- दिनकर रायकर
लोकांसाठी झटणो आणि
त्यांच्यासाठी उपलब्ध राहणो हाच धर्म मानलेले रामभाऊ
राजकारण आणि समाजकारणात
निधर्मी राहिले.
राजकीय वादंग निर्माण करणा:या
बेलगाम विधानांमुळे नव्हे,
तर कामातून बातमीत राहिले.
त्यांचे पत्रक आले, आणि
त्यात बातमी नव्हती, असे झाल्याचे
मला आठवत नाही.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या संसदीय कारकिर्दीचा मूलमंत्र आणि त्याचा उगम याच आठवडय़ाच्या सुरुवातीला मुंबईत झालेल्या एका आगळ्यावेगळ्या प्रकाशन सोहळ्यात सांगून टाकला. ही दीक्षा फडणवीसांनी ज्या राम नाईक यांच्याकडून घेतली, त्यांच्याच प्रदीर्घ वाटचालीचा धांडोळा असलेल्या पुस्तकाच्या प्रकाशनाचा तो सोहळा होता. हा कार्यक्रम, त्याला असलेली पक्षभेदापलीकडची उपस्थिती आणि स्वत: राम नाईक यांची राजकीय कारकीर्द या सा:याच्या निमित्ताने तीन-चार दशकांचा कालखंड माङया डोळ्यांपुढे तरळला. आणि जे शाश्वत असते, ते किती चिरंतन असते, याची जाणीवही प्रकर्षाने झाली. एखादा राजकारणी अष्टौप्रहर लौकिकार्थाने ज्याला राजकारण म्हणतात, त्याच्या पलीकडचे आयुष्य जगू शकतो का, या प्रश्नाचे होकारार्थी उत्तर मला राम नाईक नावाच्या भाजपा नेत्याच्या राजकीय वाटचालीतून सापडते.
मुख्यमंत्री म्हणाले, ‘‘रामभाऊंना कदाचित आठवतही नसेल, पण मी पहिल्यांदा विधानसभेत निवडून गेलो, तेव्हा माङयासारख्या नव्या आमदारांसाठी पक्षाने दिल्लीत प्रशिक्षण वर्ग ठेवला होता. त्यात संसदीय आयुधांचा प्रभावी वापर कसा करायचा याविषयी रामभाऊंनी मार्गदर्शन केले होते. विधानसभेत असाल तेव्हा मतदारसंघाचा विचार करा आणि मतदारसंघात असाल तेव्हा विधानसभेचा विचार करा..’’
मुख्यमंत्री म्हणतात, याचे तंतोतंत पालन केले म्हणूनच मी यशस्वी झालो. विधानसभेचे कामकाज चालू असताना आपल्या मतदारसंघाचा विचार डोक्यात असतो आणि मतदारसंघात फिरताना दिसलेले, जाणवलेले विषय विधानसभेत कोणत्या पद्धतीने मांडावेत, याचा विचार मनात घोळत राहतो. हे केवळ रामभाऊंनी दिलेल्या मंत्रमुळे शक्य झाले.
मुंबईत झालेल्या या कार्यक्रमातून काही गोष्टी अधोरेखित झाल्या. एक तर एखाद्या कर्मयोग्याचे त्याच्या मूळ कर्मभूमीशी जडलेले नाते कायम तितकेच घट्ट राहते. दुसरे असे की, राजकीय अभिनिवेशाविना राजकारण करणा:यांना पक्षभेदाच्या भिंतींचा अडसर निर्माण होत नाही आणि तिसरी महत्त्वाची बाब म्हणजे पेराल तेच उगवते, याची प्रचिती चांगुलपणाच्या बाबतीतही आल्याविना राहत नाही.
रामभाऊ आजमितीस उत्तर प्रदेशसारख्या राजकीयदृष्टय़ा कमालीच्या महत्त्वाच्या आणि संवेदनशील राज्याचे राज्यपाल आहेत. मूलत:
रा. स्व. संघाचा हाडाचा कार्यकर्ता असलेला हा माणूस जनसंघाच्या संघटनानिमित्ताने राजकारणात आला. जनसंघ ते भाजपा या वाटचालीत मुंबईसारख्या शहरात महत्त्वाची भूमिका बजावत राहिला. संघटनमंत्री ते केंद्रीय मंत्री असा मोठा पल्ला गाठू शकला.
- या सा:या प्रवासाचा पत्रकार म्हणून मी साक्षीदार आहे. मला या कार्यक्रमाच्या निमित्ताने आणखी एक बाब प्रकर्षाने जाणवली. ती अशी, की दीर्घकाळ राजकारण केल्यानंतर राज्यपाल झालेल्या रामभाऊंच्या पुस्तकाच्या प्रकाशनाला महाराष्ट्राच्या एक-दोन नव्हे, तर तब्बल तीन माजी मुख्यमंत्र्यांनी उपस्थितीसाठी होकार दिला. संसदेच्या अधिवेशनाच्या पाश्र्वभूमीवर सुरू असलेल्या घडामोडींपायी शरद पवार येऊ शकले नाहीत. पण सुशीलकुमार शिंदे आणि मनोहर जोशी हजर राहिले. माङया मते रामभाऊंनी कधी द्वेषमूलक राजकारण केले नाही, त्याचाच तो परिपाक आहे.
तसे पाहिले, तर डाव्या आणि समाजवादी विचारसरणीच्या राजकारणाने संघाच्या मुशीतून आलेल्यांना काहीसे आकसानेच वागविले. रामभाऊंच्या संसदीय कारकिर्दीचा काळ हा समाजवादी आणि साम्यवादी विचारांच्या प्रभावाचा काळ होता. म्हणजे त्यांच्या विचारसरणीसाठी प्रतिकूलच. राममनोहर लोहिया, जयप्रकाश नारायण यांच्या विचारांचे गारुड, तशात बॅ. नाथ पै, मधू लिमये, प्रा. मधू दंडवते यांच्या संसदीय कारकिर्दीचा, मृणालताई गोरे, बापूसाहेब काळदाते यांच्यासारख्या नेत्यांचा दबदबा अशा वातावरणात रामभाऊंची कारकीर्द सुरू झाली. ती बहरली आणि बळकटही झाली.
सांगली जिल्ह्यातील आटपाडीसारख्या खेडय़ातून चरितार्थासाठी रामभाऊ मुंबईत आले, तेव्हा या अफाट मायानगरीत त्यांना फक्त एक माणूस ओळखत होता. आजमितीस मुंबईतील लाखो लोक त्यांना नावाने, चेह:याने ओळखतात. त्यांची पहिली नोकरी मुंबईला ए.जी.च्या म्हणजे अकौंटंट जनरलच्या कचेरीतली. हाच माणूस पुढे देशाच्या पब्लिक अकौंट्स कमिटीचा (पीएसी) चेअरमन झाला. विद्यार्थीदशेत पुण्यात सकाळी सायकलवरून पेपर टाकणारा हाच माणूस पुढे कष्टाने मोठा झाला आणि कायम वर्तमानपत्रंमधून झळकत राहिला. या दोन टोकांच्या मधले अंतर त्यांनी कसे कापले, ते मला पाहता आले.
रामभाऊ हे त्यांच्या स्वभाव आणि पिंडामुळे अशा दुर्मीळ कार्यकत्र्याच्या भूमिकेत शिरले आणि लौकिकार्थाने नेते बनल्यावरही कार्यकत्र्यासारखेच साधेपणाची श्रीमंती वागवत राहिले. त्यांच्यातील नेतृत्व आणि संघटन कौशल्याला सभ्यता आणि शिस्तीची जोड लाभली. शिवाय ते मोठे बनल्यावरही कायम छोटय़ातल्या छोटय़ा माणसाचा विचार करीत राहिले. पं. दीनदयाळ उपाध्यायांच्या अंत्योदयाची कल्पना कोणाला उमगली, या प्रश्नावर मी छातीठोकपणो रामभाऊंकडे बोट दाखवू शकतो.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, तशी संसदीय आयुधे रामभाऊंनी मोठय़ा खुबीने वापरली. पण त्याचा वापर त्यांनी प्रामुख्याने सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी केला. रामभाऊ 1978 साली पहिल्यांदा बोरिवलीतून आमदार झाले, तोवर मी इंग्रजी पत्रकारितेत ब:यापैकी स्थिरावलो होतो. आमच्या सुदैवाने त्याकाळी संख्येने कमी असले, तरी विरोधक कमालीचे प्रभावी होते. रामभाऊ हे त्यापैकीच एक. मुंबईसारख्या शहरात त्यांनी दुमजली संडास, झोपडपट्टय़ांमध्ये कूपनलिका, गोराई-मनोरीला जाण्या-येण्यासाठी बेस्टची लाँच वाहतूक असे अनेक उपाय करून दाखविले. मुख्य म्हणजे त्यासाठी त्यांनी अर्धा तास चर्चेसारख्या संसदीय आयुधाचा खुबीने वापर केला. पूर्वी कोणाचेही लक्ष न गेलेले विषय त्यांना कायम दिसत राहिले, खुणावत राहिले. ते मार्गी लावण्यासाठी ते झटतही राहिले. तीनदा आमदार आणि पाचदा खासदार अशी लोकप्रतिनिधित्वाची प्रदीर्घ कारकीर्द त्यांनी लोकांसाठी कारणी लावली. म्हणूनच पेट्रोलियममंत्री बनल्यानंतर 5क् वर्षे विजेपासून वंचित राहिलेल्या अर्नाळा किल्ल्याला प्रकाशाची भेट देण्याचा, मुंबईच्या हद्दीत असूनही पाण्यासाठी तहानलेल्या गोराई-मनोरीकरांसाठी समुद्राखालून पाइपलाइन टाकण्याचा, दुर्गम भागासाठी पाच किलोचा हलका सिलिंडर देण्याचा विचार त्यांना सुचला. कुष्ठरोगी, मच्छिमार यांचा ते सातत्याने विचार करीत राहिले.
रामभाऊंचा जनसंपर्कही लोकविलक्षण आहे. एरवी ते जेवणावळी, पाटर्य़ामध्ये दिसणार नाहीत. पण तरीही त्यांचा संपर्क टिकून असतो. ऊठसूट भेटायला न येणारे किंवा वायफळ गप्पा न छाटणारे रामभाऊ भेटतात, तेव्हा त्यांच्या सहृदयतेचा परिचय देऊन जातात.
मला कर्करोगाने घेरल्याचे कळल्यावर ते मला आवजरून भेटायला आले. स्वत: या रोगावर मात केलेल्या रामभाऊंनी अधिकारवाणीने मला लढण्याची त्रिसूत्री सांगितली. ते म्हणाले, लढण्याची जिद्द आणि इच्छा, कुटुंबाची साथ आणि लोकांच्या सदिच्छा हव्यात. ती त्रिसूत्री माङया कामी आली.
मुखमंत्र्यांचे भाषण ऐकताना मला जाणवले, ..अरेच्च ही त्रिसूत्रीच तर रामभाऊंचे जीवन आहे..
(चार दशकांहून अधिकच्या पत्रकारितेचा दीर्घ अनुभव असलेले लेखक ‘लोकमत’चे समूह संपादक आहेत.)