- सुमती लांडे
श्रीरामपूर हे अहमदनगर जिल्ह्यातील तालुक्याचं गाव़ ना खेडं, ना शहर. निमशहर. 35 वर्षांपूर्वी सुमती लांडे यांनी येथे ‘शब्दालय’ प्रकाशनाचा प्रारंभ केला. आजपर्यंत सुमारे 600 पुस्तकं त्यांनी प्रकाशित केली; पण नुसतं प्रकाशन करून त्या थांबल्या नाहीत़, पायाला भिंगरी लावून महाराष्ट्रभर फिरल्या़ ‘लोकांनी पुस्तकं वाचून मस्तकं सुधारावीत’ असा त्यांचा हट्ट़ त्यासाठी अगदी गोवा, कर्नाटकपर्यंतही पोहोचल्या़ वयाची 68 वर्षं त्या पूर्ण करीत आहेत़ तरीही आजही त्या गावोगावी पुस्तकांची प्रदर्शन भरवतात़ उस्मानाबाद येथील 93 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात त्यांचा विशेष सन्मान होत आह़े त्यानिमित्ताने त्यांच्याशी साधलेला संवाद़़..
* तुम्ही उच्चशिक्षित आहात़ तरीही नोकरीचा पर्याय न स्वीकारता, कुठलाही पूर्वानुभव नसताना प्रकाशन व्यवसायाच्या आडवाटेला कशा आलात?- 80-82 चा तो काळ होता़ शिक्षण असेल, तर नोकरी हमखास, असा तो काळ होता.अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत मी शिक्षण घेतलं होतं़ अकरावीत असतानाच माझं लग्न झालं होतं़ मुलं लहान होती़ सासरी असताना एमए, एम.फील. केलं़ प्राध्यापक होण्याइतकं माझं शिक्षण होतं़ परिस्थिती जेमतेम होती़ त्यामुळे नोकरीसाठी मुलाखत दिली, तर ‘चिठ्ठय़ा’ म्हणजे वशिला कमी पडला. संतापाच्या भरात रोपवाटिका सुरू करून पाहिली. म्हटलं, यातून पैसे मिळतील; पण श्रीरामपुरात पाणी नव्हतं. व्हायचं तेच झालं. रोपं जळाली अन् रोपवाटिकेचं स्वप्नही़. वाचनाची आवड होती़ पुस्तकांचं दुकान सुरू करावं, असा विचार मनात आला़ ‘शब्दालय’ हे नावही त्यासाठी सुचलं. बॅँकेनं 25 हजार रुपयांचं कर्ज मंजूर केलं़ त्यावेळी आम्ही गावाबाहेर राहात होतो़ घराच्या आवारातच शेड उभं करून दुकान सुरू करण्याचा निर्णय घेतला़ शेडसाठी 11 हजार रुपये खर्च आला़ 14 हजार शिल्लक राहिल़े त्यातून पुस्तकं आणली अन् सुरू झालं ‘शब्दालय पुस्तक भांडार’! त्याचवेळी ‘ग्रंथाली’ने गावोगाव पुस्तक विक्री केंद्र सुरू केली होती़ त्यांच्याशी संपर्क करून ‘ग्रंथाली’चं केंद्रही सुरू केलं़ ग्रंथालीच्या लोकांना मोठं अप्रूप होतं की एक मुलगी खेड्यात राहून पुस्तक विक्रीचं काम करतेय; पण हे दुकानही गावाबाहेर होतं़ तिथे पुस्तकं घ्यायला फारसं कोणी आलंच नाही़ मग ते दुकान तिथून उचललं़, बसस्थानकासमोरच्या मोकळ्या जागेत पत्र्याचं शेड ठोकलं़, एक जुनी मोपेड विकत घेतली़ या गाडीवरून परिसरातील शाळाशाळांत जाऊन पुस्तकं विकणं सुरू केलं. पैसे उशिरा मिळत़; पण बुडत नव्हत़े पुढे हळूहळू हे काम वाढलं़ पुण्यात गेल्यानंतर अनेक गोष्टी समजल्या़ बालभारतीची पुस्तकं घेण्यासाठी रजिस्ट्रेशन गरजेचं होतं; पण तेव्हढे पैसे नव्हत़े त्यामुळे गळ्यातील मंगळसूत्र मोडून पुस्तकं आणली़ ही पुस्तकं, इतर शालेय साहित्य शाळांवर तसेच रस्त्यावर स्टॉल लावून विकत अस़े नंतर गावोगावी जाऊन पुस्तकं विकण्याचा सपाटा लावला़ त्यात चांगलं यशही मिळालं़ * दिवाळी अंकाकडे कशा वळलात?- पुण्यात दिवाळी अंकांची धूम असायची़ त्यातले अनेक जाहिरातदार नगर जिल्ह्यातील होत़े आपणही दिवाळी अंक काढावा असा विचार मनात आला़ नगरचे र्शीधर अंभोर, प्रा. मंचरकर यांच्याशी दीर्घ चर्चा झाल्या. दिवाळी अंकाची निर्मिती कशी करतात, तो कोठून छापून घ्यायचा, छपाई कशी करतात यातलं काहीही माहिती नव्हतं़ त्यासाठी पुण्याला जाऊन माहिती घेतली़ त्यासाठी एकटी फिरले. जाहिराती मिळवणं, लेखकांशी पत्रव्यवहार करून लेख घेणं अशी सर्व कामं मी एकटीच करायचे. पहिल्याच अंकासाठी नरहर कुरुंदकरांचा ‘लैंगिक स्वातंत्र्याचा प्रश्न’ असा लेख मिळाला़ 1985 साली पहिला दिवाळी अंक निघाला़ पुढे या दिवाळी अंकानं अनेक पुरस्कार पटकावल़े दज्रेदार दिवाळी अंक म्हणून राज्यभर नाव झालं. * प्रकाशन क्षेत्रात उतरताना वाचक मिळेल का, पुस्तकं विकली जातील का, असा काही व्यावसायिक विचार केला होता का?- नाही़ त्यावेळी असा काहीही विचार केला नव्हता़ किंबहुना तेव्हढी समजही नव्हती़ नामदेवराव देसाई यांच्या उपहासात्मक कथांचा संग्रह ‘पंचनामा’ हे ‘शब्दालय’चं पहिलं पुस्तक़ नंतर साहित्य मंडळाची पुस्तकंही मिळाली़ रंगनाथ पठारे ‘दु:खाचे श्वापद’ या कादंबरीचं लेखन करीत होत़े ही कादंबरी ‘शब्दालय’नं प्रकाशित केली़ त्यानंतर पठारे यांची सर्व पुस्तकं ‘शब्दालय’नेच प्रकाशित केली़ नंतरच्या काळात इतरीही अनेक मान्यवर लेखकांची पुस्तकं ‘शब्दालय’नं प्रकाशित केली़ आजपर्यंत विविध विषयांवरची 500 आणि बालसाहित्याची शंभर पुस्तकं ‘शब्दालय’नं प्रकाशित केली आहेत़ * कोणताही वारसा नसताना एवढा मोठा व्याप कसा उभा केलात? महिला म्हणून उंबरठा ओलांडताना व्यवस्थेचा काही अडथळा आला का?- वारसा नव्हता हे खरं आह़े आई-वडीलही फार शिकलेले नव्हत़े उच्चशिक्षण घेणारी मी घरातील पहिलीच़ रस्त्यावर स्टॉल लावून पुस्तकं विकायला प्रारंभी वडिलांचा विरोध होता़ हा विरोध लेकीच्या सुरक्षेच्या दृष्टीनंच असावा़; पण आई खंबीरपणे पाठीशी उभी राहिली़ वडिलांची समजूत काढली़ त्यांचाही विरोध मावळला़ 80-90 च्या दशकात एका महिलेनं प्रकाशन व्यवसायात उतरावं, असे ते दिवस नक्कीच नव्हत़े स्वत:च्या हिमतीवर प्रकाशन व्यवसाय सुरू करणार्या कोणी महिला त्यावेळी होत्या असंही आठवत नाही़ तालुकास्तरावर तर कोणीच नव्हतं़ पण हे धाडस केवळ वाचन, पुस्तकांवरील प्रेमापोटी केलं. त्यातून चार पैसे मिळतील, ही भावना त्यामागे होतीच़ महिला म्हणून हे काम करीत असताना मला फार काही वाईट अनुभव आले नाहीत़ काही विषवल्ली असतातही़ त्यांना तोंड देऊन पुढे जावंच लागतं़ मात्र, चांगली माणसं अधिक भेटली़ पुरुषी व्यवस्थेविषयी मला आकस नाही़ तक्रारही नाही़ त्यामुळे या व्यवस्थेचा अडथळा वाटण्याचं काही कारणच नाही़ * महिलांच्या साहित्यानं अजूनही मर्यादांचा उंबरठा ओलांडलेला दिसत नाही़.- प्रत्येकाचं अनुभवविश्व वेगळं असतं़ व्यक्त होण्याची प्रक्रिया वेगळी असत़े आपल्याकडे बहिणाबाई, जनाबाईंपासून ते आजच्या महिला नवसाहित्यिकांपर्यंत बारकाईनं पाहिलं तर लक्षात येईल, महिलांचं साहित्य तसं समृद्ध आह़े; पण जे मुक्तपणे व्यक्त व्हायला पाहिजे, तसं महिला साहित्यिक व्यक्त होताना दिसत नाहीत. महिला सोशिक आहेत़, समंजस आहेत़ कोठे आणि किती मोकळेपणानं व्यक्त व्हायचं हे त्या जाणून आहेत़ म्हणूनच आजची व्यवस्था टिकून आह़े जसं कुटुंब टिकवण्यात महिलाचं योगदान, तसंच ही व्यवस्था टिकवण्यातही महिलांनी पाळलेल्या र्मयादांचं यश कोणीच नाकारू शकत नाही़ * सोशल मीडियामुळे तरुण वाचनापासून दूर गेले आहेत, असं वाटतं का?पूर्वी वाचक जास्त होता आणि आता कमी झाला आहे, असं अजिबात नाही़ ज्याला वाचायचं आहे, तो पुस्तक घेऊन वाचतो आह़े अनेक ग्रंथालयं आहेत़ वाचणारे लोक गावोगावी आहेत़ म्हणूनच पुस्तकं विकली जात आहेत़ हा वाचक विखुरलेला आहे. त्यामुळे तो दिसत नाही़ लॅपटॉप, कॉम्प्युटरवर पुस्तकं वाचता येतात़ अगदी हातातल्या स्मार्टफोनवरही पुस्तकं उपलब्ध होतात़; पण त्यावर फार काळ कोणी वाचू शकत नाही़ शिवाय पुस्तक समोर धरून वाचण्याची मजा मोबाइल किंवा कॉम्प्युटरवर वाचण्यात येत नाही़ मुलांना सोन्याची अंडी देणारी कोंबडी बनवण्याची घाई पालकांना झाली आह़े पालकांना कमावतं मशीन हवंय़ त्यासाठीच पालक मुलांना अवांतर पुस्तकं वाचण्याचा आग्रह धरीत नाहीत़ एकतर बरेच पालक स्वत:च वाचत नाहीत. ते मुलांना तरी कसं सांगणार? पालकांचा एकच रट्टा असतो, तो म्हणजे अभ्यासाचा़ यातून अवांतर वाचन निसटून जातं अन् मुलांवर मूल्यांची रुजवण होत नाही़ आजच्या मुलांना दोष देण्यात अर्थ नाही़ सामाजिक माध्यमांमुळे तरुण वाचनापासून दूर गेले आहेत, असं म्हणणं चुकीचं आह़े
(शब्दांकन : साहेबराव नरसाळे)