- विनय र. र.
काळाच्या ओघात आपण आपली फक्त जीवनशैलीच बदलली नाही, तर अनेक नैसर्गिक गोष्टींशीही फारकत घेतली. त्यातलाच एक प्रकार म्हणजे नैसर्गिक सूर्यप्रकाश आणि नैसर्गिक अंधार. या दोन्ही गोष्टी आपण आपल्या आयुष्यातून जणू हद्दपार करायला घेतल्या आहेत. मात्र त्यामुळे आपण आपले सुदृढ मानसिक, भावनिक आणि शारीरिक आरोग्यही गमावून बसलो आहोत किंवा त्या वाटेवर अधिक वेगाने आपण चाललो आहोत.आपल्या बदलेल्या जीवनशैलीमुळे आपण प्रकाशाशी असणार्या आपल्या नात्यात झपाट्याने बदल केला आहे. 19व्या शतकाच्या सुरुवातीस गॅसबत्तीचा शोध लागण्याआधी कृत्रिम प्रकाश म्हणजे मिणमिणते टेंभे, मेणबत्त्या, पणत्या किंवा समया होत्या. शिवाय लोक जागे असताना बराच काळ चार भितींबाहेर घालवत.आज, पाश्चिमात्य जीवनशैलीने जगणार्या व्यक्ती दिवसातील 90 टक्के काळ चार भिंतींच्या आत घालवतात. त्यामुळे लोकांचा दिवसाचा वावर कमी उजेडात, तर रात्नीचा वावर अधिक उजेडात होत आहे. परिणामत: त्यांच्या दैनंदिन जैविक चक्रात सतत उतार-चढाव होत आहेत, शरीरक्रिया आणि मनोवर्तनात बदल होत आहेत. झोप विस्कळीत होत आहे आणि शारीरिक घड्याळ बिघडते आहे. सूर्यप्रकाश खूपच कमी मिळाल्यावर ड जीवनसत्त्वाची कमतरता होते, प्रतिकारशक्तीचा र्हास होतो आणि हृदयक्रियांमध्ये बिघाड होतो.सूर्याशी बदललेल्या नात्याचा आपल्या जीवनावर किती प्रभाव पडतो? सतत सावलीत राहिल्यामुळे आपले किती नुकसान होते? शरीराला किती प्रकाश आवश्यक आहे? याबाबत काम करणार्या संशोधकांची सध्या बरीच लगबग चालू आहे.आज आपल्यापैकी बहुतेक जणांचा दिवसाचा काळ संध्याछायेत मिळणार्या अंधुक उजेडाइतक्या वातावरणात जातो. उजेड लक्स या एककात मोजतात. आदिवासी किंवा ग्रामीण भागात विजेची मुबलकता नाही आणि जीवन शेतीशी निगडित आहे तेथील माणसाचे रोजचे जगणे पहा. त्यांच्या अंगावर रोज पडणारा सूर्यप्रकाश आणि शहरी व्यक्तींच्या अंगावर पडणारा सूर्यप्रकाश यांची तुलना केली तर सूर्यप्रकाशाशी असणारे आपले नाते किती बदलले आहे ते लक्षात येईल.संध्याप्रकाशातला वावर सुकिकेंद्रांचे (सुप्रा कियास्मॅटिक केंद्र) कार्य मंद करतो, त्यामुळे आपले ‘घुबड’ होते. रात्नीच्या वेळी उजेडात वावरण्यामुळे आपण उशिरापर्यंत जागेच राहतो. बराच वेळ झोपेची आराधना करण्यात जातो आणि झोप न येण्याची समस्या निर्माण होते. मात्न दैनंदिन कामांसाठी आपल्याला सकाळी ठरावीक वेळी उठणे भागच असते, त्यामुळे आपल्याला झोप कमी मिळते. सकाळी होणार्या लख्ख प्रकाशाच्या दर्शनामुळे आपल्या शरीराचे घड्याळ वेगाने चालू होते आणि त्यामुळे झोप पूर्ण झाली नसेल तर आपल्याला विचित्न वाटायला लागते.रात्नी गडद अंधारात झोपणे अत्यंत महत्त्वाचे आहे. रात्नीच्या उजेडामुळे आपल्या शरीराचे घड्याळ अनियमित होते, शरीराला अवांछित उत्तेजना मिळते आणि मेलाटोनिन नावाच्या संप्रेरकाची निर्मिती कमी होते. मेलाटोनिनमुळे मेंदूतील शरीराला उत्तेजना देणार्या भागांना - बाहेर रात्न आहे, अजून जागे होऊ नका, आराम करा - असा संदेश दिला जातो.2016 साली झालेल्या एका अभ्यासानुसार, प्रकाश-प्रदूषणाची उच्च पातळी असलेल्या भागात राहणारे लोक उशिरा झोपी जातात आणि उशिरा जागे होतात. त्या मानाने अंधार्या भागात राहणारे लोक रात्नी लवकर झोपतात आणि सकाळी लवकर उठतात. प्रकाशप्रदूषित भागातले लोक कमी झोपतात, दिवसभर जास्त थकतात आणि त्यांच्या झोपण्याच्या गुणवत्तेबद्दल ते फारसे समाधानीही नसतात. अलीकडील उपग्रह प्रतिमांच्या अभ्यासानुसार, कृत्रिम दिव्यांनी प्रकाशित होणारा पृथ्वीवरील भाग दरवर्षी 2 टक्क्यांहून अधिक प्रमाणात वाढत आहे.दिवस आणि रात्नीदरम्यान अंधार आणि उजेड यांच्यात मोठी तफावत असणे महत्त्वाचे आहे. प्रकाशामुळे आपले जैविक चक्र मोठय़ा प्रमाणात प्रभावित होते. रात्नीच्या आणि दिवसाच्या उजेडातील फरक जेवढा कमी असेल तेवढी जैविक चक्राची लय मंदावत जाते, निद्रार्हास होतो. ते टाळण्यासाठी आपण काही करू शकतो का?जनरल सर्व्हिसेस एडमिनिस्ट्रेशन ही अमेरिकेतील शासकीय मालकीच्या इमारतींचे व्यवस्थापन आणि देखभाल करणारी एक स्वायत्त संस्था आहे. इमारतींमध्ये दिवसाचा उजेड अधिक पडेल असे काही बदल त्यांनी केले. त्यामुळे तेथे काम करणार्या कर्मचार्यांचे भले होते आहे - असे या संस्थेच्या अधिकार्यांना दाखवायचे होते, म्हणून त्याबाबत त्यांनी अभ्यास सुरू केला.त्यांनी सुरुवातीला प्रकाशाच्या तीव्रतेची पाहणी केली. त्याचे निष्कर्ष फारसे आशादायक नव्हते. खिडक्यांपासून फारतर सव्वा-दीड मीटर अंतरापर्यंत प्रकाश चांगला होता. त्या आतील भागात प्रकाशाची तीव्रता कमी झालेली आढळली. पण जेव्हा ऑफिसच्या कामगारांच्या झोपेची तुलना केली, तेव्हा त्यांना आढळले की ज्या दिवशी कर्मचार्यांनी खिडकीजवळ बसून काम केले किंवा दुपारच्या जेवणाच्या वेळेस बाहेर उजेडात त्यांचा वावर झाला, त्या रात्नी त्या कर्मचार्यांना छान झोप लागली आणि आतल्या भागात काम करणार्या कर्मचार्यांपेक्षा ते जास्त काळ गाढ झोपले. अधिक उजेडात काम करणार्या कर्मचार्यांना रात्नीची झोप येण्यास सरासरीने 18 मिनिटांचा कालावधी लागला तसेच त्यांना सुमारे 20 मिनिटांपर्यंत अधिक झोप लागली. झोपेत व्यत्यय येण्याचे त्यांचे प्रमाणही कमी होते, तर त्याच काळात कमी उजेडात काम करणार्या कर्मचार्यांना रात्नीची झोप येण्यासाठी 45 मिनिटांचा कालावधी लागला होता.दिवसाच्या उजेडाचे इतरही फायदे आहेत. दिवसाच्या उजेडातला वावर अधिक असणार्या कर्मचार्यांमध्ये निराशा असण्याचे प्रमाण कमी आढळले. अन्य पाहण्यांशी सुसंगत असे हे निरीक्षण आहे. सकाळच्या लख्ख प्रकाशात राहणार्यांना - ऋतुबदलामुळे होणारे त्नास आणि नैराश्याचे अन्य प्रकार यांना तोंड देणे सोपे जाते.आणखी एक मुद्दा म्हणजे सतर्कता. 2017मध्ये र्जमनीमध्ये झालेल्या एका अभ्यासात आढळले की, सकाळी प्रखर प्रकाशात वावरल्यावर लोकांची चपळता वाढली आणि प्रकाश काहीसा मंद झाला तरी चपळता दिवसभर उच्च पातळीवर राखली गेली. झोपी जाण्यासाठी बिछान्यावर पडण्याआधी त्यांना निळ्या प्रकाशात राहावे लागले तरी त्यांच्या शरीरातील जैविक चक्र ांच्या चलनवलनात बदल झाला नाही. बर्लिनमधील शिरते विद्यापीठाच्या इस्पितळात काम करणारे संशोधक डिटर कुंझ म्हणतात, ‘संध्याकालीन उदास प्रकाशाचा प्रभाव शरीरावर किती होणार हे आपल्याला मिळणार्या दिवसाच्या प्रकाशमानावर अवलंबून असते.’ आपल्यासाठीही ‘पहाटेचा सूर्यप्रकाश अंगावर घेणे’ हा एक चांगला विचार आहे. तथापि, आरोग्य अनुकूलनासाठी दिवसाचा प्रकाश किती प्रमाणात आवश्यक आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. आपल्याला जे साध्य करायचे आहे त्यानुसार दिवसाच्या प्रकाशाचे प्रमाण भिन्न असू शकते. फिग्युइरॉ या शास्रज्ञाच्या मते - आपली शारीरिक प्रणाली नियमित ठेवण्यासाठी सकाळी अध्र्या तासात मिळणारा लख्ख उजेड पुरेसा ठरू शकतो. पण दिवसभर तरतरी हवी असेल तर आपल्याला लख्ख प्रकाशात वावरायची आवश्यकता असू शकते.बाहेर मोकळ्यावरच्या उजेडात कमी वेळ घालवणे आणि मंद कृत्रिम प्रकाशात जास्त वेळ रहाणे यामुळे आपल्या शरीराच्या अंतर्गत क्रि या अनियमित होत आहेत आणि आपल्या आरोग्याची प्रत खालावत आहे. जेव्हा तुम्ही केवळ कृत्रिम प्रकाशित तळघरात राहाता, तेव्हा तुम्ही काहीतरी गमावत असता, सर्वच - भावनिक, शारीरिक आणि मानसिक गोष्टी यात येतात. एकंदरित सार्या अभ्यासावरून आणि एक मूलभूत तत्त्व म्हणून, आपण दिवस अधिक प्रकाशमान आणि रात्न गर्द अंधारी मिळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपण अशा ग्रहावर उत्क्रांत झालो; जेथे अंधार आणि उजेडाचे चक्र 24 तासांचे आहे. त्याच्याशी पुन्हा जुळवून घेण्याची वेळ आली आहे.
आयुष्यात ‘प्रकाश’ येऊ द्या.दिवसा प्रकाश तेजस्वी आणि निळसर-पांढरा असावा. नैसर्गिक प्रकाश सर्वात चांगला. जागे होण्याची वेळ नियमितपणे पाळा आणि जागे होताच पडदे उघडा. आपल्या घराच्या सर्वाधिक प्रकाशित, ऊन येणार्या जागी किंवा घराबाहेर मोकळ्यावर न्याहरी करा. शक्य असेल तेव्हा चाला किंवा सायकल वापरा. आपली बैठक खिडकीच्या लगत किंवा जेथे व्यविस्थत लख्ख उजेड येतो तेथे ठेवण्याचा प्रघात ठेवा. शक्य तितके उन्हात वावरा, अर्थात त्वचेला नुकसान होणार नाही याची सावधगिरी बाळगा. व्यायाम चार भिंतीआड करण्यापेक्षा शक्य तेवढा उघड्यावर करा. संध्याकाळी प्रकाश मंद आणि उबदार रंगांचा असावा. उंचावरच्या प्रखर दिव्याऐवजी टेबललॅम्प वापरा. उबदार रंगांचा प्रकाश देणार्या दिव्यांचा वापर करा किंवा कमीजास्त करता येण्याजोग्या, रंगबदल शक्य असणार्या प्रकाश योजनेमध्ये गुंतवणूक करा. आपल्या शरीराचे ऐका आणि जेव्हा तुम्हाला झोप येऊ लागते तेव्हा झोपायला जा. रस्त्यावरच्या दिव्यांमधून येणारा प्रकाश अडवण्याची व्यवस्था करा.‘काचेच्या’ घरांतली माणसं !काही संशोधक काचेच्या घरातल्या लोकांच्या संशोधनाबद्दल जरा जास्त आग्रही आहेत. पीटरसन आणि अन्य बारा जणांनी उत्स्फूर्तपणे डच बेटावर खास बनवलेल्या काचेच्या घरात तीन रात्नी घालवल्या. यामुळे त्यांना रात्नंदिनाच्या चोवीस तासाच्या अंधार आणि उजेडाच्या चक्राला पूर्णपणे सामोरे जावे लागले. हा कालावधी शरद ऋतू आणि वसंत ऋतू यांच्या दरम्यानचा होता; जेव्हा दिवसाचा प्रकाश व रात्नीचा अंधार यांचा कालावधी अंदाजे समसमान असतो. वाल्फ यांनी या अभ्यासाचे नेतृत्व केले. त्यांना असे आढळले की काचेच्या घरामध्ये झोपलेल्यांमध्ये सकाळ-विषयक सतर्कता अधिक प्रमाणात दिसून आली. तसेच, ज्या मेलाटोनिन द्रव्यामुळे शरीराला रात्नीची जाणीव करून दिली जाते त्या मेलाटोनिनच्या पातळीतील घट सकाळी सरासरी 26 मिनिटे आधी झाल्याचे आढळून आले. झुंजुमुंजु प्रकाशाने त्यांच्या झोपण्याच्या अंतिम टप्प्यात केलेल्या प्रवेशामुळे असे झाले असावे. ‘पहाटेच्या वेळी हळूहळू वाढत जाणार्या प्रकाशामुळे मेंदूतील मज्जारसायने हळुवारपणे चढत्या भाजणीने निर्माण झाली’, असे वॉल्फ म्हणतात. (पूर्वार्ध)(लेखक मराठी विज्ञान परिषदेच्या पुणे शाखेचे अध्यक्ष आहेत.)Vinay.ramaraghunath@gmail.com(संदर्भ - ‘न्यू सायंटिस्ट’मधील लिंडा गेडेस यांचा लेख)