- सुनील तांबे
महाराष्ट्रातील राजकीय पेचप्रसंगाबाबत प्रसारमाध्यमांनी-वृत्तवाहिन्या, वर्तमानपत्नं आणि सोशल मीडिया यांनी वापरलेली भाषा पाहता, या राज्याला आधुनिक हे विशेषण का लावतात, असा प्रश्न पडतो. ‘स्री देवी असते किंवा दासी, ती माणूस नसते’ ही बाब भारतीय संस्कृतीत आणि मराठी भाषेत घट्ट रुजलेली आहे. राजकीय बातम्या आणि भाष्यं वा विश्लेषणं यांच्या भाषेत स्रीद्वेष्टेपणा बेमालूमपणे एकजीव झालेला असतो.भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांची निवडणूकपूर्व युती होती. मात्न निवडणूक निकालांनंतर त्यांच्यामध्ये बेबनाव झाला. ‘लग्नाच्या वाटाघाटींमध्येच एवढा वाद असेल तर यांचा संसार कसा होणार’, अशी प्रतिक्रि या एका तरु ण राजकीय नेत्याने व्यक्त केली.एका वर्तमानपत्नातील संपादकीयाने टिपण्णी केली -‘उघड काडीमोड घ्यावा आणि हा जोरजबरदस्तीचा संसार संपवावा. ती घटिका आता समोर येऊन ठेपली आहे.’ सरकार स्थापन करण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांना एकत्न येण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. या घडामोडींचा खुलासा करताना एका तरुण पत्नकाराने फेसबुकवर टाकलेल्या पोस्टमध्ये म्हटलं -‘ज्यांच्या घरात पारंपरिक पद्धतीनं लग्नं झालेली आहेत, त्यांना समजेल. दोन कुटुंबं एकत्न येत असतात. मग मानपान, राग लोभ, रुसवे-फुगवे सुरूच असतात. गोंधळ असतो. गडबड असते. धावपळ असते. काही लोकांना कामातून उसंत नसते. काहींना मिरवण्यातून उसंत नसते. चालायचंच. त्यातही एक मजा असतेच.’ विवाह, लग्न, संसार, काडीमोड, घटस्फोट, घटिका, लुगडी, कुटुंब, मानपान, रागलोभ, रुसवे-फुगवे या शब्दांच्या सामाजिक व सांस्कृतिक संदर्भात स्रीच्या माणूसपणाला मान्यता नाही. या संदर्भांना मान्यताच नाही तर प्रतिष्ठा देण्यासाठी राजकीय भाष्यांमध्ये त्यांचा उपयोग केला जातो. गुंतागुंतीच्या राजकीय घडामोडी सोप्या, सुबोध शब्दांत सांगण्यासाठी हे शब्द, शब्दप्रयोग, वाक्प्रचार, म्हणी उपयोगात आणण्याची गरज पत्नकारांना वा भाष्यकारांना वाटते. कौटुंबिक प्रतिमासृष्टीशिवाय सामान्य वाचक वा प्रेक्षकाला राजकारणाचं आकलन होणार नाही, अशी धारणाही त्यामागे आहे.आधुनिक राजकारणाच्या परिभाषेत सरंजामशाही मूल्यांना स्थान नाही. लिंगभावालाही राज्यघटनेत स्थान नाही. लिंग नैसर्गिक असतं, लिंगभाव सामाजिक-राजकीय असतो. स्रीच्या आर्थिक-सामाजिक स्थानानुसार तिचं राजकीय व सांस्कृतिक स्थान ठरतं. स्रीच्या उपेक्षित स्थानाला आडवळणाने मान्यता देणार्या कौटुंबिक प्रतिमासृष्टीचा सढळ वापर राजकारणी व पत्नकारांच्या भाषेत (भाषण, संभाषण वा लिखाण) असतो.या तुलनेत इंग्रजी भाषेतील राजकीय भाष्य वा विश्लेषणात सरंजामशाही मूल्यांना मान्यता देणारी प्रतिमासृष्टी अभावानेच आढळते. साधी बाब आहे, लैंगिक विषयाबद्दल गांभीर्याने चर्चा करताना मराठी वा हिंदी माणसं सर्रासपणे सेक्स हा इंग्रजी शब्द वापतात. याउलट लिंगसंवेदन करणार्या आणि स्रीचा अपमान करणार्या मराठी-हिंदी शिव्यांचा वापर बिनिदक्कतपणे केला जातो. भाषेचं रूप जेवढं अधिक देशी वा ग्रामीण तेवढा लिंगभाव प्रखर असतो. आधुनिक विचार व मूल्यं मराठीसह अन्य भारतीय भाषांमध्ये पुरेशी खोल रुजलेली नाहीत.या उलट इंग्रजी वर्तमानपत्नं वा अन्य माध्यमांमधील चालू घडामोडींचं वार्तांकन वा विश्लेषण पाहिलं तर लिंगभाव, लैंगिक विषमता यासंबंधातील जाण अधिक प्रगल्भ असल्याचं ध्यानी येतं. क्वचितच ‘हॅपी मॅरेज’ वा ‘डिव्होर्स’ हे शब्द वापरले जातात. कारण एखादा विषय सोप्या भाषेत मांडण्यासाठी कौटुंबिक प्रतिमासृष्टी वापरण्याची वा सरंजामशाही मूल्यं जागवण्याची गरज इंग्रजी लेखकाला भासत नाही. आपला वाचक पुरेसा प्रगल्भ आहे, अमेरिकन वा ब्रिटिश वा अन्य नियतकालिकांशी आपल्या वाचकाचा परिचय आहे असं इंग्रजी लेखकाने वा पत्नकाराने गृहीत धरलेलं असतं. राजकारण असो की अर्थकारण वा माध्यमं वा चित्नपट-नाटक-कला-करमणूक कोणत्याही क्षेत्नाचं वृत्तांकन करण्यात महिला आघाडीवर आहेत. चालू घडामोडींवर अनेक महिला अधिकारवाणीने भाष्य करतात. त्यांनीच आधुनिकतेची क्षितिजं रुंदावत इंग्रजी भाषा सेक्युलर आणि समतावादी बनवण्यात पुढाकार घेतला. मराठीमध्ये अशा महिला पत्नकार नहीं के बराबर आहेत. एखाद्या प्रतिमा जोशीचं नाव चटकन डोळ्यासमोर येतं. आधुनिक विचाराची जाण जशी प्रगल्भ होते त्यानुसार भाषेतही बदल करायचे असतात. ‘निग्रो’ हा शब्द अपमानजनक आहे म्हणून त्याची जागा ‘ब्लॅक’ या शब्दाने घेतली. परंतु त्यातून वर्णद्वेष जोपासला जातो म्हणून ‘आफ्रिकन अमेरिकन’ असा शब्द इंग्रजी भाषेत योजला जातो. त्यामुळे ‘इंडियन अमेरिकन’, ‘चायनीज अमेरिकन’ असेही शब्द तिथे स्थिरावले. केवळ शब्दच नाहीत तर त्यासोबत नवे शिष्टाचारही रुजवले जातात. उदाहरणार्थ पत्नव्यवहारातच नाही तर बोली भाषेतही वर्णद्वेष वा वंशद्वेष येणार नाही याची खबरदारी घेतली जाते.भारतीय भाषांमध्ये सफाई कर्मचारी वा सफाई कामगार हा शब्द असाच रु जवण्यात आला. असे अपवादवगळता आधुनिक विचार व मूल्यांची क्षितिजं रुंदावणारे शब्द भारतीय भाषांमध्ये रुजवण्यात आपण फारसे यशस्वी झालेलो नाही. कारण आधुनिक जीवनशैली आपल्या देशातील फारच कमी लोकांच्या वाट्याला आली आहे. ‘सफाई कामगार’ हा शब्द आपण भारतीय भाषांमध्ये रुजवलेला असला तरीही त्यांच्या कामाच्या पद्धतीला आधुनिकतेचा स्पर्शही झालेला नाही. 2017 सालात दर पाचव्या दिवशी एक सफाई कामगार मृत्युमुखी पडत होता. सेप्टिक टँक वा ड्रेनेज साफ करताना. नॅशनल कमिशन फॉर सफाई कर्मचारी या संस्थेने प्रसिद्ध केलेल्या अहवालात ही माहिती आहे. 2018 व 2019 मध्येही या परिस्थितीत फारसा बदल नाही. टू जी, थ्री जी, फोर जी आणि आता फाइव्ह जीदेखील येईल. अत्याधुनिक तंत्नज्ञान सफाई कामगारांच्या वाट्याला आलेलं नाही. आधुनिकतेचा लाभ मिळून भारतीय माणसं र्शीमंत झाली की अधिक परंपरानिष्ठ आणि सरंजामशाही बनतात. त्याचंच प्रतिबिंब आपल्या भाषेत पडतं. मराठी भाषा अभिजात असेलही; पण आधुनिकतेपासून मात्न खूप दूर आहे. suniltambe07@gmail.com (लेखक स्वतंत्र पत्रकार आहेत.)