- अनंत गाडगीळ
‘ग्रास इज् ग्रीन ऑन द अदर साईड’. इंग्रजीतील प्रसिद्ध म्हण. आपल्या देशातील खासदार-आमदार यांचे जीवन म्हणजे एक सुंदर हिरवागार गालिचा असा बहुतांशी समज आहे. त्यांना मिळणाऱ्या सुखसोयी हा नेहमीच वादाचा विषय. इंग्लंडचे खासदारही त्याला अपवाद नाहीत.. आपल्याकडचे राहूद्या, पण इंग्लिश खासदारकी जीवनाच्या हिरव्या गालिच्याची ‘अदर साईड’ एक चिंतनात्मक विषय बनत आहे. इंग्लंडच्या राजकीय पत्रकार ईझाबेल हार्डमन व माजी खासदार निक द बॉय यांनी ब्रिटिश खासदारांच्या जीवनातील एक आगळीवेगळी बाजू नुकतीच वाचकांसमोर आणली आहे. कुटुंबाची सुरक्षितता यापासून ते राजकारणामुळे दुभंगणारे वैवाहिक जीवन, मनाला धक्का देणारे दृश्य, भारतीय संस्कृतीच्या चौकटीत राहून अशक्यप्राय वाटते
इंग्लंडमधील अति महत्त्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षिततेचा कायम आढावा घेणाऱ्या ‘फिक्सडेट थ्रेट असेसमेंट सेन्टर’ संघटनेनुसार, गेल्या १०-१५ वर्षात, इंग्लंडमधील ५ पैकी ४ खासदारांना प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे आक्रमक हल्ल्याला सामोरे जाण्यापासून ते त्यांच्या कुटुंबानाही सतत शिव्या-शापमिश्रित धमक्यांचा त्रास सहन करावा लागला आहे.
बर्मिंघमच्या खासदार जेस फिलिफानं यांच्या मुलांना धमक्या येताच घराभोवती विशेष सुरक्षा व्यवस्था उभारावी लागली. खासदार ईस्ट ह्याम यांनी इराकसंबंधी घेतलेल्या भूमिकेवरून एका स्त्रीने भर बैठकीत त्यांच्या पोटात चाकूने वार केले तर खासदार स्टीफन टीम्स यांच्यावर एका मतदाराने त्यांच्या जनता दरबारातच हल्ला केला होता.
जन्माने ज्यू असलेल्या ली स्कॉट यांना २०१५ मध्ये पराभव झाल्यानंतरही जीवे मारण्याच्या धमक्या येत राहिल्या. परिणामी पुढील २ वर्षे दररोज सकाळी स्कॉट पती-पत्नी आपल्या घराभोवतालची व मोटारीची स्वतःच कसून तपासणी करायचे. खासदारकीच्या एका उमेदवाराच्या विरुद्ध तर फेसबुकवरील खोटे-नाटे भयानक लिखाण वाचून त्याच्या तिन्ही मुलींच्या मनावर परिणाम होता होता वाचला.
इंटरनेटच्या जमान्यामध्ये इंग्लंडमधील महिला उमेदवारांसमोर एक नवे आव्हान उभे ठाकले आहे. मजूर पक्षाच्या उमेदवार केट गॉडफ्रेना प्रचारकाळात अज्ञात संगणकस्थळावरून अश्लील संदेश पाठवले जायचे. इतर काही महिला उमेदवारांना अनोळखी नंबरवरून मध्यरात्री अर्वाच्य शिव्याही दिल्या जायच्या. धक्कादायक म्हणजे, अनेकदा हे सारे मतदार नसायचे तर पक्षाचे नाराज कार्यकर्ते असायचे.
इंग्लंडमध्ये खासदारांमधील सुखी-संसाराचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. आपल्याकडे अनेक खासदारांच्या पत्नी, अधिवेशन काळात दिल्लीत मुक्काम करतात. मात्र, इंग्लंडमधील काही खासदारांच्या ‘स्वतंत्र विचाराच्या’ पत्नींनी अधिवेशन काळात नवऱ्यासोबत वर्षातील ५-६ महिने लंडनमध्ये राहण्याऐवजी घटस्फोट घेणे पसंत केले. गेल्या १०-१५ वर्षांत सुमारे ६५० खासदारांपैकी ७५ हून अधिक संसद सदस्यांच्या पत्नींनी नवऱ्याच्या खासदारकीमुळे घटस्फोट घेतला आहे.
इझाबेल यांच्या सर्वेक्षणानुसार निवडणूक लढवली या कारणावरून आपल्या स्त्री-जोडीदाराला गमवावे लागल्याची ३५ टक्के उमेदवारांनी कबुलीच दिली. लग्न टिकवण्यासाठी ‘आपण एकच टर्म खासदार राहू’ असा करार करण्यास डेव्हिड हिथ यांच्या पत्नीने त्यांना भाग पाडले. २५ टक्के खासदारांनी, आपले कुटुंब एकसंघ राहावे म्हणून मुदत संपताच राजकारणाऐवजी नोकरी-धंदा करणे पसंत केले. अर्थात १० टक्के खासदारांनी राजकारणाचा उबग आल्यामुळे पुन्हा खासदार न होण्याचे ठरवल्याचे खरे कारण मात्र गुपित ठेवले.
इंग्लंडमधील राजकारणी बऱ्याचदा भावनात्मक होतात. राजकारणात पुनर्संधी न मिळणे, निवडणुकीतील खर्चामुळे कर्जबाजारी वा अपयश, यासारख्या कारणांमुळे काही उमेदवार व्यसनाधीन झाले. विकी स्लेड तर पराभवानंतर दररोज रात्री महिनाभर रडायच्या असे त्यांनी कबूल केले. ऐन निवडणुकीत दिवस गेल्यामुळे एका महिला उमेदवाराला तिच्या पक्षाच्या समितीनेच खडे बोल सुनावले.
एकीकडे वरील गंभीर दृश्य असताना दुसरीकडे हास्यास्पद कामेही खासदारांना सांगितली जातात. ‘आमच्या दारातील कचरा महापालिकेला त्वरित उचलायला सांगा, आम्ही तुम्हाला उगीच निवडून दिलेले नाही’ हे वाक्य पुण्यातील खासदार-आमदाराला कधीतरी ऐकावेच लागते; मात्र इंग्लंडच्या मतदारांनी पुणेकरांनाही मागे टाकले आहे. खासदार अबून केर्न यांना त्यांच्या मतदारसंघातील एका गृहप्रकल्पातील लोकांनी नाताळच्या सुट्टीत सर्व गावी जात असल्यामुळे, रहिवाशांच्या कुत्र्यांसाठी “ स्वान संगोपन केंद्र “ त्वरित उघडण्यास भाग पाडले. शोरह्यामचे खासदार टीम लोकटन यांचे अनेक मतदार अविवाहित असल्यामुळे ‘वधू-वर’ सूचक मंडळ स्थापन करण्याची मागणी पालकांनी लावून धरली. एका गरजू महिलेला सरकारी कोट्यातून सदनिका देणारा खासदार तिला मॉलमध्ये दिसताच, तिने उत्साहाच्या भरात मोठ्याने ओरडत त्यांचे आभार मानले. परिणामी दुसऱ्या दिवशी त्या खासदाराच्या कार्यालयात सदनिका मागण्यासाठी मॉलमधील दुकानदारांची रांगच लागली.
गंमतीशीर प्रथा
इंग्लंडमध्ये अशा काही प्रथा आहेत की त्यामुळे राजकारणाला एक विनोदाची झालरही आहे. वायकोम्ब गावात, वर्षातून एकदा, गावातील प्रमुख चौकात, तेथील नागरिक खासदारांचे जाहीरपणे वजन करतात. करदात्याच्या पैशातून आपला लोकप्रतिनिधी ऐश करत नाही ना हा त्यामागचा उद्देश. आपल्याकडे असे सुरू केल्यास ट्रकचे वजनकाटेच आणावे लागतील! सॅल्स्बरी मतदारसंघात, दर निवडणुकीत प्रत्येक उमेदवाराला एका ठरलेल्या हॉटेलच्या गच्चीतून मोठ्याने गाणे म्हणावे लागते. तेथील खासदार जॉन ग्लेन हे यासाठी गायनाच्या क्लासलाच गेले. ऍबिंग्डन व वेन्टवर्थ मतदारसंघात निवडणूक जिंकणाऱ्या उमेदवारांनी गच्चीतून शेकडो पाव फेकायची प्रथा आहे. ‘गच्चीतून थाळ्या व बाल्कनीतून टाळ्या’ वाजवायची आपल्याकडे नव्याने सुरु झालेली गंमतीशीर प्रथा मतदारांची किती करमणूक करते आहे ना?
(लेखक माजी आमदार आहेत.)
anantvsgadgil@gmail.com