सुलक्षणा वऱ्हाडकर
जगभरातल्या क्रीडारसिकांचा कुंभमेळा रिओत सुरू झालाय.
ऐन विशीतल्या तरुणांपासून ते सत्तरीच्या आजोबांपर्यंत आणि विद्यार्थिनींपासून ते गृहिणींपर्यंत..इथे रिओतल्या आॅलिम्पिकनगरीत उत्साही स्वयंसेवक दिवसाचे बारा-बारा तास काम करताहेत. त्यात आम्ही भारतीयही आहोत.
कामाने शिणलेपणाचाही एक विलक्षण कृतार्थ अनुभव आमच्या वाट्याला आला आहे..
ज्या ऑलिम्पिकची जगभरातील रसिक डोळ्यांत प्राण आणून वाट पाहत होते त्या रिओ आॅलिम्पिकचा उद्घाटन सोहळा परवा मोठ्या दिमाखात आमच्या डोळ्यांसमोर चिरंजीव झाला.
क्रीडारसिकांना जेवढी त्याची उत्सुकता होती, त्याहीपेक्षा जास्त इथे रिओमध्ये जमलेल्या आमच्यासारख्या स्वयंसेवकांची.
या आॅलिम्पिकसाठी तब्बल सात हजार स्वयंसेवक स्वयंस्फूर्तीनं आॅलिम्पिकनगरीत दाखल झालेत. त्यात ८० टक्क्यांहून जास्त स्वयंसेवक स्थानिक असले, तरी जगाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या स्वयंसेवकांची संख्याही कमी नाही. अमेरिका, चीन, इंग्लंड.. भारतातून आलेल्या स्वयंसेवकांची संख्याही सव्वाशेच्या आसपास.
स्वत:च्या खिशाला फोडणी देऊन, कामातून वेळ काढून, सुटी घेऊन इथे हजर झालेल्या भारतीय स्वयंसेवकांसाठी वेलकम डिनर आणि लंच पार्टीही इथे माझ्या रिओतल्या घरी झाली.
कोण कोण, कुठून कुठून आलंय. साऱ्यांचा ध्यास एकच. रिओ आॅलिम्पिकमध्ये सहभागी होण्याचा! खेळाडू म्हणून जरी नाही, तरी किमान स्वयंसेवक म्हणून तरी आॅलिम्पिकचा एक भाग आपल्याला होता यावं यासाठीची प्रत्येकाचीच आस मोठी विलक्षण. त्यासाठी मोठी ‘तालीम’ आणि कसरतही साऱ्यांना करावी लागली. पण आता प्रत्यक्ष आॅलिम्पिक सुरू झाल्यानंतर आणि दिवसाचे दहा-बारा तास याच आॅलिम्पिकच्या तयारीत व्यस्त असताना त्या शिणलेपणाचाही एक विलक्षण कृतार्थ अनुभव आम्ही सारे इथे घेत आहोत.
स्वयंसेवकांच्या माध्यमातून रिओमध्ये एकवटलेला विविधरंगी भारत आम्ही इथे अनुभवतोय. सर्वांनी एकत्र येण्याची आॅफिशअली व्यवस्था पुरेशी कार्यक्षम नसली, तरी फेसबुक ग्रुपच्या माध्यमातून ही उणीव साऱ्यांनीच भरून काढली.
रिओतला हा भारत कसा दिसतो?
यातील अनेकांच्या कहाण्या स्फूर्तिदायक आहेत. या गटातले आमचे ज्येष्ठ मित्र मुंदडा नागपूरचे व्यावसायिक आहेत. आतापर्यंत त्यांनी चार आॅलिम्पिकमध्ये हजेरी लावलीय. ‘फिफा’मध्ये तीन वेळेस जाऊन आले आहेत. ‘फिफा’ने त्यांची मुलाखतसुद्धा घेतली होती. ते आणि त्यांच्या पत्नी फिफा आणि आॅलिम्पिक सामन्यांच्या वेळेस प्रत्यक्ष त्या ठिकाणी जातात. खेळाची आवड असणारं हे दांपत्य तिरंगा घेऊन तिथे कार्यरत असतं.
मूळची गोव्याची, वास्कोची असलेली परंतु गेली सहा वर्षं दुबईत असलेली डॉक्टर वृषाली रेवणकर दरवर्षी जुलैमध्ये महिनाभराची सुटी घेऊन जगभर प्रवास करते. तिने आतापर्यंत आफ्रिका, अलास्काच्या सहली केल्या आहेत. वंडरलास्ट वुमन ग्रुपबरोबर ती फिरते. यातून तिला खूप काही मिळाले असे ती म्हणते. .. देशाटन, तेही बायकांच्या ग्रुपबरोबर! हे जी जाणीवपूर्वक करीत असते आणि त्याबाबतीत इंग्लिशमध्ये लिहितही असते.
रमा बिष्णोई या मुंबईच्या सायकल ग्रुपमधील उत्साही सदस्य. पन्नाशी पार केलीय परंतु त्यांचा उत्साह विशीतल्या तरुणालाही लाजवेल असा.
सामाजिक उपक्र मात त्या सहभागी होतात. सायकलिंग हा त्यांचा अत्यंत आवडता छंद.
चेन्नईवरून आलेले अजय आणि निशा दोघेही असेच स्पोर्ट्सप्रेमी. अजयने तर मोठ्या प्रयत्नाने त्याचा फिटनेस परत मिळवला आणि आता तो आॅलिम्पिकसाठी सज्ज झालाय.
संभू हरी हा मूळचा केरळचा. सध्या जपानमध्ये शिकतोय. तोसुद्धा जपानहून थेट रिओला आला आहे. खराब हवामानामुळे त्याचे विमान रखडले होते. तरीही तो मजल दरमजल करीत इथे एकदाचआ पोचलाच.
शाश्वत खेमानी आयआयएम्समध्ये रिसर्च असिस्टंट आहे.. शाकाहारी असलेल्यांसाठी इथे काळजीचे वातावरण असले, तरीही साहस म्हणून शाश्वतला रिओचा अनुभव हवा आहे.
संपत अय्यर पुण्याचे. महाराष्ट्र बँकेत मोठ्या पदावरून निवृत्त झालेले. अनेक मोठ्या बँकांमध्ये त्यांनी काम केले होते. उत्तम मराठी बोलणारे. निवृत्तीनंतर त्यांच्या बकेटलिस्टमध्ये आॅलिम्पिकवारीसुद्धा होती. त्यांचाही उत्साह पाहण्यासारखा.
संदीप शेखरमंत्री हा दोह्यात काम करतो. तो मूळचा तेलंगणाचा. इंदिराजी या आमच्या‘ग्रुप अॅडमिन’. अतिशय सळसळीत व्यक्तिमत्त्वाच्या. कोलकात्यामधील गृहिणी. त्यांचा रियल इस्टेटचा व्यवसाय आहे. त्यासुद्धा पन्नाशीच्या पुढे आहेत.
रिलायन्स अॅनिमेशनमध्ये विद्यार्थी असलेल्या तुषारची रिओ आॅलिम्पिकसाठी स्वयंसेवक म्हणून निवड झाली होती, पण ऐनवेळी पैसे उभे राहू न शकल्याने त्याला येता आले नाही. मॉस्कोमध्ये शिकणारा, आॅस्ट्रेलियात राहणारा ऋषिकेश गवाणकर पॅरा आॅलिम्पिकसाठी सिलेक्ट झालाय, पण नेमकी तेव्हाच त्याची परीक्षा आहे. त्यामुळे त्यालाही येता येणार नाही.
अदिती चेन्नईची. अमेरिकेत वॉशिंग्टनमध्ये ती पदव्युत्तर शिक्षण घेतेय. ती अमेरिकेतून रिओला येणार आहे.
उल्हास शहा टोरांटोमध्ये पिझ्झा हट मॅनेजर म्हणून काम करतो. अहमदाबादचा हा गुजराथी मुलगा उत्तम शेफ आहे. त्याची ड्यूटी बॅडमिंटन कोर्टवर असणार आहे. अंकुश जयपूरमधून येतोय, तर भास्कर बेंगळुरूमधून. अभिजित देशमुख हा आयटी इंजिनिअर . तो पुण्याहून येतोय. तो एका वाहिनीसाठी रिपोर्टिंगसुद्धा करणार आहे.
सेलिंगची आवड असणारी सोनाली कुलश्रेष्ठ केळकर ही लीडरशिप कन्सल्टण्ट आहे. तिची सेलिंगसाठीच्या इव्हेण्ट्समध्ये निवड झालीय.
आॅलिम्पिकच्या ओपनिंग सेरेमनीच्या रंगीत तालमीसाठी तिला बोलावण्यात आले नव्हते, परंतु तरीही ‘माराकाना’मध्ये जाऊन तिने रिक्वेस्ट करून एक तिकीट मिळवले. तिच्या भाग्याने भारतीय टीमच्या मॉक परेडसाठी तिला तिरंगा घेण्यासाठी बोलावण्यात आले. तिच्यासाठी हा अत्यंत आनंदाचा दिवस होता. सुयश माथूर दिल्लीत सेल्स मॅनेजर म्हणून काम करतोय, तर नील देशपांडे पुण्यातून येतोय. तो स्पोर्ट्स मॅनेजमेंट स्टुडण्ट आहे.
सॅनफ्रान्सिकोमधून गिरीप्रसाद चमाला येत आहेत. रोटरी क्लबमध्ये अत्यंत महत्त्वाच्या आणि मोठ्या पदावर कार्यरत असलेले प्रदीप गोडबोले हे मुंबईहून आले आहेत. खेळविषयक लिखाणही ते करतात.
स्विडनवरून नाग सुधा मंगेशकर येत आहेत. चेन्नईच्या रेणुकालासुद्धा जग फिरण्याची आवड आहे. ती टेक्निकल पब्लिकेशनमध्ये कण्टेण्ट मॅनेजर म्हणून काम करतेय. रामा, वृषाली आणि रेणुका यांची फेसबुकवर ओळख झाली. त्या तिघी एकत्र राहत आहेत.
खेळाची आवड असलेला शरण मेहरा दुसऱ्यांदा रिओला आलाय. याआधी फिफासाठी आला होता. तो मुंबईकर आहे. सीएचा अभ्यास करतोय. मुंबईकर श्याम दाते हा तरु णसुद्धा यात सामील आहे. तो युरोपमध्ये राहतो.
नागपूरचे क्र ीडाप्रेमी ओम प्रकाश मुंदडा यांना प्रेसचे मानांकन मिळाल्यामुळे सगळ्यांनाच आश्चर्य वाटले. ते एका हिन्दी वर्तमानपत्रासाठी वार्तांकन करणार आहेत..
येथे काही इंग्लिश पत्रकारसुद्धा स्वयंसेवक म्हणून काम करणार आहेत. मुंबाहून चंद्रशेखर तिवारी, आफ्रिकेतून विनोद, जे पूर्वी तिथल्या वकिलातीत काम करत होते..
असे अनेक जण म्हणजे तब्बल सव्वाशेपेक्षाही जास्त स्वयंसेवक रिओ आॅलिम्पिकसाठी इथे काम करत आहेत.
आजच्या आर्थिक मंदीच्या काळात दोन-तीन लाख रु पये खर्च करून, महिनाभराची सुटी काढून, अगदी परक्या देशात, ज्यांची संस्कृती पराकोटीची भिन्न आहे अशा जागी केवळ खेळावर प्रेम किंवा आवड म्हणून एकत्र जमणारे हे सर्व स्वयंसेवक पाहिले की आपल्या नवीन भारताची ओळख कळते.
तशीही ‘इमर्जिंग मार्केट’ म्हणून भारताची ओळख आहेच. एक काळ असा होता, खिशात जरा पैसे आले की काश्मीर, सिंगापूर किंवा फार फार तर थायलंड मलेशियासारख्या ठिकाणी ‘चार दिवस तीन रात्री’ राहून यायचं. त्याचा अल्बम बनवायचा आणि त्या शिदोरीवर पुढची काही वर्षं काढायची किंवा ‘स्मरणातली पहिली आणि शेवटची ट्रिप’ म्हणून त्याच स्मरणरंजनात आयुष्यभर रमायचे.
या पार्श्वभूमीवर आॅलिम्पिकमध्ये आलेल्या या सव्वाशे जणांकडे पाहिले तर जाणवते की हेच पैसे खर्च करून त्यांना एखाद्या एक्झॉटिक ठिकाणी जाता आले असते. मजा करता आली असती. सोशल साइट्सवर ते फोटो शेअर करता आले असते. परंतु त्याऐवजी त्यांनी दिवसाला बारा-बारा तास मोफत काम करणे पसंत केले. एक-दोन तास प्रवासाचे, दहा-बारा तास कामाचे. शिवाय पोर्तुगीज शिकणे, ग्रुप डायनॅमिक्स पाहणे, नवीन शहरात, तिथल्या खाद्यसंस्कृतीशी एकरूप होणे, कल्चरल शॉक्स पचविणे, सुरक्षिततेच्या दक्षता बाळगणे हे सगळे ओघाने आलेच..
एकूणच या सर्वांचा वयोगट पाहिला तर विशीतल्या मुलांपासून सत्तरीतील आजोबांपर्यंत अनेक जण या वारीत सामील झाले आहेत.
भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी या स्वयंसेवकांना झेंडावंदनासाठी आमंत्रित करण्यात येणार आहे. त्यांच्या इमेल्स वकिलातीने घेतल्या आहेत. परंतु इतर वकिलातींकडून ज्या पद्धतीने स्वयंसेवकांची काळजी घेण्यात येत आहे तशी काळजी किंवा तशा पद्धतीची माहिती भारतीय दूतावासातून थेट आलेली नाही..
कुणी तरी एक दोन स्वयंसेवक दूतावासातील काही जणांना ओळखतात. त्यांची नावे न सांगता निरोप दिला घेतला जातो. म्हणजे ब्यूरोक्र ॅसीच्या चक्र ातून हे अजून बाहेर पडले नाहीत असे वाटते. कुणाकडं संपर्क करायला हवा याचे स्वच्छ चित्र नाही...
ब्राझीलमधील इथल्या सोशल कॉन्सिल्स मात्र खूपच को-आॅपरेटिव्ह आहेत. त्यांची काम करण्याची पद्धत पाहता त्या सगळ्यांना सामावून घेत आहेत. तरीही एक उणीव जाणवते ती म्हणजे थेट संपर्क होऊ शकत नाही किंवा इाारीतले शुक्राचार्य जास्त आहेत. प्रत्येक वेळेस थेट उच्चपदस्थ व्यक्तीकडे जाणे बरोबर नाही. त्याऐवजी एक टचिंग पॉइंट असेल तर सुविधा होऊ शकते..
रिओ आॅलिम्पिकनंतर मला याबाबतीत एक सह्यांचे निवेदन द्यायचे आहे. जेणेकरून पुढल्या टोकियो आॅलिम्पिकसाठी येणाऱ्या स्वयंसेवकांना सांस्कृतिक धक्के बसणार नाहीत. (कारण तिथेही मी काही वर्षे राहिले आहे.) रिओमध्ये तर एकही भारतीय रेस्टॉरंट नाही की भारतीयांचा आकडा पंचवीस कुटुंबांच्या पुढेही जाणार नाही. मराठी म्हणाल तर इन मिन दोन कुटुंबे.
आपापल्या राज्यांचे प्रतिनिधित्व करणारे एनआरआय तसेही कमी.. त्या भिंती गळून पडायलासुद्धा वेळ लागतो. अशा वेळेस वकिलातीकडून थेट माहिती मिळाली तर स्वयंसेवकांना सोयीचे होऊ शकते..
उदाहरणार्थ ब्राझीलच्या आॅफिशियल पेजसाठी भारतीय दूतावासाचा एक ग्रुप फोटो हवा आहे. पण हा निरोप लंडनहून आलेल्या एका स्वयंसेवकाने सगळ्यांना दिला.. को-आॅर्डिनेशनचे काम ती व्यक्ती करत आहे. या सर्व प्रकारात ‘गुळाचे गणपती’ जास्त तयार होण्याची शक्यता असते.
पण तरीही रिओ आॅलिम्पिकमध्ये स्वयंसेवक म्हणून सहभागी होणाऱ्या साऱ्यांनी या किरकोळ अडचणींवर केव्हाच मात केली आहे. आॅलिम्पिकमध्ये सहभागी होण्याचा अनुभव अगदी वेगळा आणि थरारक आहे.
परदेशी नागरिकांसोबतच भारतीय नागरिकही मोठ्या उत्साहानं या कुंभमेळ्यात सहभागी झाले आहेत. त्यांचा फसफसणारा उत्साह तिथल्या सर्वसामान्य नागरिकांना, आॅलिम्पिक आयोजकांनाच नव्हे, तर खुद्द देशोदेशीच्या खेळाडूंना ऊर्जा देतोय..त्याचाच अनुभव सध्या आम्ही सारे घेतोय...
अनोख्या मैत्रीचं रिओतलं भारतीय ऐक्य
रिओला आल्यानंतर नेमके कुठे भेटायचे, सर्वांची सोय काय.. प्रत्येकाच्या ड्यूटीचा मेळ कसा साधायचा याबाबतीत फेसबुक पेजवर चर्चा होते आहे. यात थेट दूतावासातील कुणी संवाद साधून सर्वांना एकत्र बोलावले तर थोडे सोपे गेले असते. परंतु दुर्दैवाने तसे काही घडले नाही. फेसबुकमुळे या सर्वांची एकमेकांशी ओळख झाली. प्रत्येकाला
आपल्या आवडीनिवडीप्रमाणे मित्र-मैत्रिणी मिळाले आहेत.
मीदेखील मुंबईत लहानाची मोठी झाल्यामुळे ‘मुंबईकर नेहमीच इंडियन असतो’ या मूलभूत तत्त्वाने माझीही खूप जणांशी मैत्री झाली आहे. यातील काही जणांना रिओतील माझ्या घरी वेलकम डिनर आणि लंचचे आमंत्रण होते. रिओतल्या घरच्या गप्पाटप्पांची मजा काय सांगू?
पुण्याचा गणपती, मुंबईचं तोरण, नागपुरी मिठाई आणि दुबई मसाला!
माझ्या घरी आम्ही गणपती बसवतो.पुण्याहून रिओला येताना शाडूची गणपतीची मूर्ती विमानतळावर खंडित झाली होती म्हणून पुण्याचे संपत अय्यर माझ्यासाठी नवीन गणपतीची मूर्ती घेऊन आले आहेत. त्याचप्रमाणे गणपतीचे डेकोरेशन अभिजित खास पुण्याहून घेऊन आलाय. कुणी माझ्यासाठी मोदकाचे पीठ आणले. कुणी काही तर कुणी काही. सोनाली मुंबईहून दरवाजाचे तोरण आणि मिठाई घेऊन आलीय, तर वृषाली दुबईहून खूप सारे पाकिस्तानी मसाले.. काही जण नागपूरहून मिठाई घेऊन आलेत.. भारतीय आपुलकी मला या साऱ्या स्वयंसेवकांमध्ये दिसली. त्याने मी स्वत:देखील खूप भारावून गेलेय..