- सचिन जवळकोटे
जनावरांच्या कोंडवाड्यात कोंबलेली मुकी बिचारी जशी असाहाय्य अवस्थेत निपचित पडलेली असतात, अगदी तश्शीssच शेकडो माणसं हॉलमध्ये अस्ताव्यस्त होऊन पसरलेली. सकाळचे अकरा वाजलेले. तरीही अनेकजण मास्कनं झाकलेल्या तोंडावर अजून एक मफलर टाकून झोपलेले. वीस-पंचवीस दिवसातली वाढलेली दाढी. दिशाहीन नजरा. एखादा स्मार्ट मोबाइलवर गावाकडील ‘ब्रेकिंग न्यूज’च्या शोधात, तर दुसरा साध्या मोबाइलवरून घरच्यांशी संवाद साधण्याच्या प्रयत्नात.कोपर्यातल्या अंधारात एकजण गुडघ्यात डोकं खुपसून जणू जगापासून अलिप्त झाल्याच्या आविर्भावात बसलेला. पलीकडं मोबाइलवर लावलेल्या तामिळी गाण्याच्या आवाजाला भेदत एकजण हिंदीतून शेजारच्या मित्राशी काहीतरी बोलतोय. त्याच्या तिरक्या नजरेत दाक्षिणात्य लोकांबद्दलचा राग स्पष्ट दिसतोय. त्यांच्याकडं पार दुर्लक्ष करत केरळचा एक तरुण मोबाइल कानाला लावून मल्याळममध्ये घरच्यांशी बोलतोय!सगळीकडे एक विचित्र शांतता आणि तिच्या पोटातला किरटा कलकलाट..कोण ही सारी मंडळी? हरयाणवी ड्रायव्हरच्या मांडीला मांडी लावून जेवायला बसणारा कर्नाटकी सेल्समन त्याचे टोमणे का सहन करतोय? आयुष्यभर रसगुल्ल्याची सवय असलेला बंगाली कारागीर सोलापूरची कडक भाकरी का मोडून खातोय? दिवसाला तीन-चारशे रुपये कमविणार्या मजुरांपासून महिन्याकाठी तीस-चाळीस हजार रुपये खात्यात पडणार्या मुकादमांपर्यंत सारेच कसे काय एका रांगेत आणून बसवलेले?.या सार्या प्रश्नांची उत्तरं इथल्या सोलापुरातल्या या हॉलबाहेरच्या बोर्डावर एकाच वाक्यात लिहून ठेवली आहेत : ‘विस्थापित कामगारांसाठी निवारा केंद्र’. मुळात गेल्या पंचवीस दिवसांपासून या ठिकाणी राहणार्या एकाही माणसाला हा मराठी बोर्ड वाचता आलेला नाही. कोरोनाने अख्ख्या जगात काय हाहाकार माजवलाय याची कल्पना यातल्या किती जणांना असेल, कुणास ठाऊक; पण हाताचं काम गेलं आणि अन् घरदारही हरवलं, ही ‘आपबिती’ घेऊन रोज रडत बसणार्या या बेघरांची कहाणी हेच सोलापुरातल्या या स्थलांतरीत छावणीचं सध्याचं वर्तमान आहे!
तेवीस मार्चपासून देशात मोठय़ा लॉकडाउनची घोषणा होताच मोठय़ा शहरातली घरं धडाधडा बंद झाली. फ्लॅटमधली माणसं टीव्ही ऑन करून आतूनच कुलूपबंद झाली, मात्र हातावर पोट असणारी मंडळी भरल्या ताटावरून उठली. एका क्षणात उद्ध्वस्त झाली. इंडस्ट्रीचं गेट ओढलं गेलं. फॅक्टरीचे भोंगे वाजायचे थांबले. जे हुशार कामगार होते, ते तत्काळ मिळेल त्या वाहनानं आपापल्या गावाकडं सुसाट निघाले. मात्र आठ-दहा दिवसांत सारं सुरळीत होईल, ही भोळी-भाबडी अपेक्षा मनी धरून शहरातच राहणार्यांना आजूबाजूचा परिसरही नीट जगू देईना. कोरोना विषाणू किती वाईट असतो, हे त्यांना माहीत नव्हतं. मात्र आपलं ‘परकेपण’ आजूबाजूच्या स्थानिकांसाठी खूप भीतीदायक ठरतंय, ही विचित्र भावना या बाहेरून आलेल्या मंडळींपर्यंत इतक्या तीव्रतेनं कदाचित प्रथमच पोहोचलेली. त्यात पुन्हा बंद बाजारपेठेमुळे रोजच्या रोजी-रोटीचे प्रश्न अधिकच भीषण बनलेघरात उपाशीपोटी भुकेची आग, तर बाहेर खाकी काठीच्या वेदनेची तडफड. यापेक्षा काहीही करून आपापल्या गावी गेलेलंच बेहत्तर, हे या सार्यांच्या लक्षात आलं. अन् वारुळातून मुंग्या बाहेर याव्यात, तशी ही सारी माणसं पंचवीस-सव्वीस तारखेपासून रस्त्यावर उतरली. सगळ्यांना दूरवरची आपापली गावं गाठायची होती, मात्र तोपर्यंत वेळ निघून गेली होती. सारी वाहनं ठप्प झालेली. मग कुणी स्वत:च्या दुचाकीवर अख्खी फॅमिली घेऊन दीड-दोन हजार किलोमीटरचा पल्ला गाठण्याची वेडी धडपड करू लागला, तर कुणी रोज चालत शेकडो मैलाचं अंतर पार करण्याच्या अचाट प्रयोगात गतप्राण होऊन गेला, मात्र रस्त्यात लागणार्या गावांमध्ये या लोकांना प्रचंड विरोध होऊ लागला, हल्लेही सुरू झाले.दरम्यान, कोरोनाच्या संकटाशी सामना करण्यात व्यस्त असलेल्या सरकारला लॉकडाउनमुळे निर्माण झालेल्या या नव्या समस्येची जाणीव झाली. सरकारनं तत्काळ प्रमुख गावांमध्ये या स्थलांतरित समूहासाठी निवारा केंद्र उभारण्याचे आदेश काढले. यानुसार सोलापुरात कैक ठिकाणी या लोकांची व्यवस्था केली गेली आहे. दक्षिण अन् उत्तर भारताला जोडणारे बहुतांश प्रमुख रस्ते सोलापुरातूनच जातात. त्यामुळं इथं अडकलेल्या झालेल्या स्थलांतरित मजुरांची संख्याही अधिक.अशाच एका केंद्रावरची ही कहाणी. सरकारी भाषेत हे केंद्र असलं तरी खर्या अर्थानं ही निर्वासितांचीच छावणी; कारण हे स्थलांतरित कामगार आजपावेतो दोनवेळा निर्वासित झालेले. एकदा गावाकडं काम मिळेना म्हणून मोठय़ा शहरात येऊन कसंबसं जगू लागले तेव्हा, आणि आता ‘लॉकडाउन’मुळं शहरातून उद्ध्वस्त होऊन पुन्हा घराकडे निघाले तेव्हा! यातही सर्वात दुर्दैवी गोष्ट म्हणजे, यातल्या बहुतांश मंडळींना आता त्यांचं गावही स्वीकारायला तयार नाही. गावाची आणि त्यांच्या स्वत:च्या घरांची दारंही संसर्गाच्या भीतीने त्यांच्यासाठी बंद झाली आहेत. सारे रस्ते बंद करून गावानं यांच्यासाठी ‘नो एन्ट्री’ची हाळी दिली आहे. म्हणजे शहराने बाहेर हाकललं, आणि गावांनी दारं बंद करून घेतली! छावणीत शिरलो तेव्हा सर्वप्रथम भेटले या छावणीची जबाबदारी पाहणारे रामचंद्र पेंटर. ते महापालिकेचे अभियंता. आयुष्यभर यांचा संबंध बांधकाम विभागाशी आलेला; मात्र आता उन्मळून पडलेली अन् उद्ध्वस्त झालेली माणसं पुन्हा जोडण्याची अन् बांधण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. ते सांगत होते, ‘देशातील सतरा राज्यांमधून आलेली माणसं इथं वेगवेगळ्या केंद्रात ठेवलीत. रोज चहा, नाष्टा अन् दोनवेळचं जेवण व्यवस्थित दिलं जातं. प्रत्येकाला केवळ मास्कच नव्हे, तर नवीन कपडेही दिलेत. टूथ-ब्रश, पेस्टपासून साबणापर्यंत सार्याच गोष्टी यांना मिळाल्यात.’शासनानं यांच्यासाठी काय-काय सुविधा दिल्यात याची भलीमोठी लिस्ट कानावर पडत होती. मात्र याचं समाधान इथल्या कुणाच्याच चेहर्यावर दिसेना! चीड, द्वेष अन् नैराश्येची वेगवेगळी रुपं अनेकांच्या नजरेत उमटत होती. हातातल्या मोबाइलशी अस्वस्थ चाळे करणार्या करम हुसेनला बोलतं केलं, ‘मै यूपी के संत कबीरनगर का. बिजापूर में ड्रायव्हिंग का काम करता हूँ. अठ्ठाईस तारीख को हम एक ट्रक में बैठकर गांव निकले थे. लेकीन शोलापूरमेही हमें उतार दिया’- हे सांगताना तो सार्यांकडंच उद्वेगानं बघत होता. त्याच्यासोबत त्याच्या एरियातले सात-आठजण. उत्तर प्रदेशात ड्रायव्हिंगसाठी महिनाकाठी केवळ बारा-पंधरा हजार रुपये मिळतात. कर्नाटकात पंचवीस-तीस हजार सहज भेटतात, म्हणून घरदार अन् गाव सोडून आलेल्या महंमद अनसचीही हीच अवस्था.बोलता-बोलता यांच्या घरच्यांची हळुवार चौकशी केली. तसे ते खुलून सांगू लागले. उत्तर भारताच्या ग्रामीण भागात पोरगं वयात येऊ लागलं की त्याच्या बालमनावर ठसवलं जातं, ‘बंबई-पुना जाना, बहोत पैसा कमाना. बुढ्ढा-बुढ्ढी गांव मे रहेंगे, बस्सùù वहाँसे पैसे भेजते जाना’. गेल्या काही दशकांत देशातल्या अनेक राज्यांतील लोकांचा रोख या दोन शहरांवरच अधिक होता; मात्र कालांतरानं हा लोंढा सोयीप्रमाणं बाकीच्या शहरांमध्येही पसरत गेला. प्रामाणिकपणे कष्टाची कामं करण्यासाठी महाराष्ट्रात खूप मोठी संधी, हे या लोकांचं प्रांजळ मत.मात्र पैसे कमविण्याच्या नादात घरदार गमविण्याची वेळ जेव्हा ‘लॉकडाउन’मुळं आली, तशी ही मंडळी खाडकन् जागी झाली. तामिळनाडूच्या वेल्लूपुरम भागातली शंभर-दीडशे तरुण पोरं बारामती, पुणे अन् नाशिक पट्टय़ात ऑनलाइन मार्केटिंगमध्ये काम करून पोटं भरणारी. ज्याच्या त्याच्या ‘टारगेट अँचिव्ह’प्रमाणे ‘इन्कम रेशो’ ठरलेला. त्यामुळं ‘स्कील’ला इथं बराच वाव. महिन्याकाठी वीस-बावीस हजार कमविणारी ही पोरं पंचविशीच्या आतलीच.‘आता इथं राहून रोज काय करताय. मोबाइलवरून घरच्यांशी व्हिडीओ कॉलिंग करत असालच ना ?’ या प्रश्नावर बहुतांश जणांनी नकारार्थी मान हलविली; का? - तर यांच्याकडे स्मार्ट फोन असला तरी तिकडं घरी आई-वडिलांकडे थोडाच? नंतरच्या एका प्रश्नावर ते तामिळी भाषेत काय पुटपुटले हे समजलं नाही; मात्र ज्याला तोडकं-मोडकं हिंदी अन् इंग्लिश येतं, असा त्यांच्यातला एकजण पुढं सरसावला. नाव त्याचं प्रदीप पांडियन. या मुलांसाठी तो महाराष्ट्रात दुभाषी म्हणून काम करतो. तो सांगत होता,‘हमारे कई बच्चोंने पैसा कमाया, लेकीन अब सब डर गये है. जान से जादा कुछ भी नही है. यहाँ का काम छोडके सब अपने गाँव लॉँग लाईफ जा रहे हैं. अब वापस कभी नही लौटेंगे. दे विल गो बॅक.’यातल्या बर्याचजणांची अजून लग्नं व्हायची आहेत. त्यांच्या टापूत कमाईची साधनं नव्हती. चांगला संसार थाटण्यासाठी थोडाफार तरी पैसा गाठीशी हवा होता; मात्र म्हातार्या आई-वडिलांच्या काळजीपुढं आता या सार्या गोष्टी त्यांच्यासाठी गौण होत्या. किरकोळ ठरल्या होत्या.टीव्हीवर रोज वेगवेगळ्या ब्रेकिंग न्यूज. मोबाइलवरही अफवांचा पाऊस. अशावेळी आपल्या पोटचं लेकरू कुठल्यातरी अनोळखी प्रदेशात एकटंच अडकून पडलंय, या जाणिवेनं मध्य प्रदेशातल्या प्रिन्स सिंगची आई आजारी पडली आहे. तिला हार्ट अँटॅक आला असावा, असं प्रिन्सला वाटतंय. सिंगरोली गावचा प्रिन्स स्वत:ची माहिती सांगत असतानाच त्याचा मोबाइल वाजला. त्याच्या वडिलांचा फोन होता. त्यानं मुद्दाम स्पीकर ऑन केला. तिकडचं दु:ख इथल्या प्रशासनाला समजावं अन् त्याला गावाकडं जाण्याची परवानगी मिळावी, हा हेतू असावा कदाचित. तिकडून वडील सांगत होते,, ‘बेटाùù कहाँ हो अभी ? तेरी मम्मी रो रो के पागल हो गयी है । उसकी तबियत बहुत खराब है, जल्दी आ जानाùù.’मागून हळूच आवाज आला, ‘हा रोज दोन-तीन वेळा तरी आम्हाला हे ऐकवतो, मात्र त्याला कोण सांगणार की इथून बाहेर पडणंही आता किती अवघड ?’ मोबाइल बंद झाल्यानंतर प्रिन्सला इथल्या अधिकार्यांनी समजावण्याचा प्रयत्न केला; मात्र त्याची भाषा एकदम आक्रमक, अत्यंत धक्कादायक, ‘देखो साबùù दो दिन में नही छोडेंगे तो मैं यहाँ से सीधा भाग जाऊंगाùù, यहाँ से सीधा एमपी चलते जाऊंगा !’त्याची बंडखोर देहबोली पाहून आजूबाजूचे केविलवाणे चेहरे क्षणभर चमकले. काहीजणांचे डोळेही लकाकले. अनेकांना वाटलं, आता त्याच्यासोबत आपल्यालाही मिळणार इथून स्वातंत्र्य. ही सारी स्थलांतरित मंडळी इथं स्वत:ला तुरुंगातले कैदीच समजतात. या छावणीत तीन वेळचं जेवण आहे, कपडे आहेत, बाकी सगळ्या सोयी आहेत आणि त्याही विनामूल्य; तरीही त्यांना घाई आहे इथून बाहेर पळण्याची. त्यांना ना कोरोनाशी देणं-घेणं ना लॉकडाउन पाळण्याची चिंता. त्यांना फक्त एवढंच माहिती आहे की आपण केवळ घरच्यांसाठी घरदार सोडून हजारो मैल दूर आलो होतो. आता मरायचीच वेळ आली तर फक्त घरच्यांसोबतच मरणार.
.. बस यहाँ से मुझे छोड दो. जानेss दोss
नाव दिलशाद महंमद. मूळचा मुजफ्फरनगरमधल्या लोई गावचा. तो गेल्या अनेक वर्षांपासून सोलापुरातच गवंड्याचं काम करतो. लॉकडाउन झाल्यानंतरही त्यानं इथंच राहण्याचा निर्णय घेतला, कारण गाठीशी पैसाही होता, मात्र तो ज्या विजापूर वेशीतल्या मोहल्ल्यात राहत होता, तिथल्या लोकांनी त्याला म्हणे तत्काळ रूम सोडायला सांगितली. त्याला धक्का बसला.‘भैर का आदमी आखीरकू भैरकाच होता है !’ हे वाक्य कानावर पडताच त्याचे डोळे भरून आले. मात्र गावाकडं जाण्यासाठी तो मोहल्ल्यातून बाहेर पडला, तोपर्यंत वेळ निघून गेली होती. लॉकडाउन एकदम कडक होऊन गेलं होतं. अखेर इथल्याच ओळखीच्या कार्यकर्त्यानं महसूल अधिकार्यांना सांगून त्याची रवानगी या छावणीत केली.ज्या गावात आपण कैक बंगले बांधले, तिथंच आता खिशात पैसा असूनही निर्वासितांसारखं निराधार छावणीत राहावं लागतंय, हे सांगताना त्याला त्याच्या लेकरा-बाळांचीही खूप आठवण येत होती. ‘वहाँ गाव में मेरी बीवी अकेली है, बेटा बिमार है, दवा लाने के लिये भी कोई नही है, यहाँ से मुझे छोड दो. जानेss दोss- दिलशाद कळवळून सांगत होता. त्याला समजावताना छावणीतल्या चांगल्या सुविधांची यादी वाचून दाखवायला कुणीतरी सुरुवात केली, तसा तो राग अनावर होऊन ओरडला, ‘अच्छा खाना दिया तो क्या हुवा ? खाना तो कुत्ते भी खाते हैं..मुझे मेरे बच्चे के पास जाने दोss प्लीजss
(लेखक ‘लोकमत’च्या सोलापूर आवृत्तीचे निवासी संपादक आहेत)sachin.javalkote@lokmat.com(छायाचित्रे : यशवंत सादूल, सोलापूर)