- विश्राम ढोले
वन स्पीलबर्गचा ‘मायनॉरिटी रिपोर्ट’ नावाचा चित्रपट आठवतोय? विज्ञानपट जातकुळीतील या चित्रपटाची कथा गुंतागुंतीची; पण विलक्षण होती. चित्रपट आला २००२ साली; पण त्याची कथा घडते २०५४ सालात. गुन्हा घडण्यापूर्वीच संभाव्य गुन्हेगाराच्या मनातला गुन्ह्याचा हेतू विश्वासार्हरीत्या ओळखण्याचे तांत्रिक कौशल्य असलेला एक विभाग वॉशिंग्टन पोलिसांमध्ये असतो. त्या विभागातलाच एक अधिकारी एका व्यक्तीचा खून करणार आहे असा भविष्यदर्शी अहवाल या विभागाला मिळतो आणि मग वेगवान घडामोडींची एक मालिकाच सुरू होते. अखेरीस व्यवस्था वाचवायची की स्वत:ला वाचवायचे अशा एका पेचात असलेला या विभागाचा संस्थापकच आत्महत्या करतो आणि ही भविष्यदर्शी पद्धतीनं घडण्यापूर्वीच गुन्हे रोखू पाहणारी व्यवस्थाही बंद होते...
गुंतागुंतीची ही कथा काही खोलवरचे नैतिक प्रश्न निर्माण करते. तंत्रज्ञानाच्या साह्याने भविष्य इतके निश्चितपणे माहीत करून घेता येत असेल तर मग मूलभूत मानवी स्वातंत्र्य आणि ऊर्मीचे स्थान काय? तंत्रज्ञान आणू पाहत असलेली निश्चितता आणि नियंत्रण झुगारून देण्याचे सामर्थ्य स्वातंत्र्याच्या मानवी ऊर्मीत आहे काय? अगदी सार्वजनिक हितासाठी जरी असला तरी व्यक्तीच्या खासगी आयुष्यात तंत्रज्ञानाला आणि त्याच्या माध्यमातून शासनाला व बाजारव्यवस्थेला हस्तक्षेप कितपत करू द्यायचा?..
हा चित्रपट आणि हे प्रश्न आठवायचे तात्कालिक कारण म्हणजे नुकताच वाजत-गाजत लाँच झालेला अॅपलचा आयफोन एक्स. एरवीही अॅपलच्या उत्पादनांबाबत लोकांमध्ये उत्सुकता असतेच. आयफोन एक्सच्या लॉन्चच्यावेळी त्याला आणखी एक परिमाण होते. कारण या फोनमध्ये विकसित स्वरूपातले चेहरावाचक तंत्रज्ञान समाविष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे फोनचे कुलूप उघडण्यासाठी आता कोणती गुप्तसंख्या किंवा पॅटर्न लक्षात ठेवण्याची गरज नाही. आपला फोन फक्त आपल्या चेहऱ्यासमोर धरायचा. मालकाचा चेहरा ओळखून हे तंत्रज्ञान स्वत:हून पडद्याचे कुलूप उघडेल. आरशासमोर उभे राहिल्यानंतर आपण आपली प्रतिमा जितक्या सहजतेने ओळखू तितक्या सहजतेने हे घडेल. प्रत्यक्षात मात्र फोन लॉन्च कार्यक्रमात या तंत्रज्ञानाने ऐनवेळी माती खाल्ली. फोन थोडावेळ अनलॉकच झाला नाही. अर्थात, हा प्रसंग अपवाद. कारण बोटांचे ठसे ओळखून फोन, दरवाजे किंवा इतर काही सुविधा उघडू शकणाºया तंत्रज्ञानाप्रमाणेच चेहरा वाचून सुविधा उघडण्याचे तंत्रज्ञानही आता बऱ्यापैकी विकसित झाले आहे, हे खरेच आहे.
खरं तर एरवी खूप सोयीचे, सुरक्षित आणि निष्पाप भासणाऱ्या या तंत्रज्ञानाच्या संदर्भात हे असे नैतिक वगैरे प्रश्न पडण्याचे कारण काय, असे वाटू शकते. पण मालकाचा चेहरा ओळखून फोन अनलॉक करणे ही कृती म्हणून जरी किरकोळ असली तरी तसे करण्यामागची तांत्रिक क्षमता मात्र किरकोळ मानता येणार नाही. या क्षमतेतून निर्माण होणाऱ्या इतर अनेक शक्यता तर नक्कीच नाही. अर्थात ते समजून घेण्यासाठी आधी या तंत्रज्ञानाचे आजचे स्वरूप समजून घेण्याची गरज आहे. खरं तर चेहरा वाचून व्यक्ती ओळखण्याच्या या तंत्रज्ञानाची सुरुवात साठीच्या दशकातील. पण तेव्हाच्या संगणकीय क्षमता आणि तांत्रिक सुविधा मर्यादित असल्याने त्याची व्याप्ती आणि यशही मर्यादितच होते. पण आज तसे नाही. कॅमेऱ्याच्या साह्याने चेहरा टिपायचा, त्याचे गणिती आणि भौमित्तिक पद्धतीने आरेखन करायचे, त्याआधारे चेहऱ्याच्या विविध शक्यतांचा संच बनवायचा आणि मग तो संच ओळखीच्या हजारो-लाखो चेहऱ्यांशी जुळवून चेहऱ्याची ओळख पटवायची असे या प्रक्रि येतील सर्वसाधारण टप्पे असतात.
या प्रत्येक टप्प्यावर संगणकीय क्षमता आणि तांत्रिक सुविधा आता खूपच विकसित झाल्या आहेत. अगदी कॅमेऱ्यांचे उदाहरण घेतले तरी हा मुद्दा स्पष्ट होईल. आज अगदी ‘जळी-स्थळी-काष्ठी-पाषाणी’ कॅमेरे असतात. मोबाइलमध्ये दहा-पंधरा मेगापिक्सलचे कॅमेरे असणे अगदी साधारण बाब झाली आहे. त्यांच्या फोकसिंग क्षमताही वाढल्या आहेत. सीसीटीव्ही कॅमेरे तर रस्ते, दुकाने, सार्वजनिक जागा आणि अगदी घरांमधूनही दिसू लागले आहेत. कॅमेरे जसे मोबाइलमध्ये असू शकतात तसे शर्टांच्या बटणांमध्येही. अशा सतत वेढून असणाºया कॅमेरांमधून येणाऱ्या चेहऱ्यांचे आरेखन करण्याच्या संगणकीय आज्ञाप्रणालीही आता खूप विकसित झाल्या आहेत.
अगदी आयफोनचेच उदाहरण द्यायचे तर त्यासाठी न्यूरल नेटवर्कसारखी गुंतागुंतीची प्रणाली वापरण्यात येते. त्यामुळे आपल्या चेहऱ्यातील विविध वैशिष्ट्यांचे अगदी अतिसूक्ष्म अंतर आणि कोनांच्या पातळीवर आरेखन करून त्याचे एकमेवाद्वितीय रूप संगणकीय परिभाषेत मांडण्याची अफाट क्षमता प्राप्त होते. एकदा हे आरेखन सिद्ध झाले की मग संगणकीय मॉडल्सच्या साह्याने तो चेहरा समोरून, बाजूने, ऊर्ध्वमुखी (वर), अधोमुखी (खाली), स्वच्छ प्रकाशात, थोडे अंधारलेल्या परिस्थितीत, चष्मा लावून किंवा न लावता, दाढी-मिशा ठेवून किंवा न ठेवता अशा अनेक स्थितींमध्ये कसा दिसेल याचाही अंदाज बांधता येतो.
चेहऱ्याचे हे मूळ रूप आणि त्याचे विविध आविष्कार उपलब्ध अशा लाखो ज्ञात चेहऱ्यांच्या प्रतिमांपैकी कोणाशी जुळते हे बघण्याचा शेवटचा टप्पाही तसा किचकट. एकतर त्यासाठी मुळात ज्ञात प्रतिमांचा मोठा साठा हवा, त्याचे गणितीय आरेखन झालेले हवे आणि ते काही क्षणांत जुळवून बघण्याइतपत संगणकीय वेग हवा. फेसबुक, इन्स्टाग्राम, विविध सरकारी खात्यांकडे असलेल्या छायाचित्रांच्या नोंदी, पासपोर्ट, आधारकार्ड अशा अनेक रूपांमध्ये आज असे नावगावानिशी नोंद असलेल्या छायाचित्रांचे महाकाय साठे उपलब्ध आहेत. सोशल साइट्सवर स्वत:ला, दुसºयांना नावाने टॅग करून आपण त्यात दररोज प्रचंड मोठी भर घालत असतो. शिवाय नाव-गावासकट माहिती नसले तरी बऱ्यापैकी माग काढता येऊ शकतील अशी छायाचित्रे घेणाऱ्या सीसीटीव्हीसारख्या व्यवस्था तर आहेतच. त्यामुळे चेहरा ओळखण्याच्या प्रक्रियेतील प्रत्येक टप्प्यावर आज उपयुक्त असे तंत्रज्ञान आणि परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे चेहरा वाचण्याऱ्या तंत्रज्ञानाच्या यशाचे आणि कार्यक्षमतेचे प्रमाण अगदी ९०-९५ टक्क्यांपर्यंत पोहचले आहे. काही विशिष्ट प्रसंगांमध्ये तर हे तंत्रज्ञान मानवी प्रज्ञेवरही सहज मात करू शकते. खोलवरचे नैतिक प्रश्न व्यावहारिक स्वरूपात थेट सामोरे यायला लागतात ते याच टप्प्यावर. चेहरा ओळखून फोनचा पडदा झळाळणे ही तशी किरकोळ बाब. पण हेच तंत्रज्ञान वापरून तुमचा सदैव नावगावानिशी माग काढला जात असेल तर ती आपल्या खासगीपणाशी संबंधित एक मोठी व्यावहारिक समस्या बनते. एका उदाहरणाने ते स्पष्ट होईल...
तुम्ही किरकोळ वाणसामान खरेदीसाठी दुकानामध्ये किंवा मॉलमध्ये जाता. तिथले सीसीटीव्ही कॅमेरे तुमच्या प्रतिमा टिपतात. समजा, याच प्रतिमा या तंत्रज्ञानाचा वापर करून उपलब्ध ज्ञात माहितीसाठ्याशी ताडून बघितल्या तर तुमचे नावगाव, व्यवसाय वगैरे सगळं कळू शकते. फेसबुकवर तुमचे अनंत फोटो हिंदकळत फिरत असतात. पासपोर्टच्या, लायसेन्सच्या, शाळा-कॉलेजच्या, बोर्डाच्या, रुग्णालयांच्या, कार्यालयांच्या अशा अनेक माहितीसाठ्यांमध्ये तुमचे फोटो असतात. त्यामध्ये फोटोसोबतच तुमची वैयक्तिक, शारीरिक, शैक्षणिक, आर्थिक अशी अनेक प्रकारची माहितीही हाती लागते. त्यामुळे वाण्याच्या दुकानात किंवा मॉलमध्ये टिपली जाणारी तुमची प्रतिमा फक्त प्रतिमा न राहता तुमच्या भूतकाळाची आणि वर्तमानाची माहिती मिळवून देऊ शकेल, अशी किल्ली बनते. मॉलमध्ये, रस्त्यात, सार्वजनिक ठिकाणी अनामिक व्यक्ती बनून राहण्याचे तुमचे स्वातंत्र्य, इच्छा, ऊर्मी हे सारेच तंत्रज्ञानामुळे संपुष्टात येऊ शकते. एकदा तुमची अनामिकता, तुमच्यासंबंधीचा खासगीपणा संपुष्टात आला की, मग तुमच्यापर्यंत पोहचण्याचे दरवाजेही खुले होत जातात. मग कोणी तुमच्याकडे वस्तू विकायला येतील, तर कोणी सेवा. कोणी मत मागायला येईल, तर कोणी दान. कोणी पटवायला येईल, तर कोणी घाबरवायला. आणि या प्रत्येक प्रयत्नांमधून तुमचे खासगीपण, तुमची हवीहवीशी, निरूपद्रवी अनामिकता नष्ट होत जाईल.आता हे खरेच आहे की, तंत्रज्ञानाच्या साह्याने चेहऱ्याचे आरेखन करणे हे सोपे असले तरी ते माहितीसाठ्याशी ताडून बघणे इतके सोपे नसते. त्यासाठी मुळात ते माहितीसाठे हाताशी असावे लागतात. वर उल्लेख झालेले माहितीसाठे अनेकदा बाहेरच्यांना इतक्या सहजी उपलब्ध होत नाहीत. पण त्याचसोबत हेही अनेकदा सिद्ध झालेले आहे की, असे माहितीसाठे बाळगणाऱ्या कंपन्या त्यांच्या फायद्यासाठी ते बाहेरच्यांना उपलब्ध करून देतात. अनेकदा व्यवस्थेच्या आतलीच मंडळी त्याची चोरी करतात, अनेकदा हॅकर्स त्यावर डल्ला मारतात. कधी शासनव्यवस्था दरडावून त्या माहितीसाठ्याचा ताबा घेतात किंवा त्याच्या डुप्लिकेट चाव्या मागतात. आणि एकदा हा माहितीसाठा बाहेर आला की त्याच्या हजारो प्रती काढणे एकदम सोपे असते. या प्रत्येकवेळी तुमचे खासगीपण, तुमची अनामिकता मरत जाते.डिजिटल नेटवर्कच्या आजच्या काळात एरवीही तुमचा खासगीपणा कमालीचा धोक्यात आला आहेच. तुमचा मोबाइल तर खासगीपणा-अनामिकता संपवणारे सर्वात मोठे शस्त्र. तुमचा संगणक, तुमची क्रेडिट-डेबिट कार्डे, मोबाइलवरील अॅप्स, घरीदारी असणारे सीसीटीव्ही ही सगळीच आपले खासगीपण संपविणारी कमी-अधिक क्षमतेची शस्त्रेच.अनेकदा आपले सेल्फीवेड, फेसबुक-ट्विटर, इन्स्टाग्राम वगैरेवरील आपले वर्तन जणू आपल्याला काही खासगीपणा-अनामिकता नकोच आहे असे दर्शविणारे. त्यामुळे आपण तसेही फार वेगाने ‘प्रायव्हेट लिमिटेड’पासून ‘पब्लिक अनलिमिटेड’ होत चाललो आहोत. खासगीपणाच्या आपल्या किल्ल्याचे नाव, पत्ता, आवडी-निवडी, मत-मतांतर, आर्थिक क्षमता वगैरेचे बुरूज आधीच ढासळलेत. काही या डिजिटल शस्त्रांमुळे कोसळलेत. काहींना आपण स्वत:हून सुरुं ग लावला. आपला चेहरा हा त्यातला शेवटचा संरक्षक बुरूज होता. आता तोही ढासळतोय.त्यातील गंभीर बाब अशी की, ते थांबवणं आपल्या हातात राहिलेले नाही. अगदी शब्दश: म्हणायचे झाले तर आता तोंड लपवायला जागा शिल्लक राहिलेली नाही. कॅमेऱ्याने वेढलेल्या जगात आता तुम्ही तोंड लपवू शकत नाहीत आणि एकदा का तोंड दिसले, की मग तुमचा इतिहास आणि वर्तमान सार्वजनिक होण्यापासून थांबवू शकत नाही अशी ही व्यवस्था आहे. आणि चेहरा टिपण्यासाठी ना तुमची परवानगी लागते ना तुमच्या जवळ यावे लागते. संरक्षण, खबरदारी वगैरे नावाखाली तुमचे चेहरे टिपायला कोणीच कायद्याने किंवा व्यवहाराने रोखू शकत नाही. तुम्ही गुन्हेगार नसले, गुन्हे करण्याचा तुमचा कोणताही हेतू नसला तरी तुम्ही टिपले जाणार. दररोज आणि सतत..छायाचित्रांचे प्रकरण फक्त एवढ्यावर थांबत नाही. चेहरा हा मनाचा आरसा आहे असे म्हणतात. अगदी शब्दश: नसला तरी त्यात काही तथ्यांश नक्की आहे. आपल्या मनातील खळबळ, भाव चेहºयावर अनेकदा आपल्याही नकळत उमटत असतात. त्यावर बहुतेकवेळा आपले काही नियंत्रण नसते. म्हणूनच चेहरा वाचता येणे म्हणजे मनातील भाव वाचता येण्याची किल्ली सापडणे. चेहरा वाचणारे तंत्रज्ञान तो चेहरा धारण करणाºया व्यक्तीचे फक्त नावच ओळखू शकेल असे नाही तर त्यातील भावही ओळखू शकेल अशा दिशेने वेगाने चालले आहे.देहबोली, मुखाबोली आणि भावावस्था-मानसिकता यांच्यातील संबंध दाखविणारे सिद्धांत उपलब्ध आहे. त्यांचा वापर करून चेहºयाच्या आधारे व्यक्तीच्या मानसिक अवस्थेचा अंदाज बांधू शकणारे सॉफ्टवेअर्स बनू लागले आहेत. त्यांची कार्यक्षमता, अचूकता सध्या जरी मर्यादित असली तरी लवकरच ती बऱ्यापैकी विश्वासार्ह बनू शकतील हे नक्की. जेव्हा ती तशी बनतील तेव्हाची स्थिती ही नक्कीच मायनॉरिटी रिपोर्टसारखी होईल. त्यासाठी कदाचित २०५४ पर्यंत थांबावेही लागणारी नाही.सुरक्षेचा भाग म्हणून काही प्रमाणात खासगीपणाचा त्याग करणे आधुनिक जगातील गरज झाली आहे हे खरेच आहे; पण त्याची मर्यादा काय, त्याचे नियंत्रण कोणाकडे असावे, त्याचे स्थान काय असावे हे प्रश्न आता नुसतेच व्यावहारिक राहिलेले नाहीत. ते राजकीय-सामाजिक आणि नैतिक होत आहेत. आणि प्रत्येक डिजिटल तंत्रज्ञानामुळे आपले शारीरिक-सामाजिक-आर्थिक-सांस्कृतिक आणि भावनिक अस्तित्व जसजसे माहितीच्या तुकड्यांमध्ये रूपांतरित होत जाईल तसतसे आपणही मानवप्राणी न राहता माहितीजंतू (इन्फर्मेशन ऑर्गेनिझम) बनत जाऊ. स्वातंत्र्य, खासगीपणा, अनामिकता या भल्याही मनुष्यप्राण्याच्या गरजा, मूलभूत इच्छा वा ऊर्मी असतील; पण नेटवर्कमध्ये गुंतलेल्या माहितीजंतूना ही श्रीमंती मिळत नसते. आपली प्रतिमा हा त्या मानवीय श्रीमंतीला पडलेले मोठे भगदाड. देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवा या प्रसिद्ध मराठी गाण्यातील ओळीचा आधार घ्यायचा तर म्हणता येते की, चेहऱ्याच्या तिजोरीत ठेवलेला आपला खासगीपणाचा ठेवा आता कोणालाही खुला होऊ लागला आहे. आपलीच प्रतिमा आपलीच वैरी व्हायला लागली आहे...(लेखक समाजमाध्यमांचे अभ्यासक आहेत.)