे नातेवाईक हॉस्पिटलच्या आवारात जेथे जागा मिळेल तेथे राहतात, झोपतात, त्याच कपड्यानिशी पेशंटजवळ येतात, त्याच्या बेडवर बसतात आणि त्याला इन्फेक्शन देतात. कोणत्याही जिल्हा रुग्णालयात फेरफटका मारा, मोकाट कुत्री, मांजरे स्वैरपणे फिरत असतात. अनेक जिल्हा आणि मेडिकल कॉलेजमध्ये रुग्णांना बेड मिळत नाहीत म्हणून दोन कॉटच्या मधे गादी टाकून झोपवले जाते. तेथे चप्पल, बूट घालून रुग्णांचे नातेवाईक, डॉक्टर, कम्पाउण्डर, नर्सेस ये-जा करत असतात, मधेच एखादी मांजर फिरत जाते, त्यातून रुग्णांना इन्फेक्शन होते. दोन रुग्णांना तपासले की डॉक्टरांनी स्वत:चे हात ‘हॅण्ड हायजीन’ वापरून जंतुविरहित करावेत ही साधी अपेक्षा जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) केली, पण तीदेखील अनेकजण पाळत नाहीत.
रुग्णांसाठी वापरली जाणारी उपकरणे पूर्णपणे जंतुविरहित करून घ्यावीत, जमीन, फर्निचर, आॅपरेशन टेबल, आॅपरेशन रूम, मॉनिटरचे स्क्रीन.. हॉस्पिटलमधील अशा अनेक गोष्टी निर्जंतुकीकरण करून घ्याव्यात ही साधी अपेक्षाही अनेक ठिकाणी पूर्ण होत नाही. त्यातून रुग्ण बरे होण्याचे नाव घेत नाहीत. आणि मग सुरू होतो अॅण्बिायोटिकचा
बेसुमार वापर..! एका पाठोपाठ एक गोळ्यांचा मारा सुरू होतो..
आजार कोणताही असो, आजकाल कोणत्याही डॉक्टरकडे गेलं की पहिल्यांदा त्याला अॅण्टिबायोटिकचा डोस दिला जातो. हा डोस सर्वसाधारणपणे पाच ते सात दिवस घेतला जावा असे डॉक्टर सांगतात. (काही वर्षांपूर्वी हाच डोस तीन दिवस दिला जायचा.) पेशंटला त्या औषधांचा, डॉक्टरच्या उपचारांचा तातडीने गुण आला नाही की लगेच तो दुसऱ्या किंवा त्याच्या दृष्टीने आणखी तज्ज्ञ किंवा स्पेशालिस्ट डॉक्टरकडे जातो. दुसरा डॉक्टर आणखी जास्त क्षमतेचे अॅण्टिबायोटिक रुग्णाला देतो. अशा प्रकारांमुळे शरीरातले जीवाणूही अॅण्टिबायोटिक्सला दाद देत नाहीत. परिणामी पहिल्यापेक्षा आणखी जास्त क्षमतेची प्रतिजैविके देत राहण्याचा प्रयोग रुग्णांवर होत राहतो. त्याचा रुग्णांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो.
शिवाय वेगवेगळ्या औषध कंपन्या आपली औषधं, प्रतिजैविकं खपवण्यासाठी वेगवेगळ्या क्लृप्त्याही लढवत असतातच. त्यातलाच एक प्रकार म्हणजे आपली औषधं खपवण्यासाठी डॉक्टरांना आमिष दाखवणं. मोठमोठ्या रोख रकमांसह परदेश दौरे आणि किमती भेटवस्तू डॉक्टरांना भेट म्हणून देण्याचे प्रकार आता नवीन राहिलेले नाहीत. अशा प्रकारांमुळेही रुग्णांच्या जिवाशी खेळ होतो.
कोणत्याही अॅण्टिबायोटिकचा कोर्स हा किमान ५ ते ७ दिवस असावा असा नियम आहे.
डॉक्टरने अॅण्टिबायोटिक दिले की पेशंट दोन दिवस त्या गोळ्या घेतो, पण त्रास सहन होत नाही हे पाहून तो आणि त्याचे नातेवाईक लगेच दुसऱ्या डॉक्टरकडे जातात. दुसरा डॉक्टर आपण पहिल्यापेक्षा किती हुशार आहोत हे दाखवण्यासाठी आणखी जास्ती क्षमतेचे दुसरे अॅण्टिबायोटिक देतो. परिणामी पेशंटच्या शरीरातले बॅक्टेरिया अॅण्टिबायोटिक्सना दादच देत नाहीत. त्यातून पेशंटवर वेगवेगळे प्रयोग होत जातात. मग पेशंटचा औषधांचा खर्च आणि तिकडे अॅण्टिबायोटिक बनवणाऱ्या कंपन्यांचा नफा एकाचवेळी वाढत जातो.
सर्दी-पडसे झाले तर ते काहीही न करता सात दिवसात बरे होते आणि डॉक्टरकडे गेल्यानंतर, त्याला भरपूर फी देऊन भारी अॅण्टिबायोटिकचे डोस पैसे मोजून घेतल्यानंतर तेच सर्दी-पडसे एक आठवड्यात बरे होते..! असे असतानाही एकही डॉक्टर आम्हाला खरे सांगत नाही आणि जे डॉक्टर रुग्णांना जास्तीत जास्त अॅण्टिबायोटिक लिहून देतात त्या डॉक्टरांसाठी फार्मासिटीकल कंपन्या परदेश सहलींपासून महागड्या भेटींपर्यंत वाट्टेल ते द्यायला तयार होतात.
हॅण्ड हायजिन (हात जंतुविरहित करणे), स्कीन अॅण्टिसेप्सीस (रुग्णांच्या अंगावरची त्वचा जंतुविरहित करणे), उपकरणांचे निर्जंतुकीकरण करणे आणि सरफेस डिसइन्फेक्टण्ट (हॉस्पिटलमधील फरश्या, फर्निचर आणि अन्य गोष्टी पूर्णपणे निर्जंतुकीकरण करणे) यावर भर द्यावाच लागेल असे जागतिक आरोग्य संघटनेने आपल्या ‘ग्लोबल अॅक्शन प्लॅन’मध्ये स्पष्टपणे नमूद केलेले असतानाही आम्ही अजूनही यात गंभीर होऊ शकत नसू तर येणारी पिढी अॅण्टिबायोटिकच्या अतिवापरामुळे मृत्यूच्या उंबरठ्यावर उभी राहिलेली पाहण्याशिवाय आपल्या हाती काहीही उरणार नाही..!
जागतिक बँकेचा अॅक्शन प्लॅन
मॉर्डन मेडिसीनमध्ये अॅण्टिबायोटिकला जीवाणू आणि विषाणू दाद देईनासे झाले आहेत. ही गंभीर समस्या आज जगासमोर आ वासून उभी आहे. परिणामकारक उपचारासाठी अॅण्टिबायोटिकची गरज असतानाही दिवसेंदिवस उपचार पद्धती निष्प्रभ होत चाललेली आहे.
अशा काही औषधांचा मानवी आरोग्यासाठी तसेच अन्नप्रक्रियेत व पशुआरोग्यासाठी जाणीवपूर्वक पद्धतशीर गैरवापर व अतिवापर केला जात आहे. त्यामुळे जगभरातील मानवी आरोग्य धोक्यात आले आहे.
जग एका गंभीर आरोग्य समस्येच्या उंबरठ्यावर उभे आहे. छोटे छोटे आजारही घातक ठरू लागले आहेत, त्यातून मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. म्हणून वर्ल्ड हेल्थ असेंब्ली ग्लोबल अॅक्शन प्लॅन तयार करत आहे. त्यात-
१) संवाद, शिक्षण, प्रशिक्षणातून अॅण्टिबायोटिकच्या वापराबद्दल प्रबोधन करणे.
२) सातत्याने सर्व्हे आणि संशोधन करणे.
३) इन्फेक्शन होणार नाही यासाठी परिणामकारक हॅण्ड हायजिन, स्कीन अॅण्टिसेप्सीस, उपकरणांचे निर्जंतुकीकरण, सरफेस डिसइन्फेक्टण्ट यावर पूर्णपणे लक्ष केंद्रित करणे.
४) अॅण्टिबायोटिकचा कमीत कमी वापर करणे.
५) शासनाने औषधांपेक्षा या गोष्टीत जास्तीत जास्त गुंतवणूक करणे व याविषयी जागृती निर्माण करणे.
या पाच प्रमुख उद्दिष्टांचा अॅक्शन प्लॅनमध्ये समावेश आहे. जगभरातील देशांनी २०१७ पर्यंत आपापल्या देशांचा आढावा घेऊन यासाठीचा आराखडा तयार करावा.
रुग्णांच्या जिवाशी खेळ
आपल्याकडे आजही जागतिक आरोग्य संघटनेने किंवा ग्लोबल अॅक्शन प्लॅनने ज्या सूचना केल्या त्यावर कोणतीही प्रभावी अंमलबजावणी झालेली नाही. वैद्यकीय शिक्षण विभाग, सार्वजनिक आरोग्य विभाग किंवा महापालिकांचे दवाखाने यासाठीच्या खरेदीऐवजी अॅण्टिबायोटिक्सच्या खरेदीतच सारे मग्न आहेत. त्यांच्या दृष्टीने हायजिनची खरेदी बिनकामाची आहे. कारण त्यातून त्यांना जे हवे ते मिळत नाही. एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वच्छ भारताचा नारा देतात आणि दुसरीकडे आमच्या सरकारी हॉस्पिटलचे व्यवस्थापन पाहणाऱ्यांचे प्राधान्य नेमके याच्या विरुद्ध आहे हे गेल्या दोन वर्षात झालेल्या खरेदीवरून स्पष्टपणे लक्षात येईल. आॅपरेशन थिएटरचे फ्यूमिगेशन (निर्जंतुकीकरणासाठी धुरी देणे) करायचे तर पूर्वी २४ तास ‘ओटी’ बंद ठेवावी लागत असे. त्यात संशोधन झाले आणि अवघ्या काही तासात ‘ओटी’ फ्यूमिगेशन होऊन वापरता येईल अशा गोष्टी समोर आल्या. पण त्यामुळे आम्हाला जास्त काम करावे लागेल म्हणून त्यांचा वापर टाळला जातोय. दुसरीकडे फ्यूमिगेशनसाठी जी जंतुनाशके वापरली जातात त्यात कॅन्सर होऊ शकणारी घातक रसायने असतानाही ते स्वस्त आहे, आमच्याकडे स्टॉक पडून आहे असे सांगून नव्या चांगल्या गोष्टी वापरण्याकडे आम्ही जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहोत. कोणत्याही मोठ्या खासगी हॉस्पिटलमध्ये प्रत्येक पेशंटच्या कॉटला एक स्टॅण्ड आणि त्यात अडकवलेली एक बाटली आपल्याला पाहायला मिळते. त्यात अल्कोहोल ड्राय हॅण्डरब असते. ते वापरूनच डॉक्टर, नर्सने पेशंटना हात लावावा अशी साधी गोष्टही सरकारी हॉस्पिटलमध्ये पाळली जात नाही. या सगळ्यांचा परिणाम रुग्णांच्या जिवाशी खेळण्यात होतोय हे कोणाच्याही लक्षात येत नाही असे नाही, पण पळा पळा कोण पुढे पळे तो... या न्यायाने सगळ्यांना ‘सगळ्या गोष्टी’ झटपट हव्या आहेत. त्यासाठी रुग्णांचे जीव टांगणीला लागले तर त्यात काय विशेष...!
ना बंधन, ना नियम!
वाढत्या जागतिकीकरणाच्या रेट्यात कोणत्याही आजारावर उपचार करणे दिवसेंदिवस महाग होत चालले आहे. शिवाय ते धोक्याचेही होत आहे. त्यामुळे आजारी पडण्यापेक्षा काळजी घेणे जास्त गरजेचे बनले आहे. कोणतेही इन्फेक्शन टाळण्यासाठी दिले जाणारे अॅण्टिबायोटिक रुग्णहिताऐवजी फार्मा कंपन्यांच्या हितासाठी बाजारात आणली जाऊ लागली. डॉक्टरांनी अशी अॅण्टिबायोटिक लिहून द्यावीत म्हणून नवनवीन प्रलोभने येऊ लागली. त्यामुळे अॅण्टिबायोटिकच्या अतिरेकी वापरामुळे रोगाचे जंतू दाद देण्यास तयार नाहीत.
गेल्या तीस वर्षांत एकही नवीन अॅण्टिबायोटिक तयार झाले नाही. कोणी कोणते अॅण्टिबायोटिक लिहून द्यावे याचे कसले बंधन नाही आणि नियमही नाहीत. त्यामुळे अनेक डॉक्टर त्यांना जे योग्य वाटते ती अॅण्टिबायोटिक देऊ लागली. अॅण्टिबायोटिकवर खर्च करण्यापेक्षा प्रिव्हेंटिव्ह मेडिसीनवर खर्च वाढवावा हे कोणाला वाटत नाही. केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांनी ‘मेडिसीन विथ रेड लाइन’ नावाचे कॅम्पेन केले. ज्या अॅण्टिबायोटिकवर ‘रेड लाइन’ आहे ते डॉक्टरांच्या प्रिस्क्रीप्शनशिवाय द्यायचे नाही अशी भूमिका केंद्र सरकारने घेतली. पण राज्याराज्यातील अन्न व औषध प्रशासन विभाग ढिम्म हलायला तयार नाहीत. या सगळ्यांचा परिणाम मात्र ज्यांना या गोष्टी माहितीच नाहीत अशा सामान्य रुग्णांवर होत आहे. ‘आता देवाच्याच हाती’ असे म्हणायची वेळ आली आहे, हेच खरे...!
युद्ध आणि सैन्य!
आपल्या शरीरात काही चांगले तर काही वाईट सूक्ष्मजीवही असतात. आपण घरात असो, घराबाहेर, हॉस्पिटलमध्ये किंवा इतर कोठे, आपल्यावर बाहेरून काही सूक्ष्मजीव हल्ले करत असतात. अॅण्टिबायोटिकच्या रूपाने आपण ते हल्ले परतवून लावत असतो.
हे युद्ध सतत चालू असते. या युद्धात जर आपण सुरुवातीलाच आपले चांगले चांगले सैनिक वापरून टाकले तर जेव्हा मोठा हल्ला आपल्यावर होईल तेव्हा आपल्याकडे सैनिकच उरणार नाहीत.
हे साधे गणित आपल्याला होणारे इन्फेक्शन आणि आपण वापरतो ते अॅण्टिबायोटिक यांना लागू होते..!
(लेखक लोकमतच्या मुंबई आवृत्तीत
सहायक संपादक आहेत.atul.kulkarni@lokmat.com)