- दिनेश नि:संग सुमारे १० वर्षांच्या कालावधीनंतर सर्व खगोलप्रेमी व नागरिकांसाठी दुर्मिळ संधी आली आहे. दक्षिण भारतातून २६ डिसेंबर रोजी कंकणाकृती सूर्यग्रहण दिसणार आहे. यापूर्वी १५ जानेवारी २०१० रोजी कंकणाकृती सूर्यग्रहण भारतातून दिसले होते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे डिसेंबर महिना असल्याने आकाश निरभ्र राहून निसर्गाचा हा कलाविष्कार ढगांच्या मध्यस्थीशिवाय 'याची देही याची डोळा' अनुभवण्याचा योग असणार आहे. भारतामधून यानंतरचे कंकणाकृती सूर्यग्रहण २१ जून २०२० रोजी आहे; मात्र जून महिना असल्याने हे ग्रहण दिसू शकेल की नाही याबद्दल साशंकता आहे. त्यानंतर भारतातून ग्रहण पाहण्यासाठी मात्र तुम्हाला तब्बल १४ वर्षे वाट पाहावी लागेल. २० मार्च २०३४ रोजी जम्मू-काश्मीर-लेहमधून खग्रास सूर्यग्रहण दिसेल. यामुळे एकंदरीत विचार करता, आयुष्यातील अमूल्य आठवण गोळा करण्यासाठी या वर्षीचे कंकणाकृती सूर्यग्रहण चुकवू नये! चंद्र पृथ्वीभोवती लंबवर्तुळाकार कक्षेत भ्रमण करते. येत्या २६ डिसेंबर रोजी चंद्र पृथ्वीपासून दूर असल्याने चंद्रबिंब सूर्यबिंबाला पूर्णपणे झाकू शकणार नाही. त्यामुळे आपल्याला आकाशात सूर्य एखाद्या बांगडीसारखा दिसेल. त्या वेळी दिवसा अंधार दाटून येईल, पक्षी त्यांच्या घरट्यांकडे परतण्याची लगबग करतील, पशु-प्राण्यांच्या वर्तनात फरक होईल, झाडांच्या सावल्या बदलतील, यांसारखे असंख्य अनुभव तुम्हाला केवळ आणि केवळ ग्रहणकाळातच मिळतील. या वर्षीचे कंकणाकृती सूर्यग्रहण कर्नाटक, केरळ आणि तमिळनाडू राज्यांतील काही शहरांमधून दिसणार आहे. उर्वरित संपूर्ण भारतातून खंडग्रास सूर्यग्रहण दिसेल. सर्वसाधारणपणे सकाळी ८ ते ११ च्या दरम्यान सर्वत्र ग्रहण दिसेल. उटीमधून (तमिळनाडू) सूर्याची कंकणाकृती अवस्था ३ मिनिटे ७ सेकंद दिसेल. काही प्रमुख शहरे व तेथील कंकणाकृती अवस्थेचा कालावधी पुढीलप्रमाणे : तिरूपूर- तमिळनाडू (३ मिनिटे ४ सेकंद), बेकल फोर्ट- केरळ (३ मिनिटे ३ सेकंद), कोईम्बतूर- तमिळनाडू (२ मिनिटे ५७ सेकंद), कन्नूर- केरळ (२ मिनिटे ५४ सेकंद), मेंगलोर- कर्नाटक (२ मिनिटे ११ सेकंद), इरोड- तमिळनाडू (१ मिनिटे ४८ सेकंद), तिरुचिरापल्ली- तमिळनाडू (१ मिनिटे ४४ सेकंद), कालिकत- केरळ (१ मिनिटे ७ सेकंद) चला तर मग! लागा तयारीला. स्वत: सूर्यग्रहण कुटुंब सहलीचे नियोजन करा अथवा आपल्या आसपास एखाद्या खगोल मंडळाने सूर्यग्रहण अभ्यास सहल आयोजित केली असेल तर त्यांना सामील व्हा. ग्रहण हा पूर्णपणे नैसर्गिक आविष्कार असून त्या काळात अन्न-पाणी-मनुष्य यांच्यावर कुठलाही अनिष्ट परिणाम होत नाही. त्यामुळे सर्व गैरसमजांना बाजूला सारून आपण सर्व जण या ग्रहणाचे स्वागत करू या आणि जितका उत्साह चांद्रयान मोहिमेत दाखवला, तेवढ्याच उत्साहाने सूर्यग्रहणाचा अनुभव घेऊयात. कारण त्याच चंद्रयानाची सावली ग्रहणकाळात तुमच्यावर पडणार आहे! (लेखक प्रसिद्ध विज्ञानप्रसारक व खगोल अभ्यासक आहेत)
दहा वर्षांनी पुन्हा दुर्मिळ सुवर्णकंकण..
By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2019 7:00 AM
ऑनलाइन बुकिंगच्या जमान्यात तुमच्या संपूर्ण कुटुंबाच्या आयुष्यभर लक्षात राहील अशा सहलीचे नियोजन तुम्ही करू शकताय. या वर्षीचा नाताळ खास असणार आहे;
ठळक मुद्देकारण २६ डिसेंबरच्या सकाळी भरदिवसा सूर्य-चंद्र सावल्यांचा नयनरम्य खेळ सादर होणार