- दिलीप तिवारी
(मुक्त पत्रकार, जळगाव)
कोरोना महामारीच्या महाभयंकर प्रकोपात संपूर्ण विश्व चिंतीत आहे. कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे विविध विकारांचे रूग्ण कोटीच्या संख्येत वाढत आहेत. श्वसनाचा आजार बळावून मृत्यूची संख्या लाखांच्या संख्येत आहे. यापूर्वी इतर साथरोगांचा पाय रोऊन मुकाबला करणारा जगभरातला मानव कोरोनाचे संकट हाताबाहेर जात असल्यामुळे भांबावून गेला आहे. अशा या आपत्तीत मानवाच्या सुरक्षा व्यवस्थापनासाठी जैन तत्त्वज्ञानातील काही परंपरा व मूल्ये काळाच्या कसोटीवर उपयुक्त ठरली आहेत. जैनांच्या आचरणातील मुखपट्टी आणि चातुर्मासात स्थानकातील निवास या दोन बाबी आज कोरोना नियंत्रणासाठी संपूर्ण जगाला उपयुक्त ठरत असल्याचे लक्षात येते.
जैन धर्मियांच्या आचरणात अहिंसा तत्वाचे पालन करण्यासाठी मुखपट्टी (मुखआच्छादन /मुखवस्त्रिका) वापरले जाते. वातावरणातील सुक्ष्म वा अती सुक्ष्म जीव-जंतूची हत्या श्वसन वा मुखावाटे होऊ नये या हेतूने मुखपट्टीचा उपयोग होतो. कोरोना आपत्तीत विषाणूचा संसर्ग नाक आणि घशातून होऊनये म्हणून आज संपूर्ण जगभरात 'मास्क' चा वापर केला जात आहे. मुखपट्टी आणि मास्क वापरामागील हेतू थोडे फार भिन्न आहेत. जीव-जंतू हत्या होऊ नये यासाठी मुखपट्टी आहे तर विषाणू संसर्ग होऊनये म्हणून मास्क आहेत. पण दोघा वस्त्रांचे कार्य हे श्वसन व मुख मार्ग बचावाचे आहे. जैन धर्मियांनी मुखपट्टीचा वापर कधी सुरू केला असावा या विषयी फारसे संदर्भ समोर येत नाहीत. जैन धर्मियातील श्वेतांबर पंथी वा स्थानकवासी जैन मुखपट्टीचा वापर आवर्जून करतात.
चातुर्मासात याच पंथाचे अनुयायी स्थानकात जाऊन आराधना करतात. प्रसंगी तेथे मुनी, साधू, संत यांच्यासोबत निवास करतात. स्थानकातील निवास हा व्रतस्थ असतो. दैनंदिन जीवन कार्याच्या तुलनेत व्रतस्थ असणे म्हणजे स्वतःला निग्रह व निश्चयाने इतर गोष्टींपासून विलग करणे होय. जैन धर्मिय 'जीन' ला मानतात. जीन म्हणजे स्वतःवर विजय मिळवणारा. राग, द्वेष, मोह, माया या पासून विरक्त होणारा. विलग होणारा. कोरोना महामारीतही विषाणूचा संसर्ग झालेल्या रूग्णाचे निग्रहाने विलगीकरण करावे लागते आहे. त्याचा स्वतंत्र रहिवास हा सुद्धा व्रतस्थ आहे. आराधना, योग साधना, श्वसनाचे व्यायाम अशा गोष्टी अंगिकारून निग्रह व निश्चयाने विषाणू संसर्गावर मात करता येत आहे. कोरोना विषाणू पासून मुक्तीसाठी रुग्णाचे काही दिवसांसाठी एखाद्या केंद्रात विलग होणे हा भाग जैन आचरणात काही काळ स्थानकवासी वा व्रतस्थ असण्याच्या परंपरेचा मानता येईल.
मुखपट्टी आणि मास्क किंवा स्थानकात व्रतस्त असणे आणि संसर्गामुळे विलग होणे यात तुलना करणे योग्य नसेल सुद्धा. त्यात साम्य शोधणे हे उचितही नसेल. पण मानवाच्या आचरणात जीव-जंतुंच्या बचावासाठी मुखपट्टी हे साधन आहे. काही विकारांपासून दूर राहण्यासाठी व्रतस्थ असणे हे आचरण आहे. या दोन मूळ संकल्पना आज कोरोना पासून बचावासाठी प्रत्येकाला स्वीकाराव्या लागत आहेत. आचरणाचे हे पारंपरि जैन तत्त्वज्ञान आज काळाच्या कसोटीवर थोड्या वेगळ्यया रचनेत व संकल्पनेत मास्कचा वापर आणि विलगीकरणाच्या रूपात अनुभवाला येते आहे.
जैन धर्मियांनी मुखपट्टीचा वापर का आणि कशासाठी सुरू केला असेल? याची कारणे शोधण्याचा प्रयत्न अभ्यासकांनी केला आहे. त्याविषयी लिखित, चित्रित वा शिलालेख, लेण्यांमधील कोरीव काम यात संदर्भ आढळत नाहीत. अशावेळी तर्कावर आधारलेल्या तथ्य, माहिती याची साखळी जोडून निष्कर्ष काढला जातो. त्यानुसार मुखपट्टीचा वापर हा वातावरण प्रदुषणातील बचावासाठी सुरू झाला असावा असे मानले जाते. ते सत्य असावेच असा कुठेही दावा नाही.
भारतात अती प्राचीन सिंधू संस्कृती मानली जाते. त्या संस्कृतीचा कालखंड ५ हजार वर्षांपूर्वी असावा. त्यानंतर वैदिक संस्कृती मानली जाते. या संस्कृतीचा कालखंड इसवी सन पूर्व १००० ते इसवी सन पूर्व ६०० मानला जातो. सिंधू संस्कृतीत काही मानवी नग्न मूर्ती व बैल (वृषभ) मूर्ती आढळल्या आहे. त्या आधारावर असे मानले जाते की, त्या मूर्ती जैन धर्मियांशी संबंधित असाव्यात. म्हणजेच वैदिक काळापूर्वी किंवा त्याच बरोबरीने जैन धर्म अस्तित्वात असावा. हा काळ काही अभ्यासक सहाव्या शतकाचा मानतात. वैदिक उत्तर काळात तेव्हा छोटी राज्ये म्हणजे जनपदे अस्तित्वात होती. तेव्हाच्या राज्यकर्त्यांवर वेद, होम, हवन, यज्ञ आणि बळी अशा कर्मकांडाचा पगडा होता. कोणतेही सामर्थ्य, यश प्राप्तीसाठी राजा कर्मकांड करीत असे. याच हेतुने सामान्य माणूसही कर्मकांडात ओढला जाऊ लागला. ते नित्याचे झाले. कर्मकांड व बळी यासाठी धन खर्च होत असे. त्यामुळे सामान्य माणसातील काही घटक या कर्मकांडापासून दूर होऊ लागले. अशा स्थितीत वैदिक परंपरा न मानणारा, बळी न देणारा जैन धर्म सामान्य घटक स्वीकारू लागले. त्यांची संख्या फारच कमी होती. कर्मकांडाच्या निमित्ताने होणारे विधी व धुराचे प्रदुषण या पासून नाक व मुखाचा बचाव करण्यासाठी मुखपट्टीचा वापर जैनांनी सुरू केला असावा. शिवाय, मुखपट्टी वापरणारे जैन अशीही ओळख तेव्हा निर्माण झाली आसावी. अशा प्रकारची मांडणी ही केवळ तर्काधारे केली जाते. पुरावे म्हणून हाती काहीही नाही.
जैन धर्मियात श्वेतांबर पंथी वा स्थानकवासी परंपरा या नैसर्गिक आपत्तीतूनच निर्माण झालेल्या आहेत. याविषयी अनेक ग्रंथात संदर्भ आढळतो. राजा चंद्रगुप्तचा कालखंड इसवी सन पूर्व ३२२ ते २२८ होता. मगध साम्राज्यावर कोरडा दुष्काळाचे सावट ओढवले. तेव्हा जैनांचे आठवे गणधर भद्रबाहुंनी १२ हजार शिष्यांसह दक्षिणेकडे स्थलांतर केले. मात्र आचार्य स्थूलभद्र काही अनुयायांसह मगध राज्यातच थांबले. अशा कालखंडात जगण्यासाठी जे हवे ते आचार्यांनी स्वीकारले. निवासासाठी ते जागा शोधत. अन्नासाठी भटकत. एक प्रकारे ही मंडळी मूळ पंथापासून व समाजापासून विलग राहिली. त्यांना ढुंढापंथी म्हटले गेले. दुष्काळ आणि ऊन यापासून बचावासाठी कमरेला श्वेत वस्त्र धारण करणे सुरू झाले. भिक्षा मिळविण्यासाठीचे नियम बदलले. धार्मिक आचरण बदलाने आपल्याच निवासात निग्रहाने आणि कमी गरजांमध्ये निवास करण्याचा संस्कार अनुयायांना दिला. काळ बदलला आणि श्वेतांबर पंथी स्थानकात निवास करू लागले. स्थानकातील निवास हा सुद्धा व्रतस्थ आणि मोह-मायापासून विलग करणारा असतो. जैन धर्मियांच्या स्थानकात आजही मुलभूत गरजेच्या व्यतिरिक्त इतर मानवी सोयी-सुविधा नसतात. विलगीकरणातील हा निग्रहीपणा आता कोरोना काळात विषाणू संसर्गित वा लक्षण सदृश्य व्यक्तिंच्या विलगीकरणाशी आणि तेथे त्यांच्या आचरणाशी समांतर मानता येऊ शकतो. तो तसाच आहे असे म्हणता येत नाही.
जैन तत्त्वज्ञानात कर्मनाश म्हणजे मुक्तीचा मार्ग मानला जातो. या मार्गावर जाण्याच्या दोन नीती आहेत. गृहस्थधर्म आणि साधुधर्म या त्या नीती होत. हे दोन्ही धर्म अंताला कर्मनाशाकडे जातात. गृहस्थधर्मातील आचरण थोडे सौम्य व सुसह्य केले आहे. साधुधर्म मात्र आजही कठोर वा खडतर आहे. साधूला सर्व प्रकारच्या मोहासह हिंसेचा त्याग करावा लागतो. गृहस्थाला गरजेपुरता मोह पूर्ण करीत हिंसेचा त्याग करावा लागतो. तो निर्वाहासाठी योग्य उद्योग, व्यापार, व्यवसाय, रोजगार करू शकतो. स्वतः, कुटुंब किंवा देशाच्या रक्षणासाठी शस्त्रही धारण करू शकतो. साधू असत्य बोलत नाही. परंतु गृहस्थ सत्याचे तरतमभाव करू शकतो. अचौर्यव्रत करणाऱ्या साधूला कोणतीही वस्तू इतरांनी दिल्याशिवाय घेता येत नाही. गृहस्थाच्या बाबतीत अशा मिळकतीच्या पुष्कळ सवलती आहेत. त्याला चोरी करता येणार नाही पण मित्राच्या घरातील स्वतःच्या मालकीची वस्तू त्याला न विचारता आणता येईल. साधूला कडक रीतीने ब्रह्मचर्य पाळावे लागते. गृहस्थाचे या बाबतीतले व्रत आहे ‘स्वदारसंतोष’. म्हणजे स्व संतोषासाठी विवाह केला जातो. साधूला कोणताही परिग्रह म्हणजे घरदार, सामान, नोकरी, जमीन-जुमला ठेवता येत नाही. गृहस्थाला विशिष्ट मर्यादेपर्यंत हे सर्व ठेवता येते. लोभाचा त्याग हा अपरिग्रहामध्ये महत्त्वाचा आहे. लोभाचा त्याग म्हणजे अहिंसा कार्य आले. सूर्यास्तानंतर न जेवणे, पाणी गाळून पिणे, मदिरात्याग, मितभाषण, जीवजंतू तोंडात जाऊ नयेत म्हणून मुखपट्टी बांधणे असे आचरण जैन धर्मियांचे असते. साधूच्या आणि गृहस्थाच्या सर्व नियमांचा विचार केला, तर गृहस्थाश्रम आणि सन्यस्थाश्रम यातील विलगीकरणाचा भेद लक्षात येतो. गृहस्थाश्रमातील सर्व कर्म पूर्ण केल्यानंतर जर कर्मनाशाकडे जायचे असेल तर सन्यस्थ जगून मुक्तीकडे जाण्याचा मार्गही जैन तत्त्वज्ञान व आचरणात आहे. संसारी गृहस्थ संन्यस्थमार्ग स्वीकारून स्थानकवासी होतो. साधू, मुनींच्या सानिध्यात निवास करतो. सांसारिक पाशातून लांब राहतो. काही वेळा संथराव्रत (अन्न-पाणी त्याग) करून मुक्तीच्या प्रवासाचा स्वीकार करतो. हेच जैन तत्वज्ञान व आचरणाचे सूत्र आजही आपत्तीच्या काळात स्वयं संरक्षणासाठी उपयुक्त व प्रभावी ठरत असल्याचे प्रकर्षाने जाणवते.