- अंकुश काकडे- बेडेकर मिसळ तर पुणे काय महाराष्ट्रात प्रसिद्ध, छोटंसं दुकान आणि विशेष म्हणजे सर्व पदार्थ स्वत: बेडेकरांचे कुटुंबीय करीत असत. अगदी ब्राह्मणी शिस्त, रस्सा जास्त मिळणार नाही, ज्यादा कांदा घेतला तर वेगळा चार्ज, आजही तेथे हॉटेलबाहेर २०-२५ जण प्रतीक्षेत उभे असलेले पाहावयास मिळतात, आता तर आॅनलाईन आॅर्डरदेखील घेतली जाते. मला वाटतं बेडेकरांची तिसरी पिढी मुलगा अनिल व नात तन्वी यांनी हा व्यवसाय चालू ठेवलाय. तशीच पुण्यातील रविवार पेठेतील वैद्य मिसळ आजही आपले स्थान टिकवून आहे, जाडी शेव, हिरवा टोमॅटोचा रस्सा, मस्तपैकी जाड स्लाईस आजही तीच चव तेथे चाखायला मिळते. अगदी साधी मांडणी, लाकडी खुर्च्या- टेबलं, फक्त सकाळी ८ ते १२ पर्यंतच ते सुरू असते. तेथील कामगारांना दुपारनंतर काहीच काम नाही, मग सायंकाळच्या वेळी वैद्य उपाहारगृहाबाहेरच तेथील काही कामगार हातगाडी लावून मिसळ व्यवसाय करतात, तेथेही मोठी गर्दी पाहायला मिळते. मोठा बटाटेवडा पाहायचा असेल तर केसरीवाड्यासमोर प्रभा विश्रांतीगृह अजूनही तीच चव, तोच आकार, तेथील वड्यातील थोडासा गोड असलेला बटाटा इतरत्र क्वचितच पाहायला मिळतो. उदय परांजपे व त्यांची पत्नी स्वत: जातीने लक्ष देतात, पण वेळेच्या बाबतीत कुठेही तडजोड नाही, सकाळी ९ शिवाय उघडणार नाही, हॉटेलात घाईगर्दी करायची नाही, असा कडक नियम. एकदा केलेला माल संपला की पुन्हा करायचा नाही, असा स्वयं नियम, सदाशिव पेठेत गेल्या १५-२० वर्षांत नावारूपाला आलेली भिडे दांपत्याची मिसळ, त्यांचा रस्सा-चव दिवसभर तोंडात राहते, भिडेंच्या निधनानंतर भिडे वहिनींनीदेखील अगदी प्रेमाने हा व्यवसाय चालू ठेवला, दरवर्षी गणेश विसर्जनाची मिरवणूक कुंटे चौकात आली, की बॅ. विठ्ठलराव गाडगीळ यांच्यासमवेत २५-३० जणांची पाऊले आपोआप श्री मिसळकडे वळत, भिडे वहिनी कधीही आम्हा मंडळींचे बिल घेत नसत, सदाशिव पेठेतील हा ‘एकमेव’ अनुभव आम्हाला मिळत असे. तुळशीबागेतील श्रीकृष्ण मिसळ, त्याचा वेगळा असा तांबडा रस्सा, गोल भजी १५-२० मिनिटे रस्त्यावर उभे राहत आपला नंबर येण्याची वाट पाहणे हे नेहमीचेच, आता मात्र त्याचा विस्तार झालाय, त्यामुळे वेटिंग थोडं कमी झालंय, फडतरे चौकातील स्वीट होम. हे तर कुटुंबीयासमवेत हजेरी लावण्याचं ठिकाण. तेथील मोठी इडली त्याबरोबरचा तर्री असलेला सांबार, त्यावरील शेव इतरत्र कुठेच पाहायला मिळाली नाही, शिवाय सोबतीला गोल बटाटेवडा, चटणी, दहीवडा, खिचडी, खमंग काकडी आणि शेवटी कॉफी, तेथील कॉफीला येणारा सुगंध आजपर्यंत कुठेही दिसला नाही, कुमठेकर रोडवरील सदाशिव पेठ हौद चौकात असलेलं दत्त उपहारगृह, साधी मांडणी, लाकडी खुर्च्या-टेबल, मालक ब्राह्मण पण तेथील सर्व सेवक कोकणी, तेथील मिसळ, त्यासोबत मिळणारा पातळ रस्सा आठवलं की लगेच पाऊल तिकडे वळायचे. तेथेच जवळ काही काळ डी. बी. गोडसे यांचे सुजाता हॉटेल होते. त्या गोडसेंचा ‘बालगंधर्व’मधील बटाटेवडा सोबतीला तळलेली हिरवी मिरची पुणेकरांबरोबरच नाट्यक्षेत्रातील कलावंतांचा प्रिय होता, तोच वडा सुजातामध्ये, त्याचबरोबर मस्तानी मिसळची चव काय न्यारीच. कुमठेकर रोडवरच काही काळ न्यू सेपरेट कंपनी म्हणून एक हॉटेल होते, तेथील मिसळसोबत मिळणारा पिवळा रस्सा, त्यातील उभा कापलेला कांदा त्याची वेगळी अशी चव होती. टिळक रोडवरील एस. पी. कॉलेजजवळील हॉटेल, ही तर कॉलेजमधील तरुण-तरुणींची उपस्थिती लक्षणीय असे. एस. पी. कॉलेज प्रवेशद्वारासमोरील उदय विहारमधील बटाटेवडा चटणी-कॉफी घेण्यासाठी प्रेमी युगुलांची गर्दी नेहमीच असे, सध्या असलेल्या ग्राहक पेठेत तेथे हॉटेल जीवन होते, तेथेही महाराष्ट्रीयन पदार्थ असत, पुढे तेथे मांसाहारी हॉटेल सुरू झाले आणि पुणे शहरात प्रथमच ९९ रुपयांत हवे तेवढे खा, पांढरा रस्सा, तांबडा रस्सा, मटण, चिकन, चपाती, भाकरी, बिर्याणी असा मेनू, पण ते सुरू करीत असताना शेजारी तालीम आहे, हे ते विसरले, त्यामुळे तेथे पैलवान मंडळींचा मोठा राबता, हवे तेवढे खा, मग काय ८ दिवसांतच तो प्रयोग बंद करावा लागला. टिळक स्मारक मंदिराजवळील न्यू रिफ्रेशमेंट हाऊस, तेथील बटाटा पॅटिस, वडा-सांबार, घावन हे पदार्थ, बिलाचे वेळी सुटे पैसे नसतील, २-३ काजूकंदाची वडी घ्यावीच लागे. शिवाय महाबळेश्वर येथील गिरी विहीराचे बुकिंगची व्यवस्था होती. पुढे साहित्य परिषद चौकातील रामनाथ विश्रांतीगृहातील मोठी गोल भजी, कडक तिखट मिसळ-स्लाईसची गोडी काही और होती, मिसळ खाल्ल्यानंतर तिखट काय असते हे तेथे गेल्यावरच कळते.सदाशिव पेठेतील देशमुखवाडीत असलेलं मारुती उपाहार गृहामध्ये मिळणारी मिसळ, गोलभजी अजूनही तेथे मिळते. टिळक रोडवरीलच संजीवनीचे आता नूतनीकरण झालंय, पण पदार्थ मात्र आजही मिसळ-भजी, चहा-कॉफी असेच स्वरूप आहे, आणखी एक हॉटेल भवानी पेठेतील, वटेश्वर हॉटेलमधील भजी, पाव सॅम्पल, मिसळ आजही त्याची चव आहे तशीच आहे. अलका टॉकीज चौकात विहार नावाचं छोटं हॉटेल सध्याच्या रिगलशेजारी होतं, तेथील पाव सॅम्पल, पांढरा वाटाणा-पातळ रस्सा, मोठा स्लाईस फक्त तेथेच मिळत असे. अशी ही माझ्या लक्षात येणारी शहरातील मध्यवस्तीतील हॉटेल परंपरा आजही बदलत्या काळानुसार चालू ठेवण्याचा त्यांच्या कुटुंबीयांनी चालू ठेवली आहे. (लेखक प्रसिद्ध राजकीय-सामाजिक कार्यकर्ते आहेत.) (उत्तरार्ध)
आठवण पुण्यातील जुन्या उपहारगृहांची.....
By ऑनलाइन लोकमत | Published: December 09, 2018 7:00 AM