कोल्हापूरचे काँग्रेसचे खासदार उदयसिंहराव गायकवाड यांना केंद्रात मंत्रिपद मिळावे यासाठी आम्ही ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या पुढाकाराने पंतप्रधान नरसिंहराव यांना भेटून आलो. त्यावेळी आतासारखी माध्यमांमध्ये झळकण्याची ईर्षा नव्हती. त्यामुळे आम्ही काय त्यांना भेटायला जाताना फोटोग्राफर घेऊन गेलो नव्हतो. तिथे गेल्यावर कोणीतरी ऐनवेळी फोटोग्राफरची व्यवस्था केली.
पंतप्रधानांना भेटल्यावर त्याने आमचे फोटो काढले. रात्री तो फोटोग्राफर आम्ही उतरलो होतो त्या खासदार गायकवाड साहेबांच्या बंगल्यावर फोटो घेऊन आला. फोटो पाहून आमचा भ्रमनिरास झाला. फोटो काळेमिट्ट आले होते. त्यात आम्ही कुठे शोधूनही दिसत नव्हतो.
खरेतर आम्ही गायकवाड साहेब यांना मंत्रिपद मिळावे यासाठी पंतप्रधानांना भेटायला गेलो होतो, परंतु आपण पंतप्रधानांना त्यांच्या दिल्लीतील बंगल्यावर जाऊन भेटलो याचे आम्हालाही मोठे अप्रुप होते. तसा आमच्याही जीवनातील तो एक अनमोल क्षण होता. परंतु हा क्षण फोटोमध्ये मात्र टिपला गेला नसल्याने आम्ही सारेच नाराज झालो. फोटो पाहून पैलवान युवराज पाटील तर फारच संतापला. भेट वाया गेली अशीच काहीशी त्याची प्रतिक्रिया होती, परंतु तो गप्प बसायला तयार नव्हता. तो म्हटला, आपण गप्प बसायचे नाही. उद्या पुुन्हा पंतप्रधानांना भेटून फोटो काढून यायचे. परंतु त्याचा हट्ट कोण मनावर घ्यायला तयार नव्हते.
पंतप्रधानांसारख्या अत्युच्च पदावरील व्यक्तीला एकदा पाच-दोन मिनिटे भेटतानाही मारामार असते आणि इथे युवराज पाटील तर त्यांच्यासोबत फक्त फोटो काढण्यासाठी दुसऱ्यांदा भेटायचा आग्रह धरत होता. परंतु त्याने जास्तच आग्रह धरल्यावर नुसतं विचारून तरी बघू म्हणून पवारसाहेबांना फोन लावला. घडलेले सगळे त्यांना सांगितले. आणि फक्त एक मिनिटे आम्ही पंतप्रधानांना भेटतो व फोटो काढला की लगेच निघून येतो अशी विनंती त्यांना करण्यात आली.पवारसाहेबांनी मी प्रयत्न करतो असे आश्वासन दिले. त्यांनी पंतप्रधान कार्यालयाशी पुन्हा संपर्क साधला. महाराष्ट्रातील अमुक अमुक हिंदकेसरी व महाराष्ट्र केसरी झालेले मल्ल पुन्हा भेटण्यासाठी येणार असल्याचे त्यांना सांगितले. ते कशासाठी पुन्हा येणार आहेत त्याचे कारणही सांगण्यात आले. फक्त पाच मिनिटे वेळ द्या अशी विनंती करण्यात आली, परंतु गंमत अशी घडली की, पंतप्रधान कार्यालयाने त्यास मान्यता दिली. आम्ही राष्ट्रीय मल्ल असल्याने त्या आदरापोटी कदाचित पंतप्रधानांनीच त्यास संमती दिली असावी.
दुसºया दिवशी आवरून आम्ही पुन्हा पंतप्रधानांच्या निवासस्थानी सकाळी दहा वाजता गेलो. आमच्यासोबत दुसºया दिवशीही शरद पवारसाहेब आले होते. कारण त्यांच्याशिवाय आम्हाला पंतप्रधान निवासस्थानी प्रवेशच मिळाला नसता. पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव यांच्यासोबत मनसोक्त फोटो काढले. ते म्हणाले, ‘तसे कामाच्या निमित्ताने मला भेटायला तर रोज शेकडो लोक येतात, परंतु तुमच्यासारखे धिप्पाड लोक बघितले की डोळेही सुखावतात.’
आम्ही सारेच जण त्यावेळी प्रकृतीने दणकट होतो. शामराव भिवाजी पाटील व सखाराम बापू खराडे हे पैलवान नसले तरी त्यांचीही प्रकृती चांगली होती. त्यामुळे आमच्या तब्बेतीने पंतप्रधानांची दुसºयांदा भेट घालून दिली. पंतप्रधानांसमवेत मी उर्दूमिश्रित हिंदी बोललो. भाषेचा लहेजा त्यांना खूप आवडला. पैलवानही इतकी चांगली भाषा बोलू शकतो याचे त्यांना अप्रुप वाटले.
‘‘बडी मुश्कील से इस दिलकी बेकरारी को करार आया.. जिस जालीमने मुझको तडपाया, उसीसे प्यार आया..!’’ हा शेर मी त्यांना ऐकवला. त्यांनीही आपण हैदराबादमध्ये उर्दूतून शिकलो असे सांगितले. त्यांनी मला तुम्ही कुठे शिकला असे विचारले. मला त्यांच्या प्रश्नाचे हसू आले. मी म्हणालो, साहेब, आमच्या जन्माचा आखाडा झाला. माती हेच आमचे कॉलेज. त्यामुळे मला शिकता आले नाही. काहीच शिक्षण नसताना साहित्य व शेरोशायरींचे ज्ञान कसे व कुठून मिळाले याबद्दल त्यांना उत्सुकता होती. ‘यह सब ईश्वर की देन है’ असे त्यांना सांगितले.‘ईश्वर की देन’वरून त्यांनाही आपल्या आयुष्यात घडलेल्या एका प्रसंगाची आठवण झाली. त्यांनी सांगितले की, यावेळेच्या (१९९१) लोकसभा निवडणुकीत मला काँग्रेसकडून उमेदवारी मिळणार नाही याची कुणकुण लागली होती. म्हणून मी स्वत:च पक्षाला पत्र लिहिले आणि कळविले की, माझी शस्त्रक्रिया झाली आहे, प्रकृतीही साथ देत नाही. तरी मला यावेळेला उमेदवारी दिली जाऊ नये.
मला काँग्रेस पक्षाकडून उत्तर आले की, तुमची प्रकृती ठीक नाही तर तुम्ही प्रचारातही भाग घेऊ नका व आराम करा. म्हणजे पक्षाने मला एकाअर्थाने सक्तीनेच घरी बसवले होते. परंतु नशिबाचा खेळ बघा. ज्याला आराम करायला सांगितले, तो आज पंतप्रधानांच्या खुर्चीवर बसला आहे व ज्यांना या खुर्चीवर बसायला हवे होते, ते आज भगवान के घर में है..! त्यांच्या बोलण्याला राजीव गांधी यांच्या २१ मे १९९१ ला तमिळनाडूतील श्रीपेरंबदूर येथील बॉम्बस्फोटात झालेल्या मृत्यूचा संदर्भ होता...!शब्दांकन : विश्वास पाटील