'पुनश्च'!... हे मराठीमधले पहिलेवहिले डिजिटल नियतकालिक!किरण भिडे या अभ्यासू तरुणाने त्याची निर्मिती केली आहे. हे डिजिटल नियतकालिक वेब पोर्टल आणि अँड्रॉईड अॅपच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहोचते आहे आणि त्याला उत्तम प्रतिसाद मिळतो आहे. रत्नागिरीच्या प्रवासात लोकमान्य टिळकांच्या जन्मस्थळी जतन केलेले त्यांचे अग्रलेख वाचायला मिळण्याचा क्षण एका नव्या उपक्रमाला जन्म देऊन गेला. एरवी हॉटेल व्यवसायात असलेल्या किरण यांची ती पहिलीच ‘केसरी’ भेट होती! जुने कालसुसंगत संदर्भ वाचायला मिळणे हा किती दुर्मीळ आनंद आहे हे जाणवल्यावर त्यांना मग छंदच लागला.. जुने लेख शोधून वाचण्याचा, स्वत:च्या विचारांना समृद्ध करण्याचा.
बाळशास्त्री जांभेकरांनी काढलेले पहिले दर्पण वृत्तपत्र, पूर्ण मराठीतले पहिले वृत्तपत्र मुंबई अखबार, भाऊ महाजनांचे प्रभाकर व त्यातील लोकहितवादींची शतपत्रे.. इथपासून नियतकालिकांची उज्ज्वल अशी प्रतिभासंपन्नतेची परंपरा धुंडाळणे किरण भिडे यांनी सुरू केले. १९०९ ला का. र. मित्र यांनी काढलेल्या पहिल्या दिवाळी अंकापासूनचे महाराष्ट्रात प्रकाशित होणारे सारे दिवाळी अंक, सत्यकथा, ललित, ‘मुद्राराक्षसाचा विनोद’ किंवा ‘उपसंपादकाच्या डुलक्या’ अशी सदरे असलेले अमृत, विचित्र विश्व, महाराष्ट्राच्या सामाजिक वाटचालीचा दस्तावेज असलेले माणूस... या साºया साहित्याचे डिजिटायझेशन करता आले तर ते नष्ट होणार नाही, चिरंतन राहील हा विचार करून भिडे यांनी या साहित्याच्या डिजिटायझेशनसाठी पुढाकार घेतला आणि हे शिवधनुष्य उचलले.
या प्रयत्नांचे वेगळेपण आणि महत्त्व जपले जावे म्हणून त्यासाठी अत्यल्प वर्गणी ठेवली. ती भरू इच्छिणाºया वाचकांनाच त्यात सामील करून घ्यायचे ठरवले. त्यातून निवडक पण चोखंदळ मंडळी आॅनलाइन जोडली गेली. त्या सा-यांपर्यंत हा वैचारिक ठेवा पोहोचण्याची सिद्धता झाली. या प्रयत्नांना मूर्तरूप आले आणि ‘पुनश्च’ नावाने संकेतस्थळ साकारले. वेबसाइटवर आणि अॅपवर हे लेख वाचण्याची, त्याच्यावरील प्रतिक्रिया वाचण्याची आणि सोशल मीडियावर शेअर करण्याची सुविधाही उपलब्ध झाली. रुपयाला एक इतक्या कमी शुल्कात शेकडो लेख त्यांनी या माध्यमातून जगासमोर आणले आहेत. पहिले सशुल्क डिजिटल नियतकालिक म्हणून त्याचे महत्त्व निश्चितपणे वेगळे आहे.संकेतस्थळ : http://punashcha.com/