- कांचन अधिकारीआपल्या आयुष्यात आपल्याला आपली म्हणून असणारी अशी एक जरी मैत्रीण असेल ना, तर आयुष्य खूपच सोपं होऊन जातं. माझ्याही आयुष्यात माझ्या नशिबानं मला अशी सोन्यासारखी मैत्रीण दिली होती जी माझ्या आनंदानं, माझ्या प्रगतीनं सुखावायची आणि माझ्या दु:खातही तितक्याच तन्मयतेने मला साथ द्यायची. ती होती ‘प्रिया तेंडुलकर’. पवईला खूप वरच्या मजल्यावर राहणारी प्रिया! हिला पहायला चक्क लिफ्ट खालून वर भरून यायची.
१९ आॅक्टोबर १९५४चा प्रियाचा जन्म आणि १९ सप्टेंबर २००२ या दिवशी मृत्यू. अवघ्या ४८ वर्षांचं आयुष्य तिला लाभलं. त्यातही शेवटची दोन वर्षे कॅन्सरशी झुंजण्यात गेली; पण आजही हिंदुस्थान टेलिव्हिजन जगतात ती ‘रजनी’ या नावानं अमर आहे. खरं तर प्रियाने असंख्य सिनेमे (हिंदी व मराठी), असंख्य मालिकांत काम केलं; पण ती गाजली ते रजनी मालिका व तिच्या सामाजिक विषयांवर आधारित ‘प्रिया तेंडुलकर टॉक शो’ आणि ‘जिम्मेदार कौन’ या दोन शोमुळे.
सामाजिक, राजकीय, आर्थिक विषयांना वाचा फोडण्याचं काम हे तिच्या या ‘शो’मुळे होत होतं. तिचा पडद्यावरचा अवतार पाहून ती खूप कडक असली पाहिजे असा सर्वसाधारण समज समाजात होता; पण प्रत्यक्षातली प्रिया ही खूपच हळवी, दुसºयाच्या दु:खांनी दुखावली जाणारी, त्यावर विचार करणारी, आपण त्याला काही मदत करू शकतो का? असं वाटून त्याप्रमाणे पावलं उचलणारी होती.प्रियाची माझी ओळख ‘दामिनी’ या माझ्या मालिकेमुळे झाली. ती गौतम अधिकारी दिग्दर्शित एका मालिकेत काम करत होती तेव्हा मी तिला सेटवर भेटायला गेले होते. ‘दामिनी’ या आगामी मालिकेत काम करशील का विचारलं, तेव्हा तिने मन लावून मालिकेचं कथासूत्र ऐकलं. स्वत:चा रोल काय आहे हे समजून घेतलं, आणि मग विचारलं,‘ही मालिका तू स्वत: दिग्दर्शित करणार आहेस ना? की मार्कंड अधिकारीची बायको म्हणून केवळ नाव लावणार आहेस?’‘नाही मी स्वत: दिग्दर्शित करणार आहे.’ती म्हणाली बस्स! मग मी या मालिकेत नक्कीच काम करणार.
कुठलीही स्त्री स्वयंसिद्धपणे काही करणार असेल तर तिला पाठिंबा द्यायला प्रियाला नक्कीच आवडायचं. दामिनी मालिकेतल्या तर असंख्य आठवणी माझ्यापाशी आहेत; पण खरी दौलत आहे ती म्हणजे तिचं आणि माझं रोजचं रात्रीचं टेलिफोनवरचं बोलणं. आमचा फोन रात्री १०.३० वाजता सुरू व्हायचा तो मध्यरात्री २.३० तर कधी ३ वाजता बोलता बोलता गळून पडायचा तेव्हा आम्ही थांबायचो. खरंच आम्ही एवढं काय बोलायचो?... असंख्य गोष्टींचा समावेश असायचा त्यात! अगदी जीवनातल्या साध्या-साध्या गोेष्टींपासून ते गॉसिपपासून ते स्वयंपाकघरातल्या रेसिपींपासून ते राजकारण, समाजकारण अनेक गोष्टीवर गप्पा रंगत! शूटिंगमधल्या गंमती-जंमतींपासून आज घरी
जेवायला काय होतं, इथंपर्यंत आम्ही अक्षरश: काय वाट्टेल ते बोलत असू!प्रिया एकदा म्हणाली होती, ‘कांचन मी घराच्या बाहेर पडले की प्रिया तेंडुलकर असते; पण घरात एकटीच असते गं! एक हाडामासाची व्यक्ती. दिवस संपवून विश्रांतीसाठी बिछान्यावर पडले की माझ्यात आणि सर्वसामान्य बाईत काय फरक असणार? मलाही त्याच गरजा, तेच श्वास, तीच स्वप्नं!’
मी म्हटलं ‘प्रिया बाकीच्या अनेकांना स्वप्नं पडतात, तू स्वप्न पाहतेस आणि ती प्रत्यक्षात उतरवतेस हा फरक आहे.’एवढ्या आम्ही रोज ३-४ तास गप्पा मारणाºया पण प्रियानी मला कधीच हे सांगितलं नाही की तिला कॅन्सर झालाय. मला ही बातमी बाहेरून कळली तेव्हा मी तिला तडक विचारलं. ती खूपच चिडली म्हणाली,‘कोणी सांगितलं हे तुला?’मी म्हटलं, ‘हे खरं आहे का?’त्यावर ती म्हणाली, ‘का ही माणसं दुस-याच्या आयुष्यात डोकावू पाहतात? काय आनंद मिळतो त्यांना?’परत माझा तोच सवाल, ‘प्रिया हे खरं आहे का?’आयुष्यात प्रथमच माझ्याशी प्रिया खोटं बोलली, ‘नाही, हे खरं नाहीए’.- आज जेव्हा मी याचा विचार करते तेव्हा मला प्रियाचा राग अजिबात येत नाही. कारण माझ्या इंडस्ट्रीत जर कुणाला असं काही झालं असेल तर त्या माणसाला लोक काम देत नाहीत आणि प्रियाला पैसे कमावण्यापासून पर्याय नव्हता. तिला कामाची फार गरज होती.एकदा मी आणि प्रिया शिर्डीला गेलो होतो. दर्शन झाल्यावर आम्ही जवळच्या एका हॉटेलात जेवायला गेलो. तिथे आम्ही जेवणाची आॅर्डर दिली आणि बाथरूमला म्हणून गेलो. प्रियाने बाथरूमच्या मुख्य दरवाजाला आतून कडी लावली. माझ्याकडे वळली आणि आपल्या डोक्यावरचा विग उतरवला. डोक्यावर भरपूर कुरळ्या केसांचा भार असणाºया प्रियाच्या डोक्यावर लहान मुलांच्या डोक्यावर असावी अशी पिंगट विरळ लव होती. मी समजायचं ते समजले आणि तिला मिठी मारून रडायला लागले.प्रियानं मला थोपटलं आणि म्हणाली, ‘रडू नकोस! बघ माझ्याकडे कशी दिसते मी? छान दिसते ना? अगं आयुष्य खूप सुंदर आहे आपण आपल्या जगण्यानं ते खूप अधिक सुंदर करायचं असतं. तुझं माझ्यावर प्रेम आहे ना?’मी म्हटलं, ‘हे काय विचारणं झालं?’ती म्हणाली, ‘मला माहितेय तू माझ्यावर प्रेम करतेस. बस्स तर मग असंच प्रेम करत रहा.मी असले काय किंवा नसले काय!’