- अजय परचुरे
आर. के. स्टुडिओ हा ग्रेट शोमॅन राज कपूरचं केवळ ‘स्मारक’च नव्हे, चित्रपटांच्या सुवर्णयुगाचा तो साक्षीदारही आहे. एकाहून एक सरस सिनेमे इथे तयार झाले. अनेक अभिनेत्यांच्या अभिनयाला कसदार वळसे याच ठिकाणी पडले. पण काळाची पावलं या स्टुडिओला ओळखता आली नाहीत, स्टुडिओची रया गेली, गेल्या वर्षी लागलेल्या आगीत तर त्याच्या सुवर्णयुगानं अक्षरश: काजळी धरली.चित्रीकरण बंद पडलं, तो चालवणं अवघड झालं. कपूर खानदानानं आता तो विकायचा निर्णय घेतलाय..हा स्वप्नमहाल रसिकांच्या मनातूनपुसला जाणं मात्र अशक्य आहे.
हम ना रहेंगे, तुम ना रहोगे.. फिर भी रहेगी निशानियाँ.. श्री ४२० सिनेमातील राज कपूर आणि नर्गिस यांच्यावर चित्रित झालेलं हे गाणं. योगायोगाची गोष्ट म्हणजे या गाण्याच्या ओळी पडद्यावर सुरू असताना पावसात भिजत जाणारी तीन लहान मुलं पडद्यावर येतात. पडद्यावरच्या या लहान मुलांत राज कपूरचा लाडका मुलगा ऋषी कपूरही होता. आर.के. स्टुडिओ विकण्यावरून सध्या जो काही बातम्यांचा महापूर आलाय, त्यात हे गाणं सतत आठवतंय. सध्या आर.के. स्टुडिओची जबाबदारी ऋषी कपूरच सांभाळतोय हाही एक योगायोग. इतक्या वर्षांपूर्वी चित्रित झालेल्या या गाण्यात राज कपूर जणू ऋषी कपूरला गाण्यातून सांगतोय की, मी राहणार नाही; पण मी जागवलेली ही विशाल स्वप्नं, माझा स्टुडिओ याची निशाणी मात्र पुसू नकोस. मात्र परिस्थिती बदललीय. सिनेमाचं स्वरूप बदललंय आणि एकेकाळी सुवर्णकाळ पाहिलेला आर.के. स्टुडिओ कपूर कुटुंबीयांकडून आता व्यावसायिक हातात दिला जातोय...
ग्रेट शोमॅन राज कपूर म्हणजे रूपेरी पडद्यावरील जादूगार. त्याने नुसतीच स्वप्नं दाखवली नाहीत तर तो स्वत: पडद्यावर ती स्वप्नं जगला. त्याच्या निळ्या डोळ्यांतील भाबडेपणा, ओठांवरील करुण हास्य तर कधी शृंगारातील आक्रमक धसमुसळेपणा पाहताना थिएटरच्या अंधारात बाह्य जगाचा विसर पडत असे. या स्वप्नांच्या बादशाहाने आग आणि बरसात या सुपरहिट सिनेमांची निर्मिती केल्यानंतर १९४८मध्ये मुंबईपासून दूर असणाऱ्या चेंबूरमध्ये दोन एकर जागेवर आर.के. स्टुडिओचा घाट घातला. त्या काळी चेंबूर हा वनराई आणि जंगलाने व्यापलेला सुनसान भाग होता. मात्र राज कपूरने अत्यंत मेहनतीने इथे आपल्या स्वप्नांचा महाल बांधला आणि आपल्या भात्यातून याच स्टुडिओमधून नंतर एकाहून एक सरस सिनेमे तयार केले. या स्टुडिओने काय नाही पाहिलं? सिनेमाच्या सुवर्णकाळातील सर्व गोष्टींचा आर. के. स्टुडिओ साक्षीदार आहे. होळीचा सण आर. के. स्टुडिओमध्ये जितका रंगला तितका क्वचितच नंतर या चंदेरी दुनियेत नंतरच्या सिताºयांनी अनुभवला असेल. पण या रूपेरी महालाला नेमकं आता असं चित्र का दिसतंय की कपूर कुटुंबीयांना या रूपेरी वास्तूला आता विकायची वेळ आली आहे. नेमकी काय कारणं असतील यामागे याचा शोध घेणं महत्त्वाचं आहे.
आर. के. समोरील अडचणीकपूर कुटुंबातील भावी पिढीमध्ये संपत्तीच्या वाटणीवरून कायदेशीर लढाई होऊ नये हा विचार समोर ठेवून हा निर्णय कपूर कुटुंबाने एकमताने घेतला आहे. या निर्णयाला राज कपूर यांची तीन मुले रणधीर कपूर, ऋषी कपूर आणि राजीव कपूर यांच्यासह त्यांच्या दोन मुली रीमा जैन आणि रितू नंदा यांचीही सहमती मिळाली आहे. आर. के. स्टुडिओ विकला जाणार आहे, मात्र याबाबतची निश्चित तारीख ठरलेली नाही. मालमत्ता खरेदी-विक्रीचा व्यवहार करणाºया एका कंपनीकडे हे काम देण्यात आल्याची विश्वसनीय माहिती आहे.स्टुडिओला का लागली
उतरती कळा?अनेक हिंदी चित्रपटांचे चित्रीकरण याच स्टुडिओमध्ये झाले आहे. अलीकडे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात टीव्ही मालिकांचे चित्रीकरणही चालत होते. मात्र गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात या स्टुडिओमध्ये भीषण आग लागली. या आगीत स्टुडिओचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. कपूर कुटुंबाने या संकटातून पुन्हा ताकदीनिशी उभे राहून आर.के.चे गतवैभव पुन्हा निर्माण करण्याचा निर्धार केला होता. मात्र त्यात त्यांना अडचणी येऊ लागल्या. आग लागल्यापासून स्टुडिओमधील चित्रीकरणही बंद पडले होते. त्यामुळे कुठलाही आर्थिक स्रोत नसल्यामुळे अखेर हा स्टुडिओ विकण्याच्या अंतिम निर्णयावर हे कुटुंब आले आहे.
जेव्हा स्टुडिओ गहाण ठेवावा लागला..राज कपूर यांनी आपल्या कारकिर्दीमध्ये अनेक गाजलेले चित्रपट निर्माण केले. मात्र त्यांनाही अशा काही प्रसंगाला सामोरे जावे लागले होते की, ज्यामुळे त्यांना हा स्टुडिओ गहाण ठेवावा लागला होता. राज कपूर यांनी ‘मेरा नाम जोकर’ हा अजरामर चित्रपट बनविला. त्यासाठी त्यांना भरपूर पैसा खर्च करावा लागला होता. या चित्रपट निर्मितीसाठीच त्यांना हा स्टुडिओ गहाण ठेवावा लागला होता. तरीही या चित्रपटातून त्यांना म्हणावा तितका आर्थिक फायदा झाला नाही. त्याचा मोठा धक्का राज कपूरना बसला होता. त्यानंतर त्यांनी आपला मुलगा ऋषी कपूर यांना बॉबी चित्रपटातून पडद्यावर आणले आणि या चित्रपटाच्या तुफान यशानंतर या आर.के. स्टुडिओचे कर्ज फेडण्यात आले.
काळाची पावलं ओळखता आली नाहीत..‘सबकुछ सीखा हमने ना सीखी होशियारी..’ राज कपूरनी हे गाणं सिनेमात स्वत:वर चित्रित केलं असलं तरी त्याच्या वारसांना ही होशियारी पुढे जाऊन स्टुडिओमध्ये आणता आली नाही. आर.के. स्टुडिओसमोर उभ्या राहिलेल्या इतर स्टुडिओमध्ये बदलत्या सिनेमाप्रमाणे प्रगत तंत्रज्ञान आलं. अत्याधुनिक बदल करण्यात आले. मात्र आर.के. स्टुडिओत हे तंत्रज्ञान आणण्यात कपूर खानदानने फारसं स्वारस्य दाखवलं नाही. वर्षभरापूर्वी आग लागल्याने स्टुडिओची रयाच गेली. मुंबईतील फिल्मसिटी, मढ या भागात पूर्णपणे विस्तारलेल्या सिनेमा जगताला एकेकाळचं वैभव असलेला चेंबूरचा हा स्टुडिओ दुसरं टोक वाटू लागला आणि स्टुडिओमधील चित्रीकरण पूर्णपणे थांबलं.ज्या शोमॅनने सिनेमा अक्षरश: जगला, जगवला त्याच्या स्वप्नांना आज त्याचेच कुटुंबीय आर्थिक तोट्यापायी आपली वास्तू व्यावसायिकाच्या हातात सोपवतायत. सिनेमाचा पोत बदललाय, त्याची रीत बदललीय. लाखों, कोटींचं बजेट अब्जोंमध्ये गेलंय; पण जीना यहाँ मरना यहाँ.. इसके सीवा जाना कहाँ.. हे उत्कटतेने म्हणणारा राज कपूर आणि त्याच्या या स्वप्नाचा महाल चिरकाल लक्षात राहील...कारण.. फिर भी रहेगी निशानियाँ...
(लेखक लोकमतच्या मुंबई आवृत्तीत वरिष्ठ उपसंपादक आहेत. ajay.natak@gmail.com)