गोविंद वल्लभ पंत (भारतरत्न पुरस्कार सन १९५७)
भारताच्या स्वातंत्र्यासाठी आणि स्वातंत्र्य मिळाल्यावर त्याच्या उन्नतीसाठी ज्यांनी आपल्या आयुष्याचा प्रत्येक क्षण खर्च केला, अशा स्वातंत्र्यसेनानींपैकी एक खंबीर नेते म्हणजे डॉ. गोविंद वल्लभ पंत. त्यांचा जन्म १0 सप्टेंबर १८८७ रोजी उत्तर प्रदेशातील अल्मोडा जिल्ह्यातील खुंट या गावात झाला. त्यांचे मूळ घराणे महाराष्ट्रातील; पण पूर्वज उत्तरेत गेले आणि तेथेच स्थायिक झाले.
गोविंद वल्लभांनी अल्मोडा येथे शालेय शिक्षण पूर्ण करून अलाहाबाद येथून बी.ए., एल.एल.बी.ची पदवी प्राप्त केली. नैनिताल व अलाहाबाद येथे वकिली करून त्यांनी प्रतिष्ठा व पैसा मिळविला; पण गोपाळ कृष्ण गोखले, पंडित मदनमोहन मालवीय यांचा आदर्श त्यांच्या डोळ्यांपुढे होता. आपला देश व देशबांधव यांच्याबाबत आपले काही कर्तव्य आहे, या जाणिवेतून त्यांनी पददलितांचे प्रश्न सोडविण्याकरिता ‘कुमाऊँ’ परिषदेची स्थापना केली. या परिषदेच्या साह्याने त्यांनी कूर्माचलांतील वेठमजुरीच्या घातक प्रथेच्या मुळावरच घाव घातला. त्यांनी काँग्रेसचे क्रियाशील सभासदत्व घेऊन ‘शक्ति’ या वृत्तपत्राद्वारे आपल्या ध्येयधोरणांचा पाठपुरावा केला. सायमन कमिशनविरोधी निदर्शनात पोलिसांच्या लाठी हल्ल्यात जबर मार बसून ते अधू झाले.
भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर घटना परिषदेचे सदस्य म्हणून पंतांची निवड झाली होती. उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री असताना त्यांनी जमीनदारी पद्धत बंद करून जमीन सुधारणा कायदे केले. हिंदी भाषेचा शासकीय व्यवहारात वापर सुरू केला. हिंदी भाषेतील विश्वकोश, हिंदी शब्दसागर, हिंदी साहित्याचा बृहत् इतिहास आदी प्रकल्पांच्या मागची प्रेरणा गोविंद वल्लभांची होती. काशी विद्यापीठाच्या स्थापनेसाठी त्यांनी मोलाची मदत केली. भारताच्या गृहमंत्रिपदावर असताना त्यांनी आसाममधील दंगली, केरळमधील अत्याचार, पंजाबी सुभा चळवळ असे अनेक प्रश्न कणखर भूमिका घेऊन सोडविले. बोलण्यापेक्षा प्रत्यक्ष कृती करण्यावर त्यांचा भर असे.
राजकारणात व्यस्त असतानाही त्यांनी लघुकथा लिहिल्या, नाट्यलेखन केले. अवघड प्रसंगातही मानसिक स्थिरता ढळू न देणे आणि न रागवणे, हा पंतांचा महान आणि दुर्लभ गुण होता. एक कृतिशील प्रशासक, आदर्श संसदपटू आणि कणखर मुत्सद्दी असलेले गोविंद वल्लभ पंत यांचे ७ मार्च १९६१ रोजी निधन झाले.
(सुबोध मुतालिक, लेखक पुणे मराठी ग्रंथालयाचे कार्यकारिणी सदस्य आहेत.)