शहरं
Join us  
Trending Stories
1
संजूचं शतक; आफ्रिकेत फिरकीची 'करामत' अन् सूर्याच्या कॅप्टन्सीत टीम इंडियाचा विजयी धडाका कायम!
2
ठाण्यात बिल न देता हॉटेलात जायची सवय तेच दावोसमध्ये केले; जयंत पाटलांचा शिंदेंना जोरदार टोला 
3
रावेरचे माजी आमदार आर. आर. पाटील यांचे निधन
4
मिस्ट्री स्पिनरची जादू; दक्षिण आफ्रिकेच्या ताफ्यातील स्फोटक फलंदाज ठरले फुसका बार!
5
मी शिवसेना सोडली तेव्हा ३५ आमदार, १५ खासदार माझ्याकडे आलेले...; राज ठाकरेंचा एकाच वाक्यात उद्धव, शिंदेंवर नेम
6
Aiden Markram नं रुबाब दाखवला; पण Arshdeep Singh समोर तो फिका ठरला (VIDEO)
7
फुटबॉल सामन्यावेळी इस्रायली नागरिकांवर हल्ला; १२ जखमी, नेतन्याहूंनी नेदरलँडला विमाने पाठविली
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'समोरासमोर चर्चेला तयार', पृथ्वीराज चव्हाणांचं अमित शाहांना खुलं चॅलेंज
9
Sanju Samson ची सेंच्युरी! एका डावात ३ खास रेकॉर्ड्सला घातली गवसणी
10
फक्त एक षटकार मारला त्यातही सुर्या भाऊची हवा! IPL मधील २१ कोटींचा सिक्सर किंग पडला मागे
11
जानेवारीमध्ये भाजपला मिळणार नवीन राष्ट्रीय अध्यक्ष; 22 नोव्हेंबरला दिल्लीत महत्वाची बैठक
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महिलांबाबत अपमानास्पद वक्तव्यावर निवडणूक आयोग ॲक्शमोडवर,अधिकाऱ्यांना दिल्या कारवाईच्या सूचना
13
निमलष्करी दलाच्या अधिकाऱ्यांच्या रेशन मनी भत्त्याला कात्री; दर महिन्याला ४००० रुपयांचे नुकसान
14
कोणाचा फोटो लावायचा, हा आमचा निर्णय; मोदींचा फोटो न लावण्यावरुन नवाब मलिक स्पष्ट बोलले
15
"...तोपर्यंत त्यांचा निर्णय बदलणार नाही"; अजित पवारांना परत घेण्याबद्दल शरद पवारांचं विधान
16
जम्मू-काश्मीरच्या सोपोरमध्ये सैन्याची मोठी कारवाई; दोन दहशतवाद्यांचा खात्मा
17
"...तर बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंना गोळ्या घातल्या असत्या"; नारायण राणेंचं विधान
18
ऐकावं ते नवलच! १२ वर्षे जुन्या कारचे अंत्यसंस्कार, चार लाख खर्च करुन बांधली समाधी
19
सध्यातरी इतकेच महायुतीत ठरले...; अमित शाह यांच्या मुख्यमंत्री नावाच्या दाव्यावर प्रफुल्ल पटेलांची प्रतिक्रिया
20
"अरे देवा...", राहुल-अथियाने दिली गुडन्यूज; सूर्यकुमारची पत्नी देविशाच्या कमेंटनं मात्र वेधलं लक्ष

इतिहासकार रामचंद्र गुहा यांना भावलेले ‘अटल’ कसे होते?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2018 3:00 AM

वाजपेयींनी पराकोटीची सांप्रदायिक भूमिका असलेल्या पक्षाचे आणि कडव्या विचारधारेचे नेतृत्व निभावले, हे खरे! - पण राजकीय जीवनात स्वीकारलेल्या विचारधारेला त्यांनी स्वत:मधल्या सुसंस्कृत मार्दवाच्या जिवंत माणुसकीवर कधीही स्वार होऊ दिले नाही, हेही तितकेच खरे! मी आयुष्यभर हिंदुत्ववादी विचारांचा विरोधक राहिलो आहे. पण एक कबुली देतो.जेव्हा जेव्हा अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांचे चेहरे दिसतात आणि विचार ऐकू येतात, तेव्हा तेव्हा मला जुन्या दिवसांची आठवण येते. कधीकाळी या राजकीय प्रवृत्तीचा औपचारिक आणि प्रतीकात्मक का असेना; पण चेहरा वेगळा होता.त्याचे हृदय कवीचे होते आणि वृत्ती दिलदारीची होती.नाव :अटलबिहारी वाजपेयी!

-रामचंद्र गुहा

कविता आणि एककल्ली कडवेपण यांची संगत तशी विसंगतीचीच ! मिश्कील विनोद आणि दुराग्रह हेही परस्परांशी सुसंगत नव्हेत. म्हणजे असे की मार्क्‍सवाद्यांवर विनोद केले जातात; पण मार्क्सवादी विनोद असू शकत नाहीत. धर्मगुरुंची खिल्ली उडवणारी कवने लिहिली जातात, पण कविता वाचणारे धर्मगुरु तुरळक आणि स्वत: लिहिणारे तर बिरळाच!

- अटलबिहारी वाजपेयी नावाचे गृहस्थ तब्बल दहा वेळा लोकसभेत निवडून येण्याचा मान मिळवणारे अव्वल राजकारणी नसते आणि या देशाचे पंतप्रधान म्हणून तीन वेळा निवडले गेले नसते, तरीही अतीव संवेदनशील कविता लिहिणारा ‘स्वयंसेवक’ म्हणून.. खळखळत्या नर्म विनोदाची उत्तम जाण असणारा र्ममज्ञ ‘हिंदुत्ववादी’ म्हणून त्यांचे नाव या देशाच्या इतिहासात कोरले गेलेच असते याविषयी माझ्या मनात तिळमात्रही शंका नाही.

वाजपेयींच्या निधनाने वत्सल कुटुंबप्रमुखाचे छत्र हरपलेले त्यांचे निकट कुटुंबीय पोरकेपण अनुभवतील. राष्ट्रीय स्वयंसेवक संघातले त्यांचे जुने सहकारी, तरुण अनुयायी, संघाच्या शाखा आणि पक्षाच्या विविध समित्यांमध्ये - केंद्रीय मंत्रिमंडळात त्यांच्यासोबत काम केलेले त्यांचे सहकारी आपल्या ज्येष्ठ मार्गदर्शकाला मुकल्याचा शोक करतील. वाजपेयींच्या संस्कारांमध्ये, सहवासामध्ये भरण-पोषण झालेल्या अनेकांच्या वाट्याला आपल्या गुरुच्या वियोगाचे दु:ख येईल.

- पण दुर्दैवाने कधीही वाजपेयींना समक्ष न भेटलेल्या माझ्यातल्या इतिहासकाराला दु:ख आहे ते आधुनिक भारताच्या इतिहासातल्या नेहरू-कालखंडाशी जोडला गेलेला अखेरचा आणि महत्त्वाचा दुवा निखळून पडल्याचे !आज पंडित नेहरुंबद्दल बोलणार्‍या कित्येकांनी नेहरूंना व्यक्तीश: तर पाहिलेले नाहीच. नेहरूंचा वारसा आणि त्यांचे कर्तृत्व यांचीही वास्तव जाण-साधी माहितीही त्यांना नसण्याचीच शक्यता जास्त! खुद्द वाजपेयींचा मात्र नेहरूंशी उत्तम परिचय होता, त्यांनी नेहरूंबरोबर काम केले होते. संसदेच्या सभागृहात आणि बाहेरही नेहरूंसोबत कडव्या लढायांचे दोन हात केले होते.. आणि तरीही त्यांच्या मनात नेहरूंबद्दल नितांत आदर होता.

वाजपेयींचा जन्म ग्वालियरचा. ग्वालियर आणि कानपूरमध्ये ते शिकले. 1951 साली डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी भारतीय जनसंघाची स्थापना केली तेव्हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने वाजपेयींना त्यांच्यासोबत पाठवले. अल्पावधीतच या उमेदीच्या तरुणाशी डॉ. मुखर्जींचा स्नेह जुळला, ही वाजपेयींच्या सार्मथ्याची खूणच होती.त्यानंतर दोनच वर्षांनी श्यामाप्रसाद मुखर्जींनी धुमसत्या काश्मीरच्या खोर्‍यात जाण्याचा निर्णय घेतला तेव्हा दिल्लीहून निघालेल्या रेल्वेत त्यांच्यासोबत होते अटलबिहारी वाजपेयी. अनेक संदर्भ (विशेषत: विकिपेडिया) सांगतात, की काश्मीरच्या खोर्‍याला भेट देणार्‍या भारतीय नागरिकांना मिळणार्‍या परकेपणाच्या वागणुकीचा निषेध म्हणून डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी काश्मीरमध्ये आमरण उपोषण पुकारले आणि पुढे त्यातच त्यांचा अंत ओढवला तेव्हा वाजपेयी त्यांच्यासोबत होते.

हे सत्य नाही.

डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जींचा मृत्यू ओढवला तो त्यांचे आरोग्य खालावल्यामुळे. डॉ. मुखर्जींनी खो-यात प्रवेश करायचा निर्णय घेतला तेव्हा पठाणकोटला मागे राहिलेले वाजपेयी मृत्यूप्रसंगी त्यांच्यासोबत नव्हते.

- तरीही एक गोष्ट स्पष्ट होतेच.

इतक्या महत्त्वाच्या मोहिमेवर डॉ. मुखर्जींबरोबर पाठवले गेलेले तरुण वयातले वाजपेयी भारतीय जनसंघाच्या दृष्टीने भविष्यातला एक महत्त्वाचा मोहरा ठरले होते.

1957 साली वाजपेयी पहिल्यांदा लोकसभेत निवडून आले. त्यानंतरच्या दशकभरात त्यांनी जनसंघाची ध्येयधोरणे आग्रहीपणे मांडणारा प्रभावी वक्ता म्हणून सभागृहात आणि सभागृहाबाहेरही ख्याती प्राप्त केली. शेजारी चीनशी कडवे शत्रुत्व, अमेरिकेशी सर्व स्तरांवर जवळिकीचे प्रयत्न आणि लघुउद्योगांचे हितरक्षण करणार्‍या धोरणांची जोरकस पाठराखण अशी जनसंघाची त्रिसूत्री या काळात वाजपेयींनी अत्यंत आग्रहीपणाने पुढे रेटती ठेवली. त्या काळात मुस्लीम द्वेषाला मागे सारून जनसंघाच्या अजेंड्यावर या तीन महत्त्वाच्या गोष्टी होत्या.

नेहरूंचे निधन झाले, तेव्हा त्यांच्या विरोधात सर्व अस्त्रे सतत परजून असलेल्या तरुण वाजपेयींनी राज्यसभेत नेहरूंना श्रद्धांजली वाहणारे अत्यंत उत्कट असे भाषण केले होते. या भाषणात ‘अशक्य ते शक्य आणि असाध्य ते साध्य करण्याची अद्वितीय क्षमता असलेल्या’ नेहरूंची तुलना वाजपेयींनी प्रभुरामचंद्राशी केली होती. कडव्या वृत्तीच्या जनसंघाचे नेतृत्व करणारे तरुण, तडफदार वाजपेयी नेहरूंविषयी आपल्या भावना व्यक्त करताना म्हणाले होते, ‘त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची प्रखर ताकद, उन्मुक्त स्वातंत्र्याची आस असलेल्या त्यांच्या मनाचे उमदे तेज, विरोधक आणि शत्रूशीही मैत्री करण्याची त्यांची दिलदारी, त्यांची सुसंस्कृत अभिजातता आणि व्यक्तित्वाचे ते थोरपण - कदाचित भविष्यात आपल्या प्रत्ययाला येणार नाही.’

पक्षनिष्ठेपेक्षा उमद्या मनाच्या दिलदारीचा प्रत्यय देणारे वाजपेयी या भाषणात झळाळून उठलेले दिसले. असे प्रसंग वाजपेयींच्या राजकीय-सामाजिक जीवनात पुढे वारंवार आलेले दिसतात.

एक महत्त्वाचा प्रसंग आहे तो नोव्हेंबर 1966चा. गोहत्याबंदीचा कायदा संमत करावा यासाठी संतप्त साधूंचा एक जथा थेट संसदेवर चाल करून आला होता. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि जनसंघाचे अन्य बिनीचे नेते मूग गिळून बसलेले असताना वाजपेयींनी मात्र एक पत्रक प्रसिद्ध करून या आक्रमक आततायीपणाला आपला ठाम विरोध प्रदर्शित केला होता. त्या पत्रकात त्यांनी म्हटले होते, ‘गोहत्याबंदीच्या मागणीसाठी आक्रस्ताळ्या हिंसक मार्गाचा अवलंब       करणा-यानी आपल्या या बेमुर्वत कृत्याने मूळ उद्देशालाच हरताळ फासण्याचे पातक केले आहे’.

डिसेंबर 1992मध्ये बाबरी मशीद उद्ध्वस्त झाल्यानंतर वाजपेयींनी व्यक्त केलेली तीव्र शरमेची भावना आणि गुजरात दंगलींच्या समरप्रसंगी स्वपक्षीय मुख्यमंत्र्यांना करून दिलेली ‘राजधर्म पाळण्याची आठवण’ या दोन प्रमुख घटनांचा उल्लेख स्वपक्षीय संकुचित हटवादापासून स्वत:ला निग्रहाने दूर ठेवण्याच्या वाजपेयींच्या प्रयत्नांचा दाखला देताना केला जातो. त्याही आधी वाजपेयींनी गोहत्याबंदीसाठी हिंसक मार्ग स्वीकारण्याला दिलेली ही चपराक मात्र काहीशी विस्मृतीत गेली आहे.

1971च्या बांग्लादेश युद्धानंतर वाजपेयींनी इंदिरा गांधींना ‘दुर्गा’ संबोधून त्यांच्या कर्तृत्वाला दाद दिल्याचा सार्वजनिक समज आहे, तो खरा नव्हे. इंदिरा गांधींना हे संबोधन दिले ते एका काँग्रेस खासदाराने. त्यानंतर ख्यातनाम चित्रकार एम. एफ. हुसेन यांनी दुर्गावतारातली चित्रे रंगवून या संबोधनाला अमरत्व दिले. 1970चे दशक इंदिरा गांधींचे होते हे खरे. त्यांचा विजयरथ चौखुर दौडत असताना विरोधी बाकांवर असलेल्या वाजपेयींना आपली अवघी कारकीर्द सरकारबाहेर विरोधातच जाणार असे वाटून गेले असल्यास नवल नव्हे. पण या दशकाच्या अखेरीस आणीबाणी लादली गेली आणि त्या कालखंडातल्या सार्वत्रिक अतिरेकातून फुटलेल्या संतापातून 1977 साली विरोधकांच्या एकजुटीला सत्तेवर येण्याची वाट मोकळी झाली.

या सरकारात वाजपेयी परराष्ट्र मंत्री झाले. जनसंघातून मुळे रुजलेल्या या नेत्याने आपल्या कार्यकाळात शेजारी पाकिस्तानशी संबंध सुधारण्यासाठी प्रयत्न केले आणि अमेरिकेशीही नव्याने नाते जुळवण्याची खटपट केली. या दरम्यान घडलेली (आणि पुष्कळशी अपरिचित राहिलेली) एक घटना वाजपेयींच्या उमद्या स्वभावावर लख्ख प्रकाश टाकणारी आहे. कॉँग्रेसचे कठोर विरोधक असलेल्या वाजपेयींनी परराष्ट्र मंत्रालयाची सूत्रे घेतल्यावर तिथल्या कुणा राजापेक्षा राजनिष्ठ बाबूने परराष्ट्र मंत्र्यांच्या दालनात लावलेले नेहरूंचे छायाचित्र परस्पर काढून टाकले. ही गोष्ट वाजपेयींच्या नजरेतून सुटली नाही. त्यांनी ते छायाचित्र पुन्हा पूर्ववत लावण्याचे आदेश तातडीने काढले.1980च्या दशकात वाजपेयी पुन्हा विरोधी बाकांवर आले. चित्र असे होते की, कदाचित हे विरोधात बसणे आता त्यांच्यासाठी जन्मभराचेच असावे. जनसंघाने भारतीय जनता पक्षाच्या रूपाने पुनर्जन्म घेतला होता आणि मध्यममार्ग धरण्याच्या प्रारंभिक प्रयत्नांनंतर ‘हिंदू मता’चे संघटन हे ध्येय पक्के केले होते.

या ध्येयाचा मार्ग अयोध्या नावाच्या नगरातून जाईल असे ठरले. उद्देश स्पष्ट होता : अयोध्येतली मशीद उद्ध्वस्त करून तेथे मंदिराचे निर्माण करणे.

वाजपेयींच्या मूळ स्वभावाशी सुसंगत नसलेल्या या कार्याची जबाबदारी अखेरीस काहीशा रोखठोक कडव्या स्वभावाचे त्यांचे निकट सहकारी लालकृष्ण अडवाणी यांच्या खांद्यावर दिली गेली.या मोहिमेला मर्यादित का असेना; पण यश मिळाले. विध्वंस अटळ होता, तो झाला; 

पण राजकीय सारीपाटावर भाजपाच्या हाती यश लागले. पण ते सरकार स्थापनेसाठी पुरेसे नव्हते. शेवटी अनेक छोट्या पक्षांच्या मदतीने सरकार बनवले गेले. या छोट्या घटक पक्षांनी कडवट आणि हटवादी अडवाणींऐवजी मोकळ्या आणि दिलदार कविमनाच्या वाजपेयींचे नेतृत्व मान्य केले.

वाजपेयींचा संसदेच्या सभागृहात प्रथम प्रवेश झाला 1957साली. त्यानंतर तब्बल चाळीस वर्षांनी 1996 साली भारताचे पंतप्रधान म्हणून वाजपेयींनी शपथ घेतली.

पंतप्रधान म्हणून वाजपेयींनी एकूण तीन सरकारे बनवली. पहिले सरकार 13 दिवस चालले, नंतरचे 13 महिने चालले आणि तिसर्‍या वेळी मात्र वाजपेयींना पूर्ण पाच वर्षांचा कार्यकाळ मिळाला. (काही महिने कमी कारण त्यांनी स्वत:च मुदतपूर्व निवडणुकांचा मार्ग स्वीकारला होता)

राजीव गांधी आणि नरसिंह राव या दोघांनाही प्रत्येकी एक वेळाच पूर्ण पाच वर्षांचा कार्यकाळ मिळाला होता. या दोघांशी वाजपेयींच्या कार्यकाळाची तुलना करणे मोठे जिज्ञासेचे आणि उद्बोधक आहे. सरकारच्या पोलादी पंजातून भारतीय अर्थव्यवस्थेला मुक्त करण्यासाठी अत्यावश्यक असलेले आणि दीर्घकाळ रेंगाळत पडलेले काही धाडसी निर्णय या तिघांनीही आपल्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळात घेतलेले दिसतात. वाजपेयींचे ठळक दिसणारे कर्तृत्व आहे ते संरचनात्मक पायाभूत सुविधांच्या विस्तारासाठी त्यांनी राज्यांना ज्या गतीने आणि प्रभावीपणे प्रेरित केले त्या दूरदृष्टीत ! भारतातल्या महत्त्वाच्या शहरांच्या दरम्यान प्रवासी आणि मालवाहतुकीला अधिक चालना मिळावी यासाठी त्यांनी आकाराला आणलेली ‘सुवर्ण चतुष्कोन’ योजना देशातल्या महामार्गांच्या उभारणीसाठी किती महत्त्वाची ठरली हे आपण आज अनुभवतो आहोत. ग्रामीण भारतातली खेडी हमरस्त्यांनी जोडण्यासाठी आखलेली ‘प्रधानमंत्री ग्रामसडक योजना’ हेही वाजपेयींच्या दूरदृष्टीचेच प्रतीक मानले पाहिजे.

हा तुलनेचा ताळेबंद बारकाईने मांडला आणि अभ्यासला तर उण्याच्या बाजूला राजीव गांधी आणि नरसिंह रावांच्या बरोबरीने वाजपेयींच्या नावानेही काही उल्लेख दिसतात. राजीव गांधी यांच्याप्रमाणेच वाजपेयींवरही मित्रमंडळी आणि पाठीराख्यांचे अपराध पाठीशी घालण्याचे आरोप झाले. दत्तक कुटुंबाचे सदस्य आणि स्नेह्यांच्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणांकडे डोळेझाक केल्याचा दोषही वाजपेयींच्या वाट्याला आला. भारताच्या संघराज्य रचनेतल्या निधर्मी धाग्याला बोट लावू धजलेल्या प्रवृत्तींच्या विरोधात योग्यवेळी उचित कारवाई करण्याचे धाडस दाखवण्यात नरसिंह राव पंतप्रधान म्हणून बोटचेपे ठरले. वाजपेयींवरही तोच आरोप करता येईल असे वर्तन त्यांच्याकडूनही घडले. नरसिंह राव यांनी मनात आणले असते तर बाबरी मशिदीचा विध्वंस टाळणे शक्य झाले असते आणि नंतर उसळलेल्या दंगलीतला अनिर्बंंध मनुष्यसंहार घडता ना. 2002 साली गुजरातमध्ये उसळलेल्या दंगलीच्या वेळी वाजपेयींनी तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांचे कान पिळले हे खरे; पण तेवढे पुरेसे नव्हते. त्याहीपुढे जाऊन त्यांनी मोदींना उचित शासन घडवणे जरूर होते, ते त्यांनी केले नाही.

या सगळ्या अपराधांची मोठी किंमत भारताला चुकवावी लागली आहे. एक जबाबदार देश म्हणून जगाच्या नजरेतून आपण उतरलो.. एवढेच नव्हे, तर धार्मिक वर्चस्व असलेल्या गटांच्या हिताची पाठराखण हाच ‘राष्ट्रधर्म’ मानून राज्य कारभार चालवणा-या शेजारी मुस्लीम पाकिस्तानची ‘हिंदू प्रतिमा’ या स्तरावरची तुलना केली जाणे भारताच्या नशिबी आले.

पण राजीव आणि राव यांच्या तुलनेत वाजपेयींच्या ताळेबंदातली एक जमेची बाजू मात्र अतीव तेजाने तळपणारी आणि लखलखती आहे : त्यांचे ओजस्वी वक्र्तृत्व!

या लेखाच्या प्रारंभी उद्धृत केलेले वाजपेयींचे नेहरूंवरील भाषणच घ्या. त्याचा अनुवाद वाचतानाही वाजपेयींच्या नि:स्पृहतेसमोर नतमस्तक व्हावेसे वाटते, ते मूळ हिंदीतले भाषण हा तर उत्कृष्टतेचा नमुना आहे.मी स्वत: वाजपेयींना प्रथम ऐकले ते दिल्ली विद्यापीठातल्या मॉरिस नगर चौकातल्या सभेत. मार्च 1977. आणीबाणीतल्या बंदिवासातून नुकतेच मुक्त झालेले वाजपेयी आगामी निवडणुकीत कॉँग्रेसच्या विरोधातल्या प्रचारसभेत भाषण करण्यासाठी आले होते. त्या सभेत मी ‘विचारा’ने वाजपेयींच्या बरोबर, त्यांच्या बाजूने होतो.- पण वाजपेयींचे वैशिष्ट्य आणि मोठेपण हे की, त्यांच्या विचारधारेच्या विरोधात असलेल्या नागरिकांवरही त्यांच्या विचारांची-मांडणीची-व्यक्तित्वाची मोहिनी पडल्याविना राहात नसे.

मे 1998. मला संपूर्णत: भारून टाकणारे वाजपेयींचे भाषण मी ऐकले ते टीव्हीवर. पोखरणला अणुस्फोट केला गेला होता. राजस्थानच्या वाळवंटात अणुचाचणी घेण्याचा भारत सरकारचा निर्णय मला पटणे शक्य नव्हते. या निर्णयाच्या मी संपूर्णत: विरोधात होतो. पण त्यादिवशी या निर्णयामागची पार्श्वभूमी आपल्या संयत; पण ठाम शैलीत मांडणारे वाजपेयींचे अभ्यासपूर्ण आणि प्रांजळ भाषण मी ऐकले. आण्विक सार्मथ्याच्या संदर्भात पश्चिमी देशांच्या दांभिकतेची वाजपेयींनी कशी मुद्देसूद साले काढली होती, ते मला आजही आठवते. त्यांचे ते विवेचन ऐकल्यावर भारताच्या अणुचाचण्यांना असलेला माझा विरोध मावळला आणि जवळपास सर्मथक बनण्याइतके माझे मतपरिवर्तन झाले.भाजपाचे दुसरे पंतप्रधानही त्यांच्या वक्तृत्वकौशल्यासाठी ओळखले जातात. मात्र वाजपेयी आणि मोदींच्या वक्तृत्वशैलीत जमीन-अस्मानाचे अंतर आहे हे नजरेआड करता येत नाही. मोदींचा सारा भर विरोधकांची नक्कल-चेष्टा करण्याकडे आणि आपला मुद्दा जोराने रेटून नेण्यावर असतो. वाजपेयींच्या वक्तृत्वाला बोचर्‍या उपरोधाची तीक्ष्ण धार होती तशी सखोल चिंतनाची उंची आणि खोलीही होती. विरोधकांवर व्यक्तिगत वार करून त्यांना घायाळ न करताही आपल्या सरकारच्या-पक्षाच्या ध्येयधोरणांची प्रसिद्धी आणि पाठराखण करता येते, हे वाजपेयींनी आपल्या कारकिर्दीत सदैव सिद्ध केले. इतक्या प्रभावी वक्तृत्वकलेची साथ असतानाही वाजपेयींनी कधीही स्वत:चे उदात्तीकरण करण्याचा प्रयत्नही केला नाही. व्यक्तीपेक्षा पक्ष, पंतप्रधानांपेक्षा सरकार आणि अन्य कुणाहीहून राष्ट्र अंतिमत: श्रेष्ठ असते, अशी त्यांची श्रद्धा होती. तिचा त्यांनी अखंड निर्वाह केला.

न्यू यॉर्कमध्ये अनिवासी भारतीयांच्या एका सभेत भाषण करताना वाजपेयी म्हणाले होते, मी प्रथम आणि अखेरीस एक ‘स्वयंसेवक’ आहे. असे असले तरीही हिंदुत्वाच्या मूळ विचारधारेशी त्यांची बांधिलकी नेमकी कोणत्या प्रकारची आणि स्तराची होती; हे कधी फारसे स्पष्ट झाले नाही. वाजपेयींनी संघाचे सभासदत्व घेतले ते कोवळ्या तरुण वयात. जनसंघासाठी तर ते स्थापनेपासूनचे साक्षीदार. इतका दीर्घकाळ - जवळपास त्यांचे संपूर्ण सार्वजनिक आयुष्यच- ते संघ, जनसंघ आणि भाजपाच्या सोबत राहिले. वाजपेयींची बांधिलकी होती ती संघटनेशी. राजकीय प्रवासात पन्नास वर्षांहून अधिक काळ सोबत केलेल्या सहकारी-सोबत्यांशी जोडला गेलेला स्नेह या बांधिलकीमध्ये गुंतलेला असणार हे नक्की! पण कालांतराने आपल्या कर्मठ तत्त्वांसाठी हिंसक मार्गांंचा अवलंब करणार्‍या स्नेह्यांपासून ते मनाने आणि कृतीने दुरावत गेलेले दिसतात. राजकीय विरोधकांशीही वाजपेयी सतत ज्या शालीन सभ्यतेने वागत आले ते पाहता कडव्या हिंदुत्वाची पालखी वाहणे त्यांच्यासाठी दुरापास्त असणार हे उघड दिसते.. एकतर ते फार सभ्य होते म्हणून किंवा फार मऊ होते म्हणूनही!

वाजपेयींची आठवण अक्षय राहील..

उत्स्फूर्त आणि प्रामाणिक तळमळीने व्यक्त होणारा प्रभावी वक्ता म्हणून!

हृदयाशी कविता आणि ओठांवर मिश्कील हसू निरंतर जपलेला हिंदुत्ववादी नेता म्हणून!वाजपेयींनी पराकोटीची सांप्रदायिक भूमिका असलेल्या पक्षाचं आणि कडव्या विचारधारेचं नेतृत्व निभावलं, हे खरं.- पण राजकीय जीवनात स्वीकारलेल्या विचारधारेला त्यांनी स्वत:मधल्या सुसंस्कृत मार्दवाच्या जिवंत माणुसकीवर कधीही स्वार होऊ दिलं नाही, हेही तितकंच खरं!

मी आयुष्यभर हिंदुत्ववादी विचारांचा विरोधक राहिलो आहे.- पण एक कबुली देतो.जेव्हा जेव्हा अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांचे चेहरे - विचार दिसतात, ऐकू येतात; तेव्हा तेव्हा मला जुन्या दिवसांची आठवण येते.

कधीकाळी या राजकीय प्रवृत्तीचा औपचारिक आणि प्रतीकात्मक का असेना; पण चेहरा वेगळा होता...त्याचे हृदय कवीचे होते आणि वृत्ती दिलदारीची होती.नाव :अटलबिहारी वाजपेयी !

(लेखक आंतराष्ट्रीय कीर्तीचे इतिहासकार आहेत)

अनुवाद : अपर्णा वेलणकर