शहरं
Join us  
Trending Stories
1
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
2
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
3
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
4
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
5
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
6
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
7
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
8
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
9
TATA IPL Auction 2025 Live: डेव्हिड वॉर्नर पुन्हा अनसोल्ड; हैदराबादला २०१६ मध्ये बनवलं होतं चॅम्पियन
10
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
11
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
12
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल
13
"नियोजनाप्रमाणे प्रचार केला नाही"; काँग्रेस नेत्याने शरद पवार-ठाकरेंवर फोडलं पराभवाचे खापर
14
IPL Auction 2025: इतिहास घडला! श्रेयस अय्यर ठरला सर्वात महागडा खेळाडू! पंजाब किंग्जने मारली बाजी
15
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 :'बाज की असली उड़ान बाकी है'; मुख्यमंत्रि‍पदाच्या चर्चेदरम्यान देवेंद्र फडणवीसांचा व्हिडीओ व्हायरल
16
"इतका लीड घेतला की पेट्या कमी पडल्या"; विक्रमी मताधिक्यानंतर धनंजय मुंडेंचे फडणवीसांकडून कौतुक
17
ज्या पार्टीचा एकच आमदार जिंकला; तोही म्हणाला, राजीनामा देणार!
18
IPL Auction 2025 : प्रीतीनं हाणून पाडला काव्या मारन यांचा डाव; अर्शदीप RTM सह १८ कोटींसह पुन्हा PBKS च्या ताफ्यात
19
IPL 2025 Auction : नेहरानं हेरला Jos Buttler चा चेहरा; GT च्या संघानं लगेच पर्समधून काढली एवढ्या कोटींची रक्कम

पवारांची 'पन्नाशी'

By admin | Published: February 18, 2017 4:35 PM

पूर्वार्धात अनुकूल आणि उत्तरार्धात काहीशी प्रतिकूल परिस्थिती अशी शरद पवारांची वाटचाल राहिली. हर्ष-खेद बाजूला ठेवून हा नेता आजतागायत अजिंक्य योद्ध्यासारखा खंबीरपणे उभा आहे. बेछूट आरोपांना तोंड देण्याचे अनेक प्रसंग आले, तरी ना त्यांचे संघटन कौशल्य ढळले, ना द्रष्टेपण!

- दिनकर रायकर
 
पूर्वार्धात अनुकूल आणि उत्तरार्धात काहीशी प्रतिकूल परिस्थिती 
अशी शरद पवारांची वाटचाल राहिली. हर्ष-खेद बाजूला ठेवून 
हा नेता आजतागायत अजिंक्य योद्ध्यासारखा खंबीरपणे उभा आहे. बेछूट आरोपांना तोंड देण्याचे अनेक प्रसंग आले, तरी ना त्यांचे संघटन कौशल्य ढळले, ना द्रष्टेपण!
 
 
शरद पवार. केवळ सहा अक्षरे. महाराष्ट्राच्या आणि देशाच्याही राजकारणाचा विषय या नावाला स्पर्श केल्याखेरीज पुढे सरकत नाही. त्यांच्या राजकीय कारकिर्दीच्या परमोच्च बिंदूवर त्यांच्या नावामागे अनेक विशेषणे लागली. उपाधी मिळाल्या. जाणता राजा हे त्यापैकीच एक विशेषण. हे बिरुद लागण्यापूर्वीचा आणि तेव्हापासून आजवरचा त्यांचा राजकीय प्रवास लोकविलक्षण आहे. त्यात संघर्ष आहे. वाद आहेत. वादळेही आहेत. अभिमानाचे असंख्य क्षण आहेत. अपमानाचे अपवादात्मक का होईना, प्रसंग आहेत. उदारमतवादी अंत:करणाचे दाखले आहेत. कलासक्त मनाची साक्ष देणाऱ्या, विशाल सहिष्णूतेचा परिचय देणाऱ्या घटनाही आहेत. प्रशासकीय कठोरतेचे अनुभव आहेत. जागतिक नेटवर्किंगचा वस्तुपाठ आहे, तितकाच इथल्या मातीशी असलेल्या घट्ट नात्याचा गंध आहे. स्वाभिमानाचा हुंकार आहे आणि राजकीय लवचिकतेचे परिमाणही आहे. अवघे राजकारण तसेच बऱ्याच अंशी समाजकारणही व्यापून दशांगुळे उरलेल्या शरद पवारांच्या राजकीय कारकिर्दीला याच महिन्यात - फेब्रुवारीत तब्बल पन्नास वर्षे पूर्ण होत आहेत. एका अर्थाने या पन्नाशीचा पत्रकार या नात्याने मी तटस्थ साक्षीदार आहे.
शरदचंद्र गोविंद पवार हे नाव महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर प्रथमत: अवतरले, ते १९६७च्या फेब्रुवारी महिन्यात. पुणे जिल्ह्यातील बारामतीतून १९६७च्या विधानसभा निवडणुकीतील विजयाने पवारांच्या सार्वजनिक राजकीय आयुष्याचा श्रीगणेशा झाला. त्याच वर्षी ते लग्नाच्या बेडीत अडकले. त्यानंतर बारामतीतूनच सलग सहा वेळा ते विधानसभेवर निर्विवाद बहुमताने निवडून गेले. निवडणुकीच्या राजकारणाच्या आखाड्यात या कसलेल्या पैलवानाची पाठ कधीच मातीला टेकली नाही. विधानसभा असो की विधान परिषद असो, लोकसभा असो वा राज्यसभा असो, शरद पवारांचा विजय ही काळ्या दगडावरची रेघ ठरली. 
- या कालावधीत राजकीय स्थित्यंतरे काही कमी झाली नव्हती. जॉर्ज फर्नांडिस यांनी केलेल्या स. का. पाटील यांच्या पराभवानंतर निवडणुकीच्या राजकारणात कितीही मोठा नेता पराभूत होऊ शकतो, हे अधोरेखित झाले होते. कामगार चळवळीचा दबदबा, प्रभाव वाढीस लागला होता. लालबहादूर शास्त्रींच्या निधनानंतर काँग्रेसची सूत्रे इंदिरा गांधी यांच्याकडे गेल्यानंतर अल्पावधीतच काँगे्रसने राष्ट्रीय पातळीवर बेदिली अनुभवली होती. राष्ट्रीय पातळीवरील राजकारणात ही अशी अभूतपूर्व घुसळण सुरू असताना महाराष्ट्रात बऱ्यापैकी राजकीय स्थैर्य होते.
१९७० साली मी विधिमंडळाचे वार्तांकन करू लागलो. तेव्हा शरद पवार काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे सरचिटणीस होते. त्याकाळी राजकीय पदप्राप्तीच्या बाबतीत ‘पी हळद आणि हो गोरी’, असला प्रकार नव्हता. पवारांनाही पहिल्या टर्ममध्ये लाल दिवा वगैरे मिळाला नव्हता. पण ऐन तारुण्यात त्यांच्याकडे विधानसभेतील फ्लोअर मॅनेजमेंट, सभागृहात मांडावयाच्या भूमिकेच्या संदर्भातील धोरण निश्चितीतील सहभाग, विधिमंडळ पक्षाच्या बैठकांचे नियोजन अशा पडद्यामागील महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या होत्या. तसे आम्ही समवयस्क. कदाचित त्यामुळेही असेल, मी, अरुण साधू, जगन फडणीस आणि काही काळ अशोक जैन या समवयस्क पत्रकारांशी त्यांचा दोस्ताना जमून गेला. आमच्याशी त्यांचे संबंध उत्तम होते. कालांतराने अशोक जैन दिल्लीच्या पत्रकारितेत गेले. प्रसारमाध्यमांशी सलोख्याचे संबंध ठेवण्याचे कसब पवारांनी ऐन तारुण्यात, आमदारकीच्या पहिल्या टर्ममध्येच आत्मसात केले होते. त्यासाठी ते अनेकदा विधिमंडळाच्या प्रेसरूममध्ये, प्रसंगी प्रेस गॅलरीत आवर्जून येत असत. आम्हाला हवी असलेली माहिती देण्यासाठी तत्पर असत. 
१९७२च्या निवडणुकीत विजयी झाल्यानंतर पवारांना गृहराज्यमंत्रिपद मिळाले. मुख्यमंत्र्यांनी स्वत:कडे ठेवलेल्या इतर काही खात्यांचेही राज्यमंत्रिपद मिळाले. डोक्यावर लाल बत्ती आल्यानंतर त्यांच्या डोक्यात हवा गेली नाही. पत्रकार आणि प्रशासनासोबतचे त्यांचे संबंध आणखी दृढ झाले. पवारांनी अभ्यासू व तयारी करून सभागृहात येणारा मंत्री ही प्रतिमा अल्पावधीत प्रस्थापित केली. त्याचाच परिणाम म्हणून १९७४ साली पवारांना कॅबिनेट मंत्रिपद आणि शिक्षण खाते मिळाले. तो वसंतराव नाईक यांच्या मंत्रिमंडळाचा शेवटचा विस्तार होता. त्यानंतर लागलीच १९७५ साली शंकरराव चव्हाण मुख्यमंत्री झाले. त्यांनी पवारांचे कॅबिनेट मंत्रिपद कायम ठेवताना खाते मात्र बदलले. शिक्षणाऐवजी त्यांच्याकडे शेती खाते आले. आणीबाणी संपल्यावर झालेल्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव झाला. त्या पराभवाचे राजकीय पडसाद राज्यातील काँग्रेसच्या अंतर्गत राजकारणात उमटले. वसंतदादा पाटील यांनी मोर्चेबांधणी करून शंकररावांना मुख्यमंत्रिपदावरून बहुमताच्या आधारे हटविले. दादांनी तेव्हा पवारांचे मंत्रिपद तर कायम ठेवलेच शिवाय गृहखात्याचा पूर्ण कारभार सोपविला. त्यानंतर लागलीच १९७८ साली झालेल्या निवडणुकीनंतर काँग्रेस (आय) आणि काँग्रेस एकत्र येऊन सरकार बनले. दादा मुख्यमंत्री, तर काँग्रेसचे नासिकराव तिरपुडे उपमुख्यमंत्री अशी राजकीय तडजोड झाली. त्यावेळी मात्र दादांनी पवारांना उद्योग व कामगार खाते दिले.
हा सारा वरकरणी रूक्ष वाढणारा तपशील अशासाठी दिला, की या सरधोपट वाटणाऱ्या प्रवासातच आगामी वादळाचे बीज रोवले गेले होते. सुशीलकुमार शिंदे, प्रतापराव भोसले, गोविंदराव आदिक, विनायकराव पाटील, मराठवाड्यातील सुंदरराव सोळंके आदि निष्ठावंतांच्या मदतीने पवारांनी दादांच्या मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीला सुरुंग लावला. दादा-तिरपुडे यांचे संयुक्त सरकार पवारांनी पाडले, या राजकीय नाट्याबाबत जे अनेक सिद्धांत जन्माला आले त्यापैकी एक पवारांना पुढे अनेक वर्षे छळत राहिला. ‘पवारांनी दादांच्या पाठीत खंजीर खुपसला,’ हाच तो छळवादी राजकीय सिद्धान्त! अर्थात त्यांच्या याच राजकीय खेळीने पवारांचा मगदूर केवळ सरदाराचा नव्हे, तर सेनापतीचा असण्यावर मोहोर उमटली. त्यावेळी सत्ता संपादनासाठी पवारांनी डाव्या-उजव्या अशा भिन्न प्रकृतीच्या नऊ पक्षांची एकत्रित मोट बांधली. त्यात जनसंघीयांपासून समाजवाद्यांपर्यंत साऱ्यांना एकत्र आणले. वास्तविक, त्यापैकी संख्याबळाने सर्वात छोटा गट पवारांचा होता. पण ही नऊ पक्षांची मोट पवारच नीट सांभाळू शकतील, हा ज्येष्ठ समाजवादी नेते एस. एम. जोशी यांचा कौल निर्णायक ठरला व शरद पवार पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले. हे धाडस करताना पवारांनी काँग्रेसच्या हायकमांडची पर्वा केली नाही. किंबहुना इंदिरा गांधी यांचा रोष पत्करून पवारांनी हे धाडस केले होते. यातील सर्वात लक्षणीय मुद्दा होता, पवारांच्या तरुण वयाचा! अवघ्या अडतीस वर्षीय पवारांच्या नेतृत्वाखाली उत्तमराव पाटील, हशू आडवाणी, सदानंद तथा अनु वर्दे असे दिग्गज काम करण्यास राजी झाले!
पवारांचे हे सरकार पुरोगामी लोकशाही दल तथा ‘पुलोद’ म्हणून ओळखले गेले. तोवर महाराष्ट्राने कधीही आघाडी सरकारचा प्रयोग अनुभवला नव्हता. आजच्या घडीला अपरिहार्य बनलेल्या आघाडी सरकारच्या प्रयोगाची कोनशिला पवारांनी कितीतरी अगोदर रचली होती. याच सरकारमध्ये एन.डी. पाटील, गणपतराव देशमुख यांच्यासारखे दिग्गज नेतेही सहभागी होते. त्याचवेळी मोरारजी देसाई यांच्या नेतृत्वाखालील जनता पार्टी आणि त्यात विलीन झालेल्या जनसंघीयांचे अप्रत्यक्ष आघाडी सरकार मात्र एकात्म भाव टिकवून ठेवण्यात केंद्रात अपयशी ठरत होते. बेदिलीने केंद्रातील सरकारला पुरते ग्रासले. दुहेरी सदस्यत्वाच्या मुद्द्यावरून लक्ष्य केले गेलेले मूळचे जनसंघीय पुरते बिथरले. व्हायचा तो परिणाम झालाच. १९८० साली देश पुन्हा सार्वत्रिक निवडणुकीला सामोरा गेला. इंदिरा गांधी पुन्हा सत्तेत आल्या. जनता पार्टी नामक बिगर काँग्रेसी सरकारचा जयप्रकाश नारायणप्रणीत प्रयोग धुळीला मिळाला. निर्विवाद बहुमताच्या आधारे पुन्हा केंद्रात सत्तेत आलेल्या इंदिरा गांधी यांनी पवारांवरील रोष कृतीतून व्यक्त केला. वास्तविक, पवारांचे ‘पुलोद’ सरकार नीट चालले होते. पवारांनी सभागृहात बहुमत सिद्ध केल्यानंतरही इंदिरा गांधींनी हे सरकार बरखास्त करून टाकले. ‘पुलोद’च्या निमित्ताने महाराष्ट्राने जसा आघाडी सरकारचा प्रयोग पहिल्यांदा पाहिला, तसाच सरकार बरखास्तीचा प्रयोगही प्रथमच पाहिला!
१९८० ते १९८६ हा काळ देशात राष्ट्रीय पातळीवर घुसळणीचा व म्हटले तर उलथापालथीचा काळ ठरला. याच काळात शरद पवार यांनी महाराष्ट्राची वेस ओलांडली. पुलोद सरकारच्या बरखास्तीनंतर पवारांनी राष्ट्रीय राजकारणात पाऊल टाकले. ते आपले राजकीय गुरु यशवंतराव चव्हाण यांच्या पावलावर पाऊल ठेवून वाटचाल करू पाहत होते, जणू! 
पवार राष्ट्रीय राजकारणात उतरले तेव्हा राज्यातील स्थिती वेगाने बदलत होती. शेतकरी संघटना बांधणाऱ्या शरद जोशींचे प्रस्थ वाढले होते. 
कामगार नेते दत्ता सामंत जोरात होते. अर्थात, या काळात पवारांची राष्ट्रीय नेत्यांसोबत ऊठबस सुरू झाली होती. अल्पावधीतच पवार अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण आडवाणी, जॉर्ज फर्नांडिस, शेख अब्दुल्ला, चंद्रशेखर, बिजू पटनायक अशा बड्या नेत्यांच्या परिघात दाखल झाले होते. शिवाय महाराष्ट्रात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून भाजपाच्या ज्येष्ठ नेत्यांपर्यंत अनेकांशी त्यांचे आश्चर्य वाटण्याजोगे सख्य होते. पुढे पवारांचे राजकारण अधिकाधिक व्यापक होत गेले. प्रसंगी ते राज्याच्या राजकारणात परत आलेही; पण १९९०च्या दशकापासून त्यांना केंद्रातील राजकारणाचा महारंगमंच कायमच खुणावत राहिला. त्यांचा वकूब लक्षात घेता त्यांनाही विशाल व्यासपीठ मिळणेच गरजेचे होते. उद्योगपतींमध्ये टाटा - बिर्लांपासून किर्लोस्कर - बजाज यांच्यापर्यंत, साहित्यिकांमध्ये कुसुमाग्रजांपासून महानोरांपर्यंत, खेळाडूंमध्ये सुनील गावस्कर, अजित वाडेकरपासून दिलीप वेंगसरकर - सचिन तेंडुलकरपर्यंत सर्वांनाच पवारांचे नेतृत्व आणि मैत्रही स्वीकारार्ह वाटत राहिले, हा त्यांच्या सर्वसमावेशक नेतृत्वपैलूचा विजय होता. आधी बीसीसीआय आणि नंतर आयसीसीच्या व्यवस्थापनाच्या निमित्ताने पवारांचे क्षितिज आंतरराष्ट्रीय पातळीवर विस्तारले. हे काही आपसूक वा सहजासहजी घडले नव्हते. पवारांची मुत्सद्देगिरी व धोरणी स्वभाव त्यास बऱ्यापैकी कारणीभूत होता. 
- कदाचित हे क्षितिज इतके अफाट विस्तारल्यानेच त्यांचे मन आताशा महाराष्ट्राच्या राजकारणात रमत नसावे. महाराष्ट्राचेही दुर्दैव असे, की या अचाट क्षमतेच्या आणि अफाट उंचीच्या नेत्याला सतत याच राज्यात निर्माण झालेल्या अथवा केल्या गेलेल्या प्रवादांना सामोरे जावे लागले. त्यात विरोधकांइतकाच त्यांच्या स्वपक्षीयांचाही वाटा मोठा राहिला. पवारांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह लावण्यात जेवढा वाटा भाजपा नेते स्व. गोपीनाथ मुंडे यांचा होता, तेवढाच काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते स्व. बॅ. विठ्ठलराव गाडगीळ यांचाही होता. अण्णा हजारे, गो. रा. खैरनार यांच्यासारखी मंडळी अप्रत्यक्ष राजकारणात उतरल्यावर १९९०च्या दशकात त्यात कमालीची भर पडली. अर्थात, वसई - विरार पट्ट्यातील अनिर्बंध माफिया आणि निसर्गाचा घास घेणाऱ्या बिल्डर लॉबीला पवारांचा आशीर्वाद असल्याचे चित्र निर्माण करण्यात सुधाकरराव नाईक यांच्यासारख्या तत्कालीन काँग्रेस मुख्यमंत्र्यांचा पुढाकार राहिला. एकाएकी सुजाण-सुसंस्कृत पवार हे खलनायक झाल्याचे चित्र रंगविले गेले. पवारांच्या विमानातून वादग्रस्त कुख्यात शर्मा बंधूंनी केलेला प्रवास, सुरेश कलमाडी यांच्याशी पवारांचे असलेले सख्य आदि बाबींमधून निर्माण झालेल्या प्रवादांमधून त्यात भर पडली. या प्रवादाचे वेळीच निराकारण करण्यात पवार कमी पडले. खैरनार देणार असलेल्या ट्रकभर पुराव्यांपैकी एक चिठोराही महाराष्ट्राच्या जनतेच्या दृष्टीला पडला नाही. पण त्यावेळच्या बेछूट आरोपांनी पवारांना १९९५च्या निवडणुकीत महाराष्ट्रातील सत्ता गमवावी लागली. इतके होऊनही वाजपेयींसारख्या ज्येष्ठ नेत्यांचा पवारांवरील विश्वास ढळला नाही. म्हणूनच भाजपाप्रणीत रालोआची केंद्रात सत्ता आल्यावर वाजपेयींनी आवर्जून आपत्कालीन व्यवस्थापनाच्या सुकाणू समितीची जबाबदारी विरोधी पक्षातील पवारांवर सोपविली. पवार आणि प्रवाद याविषयी माझे एक निरीक्षण आजमितीस नोंदविणे गरजेचे आहे. पवारांवरील एकही आरोप वा प्रवाद सत्याच्या स्वरूपात सिद्ध होऊ शकला नाही. तरीही त्याची किंमत इतक्या मोठ्या नेत्याला या ना त्या स्वरूपात मोजावी लागलीच. पूर्वार्धात अनुकूल आणि उत्तरार्धात प्रतिकूल परिस्थिती अशी पवारांची वाटचाल राहिली. हर्ष-खेद बाजूला ठेवून हा नेता आजतागायत अजिंक्य योद्ध्यासारखा खंबीरपणे उभा आहे. स्वाभिमानाच्या मुद्द्यावर एकदा नव्हे दोनदा कॉँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतरही हा नेता कधी अडगळीत पडला नाही. सत्तेत असताना व्यक्ती नव्हे तर ‘सकल’ विद्यांचा आधारू’ अशा प्रकारची संस्था बनून राहिला. आम्हा पत्रकारांची टीका सहिष्णुवृत्तीने स्वीकारत राहिला. टीका केली म्हणून त्यांनी कधी कोणावर डूख धरला नाही. विरोधकांचा कायम यथोचित सन्मान करण्याचा मोठेपणा पवारांनी त्यांच्या या प्रदीर्घ कारकिर्दीत सातत्याने दाखविला. राज्यात वा केंद्रात सत्ता राबविताना अनुभवी शहाणपणाचा, तर संस्थांना बळकटी देण्याच्या बाबतीत द्रष्टेपणाचा आणि क्रीडा क्षेत्रात असाधारण संघटना कौशल्याचा परिचय दिला.
संसदीय व्यवस्थेतील चारही सार्वभौम सभागृहांचे प्रतिनिधित्व करणारा हा नेता सर्वार्थाने विरळा. लोकसभा, राज्यसभा, विधानसभा आणि विधान परिषद या चारही सदनांचे प्रतिनिधित्व त्यांनी केले. केंद्रात अनेकदा मंत्री, महाराष्ट्रात १० वर्षे मंत्रिपद आणि नंतर तीनवेळा मुख्यमंत्रिपद भूषवूनही ते राजकारणातील शापित गंधर्व राहावेत, हे महाराष्ट्राचे दुर्दैव!
 
दिलखुलास
सार्वजनिक आयुष्यात वावरताना पवारांनी कधी शिष्टाचाराचा भंग केला नाही. स्थल - कालाचे भान ठेवत गांभीर्य आणि आब ठेवणारे पवार खासगीत मात्र भलते दिलखुलास वागतात. काव्य-शास्त्र-विनोदात मन:पूत रमणारे पवार मी स्वत: अनेकदा पाहिलेत. नाक किंचित उडवत दिलखुलास हसण्याची त्यांची अदा खरोखरच लोभस या वर्गवारीतली. गप्पांचा फड जमला की घड्याळाचे काटेही पवारांना थांबा सांगण्याचे साहस करीत नाहीत.
 
स्वाभिमान-अपमान
स्वाभिमानाच्या मुद्द्यावर पवारांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली. दुराग्रह सोडून १९८६ साली ते स्वगृही परतले ते औरंगाबादेतील राजीव गांधींच्या जाहीर सभेत, पण त्या सभेत राजीव गांधी यांनी पवारांचे नावही घेतले नाही. काँग्रेस प्रवेशाच्या बरोबरीने त्यांच्यात जणू जमदग्नीच अवतरले होते. व्यासपीठाच्या पायऱ्या उतरताना फेटा फेकून देण्याची त्यांची कृती मी विसरूच शकत नाही! कालांतराने याच डिवचल्या गेलेल्या स्वाभिमानातून पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केलीच की!
 
प्रदीर्घ काळ सत्ता
शरद पवार एकंदर चारदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले, १९७८-८० दरम्यान ५८० दिवस, १९८८ ते १९९० आणि १९९० ते १९९१ दरम्यान १०९४ दिवस, १९९३ ते १९९५ दरम्यान ७३९ दिवस. एकंदर २४१३ दिवस ते मुख्यमंत्रिपदी होते.