शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुणाला काय विचारावं हे पण उद्धव ठाकरेंना माहिती नाही"; राज ठाकरेंची बोचरी टीका
2
काँग्रेसची पाकिस्तानची भाषा, पीएम मोदींचा पुण्यातून हल्लाबोल; शरद पवारांवर एक शब्दही नाही
3
"माझा मुलगा हॉस्पिटलमध्ये असताना हा माणूस विकला गेला"; राज ठाकरे दिलीप लांडेंवर भडकले
4
अमित शाहांचा मुंबईकरांना शब्द; म्हणाले, "बांगलादेशी, रोहिग्यांना वेचून वेचून बाहेर काढणार"
5
"फूट पडली तर काँग्रेस तुमचं आरक्षण हिरावून घेईल..."; मोदींनी विरोधकांवर त्यांचाच डाव उलटवला!
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'माझी बॅग तुझ्याकडेच देतो, घेऊन येत जा,मात्र त्यातील कपडे चोरू नको'; उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचले
7
"भाजपसाठी काश्मीर सत्तेपेक्षा प्रिय, उद्धव ठाकरेंनी सांगावं की..."; अमित शाहांचा मविआवर हल्लाबोल
8
महायुतीला किती जागा मिळतील? CM शिंदेंनी थेट आकडाच सांगितला; म्हणाले, “जनतेचा विश्वास...”
9
"जेव्हा-जेव्हा हिंदूंमध्ये फूट पडली, तेव्हा-तेव्हा देशाचा एक भाग वेगळा झाला"; 'बटेंगे तो कटेंगे'वर शेखावत थेटच बोलले
10
"मुख्यमंत्री केलं तर वरचढ होईल म्हणून अजित पवारांना पण...; भुजबळांचा शरद पवारांविषयी गौप्यस्फोट
11
भाजपच्या सभेत मिथुन चक्रवर्तींचे पाकिट चोरले; स्थानिक नेत्यांची चोराला अपील, व्हिडिओ व्हायरल
12
"५ वर्षापूर्वी अमित शाह, शरद पवार अन् गौतम अदानी..."; अजित पवारांचा गौप्यस्फोट
13
“उद्धव ठाकरेंच्या बॅगेत असे काय आहे? एवढी आगपाखड करायचे कारण काय?”; शिंदे गटाने डिवचले
14
"समजूत काढायला गेले अन् तिथेच बसले"; येवल्यात भुजबळांवर शरद पवारांचा हल्लाबोल
15
Shocking! एक कार शेकडोंच्या गर्दीत घुसली; 35 जणांचा मृत्यू, ४३ जखमी, ड्रायव्हर कोमात
16
डोनाल्ड ट्रम्प यांनी कुणाला बनवलं NSA? नाव जाणून पाकिस्तानलाही धढकी भरेल; भारतासाठी आहेत खास!
17
किरकोळ महागाई RBI च्या हाताबाहेर गेली; रेपो रेटमध्ये कपात होणे शक्य नाही?
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मुख्यमंत्रिपदावरुन महाविकास आघाडीमध्ये वाद? उद्धव ठाकरेंनी एका शब्दात विषयच संपवला
19
महाराष्ट्रातील निवडणुकीसाठी काँग्रेसचा 'मेगा प्लॅन'! पुढच्या ६ दिवसांत काय करणार? २ गोष्टींवर असेल सर्वधिक फोकस
20
“मविआ सत्तेत आल्यास शेतकरी कर्जमाफी, महिलांना खटाखट ३ हजार देऊ”; राहुल गांधींची गॅरंटी

उध्वस्त ‘राज’महालाची आठवणीतली श्रीमंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 02, 2018 7:00 AM

‘आर. के. स्टुडिओने आपल्या आयुष्यात श्रीमंती अनुभवली तशी नादारीही. राज कपूरसारख्या कलंदर प्रतिभावंताच्या उत्सवी आयुष्याचे ते मुक्तपीठ. पण आता तिथे उरली आहे ती केवळ चार भिंतीची निर्जन, भग्न वास्तू.

-गजानन जानभोर

दिवसभरातील काम संपले की संध्याकाळी ‘आर. के.’ स्टुडिओतील मैफल सुरू होते. राज कपूरच्या हातात कुठले तरी वाद्य असते. समोर शैलेंद्र, शंकर-जयकिशन, मुकेश बसलेले.. रात्री उशिरापर्यंत ही मैफल रंगत जाते. थट्टामस्करी, नवीन विषय, संगीत, गाणी.. राज कपूर बहरत जातो. त्यात त्याला एखादी कथा सापडते तर कधी गाणे. ‘जिना यहाँ, मरना यहाँँ’ हे आयुष्याचे सार तो अशाच एका मैफलीत शैलेंद्रला सांगतो. ‘आर. के.’च्या भिंतींना आणि तिथल्या माणसांना ही मैफल अंगवळणी पडलेली असते. तो नसला की मग ती वास्तू अबोल आणि संध्याकाळ उदासवाणी.. राज कपूर आपल्यातून निघून गेला अन् नंतर मैफलीतील राग-अनुराग कायमचे हरवले..

आर.के. स्टुडिओ आहे अजूनही.. बराचसा कोलमडलेला आणि भंगलेलाही. तिथल्या आठवणींची आता राख झालेली.. राज कपूर गेल्यानंतर कुठल्यातरी चित्रपटाचे, एखाद्या टीव्ही सिरियलचे शूटिंग तिथे व्हायचे. पण त्याच्या नसण्याची उणीव सतत जाणवायची. ‘मेरा नाम जोकर’मध्ये राज कपूरने घातलेला मुखवटा तिथे असायचा. ‘जिस देश में गंगा बहती है’मधील तलवारही तिथे होती. त्याच्या आवडत्या नायिकांची आभूषणे, वस्रं होती. तो दिगंताला गेला व ही सारी ठेवच निस्तेज आणि निर्जीव वाटू लागली. दोन वर्षांपूर्वी ‘आर. के.’ला आग लागली, त्यात त्यांची राख झाली.‘आर. के.’चा जन्म कशासाठी? चित्रपटांच्या चित्रीकरणासाठी? बक्कळ पैसा कमावण्यासाठी? राज कपूर असेपर्यंत असे प्रश्न मनात कधी आले नाहीत. ‘आर. के.’ ही त्याच्या आनंदाची कल्पना आणि त्याचे स्वप्नही. त्याला आयुष्य मुक्तपणे जगायचे होते. तो जगण्याला उत्सव मानायचा आणि त्या आनंदात सार्‍यांना सहभागी करून घ्यायचा. म्हणूनच ‘आर. के.’मधून परत येणारी माणसे नेहमी प्रसन्न असायची. ‘आर. के.’मधील गणेशोत्सव आणि धुळवडीला सारेच जण आसुसलेले असायचे. या दोन्ही दिवशीच्या उत्सवात राज कपूर आपले हरवलेले बालपण शोधायचा. मनासारखे चित्रपट काढता यावेत, यासाठी राज कपूरने ‘आर. के.’ची स्थापना केली. त्यावेळी त्याच्याकडे होते अवघे 23 हजार रुपये. आग, बरसात, आवारा, बुटपॉलिश,  श्री  420, प्रेमरोग, राम तेरी गंगा मैली अशा कितीतरी.. ‘आर. के.’च्या उदरात जन्माला आलेल्या या कलाकृती. लहानपणी शाळेत नाटकात काम करताना त्याच्याकडून चूक झाली. शिक्षकाने त्याला कानशिलात लगावली. ‘तू गाढव आहेस. तुझ्या रक्तात अभिनय आहे असे तू म्हणतो, तो हाच का?’ त्याच्या मनाला ही गोष्ट लागली. ती आयुष्यभर त्याने सोबत ठेवली. मृत्यूशय्येवर असतानाही तो पत्नी कृष्णाला ती सांगायचा.

 

नर्गिस.. त्याच्या मनातील हळवा कोपरा. त्यांच्यातील नाते उत्कट. नायकाच्या एका हातात व्हायोलिन आणि      दुस-या हातात विसावलेली नायिका. ‘आर.के. फिल्म्स’चा हा मोनोग्राम त्याच्या ‘बरसात’मधील एका दृश्याचं प्रतीक. नर्गिसची आठवण त्याने अशी अक्षय करून ठेवली. तीसुद्धा त्याच्यासाठी वेडी झालेली.. ती म्हणायची लग्न कर. पण त्याला ती प्रेयसी म्हणूनच हवी होती, पत्नी नाही. त्याच्याशी लग्नाची परवानगी मागायला ती तत्कालीन गृहमंत्री मोरारजी देसाईंना भेटली. दोघांमधील तरल नात्यांचा ‘आर. के.’ स्टुडिओ साक्षीदार. त्या दोघांची पहिली भेट काहीशी गमतीची. केदार शर्मांनी राजला तिला भेटायला पाठवले. तो तिच्या घरी गेला. नर्गिसने दार उघडले. घराच्या अवतारात हाताला-गालाला लागलेले बेसन, कपाळावरील अस्ताव्यस्त केस हे नर्गिसचे त्याला झालेले पहिले दर्शन. ‘बॉबी’त ऋषी कपूर डिम्पलला पहिल्यांदा भेटतो तेव्हा तीसुद्धा अशाच अवतारात असते. नर्गिस त्याच्या आयुष्यात अशी कायम सोबत असायची.

मीनाकुमारी, वैजयंतीमाला, पद्मिनी या नायिकांशीही त्याचे नाव जोडले गेले. ते खरेही होते. चित्रपटातील नायिकेवरील प्रेम तो खरे मानायचा आणि त्यात आकंठ बुडायचा. एकदा ‘आर.के.’च्या ‘मेकअप’ रूममध्ये मीनाकुमारीच्या कुशीत तो शांतपणे झोपी गेला होता. दिग्दर्शक राजा नवाथे यांनीच ही आठवण एके ठिकाणी लिहून ठेवली आहे. ‘संगम’च्या वेळी वैजयंतीमालाला ‘बोल राधा बोल, संगम होगा की नही’ अशी तारच त्याने पाठवली. त्याच्या अशा अनेक प्रेमाराधनेचा ‘आर.के.’ साक्षीदार.

‘आर.के.’त तो कधी मालक नसायचा. तिथल्या स्पॉटबॉय, शिपायांसोबत तो जेवायला बसायचा. स्टुडिओतील एका सफाई कामगाराच्या मुलीचे लग्न होते. या कामगाराने नातेवाइकांना सांगितले की, घरच्या लग्नात राजसाहेब स्वत: येणार आहेत आणि वरातीसाठी आपली ‘इम्पोर्टेड’ कारही देणार आहेत. खरे तर ही पोकळ फुशारकी होती. राज कपूरला याबद्दल काहीच कल्पना नव्हती. पण जेव्हा त्याला हे कळले तेव्हा त्याने तातडीने आपली कार त्या कामगाराच्या घरी पाठवली. त्याच गाडीत त्या कामगाराच्या मुलीची पाठवणी झाली. ‘आर.के. स्टुडिओ’ या कलंदर कलावंताच्या संवेदनशीलतेचाही साक्षीदार होता. 

 

‘आर. के. स्टुडिओ’वर आता आलेले हे संकट नवीन नाही. राज कपूरसारखेच या स्टुडिओने आपल्या आयुष्यात अनेक बदल अनुभवले,  श्रीमंती आणि नादारीही.. 1970ला ‘मेरा नाम जोकर’ प्रदर्शित झाला. या चित्रपटात त्याची भावनिक गुंतागुंत होती. प्रेक्षकांनी ‘मेरा नाम जोकर’ला सपशेल नाकारले. राज कपूर कर्जबाजारी झाला. ‘आर.के. स्टुडिओ’ शेवटी गहाण ठेवावा लागला. पण बॉबी, सत्यम शिवम सुंदरम्, प्रेमरोग या चित्रपटांच्या अफाट यशामुळे ‘आर. के.’ला पुन्हा वैभव आले. ‘मेरा नाम जोकर’ यशस्वी ठरला असता तर बॉबी, सत्यम शिवम सुंदरम्ची निर्मिती झाली असती का? त्याच्यावर प्रेम करणा-या अभ्यासू चाहत्यांच्या मनात हा प्रश्न रेंगाळत असतो. ‘आर. के.’मधील धुळवडीला मायानगरीत प्रतिष्ठा होती. त्याचे निमंत्रण येणे हा सन्मान समजला जायचा. पण राज कपूर गेल्यानंतर येथील धुळवड हळूहळू बंद होत गेली. तो गेल्यानंतर ‘आर. के.’मध्ये फारशी चित्रपट निर्मिती झाली नाही. त्याच्या पुण्याईवर    जगणा-यात ती कुवत नव्हती. राज कपूरसाठी ‘आर.के. स्टुडिओ’ एक सर्जनशीलतेचे प्रतीक होते. पण त्याच्या कुटुंबीयांना ती संपत्ती वाटू लागली.

आर.के.ने जन्मास घातलेल्या चित्रपटांनी भारतीय सिनेमाला जागतिक पातळीवर नवी ओळख दिली. माणूस बाह्य सौंदर्यावर प्रेम करीत असतो. आंतरिक सौंदर्य त्याला कधी खुणावत नाही. ‘सत्यम शिवम सुंदरम्’मध्ये त्याने हेच सांगितले. आचार्य विनोबा भावेंच्या आवाहनाला साद घालीत अनेक दरोडेखोरांनी आत्मसर्मपण केले. राजच्या ‘जिस देश में गंगा बहती है’ची कथा त्यावरच आधारित होती. घोटभर पाण्यासाठी शहरात वणवण फिरणारा ग्रामस्थ आणि शहरातील माणसांचे येणारे अनुभव, त्याच्या ‘जागते रहो’चे सूत्र होते. ‘बुटपॉलिश’मध्ये अनाथ; पण कष्टकरी मुलाचे भावविश्व त्याने रंगवले. हा चित्रपट पूर्ण झाला; पण त्यात एकही गाणे नव्हते. ‘आर.के.’चा सिनेमा आणि संगीत नाही, राज कपूरला ही हुरहूर होती. त्याने या चित्रपटाचे प्रदर्शन थांबवले आणि 15 दिवसांत त्यासाठी गाणी तयार केली. संगीत हा राज कपूरचा प्राणबिंदू. तो अनेक वाद्य वाजवायचा. ‘आर.के.’चा पहिला सिनेमा ‘आग.’ त्यातील राम गांगुलींची गाणी फारशी लोकप्रिय झाली नाहीत, तो चित्रपट न चालण्यामागे तेही एक कारण होते. ‘बरसात’च्या निर्मितीच्यावेळी राज कपूर चिंतेत होता. शेवटी त्याने या सिनेमाची संगीतसूत्रे शंकर-जयकिशनकडे सोपवली. त्यातील 11 गाणी गाजली आणि तिथूनच त्याला आपल्या चित्रपटांच्या यशाचे एक सूत्र गवसले.

‘आर.के. स्टुडिओ’त आता काहीच उरलेले नाही. तो उद्ध्वस्त ‘राज’महाल आहे. एका कलंदर प्रतिभावंताच्या उत्सवी आयुष्याचे ते मुक्तपीठ आहे. ‘आर.के.’ने त्याला हवे ते दिले, आनंदाने न्हाऊ घातले. तो समरसून जगला. त्यानेच सांगून ठेवले आहे, ‘‘हे आयुष्य सर्कशीसारखे आहे, तीन तासांचा खेळ. पहिला तास - बालपण, दुसरा -तारुण्य आणि तिसरा - वार्धक्य.’’ त्याच्या मनाच्या, शरीराच्या या तिन्ही अवस्थेत आर. के. त्याच्या सोबतीला होता. त्याला सांभाळले आणि सावरलेदेखील. ती आता चार भिंतीची निर्जन, भग्न वास्तू आहे. तिला कुणी विकत असेल तर राजच्या लेखी त्याला फारसे महत्त्व उरत नाही..

(लेखक लोकमतच्या नागपूर आवृत्तीचे निवासी संपादक आहेत.)

gajanan.janbhor@lokmat.com