-अंकुश काकडे - साधारणत: पुणे शहरात असलेली सिनेमागृहे ही मध्यवस्तीतच होती. त्याचं कारणही असं, की मंडईत आपला शेतमाल, भाजीपाला विक्रीला आणायचा आणि फावल्या वेळेत विरंगुळा म्हणून सिनेमा पाहायचा. त्यामुळे फुले मंडईजवळ असलेले आर्यन, मिनर्व्हा ही चित्रपटगृहे फारच प्रसिद्ध होती. संभाजी पुलाजवळील अलका थिएटर, डेक्कन जिमखान्यावरील डेक्कन थिएटर, तर थोडे जवळच हिंदविजय सिनेमा, लालमहालासमोर वसंत टॉकीज येथे मॉल होऊन वसंत थिएटर झालं. फरासखान्यासमोर पूर्वीचे पॅरामाउंट थिएटरचे नाव आता रत्न चित्र मंदिर झालं. जुन्या शिवाजी रोडवरील ग्लोब पुढे श्रीनाथ थिएटर म्हणून, बुधवार पेठेतील विजयानंद श्रीकृष्ण, नारायण पेठेतील विजय चित्र मंदिर, भानुविलास थिएटर, शनिवार पेठेतील अप्पा बळवंत चौकातील प्रभात सिनेमा (किबे लक्ष्मी थिएटर), पुढे लक्ष्मी रस्त्यावर नाना पेठेत न्यू शिरीन (हल्लीचं अल्पना), रास्ता पेठेतील अपोलो, भवानी पेठेतील छाया (सध्याचं भारत थिएटर), भवानी पेठेतच असलेलं निशांत, येरवड्यातील गुंजन, तर घोरपडी गावातील अनंत, याशिवाय कॅम्प परिसरात असलेलं कॅपिटल, वेस्टएंड, एम्पायर, लिबर्टी अशी मोजकी चित्रपटगृहे; पण ती फक्त इंग्रजी सिनेमांसाठी जणू काही राखीव ठेवलेली. अशी हाताच्या बोटांवर मोजण्याइतकीच चित्रपटगृहे आपणास पाहावयास मिळत. पुढे १९५० च्या नंतर शहर वाढत गेल्यावर मग गणेशखिंड रस्त्यावरील राहुल सिनेमा, नव्या पुलाजवळील मंगला थिएटर, रेल्वे स्टेशनजवळील अलंकार, सातारा रस्त्यावरील लक्ष्मीनारायण, भवानी पेठेतील सोनमर्ग, डायस प्लॉटजवळील अप्सरा, सदाशिव पेठेतील नीलायम ह्या चित्रपटगृहांची भर पडली.अर्थात, १९६० पूर्वीच्या बहुतेक चित्रपटगृहांत ३५ एमएम पडदा असे. ती वातानुकूलित नसत. मोठमोठे पंखे तेही मोठा आवाज करणारे, छोटी-छोटी (अ)स्वच्छतागृहे असं त्याचं स्वरूप. आतमध्ये बहुतेक चित्रपटगृहांत पत्र्याची लोखंडी बाकं (सध्या मनपातर्फे रस्त्यांवर बसवतात तशी बाकं) पण पुढे तंत्रज्ञान बदलत गेलं. साधी साऊंड सिस्टिम बदलून नवीन साऊंड सिस्टिम डॉल्बीची सुरुवात झाली. बहुतेक चित्रपटगृहांतील ३५ एमएमच्या पडद्याची जागा ७० एमएम पडद्यांनी घेतली. जिमखान्यातील त्या वेळच्या हिंदविजय थिएटरचे नूतनीकरण होऊन तेथे ७० एमएम पडदा व डॉल्बी साऊंड सिस्टिम सुरू झालेलं ते पहिलं चित्रपटगृह असावं. त्याचं नावही बदललं गेलं. त्याचं नामकरण झालं नटराज नावानं. आजही त्याच नावानं ते ओळखलं जात. खरं तर आता तेथे मोठं व्यापारी संकुल झालंय; पण छोटे मिनी थिएटर आहेच. पूर्वीच्या काळी फक्त ३ खेळ होत. दुपारी ३, ६, ९ अशी वेळ असे. पुढे त्यात दुपारी १२ चा खेळ सुरू झाला आणि आता तर मॉर्निंग शो सकाळी ९ वाजता चित्रपटगृहे उघडू लागली. त्यातही काही चित्रपटगृहे ही मराठी सिनेमांची माहेरगृहे म्हणून त्यांची ओळख. त्यात मंडईतील आर्यन, मिनर्व्हा, प्रभात, विजय, भानुविलास, विजयानंद अशा चित्रपटगृहांत फक्त मराठी सिनेमाच असे. मंडईतील आर्यन चित्रपटगृहाचा इतिहासही मोठा आहे. पुणे शहरातलं ते पहिलं चित्रपटगृह. पाठक यांचं ते चित्रपटगृह. या चित्रपटगृहात ‘सांगत्ये ऐका’ हा चित्रपट तब्बल ३ वर्षे होता. त्याचं रेकॉर्ड आता तर कोणीच मोडू शकत नाही. पुढे मंडईत होणारी गर्दी, वाहतूक समस्या यामुळे त्या आर्यनवर पार्किंगच्या आरक्षणाची बला आली. बिच्चारे पाठक थिएटर वाचवण्यासाठी अनेक मंत्री, खासदार, आमदार, नगरसेवक यांचे उंबरे झिजवत होते; पण मुदतवाढ याशिवाय कोणीच काही मदत करू शकले नाहीत. अगदी सर्वोच्च न्यायालयापर्यंत बिचारे पाठक लढले; पण त्यात त्यांना यश आले नाही. आज तेथे बाबू गेनू पार्किंग उभे आहे. आजही जुन्या लोकांना तेथे गेल्यावर तेथील जुनी आर्यनची इमारत डोळ्यांसमोर येते. तसाच इतिहास सध्या मिसाळ पार्किंगचा आहे. तेथे असलेलं मिनर्व्हा हेदेखील कै. मामासाहेब मोहोळ यांचे चित्रपटगृह काळाच्या पडद्याआड गेलं. अनेक चित्रपटगृहांचा वाद हा न्यायालयात गेला होता. त्यात किबे यांचे प्रभात चित्र मंदिर. पण त्यांनी मात्र चित्रपटगृह बंद न करता चालू ठेवलंय हेदेखील वाखाणण्यासारखं आहे. भानुविलास, विजयानंद, निशांत या वास्तू आजही तेथे आहेत; पण तेथे आता चित्रपट प्रदर्शित होत नाहीत. काही जुन्या चित्रपटगृहांची जागा बदलत्या काळानुसार बदलली आहे, तर काही मल्टिप्लेक्समध्ये समाविष्ट झाली आहेत. आता बदलत्या काळात चित्रपटगृह ही संकल्पना पूर्ण बदलून गेली, मल्टिप्लेक्स ही संकल्पना जोर धरू लागली. मल्टिनॅशनल कंपन्यादेखील यात येऊ लागल्या. १०० रुपयांपेक्षा कमी तिकीट नाही. पण आजही आपल्या लक्षात येईल, सारसबागेपासून ते खडकवासल्यापर्यंत; तर इकडे कर्वे रस्त्यावरून चांदणी चौकापर्यंत तर तिकडे पुणे विद्यापीठापासून पाषाण, बाणेर, औंधपर्यंत आणि पूर्वेकडे शंकरशेठ रोडवरील अप्सरा सोडलं तर हडपसर येथे वैभवपर्यंत एकही सिनेमागृह नाही. (लेखक प्रसिद्ध राजकीय-सामाजिक कार्यकर्ते आहेत.)
पुणेरी कट्टा- काळाच्या पडद्याआड गेलेली चित्रपटगृहे
By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2018 3:37 PM
पुण्यात काही चित्रपटगृहांना तर १०० वर्षांचा वारसाही होता. बदलत्या परिस्थितीत जसा ३५ एमएमचा पडदा काळाच्या पडद्याआड गेला, तशी ही काही चित्रपटगृहेही कायमची सोडून गेली. काही आपलं रूप बदलून आजही टिकून राहण्याचा प्रयत्न करीत आहेत.
ठळक मुद्दे१९६० पूर्वीच्या बहुतेक चित्रपटगृहांत ३५ एमएम पडदामंडईतील आर्यन चित्रपटगृहात ‘सांगत्ये ऐका’ हा चित्रपट तब्बल ३ वर्षेआता बदलत्या काळात चित्रपटगृह ही संकल्पना पूर्ण बदललेली