- विनोद शिरसाठ
२६ ऑगस्ट १९२२ ते २९ मे २०१० असे ८८ वर्षांचे आयुष्य लाभले त्या ग. प्र. प्रधान यांचे जन्मशताब्दी वर्ष येत्या २६ ऑगस्टला सुरू होत आहे. १९४२ च्या ‘चले जाव’ चळवळीत भूमिगत कार्य करून नंतर दोन वर्षे तुरुंगवास, स्वातंत्र्यानंतर पुणे येथील फर्ग्युसन महाविद्यालयात वीस वर्षे इंग्रजीचे प्राध्यापक, त्यानंतर अठरा वर्षे विधान परिषदेचे सदस्य (त्यातील दोन वर्षे विरोधी पक्षनेते) आणि मग १४ वर्षे वसंत बापट यांच्यासह ‘साधना’ साप्ताहिकाचे संपादक अशी त्यांची कारकिर्द होती. दरम्यानच्या काळात त्यांची ओळख साने गुरुजींच्या धडपडणाऱ्या मुलांपैकी एक, राष्ट्र सेवा दलाचे बौद्धिक भरणपोषण करणारे कार्यकर्ते, समाजवादी शील असणारे नेते, मराठी व इंग्रजी या दोन्ही भाषांमध्ये मिळून दोन डझन पुस्तके असणारे लेखक अशीही होती.
शालेय वयात असताना त्यांच्यावर वि. स. खांडेकर यांच्या कादंबऱ्यांचा प्रभाव पडला. उदात्त ध्येयवादाचे दर्शन घडवणाऱ्या त्या कादंबऱ्यांमुळे त्यांना कुमार वयातच स्वातंत्र्य लढ्याविषयी आकर्षण निर्माण झाले. तारुण्यात प्रवेश केल्यावर महात्मा गांधी व साने गुरुजी यांनी प्रभावित केले. दरम्यान, काँग्रेसच्या अंतर्गत समाजवादी प्रवाहाकडे ते अधिक ओढले गेले, त्याचे कारण एस. एम. जोशी व नानासाहेब गोरे हे दोन प्रमुख नेते. ‘ते दोघे माझे राजकीय गुरू होते,’ हे प्रधान यांनीच लिहून ठेवले आहे.
बुद्धिमत्ता, चारित्र्य व नैतिकता यासाठी त्या काळातील अनेक समाजवादी नेते ओळखले जात. साधी राहणी, प्रांजळ लेखणी व वाणी आणि सार्वजनिक जीवनात पारदर्शकतेचा आग्रह, यामुळे त्या नेत्यांचा तत्कालीन समाजजीवनावर केवळ प्रभाव नाही, तर दबदबा होता. प्रधान यांचे स्थान त्या यादीत अग्रभागी मानले जात असे.
ते जिथे कुठे जातील तिथे वातावरण प्रसन्न करून सोडतील असे त्यांचे व्यक्तिमत्त्व होते. प्राध्यापक होते तेव्हा इंग्रजी कादंबरी शिकवताना फर्ग्युसन महाविद्यालयातील चारशे बैठक व्यवस्था असलेल्या अँफी थिएटरमध्ये ते काही तास घेत असत आणि त्या वेळी ते सभागृह ओसंडून वाहत असे, मंत्रमुग्ध होत असे. कारण त्या तासाला अन्य वर्गातील व अन्य महाविद्यालयांतील विद्यार्थीही येत असत आणि ज्यांना अभ्यासक्रमात तो विषय नाही ते विद्यार्थीही त्यात असत. ते विधान परिषदेचे सदस्य होते तेव्हा, राज्यभर दौरे करून, तळागाळातील प्रश्न व समस्या जाणून घेऊन, अभ्यास करून भाषणे देत असत. त्यामुळे ते बोलत असताना सभागृहात गडबड-गोंधळ होण्याचे प्रयत्न क्वचितच होत असत. ते साधनाचे संपादक तसे उशिरा म्हणजे वयाची साठी उलटल्यानंतर झाले; पण अग्रलेख लिहायचे तर त्याला तत्त्वज्ञानाचा किमान पाया असला पाहिजे, म्हणून त्यांनी तत्त्वज्ञानाचा अभ्यास सुरू केला होता आणि साधना साप्ताहिकाची आर्थिक घडी बसवण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले होते. अखेरच्या काळात ते अनेक संस्थांचे सल्लागार व मार्गदर्शक होते. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्षपदही त्यांच्याकडे काही वर्षे होते. शिवाय, वयाची सत्तरी ते ऐंशी या काळात पुणे शहरातील इतक्या सार्वजनिक कार्यक्रमांचे व सभा समारंभाचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले की, ती गणती केली तर त्या दशकातील विक्रम त्यांच्याच नावावर नोंदवला जाईल. त्यातून त्यांची स्वीकारार्हता व कार्यमग्नता अधोरेखित होते.
त्यांनी मराठी व इंग्रजीत विपुल लेखन केले. साहित्य, समाजकारण व राजकारण हे विषय त्यांनी प्रामुख्याने हाताळले. लोकमान्य टिळक, गोपाळ गणेश आगरकर, महात्मा गांधी, साने गुरुजी, जयप्रकाश नारायण इत्यादी नेत्यांवर केलेले लेखन विशेष लक्षणीय आहे. त्यातही त्यांनी अ. के. भागवत यांच्यासह लिहिलेले लोकमान्य टिळक चरित्र हे इंग्रजी पुस्तक विशेष गाजले. १९५६ मध्ये टिळक जन्मशताब्दीनिमित्त अखिल भारतीय काँग्रेसने आयोजित केलेल्या स्पर्धेत त्या पुस्तकाला (अन्य दोन मराठी पुस्तकांसह) प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले होते. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यावर त्यांनी अनेक लहान-मोठी पुस्तके लिहिली, त्यातील ‘स्वातंत्र्यसंग्रामाचे महाभारत’ हे पुस्तक तर मराठी, हिंदी, इंग्रजी या तिन्ही भाषांमध्ये वाचकप्रिय ठरले. याशिवाय १९६५ च्या भारत - पाकिस्तान युद्ध आघाडीवर प्रत्यक्ष जाऊन लिहिलेले ‘हाजीपिर’ आणि १९७१ च्या युद्ध आघाडीवर जाऊन लिहिलेली ‘सोनार बांगला’ ही दोन छोटी, पण महत्त्वाची पुस्तके आहेत. ‘माझी वाटचाल’ हे आत्मकथनात्मक पुस्तक तर प्रांजळ आत्मनिवेदनाचे उत्कृष्ट उदाहरण आहे. मात्र त्यांचे सर्वोत्तम पुस्तक म्हणून ‘साता उत्तराची कहाणी’चा उल्लेख करावा लागेल, त्याला त्यांनी ‘राजकीय बखर’ असे संबोधले आहे. पण, १९४० ते ८० या काळातील, भारतीय राजकारणातील सात प्रमुख प्रवाह कसे होते आणि त्या काळातील देशातील व जगातील प्रमुख घटना घडामोडींना ते प्रवाह कसा प्रतिसाद देत होते, हे समजून घ्यायचे असेल तर इतके चांगले पुस्तक मराठीत तर नाहीच, पण अन्य भाषांमध्येही क्वचितच असेल.
उदारमतवाद, लोकशाहीवर दृढ श्रद्धा आणि भारतीय संविधानाला अपेक्षित असलेली स्वतंत्र, समता, न्याय धर्मनिरपेक्षता इत्यादी मूल्ये प्रत्यक्ष समाज जीवनात अवतरली पाहिजेत, यासाठी सतत सहा दशके पाठपुरावा करणारे ते ध्येयवादी व पारदर्शक व्यक्तिमत्त्व होते. त्यामुळे त्यांच्या जीवनकार्याची ओळख करून घेणे याचा अर्थ, आज उद्याच्या पिढ्यांनी स्वत:ला तपासून घेणे असाही होऊ शकेल.. त्यांचे जन्मशताब्दी वर्ष साजरे करण्याचे काही प्रयोजन असेल तर हेच.
vinod.shirsath@gmail.com
(‘साधना’ साप्ताहिकाचे संपादक)