- सलमान खुर्शीद
(ज्येष्ठ काँग्रेस नेते)
नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले तेव्हा सात वर्षांपूवी देशात मोठाच बदल झाला. राजकारणाने अपरिवर्तनीय भासावे असे एक वळण घेतले. काळ पुढे सरकला तसे सत्ताधारी पक्षाने जणू पक्केपणाने अधोरिखित केले की, मोदी दीर्घकाळ सत्तेवर असतील आणि त्यांनी केलेले बदल कायमस्वरूपी राहतील. खूप मोठा धोका पत्करून मोदींनी आर्थिक निर्णय घेतले आणि सातत्याने पक्षपाती, द्वेषाधारित राजकारण केले तरीही ‘आपण विरुद्ध ते’ असे एक जिंकून देणारे सूत्र त्यांच्या हाती गवसले, हे नक्की! या आधीच्या राज्यकर्त्यांसाठी आत्मघातकी ठरलेल्या अनेक चुका मोदी सरकारच्या अंगावरून अगदी सहज ओघळून गेल्या.
मोदींनी २०१९ मध्ये आणखी एक सार्वत्रिक निवडणूक जिंकली आणि हळूहळू निवडणूक जिंकून किंवा अन्य मार्गाने काही राज्यांत सरकारेही आणली; परंतु कोरोनाच्या साथीने मात्र त्यांना चांगलाच दणका दिला. मोदींनी उभारलेल्या राजकीय आणि धार्मिक भिंती या विषाणूने उधळून लावल्या. आता कोरोनाचे हे संकट जेव्हा केव्हा जाईल तेव्हा जग कसे दिसेल आणि या काळात ज्यांच्या हाती कारभार होता त्यांची काय संभावना होईल हे येणारा काळच ठरवील.
शेवटी हे भयप्रद राजकारण कुठे ना कुठे जाऊन थांबेलच; पण काळजीपूर्वक किंवा लटपटी-खटपटी करून आंतरराष्ट्रीय पातळीवर निर्माण केली गेलेली ‘अपराजित’ प्रतिमा आणि जीव ओतून केलेले देशातले राजकारण यातला विरोधाभास पाहणे गमतीचे असेल. मोठ्या संख्येने मिळालेले कडवे पाठीराखे आणि आधीच्या सरकारच्या अपयशाच्या कहाण्या रंगवून सांगणे या भांडवलावर मोदी यांनी ‘मुख्य कार्यकारी अधिकारी’ म्हणून कारकीर्द सुरू केली. जनमानसात स्वत:विषयी अनुकूल ग्रह पेरण्याची कला प्रसन्न करवून घेतली गेली. विरोधी पक्ष या काळात रानोमाळ झाले नसते तरच नवल होते. राजा कधीच चुकत नसतो हे जणू वास्तवात उतरले होते. संस्थात्मक उत्तरदायित्व अर्थातच खुंटीवर टांगण्यात आले.
आंतरराष्ट्रीय व्यवहाराच्या बाबतीत मोदी यांना पंडित नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, अटलबिहारी बाजपेयी, मनमोहनसिंग यांच्या पावलावर पाऊल टाकावे लागणारच होते. बराक ओबामा, शी जिनपिंग, डेव्हिड कॅमेरॉन अशा रथी-महारथींच्या गर्दीत मोदी यांच्याकडे आधीच्या नेत्यांपेक्षा वेगळे पाहिले जाईल अशी शक्यता कमी होती; पण उभरती बाजारपेठ असलेली अण्वस्त्र सज्ज सत्ता, आधीच्या नेत्यांनी दिलेले योगदान या शिदोरीवर मोदींनी चांगली सुरुवात केली. परराष्ट्र व्यवहारात कधी नव्हे इतकीऊर्जा ओतण्यात आली. अत्यंत ध्यासपूर्वक त्यांनी चित्र बदलायला घेतले. परदेशात तिथल्या भारतीयांचे मोठमोठे मेळावे भरविण्यात आले. चीन जपानही त्यात आणले गेले. त्यात जल्लोष दाखविला गेला. एरवी अंगचोरणाऱ्या यजमान नेत्यांनी या नेत्याच्या देहबोलीला प्रतिसाद म्हणून आलिंगने दिली. एक तर त्यांनी पश्चिमी देशातल्या उत्पादकांसमोर भारताला काय काय हवे याची यादी ठेवली होती आणि ज्या रीतीने त्यांनी फ्रेंचांचे राफेल विमान खरेदी केले त्यातून ‘तेच कर्ते आहेत’ हे दिसले होते. मोदींचे नशीब असे की त्यांच्या काळात अमेरिकेतही त्यांच्यापेक्षा अतिरेकी असे ट्रम्प महोदय अध्यक्ष झाले. ‘अमेरिका प्रथम’ ही त्यांची इच्छा. त्यांचे मोदींशी सख्य जमले; पण बौद्धिक स्वामित्व हक्क किंवा व्हिसाच्या बाबतीत भारताच्या पदरात फार काही पडले नाही. तरी तिथल्या भारतीय अमेरिकन नागरिकांच्या मेळाव्यात ट्रम्प यांचा हात हाती धरून उंचावून ‘अब की बार ट्रम्प सरकार’ अशी घोषणा मोदींनी केलीच.
अमेरिकन मतदारांच्या मनात वेगळेच होते ही गोष्ट अलाहिदा. आंतरराष्ट्रीय क्षितिजावर नाव कोरण्यासाठी मोदी यांनी पाकिस्तानच्या बाबतीत वेगळ्याच शक्यता अजमावल्या. निवडणुकीच्या वेळी ‘खूनखराबा चालू असताना पाकिस्तानशी बोलणी नाही’ असा सूर त्यांनी आळवला होता, पण मोदी अगदी अचानकच नवाज शरीफ यांना भेटायला गेले. पुढे पुलवामा हल्ल्यामुळे भाजपच्या पारड्यात मते कदाचित पडलीही असतील; पण शांततेचे नोबेल मिळविण्याची मोदींची मनीषा मात्र उधळली गेली.
पुढे काही काळ काहीच झाले नाही, मग पाकिस्तानच्या लष्कर प्रमुखांनी म्हटले ‘चला, झाले गेले विसरून जाऊ’.. लगेच ‘भला पोलीस, बुरा शिपाई’ खेळ सुरू! परत पंतप्रधान इम्रान खान यांनी शब्द फिरविला, ते वेगळेच! चीन हे काही हाताळायला स्वस्तातले गिऱ्हाईक नक्कीच नाही; पण मोदी यांनी तसे भासविले किंवा त्यांना खरेच तसे वाटले असेल. चीनच्या मनातले ओळखायला ते कमी पडले आणि गलवान प्रकरण घडले.
खाचाखोचा, बारकावे नीटसे कळत नसल्याने या सरकारने आंतरराष्ट्रीय संबंधातल्या अनेक संधी तर गमावल्याच, पण लगतचे शेजारी असलेला बांगलादेश आणि श्रीलंका यांच्या बाबतीतही फार काही कमावले नाही. मानवी हक्कांच्या नावाने आपले देशांतर्गत विरोधक कितीही त्रास देवोत, आम्ही जगाची फार्मसी आहोत आणि विश्वगुरू तर आपण होणारच, हे मोदी यांनी जगाला जवळपास पटवत आणले होते... पण कसले काय अन् फाटक्यात पाय!! कोविड साथ हाताळणीच्या दुर्दशेने मोदी सरकारचे पितळ पार उघडे पडले. नवे चकचकीत विमान धावपट्टीवर उभे आहे; पण मोदी यांना कुठेच जायचे नाहीये. दरम्यान, परराष्ट्र मंत्रालयात मात्र भारतातल्या स्थितीगतीबद्दल विदेशी पत्रकार-संपादकांना उत्तरे देत बसण्याची, बाजू सावरून घेण्यासाठी आटापिटा करण्याची धामधूम सुरू आहे...
आकाशात उंच भरारी मारायची स्वप्ने पाहण्यात मश्गूल असलेल्या भारतीय नेतृत्वावर सध्या शहामृगासारखे वाळूत तोंड खुपसून बसण्याची वेळ आली आहे.