शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या जागा आमच्यामुळे वाढल्या; राऊतांनी दाखविला हातचा आरसा, दोन्ही पक्षांत तणाव वाढणार
2
शिवसेनेत आमदारकीच्या तिकीटासाठी २०-२० कोटींची मागणी; लक्ष्मण हाकेंचा शिंदेंवर गंभीर आरोप
3
राजीनाम्यानंतर शिवदीप लांडे हे प्रशांत किशोर यांच्या पक्षामधून राजकारणात उतरणार? दिलं असं उत्तर  
4
मुस्लीम परिसराचा हायकोर्ट न्यायाधीशांकडून मिनी पाकिस्तान उल्लेख; SC नं घेतली दखल
5
LLC 2024 : दिग्गज क्रिकेटपटू पुन्हा मैदानात! शिखर धवन-रैनाचे संघ भिडणार; जाणून घ्या सर्वकाही
6
महायुतीची कटकट वाढणार, गोपीचंद पडळकरही सरकारविरोधात उतरणार रस्त्यावर! मोठी घोषणा
7
HAL Stocks: हिंदुस्तान एअरोनॉटिक्स लवकरच बनणार 'महारत्न' कंपनी; आताही गुंतवणूक करून होणार का कमाई?
8
"हे तर व्होट कटिंग मशिन..."; 'परिवर्तन महाशक्ती' तिसऱ्या आघाडीवर संजय राऊत बरसले
9
पितृपक्ष: कालसर्प योगाचे चंद्राला ग्रहण, ८ राशींना शुभ काळ; पद-पैसा वाढ, अपार सुख-समृद्धी!
10
कोणत्याही हमीशिवाय ३ लाखांपर्यंत कर्ज... काय आहे पीएम विश्वकर्मा योजना? कुणाला मिळतो लाभ?
11
स्वप्नात मृतदेह दिसला अन् खेडमध्ये प्रत्यक्ष जंगलात सापडला; कोकणात रहस्यमय गूढ काय?
12
हात पाय बांधून मारहाण, बलात्काराची धमकी आणि..., लष्करी अधिकाऱ्याच्या होणाऱ्या पत्नीसोबत पोलीस ठाण्यात घडला धक्कादायक प्रकार  
13
चापून चोपून साडी नेसवून लिपस्टीक लावली! अभिजीतचा भन्नाट लूक पाहून निक्की म्हणाली- "बाsssई"
14
५० सेकंदांची फी ५ कोटी, प्रायव्हेट जेटने प्रवास; 'ही' अभिनेत्री आहे कोट्यवधींची मालकीण
15
भाजपाची ऑफर नाकारली, काँग्रेसमध्ये घरवापसी; खतगावकरांचा पुढचा प्लॅन ठरला?
16
अमित शाहांकडून महिला शेतकऱ्यांना गिफ्ट, उत्पन्न वाढवण्यासाठी सुरु केला 'हा' उपक्रम
17
Kolkata Doctor Case : "मृत्यूच्या काही तास आधी लेकीशी बोललो होतो..."; डॉक्टरच्या वडिलांनी CBI ला केली 'ही' विनंती
18
दलजीत कौरला पतीच्या गर्लफ्रेंडनेच दिली धमकी, अभिनेत्रीनेही दिलं जशास तसं उत्तर; नेमकं काय घडलं?
19
Bigg Boss Marathi 5: "२ हजारांचा सेकंड हँड मोबाईल घेतला, डिस्प्ले गेलेला"; सूरजने सांगितला पहिल्या फोनचा किस्सा
20
Share Market Live Updates 20 Sep: शेअर बाजारात विक्रमी तेजी, पहिल्यांदाच सेन्सेक्स ८४००० पार

कोरोना कोंडीचे उट्टे काढण्याची संधी : रिव्हेंज शॉपिंग!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2021 6:02 AM

कोरोनाच्या भीतीने वर्षभरापासून घरातच बसून आंबलेल्या आणि थकलेल्या शरीर आणि मनांना आता मोकळ्या, खुल्या, निर्बंधमुक्त जीवनाची आस लागली आहे. निर्बंधांची दोरी थोडी सैल करण्यात आली आणि वारुळातून मुंग्या बाहेर पडाव्यात तसे लोक बाहेर पडून खरेदीची लगबग करू लागले...

ठळक मुद्देवर्ष-दीड वर्षापासून घरात डांबले गेल्याने खरेदीसाठी काही वावच नसल्याने लोकांनी खिसा हलका करत वाट्टेल ती शॉपिंग करण्याचा धडाका लावला आहे.

- विनय उपासनी

‘फिलिंग बॉक्स्ड इन?’, अशी विचारणा करणारी सुपरस्टार अक्षयकुमारची जाहिरात सध्या मुंबई आणि परिसरात झळकते आहे. या जाहिरातीत एका बॉक्समधून अक्षयकुमार बाहेर पडत असल्याचे चित्र आहे. गृहनिर्माण प्रकल्पाच्या प्रसिद्धीसाठी तयार करण्यात आलेली ही जाहिरात सध्याच्या परिस्थितीला अगदी साजेशी आहे. कोरोनाच्या कहरामुळे एक वर्षाहून अधिक काळ लोक घरातच अडकून पडले आहेत. म्हणजे एकाअर्थी ते ‘बॉक्स्ड इन’च झाले आहेत. बाहेर पडावं तर कोरोनाची भीती. त्यात टाळेबंदीमुळे सर्व व्यवहार थंडावलेले. अशा स्थितीत घराच्या चार भिंतीत सातत्याने आणि सक्तीने राहावे लागत असल्याने शरीर आणि मन दोन्ही आंबून गेले आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर मंदावल्याचे दिसताच गेल्या आठवड्यात निर्बंधांची दोरी थोडी सैल करण्यात आली. त्यानंतर लगेचच बाजारपेठांमध्ये गर्दी दिसून आली. लोकांनी वीकेंडसाठी आपल्या आवडत्या ठिकाणांकडे धाव घेतली. रस्त्यावर वाहतूक कोंडीचे दृश्य दिसू लागले. शॉपिंगसाठी लगबग दिसू लागली.

हे सर्व कशाचे लक्षण आहे?

एखाद्या व्यक्तीला, समाजाला अमुक एका गोष्टीपासून दीर्घकाळपर्यंत दूर ठेवले तर मुक्ततेची संधी मिळताच दुरावलेली गोष्ट जवळ करणे, ही त्या व्यक्ती वा समाजाची सहजसुलभ वृत्ती समजली जाते. तद्वतच सध्याचे चित्र आहे. अनेक देशांमध्ये टाळेबंदी शिथिल झाल्यानंतर लोकांनी शॉपिंग मॉल्समध्ये धाव घेत खरेदीसाठी झुंबड केली असल्याचे दृश आहे. वर्ष-दीड वर्षापासून घरात डांबले गेल्याने खरेदीसाठी काही वावच नसल्याने लोकांनी खिसा हलका करत वाट्टेल ती शॉपिंग करण्याचा धडाका लावला आहे. यालाच म्हणतात ‘रिव्हेंज शॉपिंग’!

कोंडी फोडण्यासाठी...

कोरोनामुळे जगाच्या कानाकोपऱ्यात असलेल्या देशांतील लोकांची कोंडी झाली आहे. कोरोनाचा बहर ओसरल्यानंतर ही कोंडी फोडत जो तो खरेदीसाठी बाहेर पडू लागला आहे. खरेदीला कोणताही आगापिछा नाही. साध्या झूम कॉलसाठी कोणता ड्रेस परफेक्ट ठरेल, यावरही संदेश देवाणघेवाणीच्या विविध व्यासपीठांवर जोरदार चर्चा सुरू आहेत. याशिवाय टीव्ही, वॉशिंग मशीन, डिशवॉशर्स, कपडे, मोबाइल, लॅपटॉप, चपला, नेलपेंट्स, इतर सौंदर्यप्रसाधने इत्यादींची खरेदी जोरावर आहे. टाळेबंदी उठवली गेल्यानंतर चीनमधील एका शॉपिंग मॉलमध्ये तर एका दिवसात २० लाख डॉलरहून अधिक वस्तूंची खरेदी नोंदवली गेली. अमेरिका, फ्रान्स, इटली, जर्मनी, ऑस्ट्रेलिया आदी देशांमध्येही खरेदीसाठी तोबा गर्दी होऊ लागल्याच्या सुवार्ता आहेत.

कोरोनाच्या दोन्ही लाटांचा दाहक अनुभव भारतीयांनी घेतला. जगातील सर्वात लांबलचक टाळेबंदीचा अनुभवही भारतीयांनी घेतला. पहिली लाट ओसरल्यानंतर भारतीयांचा खरेदीचा उत्साह दुणावला होता. मात्र, दुसऱ्या लाटेनंतर बाजारात म्हणावी तितकीशी हालचाल नाही. कदाचित काटकसरीत राहायची, अनावश्यक वस्तूंच्या खरेदीकडे पाठ फिरवण्याची आणि भविष्यासाठी चार पैसे गाठीला असू द्यावेत म्हणून बचतीची सवय भारतीयांना असल्याने वायफळ खर्चासाठी त्यांचा हात सहजासहजी खिशात जात नाही. त्यामुळेच भारतात ‘रिव्हेंज शॉपिंग’ तूर्तास तरी दिसून येत नाही. समाजातल्या उच्चभ्रू वर्गात ‘रिव्हेंज शॉपिंग’चा कल दिसून येतो. मात्र, तो खालपर्यंत झिरपायला काही काळ जाऊ द्यावा लागेल, असे या क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत आहे.

हीच ती वेळ

एखाद्या गोष्टीवरून कोणाशी तंटा-बखेडा झाला, वाद, भांडण झाले तर योग्य संधी येताच त्याची सव्याज परतफेड करण्याच्या कृतीला आपल्याकडे एक चांगला शब्द आहे आणि तो म्हणजे उट्टे काढणे. कोरोनाच्या काळात टाळेबंदीमुळे झालेल्या कोंडीचे उट्टे फेडण्याची नामी संधी सध्या चालून आली आहे.

नाही तरी जगप्रसिद्ध सौंदर्यसम्राज्ञी आणि दिवंगत अभिनेत्री मर्लिन मन्रो ‘हॅपिनेस इज नॉट इन मनी, बट इन शॉपिंग’ असे सांगून गेलीच आहे... सौंदर्योपासक भारतीयांनी निदान तिचे म्हणणे मनावर घ्यावे.

‘रिव्हेंज शॉपिंग’: तेही चीनमधूनच!

‘रिव्हेंज शॉपिंग’ला इतिहास आहे. तोही कोरोनाचा उगम ज्या ठिकाणाहून झाला त्याच चीनचा! १९६६ ते १९७६ या दशकभरात चीनमध्ये सांस्कृतिक क्रांतीच्या नावाखाली प्रचंड घुसळण झाली. लाखो लोकांची कत्तल झाली. चिनी नागरिकांसाठी हा काळ महाकठीण होता. उत्साहवर्धक असे काही घडतच नव्हते त्यांच्या जीवनात. काही काळानंतर परिस्थिती पालटली. ७० च्या दशकाच्या अखेरीस चीनच्या सीमा जगासाठी खुल्या होऊ लागल्या. अनेक जागतिक उत्पादने चिनी बाजारपेठांमध्ये दाखल होऊ लागली. लोकांच्या उत्साहाला पारावार राहिला नाही. हातातला पैसा खर्च करण्यासाठी चिनी नागरिकांनी खरेदीचा सपाटा लावला. एरव्ही ज्या वस्तूू खरेदी करण्याची गरज नाही, त्याही वस्तूंची खरेदी केली गेली. अगदी केसांना लागणाऱ्या पिनांपासून टीव्ही, इस्त्री, घड्याळे यांसारख्या वस्तूंना प्रचंड मागणी आली. चिनी लोकांच्या या खरेदी उत्साहाला ‘रिव्हेंज शॉपिंग’ नाव पडले.

भारतात काय चित्र ?

कोरोनामुळे अनेकांची आर्थिक घडी विस्कटली आहे. देशातील तब्बल ९७ टक्के कुटुंबांच्या उत्पन्नात घट झाल्याचे निरीक्षण सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी (सीएमआयई) निरीक्षण अलीकडेच नोंदवले आहे. त्यामुळे अर्थचक्र मंदावले आहे. ते जोरात सुरू व्हावे असे वाटत असेल तर लोकांमध्ये खरेदीचा उत्साह निर्माण होणे गरजेचे आहे. चार पैसे हातात असतील तर आधी गरजेच्या वस्तू खरेदी केल्यानंतर अनावश्यक खरेदीकडे - म्हणजेच ‘रिव्हेंज शॉपिंग’ कडे लोक वळू शकतील.

(मुख्य उपसंपादक, लोकमत, मुंबई)